ऐकून जरा नवल वाटलं का..? नाही..परत वाचू नका..योग्य तेच वाचलत.. हो..अन्नपूर्णेश्वर!
जन्माला आल्यापासून सर्वसाधारणपणे आपण कायम अन्नपूर्णा म्हंटलं की आई, आजी, काकू, मामी, आत्या, ताई इत्यादी इत्यादी अशा बायकांनाच बघत असतो..आणि मग जरा मोठं झाल्यावर, बाहेर पडायला लागल्यावर, इडियट बॉक्स नामक यंत्र वापरल्यावर आपली ओळख होते ती या अन्नपूर्णेश्वरांशी! म्हणजेच थोडक्यात स्वयंपाक करणाऱ्या पुरुषांशी!
अगदी मोजक्या काही घरांचं उदाहरण वगळता तसं बघायला गेलं तर पुरुष स्वयंपाक करत नसतात..किंवा माझ्या लहानपणी तरी असं चित्र दिसलं तर ते पाप समजलं जायचं! असो! हल्ली जरा चित्र बदलताना दिसतं आहे ( टचवुड ;) ) तर..मूळ मुद्द्याकडे येताना..घरात पुरुष किती काम करतात ते जाऊदे, पण बाहेर खाण्याची वेळ येते तेव्हा समस्त खाबूमोशाय अर्थात खाद्यप्रेमी वर्ग पसंती देतो ती पुरुष आचाऱ्यांना..अर्थातच पुन्हा पुरुष प्रधान संस्कृतीच कारणीभूत असू शकते कारण बायकांनी बाहेर जाऊन 'असलं' काही केलं की घरचा उद्धार वगैरे वगैरे..असो..आपल्याला त्यात पडायचंच नाही!
आपल्याकडे पूर्वीपासून स्वयंपाक कसा चांगला होतो याचं एक रसायन सांगितलं जातं…ती थियरी म्हणजे 'माँ का प्यार!'
अर्थात प्रेमाने, ममत्वाने स्वयंपाक केला आणि नुसता केला नाही तर तितक्याच प्रेमाने खाऊ घातला की तो चविष्टच असतो ही आपली संस्कृती…आणि अर्थात ममत्व पुन्हा साधारणतः महिलांशीच निगडित..तर ह्याच भावनेच्या संदर्भाने अन्नपूर्णेश्वरांचे तीन प्रकार पडतात…
आता काही वेळेला विक्रेते असतात ते घरुन जिन्नस आणून मग विकतात..उदा. इडली वडा विकणारे अन्ना..तर दुसरा प्रकार म्हणजे स्वतः बनवून विकणारे..इथेही उदा. अन्नाच असू शकतो पण तो डोश्याची गाडी लावणारा..
तर अन्नपूर्णेश्वरांचे तीन प्रकार असे!
पहिला प्रकार म्हणजे प्रेमाने खायला घालणारे..
लहानपणी शाळेच्या बाहेर एक वडापाववाला असायचा..बाबू..शाळा सुटली रे सुटली की त्याच्याकडे अलोट गर्दी असायची..हा बाबू म्हणजे पहिल्या प्रकारात मोडणारा..प्रेमाने खायला घालणारा…कितीही गर्दीत मी गेले तर फक्त चेहरा बघून चटणीने ओसंडून वाहणारा भजी पाव हातात..त्याला बरोब्बर माहिती असायचं मला ती चटणी फार आवडते..! दुसरं उदाहरण म्हणजे
हल्ली सकाळच्या कॉलेजला जाताना स्टेशनजवळ एका अन्नाकडे खाणं होतं…हा सुद्धा पहिल्या प्रकारात मोडणारा बरं का..
सुगरण गृहिणीचं जेवणाऱ्या माणसाच्या ताटाकडे बरोब्बर लक्ष असतं…पानातला जिन्नस संपायच्या आत तो ताटात वाढुन मोकळ्या होतात..तसच या अन्नाचं बरोब्बर लक्ष असतं..ताटातली चटणी संपली की आपण त्याच्याकडे बघायची खोटी..वाढून मोकळा..ती सुद्धा हिरवी हवी की लाल हवी आणि कुठली किती हवी ते
ही त्याला बरोब्बर कळतं..कसं देव जाणे!
तर हे असे प्रेमाने वाढणारे अन्नपूर्णेश्वर प्रकार एक!
दुसरा प्रकार म्हणजे आवडीने व्यवसाय करणारे..
म्हणजे आवडीने इंजिनियरिंग करणाऱ्या मुलांसारखं म्हंटलं तर वावगं ठरू नये! ह्या प्रकारातले लोक मेहनती असतातच पण ते स्वतःच्या व्यवसायाला कमी किंवा तुच्छ अजिबात लेखत नाहीत..आहे त्यात अगदी आनंदी असतात..!
