Showing posts with label कथा - क्षण. Show all posts
Showing posts with label कथा - क्षण. Show all posts

Wednesday, 4 January 2017

क्षण.. (भाग ४)

भाग ४

दुसऱ्या दिवशी सकाळी उशिराच जाग आली..डोक्यात विचार होतेच पण आता विचार करायला वेळ नव्हता..घरातली कामं उरकून ऑफिस गाठायचं होतं...कसे दिवस सरले कळलंच नाही..अख्खा आठवडा ऑफिस आणि कार्यक्रमाच्या तयारीच्या गडबडीत गेला..

आणि रविवारचा दिवस उजाडला..सकाळीच आईचा फोन आला..आई-बाबा गावाला गेले असल्याने कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हते..आईने नेहेमीप्रमाणे सूचना दिल्या आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या..खरंतर आपला पहिलाच मोठा कार्यक्रम आणि आई-बाबा तो बघायला नाहीत ह्याचं तिला खूप वाईट वाटत होतं..तिच्या गुरु, म्हणजेच दीदीसुद्धा येऊ शकणार नव्हत्या..खरंतर त्यांचीच जागा घेतली होती तिने ह्या कार्यक्रमात..आता त्यांचं नाव राखणं तिच्या हातात होतं…अजयचं टेन्शन होतंच..पण त्याहीपेक्षा कार्यक्रमाचं टेन्शन जास्ती होतं..

अजय तरी कार्यक्रमाला येईल..?
छे..त्याला तर कुठल्याच कला प्रकारची आवड नव्हती…त्याचा फोनही आला नव्हता..कदाचित कार्यक्रमानंतरच बाहेर भेटेल...

तिने भराभर तयारी केली..आणि देवासमोर हात जोडले..मनोमनच तिने देवाला 'आता तू बुद्धी देशील तसं...मला काय करावं  काही समजत नाही..' असं विनवलं..व ती कार्यक्रमासाठी बाहेर पडली..

कार्यक्रम सुरु होणार होता..पण तिचं मन लागत नव्हतं..इतक्या गर्दीत पण तिला कमालीचं एकटं वाटत होतं..तिने रंगमंचाला वंदन केलं आणि पाहिलं पाऊल टाकलं..पडदा बंदच होता..ती रंगमंचाच्या मधोमध उभी होती..
निवेदकाने नाव घोषित केलं..टाळ्यांच्या कडकडाटात पडदा उघडला..

अचानक दिसलेल्या त्या गर्दीची भीतीच वाटली तिला…एरवी छोटे-मोठे कार्यक्रम केले असले तरी तेव्हा कायम पाठीशी दीदी आणि समोर आई बाबा असायचे…तिच्या पायातील सगळी ताकद गेल्यासारखी वाटत होती..तिला पळून जावसं वाटत होतं…इतक्यात..तेच दोन डोळे दिसले..ओळखीचे…आपलेसे वाटणारे..
स्मित करणारे..आत्मविश्वास देणारे..

अजय एका कोपऱ्यात उभा होता..
तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य विलसलं आणि तिचे पाय थिरकू लागले…तिने सुरवातच केली ती मागे वळून न बघण्यासाठी..बेभान होऊन नृत्याविष्कार सादर केला आणि पुन्हा एकदा दुप्पट टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला…

अनन्या स्टेजवरच खाली बसली... क्षणात तिचा सूर तिला गवसला होता..डोळे भरुन आले होते…खूप शांत वाटत होतं..एका वेगळ्याच दुनियेत पोहोचली होती ती..
पण सहकालाकारांनी तिच्या भोवती गराडा घातला आणि ती पुन्हा वास्तवात आली..सगळ्यांना भेटून ग्रीन रूम मध्ये गेली..पहिला मोबाईल बघितला..अजयचा मेसेज होता..
'भारावून टाकलंस..fantastic!
मी खाली गेट जवळ थांबतो आहे..take your own time!'
तिने चार वेळा तो मेसेज वाचला...मोबाईल ठेवला आणि पटकन आवरायला गेली..
मेकअप काढून-कपडे बदलून आवरायला तिला सहाजिकच वेळ लागला..बाहेर आली तर सगळे ग्रुप फोटो साठी थांबलेच होते..सगळं होऊन खाली यायला तिला एक-दीड तास लागला..
आता मात्र तिला भीती वाटली..अजय चांगलाच रागावला असेल..थांबला तरी असेल ना..? आपण खूपच वेळ लावला..

ती धावतच गेट पाशी आली..
तिथे कोणीच नव्हतं..इतक्यात पाठीमागे पावलं वाजली..ती गर्रकन वळली..आणि समोर अजय दत्त म्हणून उभा..प्रसन्न चेहऱ्याने..!
कितीतरी वेळ दोघे नजरेनेच संवाद साधत होते..
शेवटी अजय म्हणाला..
'भूक लागली असेल ना..?..चल..'
तीसुद्धा निमूटपणे त्याच्याबरोबर चालू लागली..
दोघे एका रेस्तराँ मध्ये गेले..
आणि मेनू कार्ड उचलायला तिने हात पुढे केला असता तो सहज म्हणाला..
'अजूनही मलई कोफ्ताच आवडत असेल ना…?'
तिने चमकून त्याच्याकडे बघितलं..तो हसला आणि
त्याने वेटरला बोलावून ऑर्डर दिली..
ती त्याला निरखून बघत होती..आजही त्याने तिचा आवडता लेमन येल्लो कलरचा शर्ट घातला होता..त्याचा हात सहज फ्रेंच कट वरुन फिरला आणि ती म्हणाली..
'अजूनही अमिताभच आवडत असेल ना..?…'
ह्यावर मात्र दोघेही खळखळून हसले…
ती बोलून गेली…'काहीच बदललं नाही रे..'
क्षणात त्याचं खिन्न उत्तर आलं..
'नाही गं..आयुष्याचं गणितच बदललं आहे..
तेवढ्यात वेटरने जेवण आणलं..सर्व्ह केलं..आणि निघून गेला..
तिची प्रश्नार्थक नजर तशीच होती..त्याला उत्तर म्हणून तो बोलू लागला..
'अनन्या..खूप दिवसांपासून तुला सांगायचं होतं..
आई-बाबांचा डिव्होर्स झाला..आज एक वर्ष झालं..
तुला तेव्हाच सांगायचं होतं..पण…पण..नाही जमलं..
दोघांमध्ये एकाची निवड करता नाही आली…म्हणून मग एकटा रहायला लागलो..आणि आता तो एकटेपणा आणि आठवणी सहन होत नाहीत म्हणून दुबईला चाललो आहे..आयुष्य आपल्यासाठी थांबत नसतं ना गं..तुझ्याच भाषेत सांगायचं तर..
The show must go on!…आज तुझा परफॉर्मन्स बघून खूप छान वाटलं..तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असाच अखंड राहूदे..!'

भावनाविवश झालेला अजय पहिल्यांदाच बघत होती ती…तिच्या डोळ्यात पाणी आलं…ते बघून अजयने सावरलं स्वतःला..
'अगं वेडे तू कशाला वाईट वाटून घेतेस..? मी पण काय वेड्यासारखं तुला सेंटी करतोय..आज तुझा दिवस आहे..! Lets celebrate!'
दोघे जेवू लागले..इतर बऱ्याच गप्पा झाल्या..पण त्याने विषय काढला नाही..
जेवण झालं..दोघे निघाले..बराच उशीर झाला होता..तो तिला त्याच्या गाडीतून घरी सोडणार होता…गाडीतही तो विशेष काही बोलला नाही..ती मात्र तो आत्ता विचारेल..मग विचारेल म्हणून वाट बघत होती..
ते तिच्या घरापाशी आले..त्याने गाडी बाजूला उभी केली..दोघे खाली उतरले..