आमच्याकडे खूप वर्षांपासून घराजवळच्या एका गल्लीत एक शेवपुरीवाला भय्या संध्याकाळी गाडी लावतो..गाडी म्हणजे तरी काय..एक स्टँड आणि त्यावर पाणीपुरीची पुरी वरून थोडी फोडली आणि उभी ठेवली की जशी दिसेल तसं दिसणार भांड, ज्यात त्याची सगळी सामग्री कशी काय बुवा मावते हा गहन प्रश्नच आहे!
तर हा भय्या म्हणजे एकदम मस्त..गप्पा वगैरे मारत शेवपुरी बनवणारा..ग्राहकाला आपलंसं करण्याची कला त्याला बरोब्बर अवगत आहे..आणि शेवपुरही भारी असते त्याची, पण क्वचित कधी बिघडलीच तर आम्हीही असुदे..कधीतरी होतंच, आपलाच भय्या आहे, असा विचार करून तीही आनंदाने खातो हे त्याचं यश!
तर हा अन्नपूर्णेश्वर दुसऱ्या प्रकारात मोडणारा!
आणि तिसरा प्रकार म्हणजे 'आलिया भोगासी असावे सादर' असं म्हणत पैशासाठी शुद्ध भाषेत 'धंदा' करणारे लोक, मूलखाचे अरसिक किंवा परिस्थितीपुढे हतबल..!
आमच्या स्टेशनजवळ एक छोटं हॉटेल आहे..आणि बाहेर त्यांचाच पाणीपुरीचा स्टॉल आहे..आता ही पाणीपुरी म्हणजे खास असते..मुंबई स्पेशल थंड पाणीपुरी! आत जाऊन कुपन घेऊन यायचं आणि बाहेर भय्याला द्यायचं..मग तो अष्टकोनी चेहऱ्याने ते घेणार, आपल्याला द्रोण देणार आणि पुन्हा 'काय कटकट आहे' असा चेहरा करून हातात प्लॅस्टिकचे ग्लोव्हज घालून पाणीपुरी द्यायला लागणार…याच्याकडे आल्यावर पाणीपुरीचा मुख्य सिद्धांत खोटा आहे याचा मला साक्षात्कार झाला..ओळखा बरं कुठला..?
भय्याने आपले स्वच्छ-सुंदर हात तिखट पाण्यात बुडवल्याशिवाय पाणीपुरीला चव येत नाही हा!
अप्रतिम चव असते..फक्त त्या भय्याच्या तोंडाकडे न बघता खायचं..तरच!
तर असा हा तिसरा औरंगजेब प्रकार!
म्हणजे एखाद्याला संगीत कळत नसेल तर तो संगीतातील औरंगजेब मानला जातो..तसंच हे खाद्यविश्वातील औरंगजेब म्हणायला हरकत नाही..!
काही ठिकाणी टू-इन-वन पण दिसतं बरं का..मग ते १-२, १-३ किंवा २-३ असं कुठलंही कॉम्बिनेशन असू शकतं!
उदाहरणार्थ..
म्हणजे मालक असतो प्रेमाने खायला घालणारा आणि कामाला असलेला माणूस चौकोनी चेहऱ्याचा..
आमच्याकडे एक भजीची गाडी आहे..राजू भय्याची...तो स्वतः तळणीवर असतो आणि कामाला ठेवलेला मुलगा ऑर्डर बांधून देत असतो..मग गेल्या गेल्या कांदाभजी गरम नाही दिसत, आता काढणार आहात का? सँडविच गरम आहे का? इत्यादी प्रश्न राजुभय्याला विचारून ऑर्डर सांगितली की भय्या तसं त्या माणसाला खुणावतात आणि तो साधारण 'साला इतक्या गर्मीत ह्या वाफा घेत उभं रहायचं आणि त्यात ह्यांची नाटकं' असंच मनातल्या मनात म्हणत असणार अशी आपल्याला खात्रीच व्हावी, इतके समर्पक हावभाव करून ऑर्डर बांधून देतो!
तर असे हे माझ्या निरीक्षणातून आलेले तीन प्रकार..पुढच्यावेळी बाहेर खायला गेलात की नक्की निरीक्षण करुन बघा..नक्की कुठल्या कॅटेगरीत बसतो विक्रेता..की कॉम्बिनेशन असतं..की ह्या सगळ्या व्यतिरिक्तही प्रकार आहेत..वेळ मजेत जाईल आणि खाण्याचा आनंद द्विगुणित होईल..!
तूर्तास थांबते!
खाद्य धर्म, आद्य धर्म…अन्नपूर्णेश्वर सुखी भव!
- कांचन लेले