तिला काय बोलावं कळत नव्हतं..इतक्यात त्याने तिचा हात हातात घेतला....
'अनन्या…thank you so much तू आज भेटलीस..
मी परत येईन न येईन..माहित नाही..काहीच ठरवलेलं नाही..
पण तुला भेटल्याशिवाय जाऊच शकलो नसतो...मी तुला बराच त्रास दिला..त्यासाठी खरंच सॉरी…मुद्दाम नाही केलं गं पण..नशिबातच नव्हतं…आता तर आई-बाबांचं बघून एकटंच रहायचं ठरवलं..
शायद..शायद..तुम किसी और के लियेही बनी हो..!'
त्याने पटकन तिचा हात सोडला..
'बराच उशीर झालाय..निघ तू..thanks once again..आणि All the best for your future…!'
इतकं बोलून तो वळला आणि गाडीकडे चालू लागला..
तिचा सगळा आनंद विरुन गेला..क्षणा क्षणात त्याची पावलं त्याला तिच्यापासून दूर घेऊन जात होती..ती भानावर आली..हाक मारायला सुद्धा घशातून आवाज फुटत नव्हता…तरी तिच्या मनाने घातलेली साद ऐकूनच जणू त्याने मागे वळून बघितलं..ती त्याच्या दिशेने चालू लागली...आणि त्याच्यासमोर उभी राहिली..नजरेला नजर भिडली..
दोघांचे डोळे भरुन आले..आणि तिचा आवाज कानांवर पडला..

'उगाच मला दुसऱ्याच्या गळ्यात मारायचं काम नाही..!'
इतकं बोलून तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं..

काय होतंय हे क्षणभर त्याला कळलंच नाही..कानांवर विश्वास बसत नव्हता..पण डोळे तरी खोटं नाही बोलणार..हे दृश्य बदलू नये म्हणून ते साठवत त्याने डोळे घट्ट मिटले…
तिला त्याच्या ह्रदयाचे वाढलेले ठोके स्पष्ट जाणवत होते..तिचीही अवस्था वेगळी नव्हतीच....अनेक दिवसाचं साठवून तुडुंब भरलेलं मन मोकळं होत होतं आणि
तिच्या डोळ्यातील अश्रू आवडत्या लेमन कलरला गडद करत होते….

समाप्त

-कांचन लेले

क्षण.. (भाग ३)

भाग ३

घरातली कामं आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करुन अनन्या झोपायला गेली..पण काही केल्या झोप लागत नव्हती..ह्या कुशीवरून त्या कुशीवर असं सारखं चालू होतं.. तिला आठवत होता कॉलेजमधला अजय.. देखणा, हुशार पण रागीट आणि जssरा ताठ.. लोकांना वाटायचं श्रीमंत घरचा आहे म्हणून आखडतो..पण तिने त्याला ओळखलं होतं..त्याला एकटं किंवा ठराविक माणसांमध्येच रहायला आवडायचं..कदाचित तो तश्याच वातावरणात वाढला होता म्हणून असेल..कोणी हस्तक्षेप केला, जास्ती जवळीक साधायचा प्रयत्न केला तर साहेबांचा पारा चढलाच..आणि ह्या अगदी उलट होती अनन्या.. पाण्यात साखर विरघळावी तशी मिसळायची कोणातही.. जssरा हट्टी ती सुद्धा होतीच..एकुलती एक होती ना..पण अतिशय लाघवी होती..
तिचं आणि अजयचं ट्युनिंग कधी जमून गेलं कळलंच नाही तिला..

अजयने तिला पहिल्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा ते फर्स्ट इयर ला होते..तेव्हा तिने 'मला एवढ्यात ह्या सगळ्यात पडायचं नाही' असं म्हणून बोळवण केली होती त्याची..त्यानेही निमूटपणे ऐकलं आणि वाट बघितली होती…मग दुसऱ्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा तिचं ग्रॅज्युएशन होऊन तिने MCom ला ऍडमिशन घेतली होती..
तेव्हा तिने त्याला सरळच सांगितलं की 'मला फक्त तू एक चांगला मित्र म्हणून आवडतोस..'

अनन्याला सगळ्यांपेक्षा वेगळं मानणाऱ्या अजयला हे चोथा झालेलं उत्तर फारच अनपेक्षित होतं..त्याला खूप राग आला..पण प्रेमच इतकं होतं की तो राग तिच्यावर काढू शकला नाही..तो नकळत तिच्यापासून दुरावला..
तेव्हापासून त्यांचं बोलणं कमी झालं होतं..भेटणं तर दूरच..

अनन्याने परत कूस बदलली..झोप येत नव्हतीच..डोळे घट्ट मिटून घेतले ..पण व्यर्थ..बंद डोळ्यांसमोरही अजयचाच चेहरा येत होता..
परत चक्र फिरु लागली..

इजा-बिजा केव्हाच झाला होता..आता तिजा पण तसाच करावा लागणार का…?
तिला अजयला परत दुखावण्याचा विचारच सहन नाही झाला..
तो खरंच एक चांगला मुलगा होता..खरंतर तिला कळायचंच नाही तो तिच्या प्रेमात कसा पडला..कारण तसं बघायला गेलं तर सगळ्याच बाबतीत तो उजवा होता..अगदी दिसण्यापासून हुशारीपर्यंत..
नाकारण्यासारखं त्यात काही नव्हतंच…पण मग का तिने त्याला दोनदा नकार दिला…?
कारण एवढंच कि सगळं चांगलं आहे म्हणून होकार देण्यात तिला काहीच अर्थ वाटत नव्हता..

क्रमशः

-कांचन लेले

क्षण.. (भाग २)

भाग २

परत फोन करावा कि न करावा अशा संभ्रमात असतानाच बस आली..तिने पटकन फोन पर्स मध्ये टाकला आणि गर्दीत सामावून गेली.. डोक्यात मात्र 'कशाला बरं फोन केला असेल अजयने..?' हेच होतं.. तेवढ्यात तंद्री भंग करायला कंडक्टर आला..तिने तिकीट काढलं आणि परत विचार करण्यात मग्न झाली..
अजय आणि अनन्या खूप चांगले मित्र असूनही फोनवर फार बोलणं व्हायचं नाही..बोलणं खूप व्हायचं ते आधी मेसेजवर, मग whatsapp किंवा फेसबुक वर..कॉलेजमध्ये असेपर्यंत भेटायचे पण त्या नंतर मुद्दाम असे एक-दोनदाच भेटले होते ते..दोन वर्षं झाली असावीत शेवटच्या भेटीला..तिलाही नीटसं आठवेना..
हल्ली बरेच दिवसात बोलणंच झालं नव्हतं..दोघांचेही कामाचे व्याप वाढले होते, जबाबदारी वाढली होती आणि सहाजिकपणे स्वतःसाठी वेळ कमीच मिळायचा..

तिचा स्टॉप आल्यावर ती उतरली आणि घराकडे चालू लागली..
घरी पोहोचते न पोहोचते तोच अजयचा मेसेज आला..
'Hi..क्लास घेत होतीस का गं..?
Free झालीस कि फोन कर..थोडं महत्वाचं आहे.. :) '
तिला आपल्या श्वासाची लय वाढल्यासारखी वाटली.. 'महत्वाचं' म्हणजे काय ह्याचा तिला पूर्ण अंदाज होताच..
तिला काही सुचेनासं झालं..पण फोन तर कधीतरी करावाच लागणार होता..काय व्हायचं ते एकदाच होउदे असा विचार करुन तिने त्याला फोन लावला..
'Hi अनन्या..कशी आहेस..?'
त्याचा आवाज ऐकताच तिच्या पोटात गोळा आला होता..पण आवाज स्थिर ठेवत ती बोलू लागली..
'मी छान..तू कसा आहेस..? आज माझी आठवण कशी काढलीस..?'
'तुझी आठवण रोजच येते गं..'
दोन सेकंदाचा सस्पेन्स पॉझ..सावरुन घेत अजय पुन्हा म्हणाला
'अगं तुला सांगायचं होतं की माझं प्रोमोशन झालंय..आणि मला दुबईच्या ऑफिसला जॉईन व्हायचं आहे..'
तिला इतकं हायसं वाटलं..हे महत्त्वाचं होतं तर..
'अरे वाह..अभिनंदन..! कधी जाणार आहेस..?'
'दहा दिवसांनी..बुधवारचं फ्लाईट आहे..'
'अच्छा..मस्त रे..आई-बाबा खुश असतील ना..?'
'हो.. अगं मी काय म्हणत होतो…अ..जायच्या आधी मला एकदा भेटायचं होतं तुला..'
तिला परत धडधडू लागलं..पहिलाच अंदाज बरोबर होता तर..आता काय करु..?
इकडे त्याला मध्ये गेलेली दोन सेकंद सुद्धा तासासारखी वाटत होती..
शेवटी आला तिचा आवाज..
'अ…चालेल ना..भेटूया..'
'तुला पुढच्या रविवारी वेळ आहे का..? कारण मी आठवडाभर पुण्याला जाणार आहे..काही कामं पेंडिंग आहेत ती संपवायची आहेत..'
'अरे..पुढच्या रविवारी संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे MG theatreला..कथ्थकचा..सो सॉरी..'
'हो का…? मग…अ…हरकत नाही..मी येईन..
कार्यक्रम झाला की भेटू..चालेल..?'
'बरं..चालेल..'
'Done मग..मला कार्यक्रमाच्या डिटेल्स मेसेज करशील प्लिज..? मी करेनच तुला शनिवारी फोन..तरी..'
'हो..चालेल..नंतर बोलूया..? जस्ट घरी पोहोचले आहे रे...'
'हो हो…नो प्रॉब्लेम..बाय..!'

ओठांवर आलेला होकार आणि मनात असलेला नकार ह्यांची बेरीज वजाबाकी करत अनन्या कामाला लागली..

क्रमशः

- कांचन लेले 

क्षण.. (भाग १)

भाग १..
"Thank you ताई..bye..!!"
"Bye, नीट जा हा.."
मुलं निघाली..क्लास संपला होता आणि म्हणजेच रविवारचा हक्काचा सुट्टीचा दिवसही संपत आला होता.. अनन्याने विचार झटकले, बांधलेली ओढणी सोडून नीट घेतली, पर्स घेतली आणि क्लासच्या खोलीला कुलूप लावून चावी वॉचमन काकांकडे दिली आणि ती निघाली..

अनन्या..एक मध्यमवर्गीय घरातील आई वडिलांची एकुलतीएक लाडकी लेक.. नाकी डोळी सुंदर..रंग सावळा..सडपातळ बांधा आणि त्याला साजेल अशी मध्यम उंची.. 

अभ्यासात बऱ्यापैकी असायची अनन्या, तिने BCom आणि नंतर MCom केलं व बँकेत नोकरीला लागली पण तिचा विशेष गूण म्हणजे नृत्य..! लहानपणापासूनच कथ्थक शिकली आणि त्यात यंदा विशारद  झाली.. ऑफिस सांभाळून शनिवार-रविवारी ती मुलांना कथ्थक शिकवत असे.. पाय थिरकू लागले की एका वेगळ्याच जगात जायची ती..तिचा बोलका चेहरा सगळ्या भावना पोहोचवायचा आणि तिचा सावळा रंग चेहरा खुलवायचा…

अनन्याने घरचा रस्ता धरला  होता..मध्येच फोन वाजला..अजयचं नाव बघताच क्षणभर ती रेंगाळली...
अजय..अनन्याचा मित्र..तसं म्हंटलं तर जवळचा मित्र..शाळा-कॉलेजपासूनचा..श्रीमंत घरचा पण त्याचा कधी माज न करणारा..
CS करुन एका चांगल्या कंपनीत जॉब करत होता..
अनन्या त्याला जवळचा मित्र मानायची, होताच तो..! पण तो तिला त्यापलीकडे पाहायचा..अगदी कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून प्रेमात होता तो तिच्या..

फोन वाजून वाजून बंद झाला आणि अनन्या भानावर आली..
क्रमशः

- कांचन लेले

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...