Thursday, 3 August 2017

श्वास...

अंधार…
गडद अंधार…
काळा रंग…
भोवळ येण्याइतका जर्द काळा..
अस्तित्वाची जाणीव हळू हळू होऊ लागली होती..
डोळे किलकिले होत होते.. त्यातूनही अंधारच दिसत होता..
मग हळू हळू आवाज कानी येऊ लागले..
सुरवातीला बारीक..मग थोडा मोठा एकसारखा आवाज 'कींssss' फोन बिघडल्यावर येतो तसा…मग आणखी मोठा झाला..
दिसत काहीच नव्हतं…
अंधार..
गडद अंधार..
सगळं असहाय्य होऊन मी जोरात ओरडलो..
क्षणभर थांबलो, मला जाणवलं मी ओरडल्याचा आवाजही नाही आला मला… मी पुन्हा ओरडलो.. जिवाच्या आकांताने..
तरी तेच… मग काही वेळ असाच गेला..
डोळे मिटून पडून राहिलो..
मिटले काय, उघडले काय..? दिसत होता अंधारच…
आणि हळू हळू पुन्हा तोच आवाज 'कींSSS'..
हळू हळू मोठा होणारा..
पुन्हा डोळे किलकिले..ह्या वेळी मात्र दिसणाऱ्या रंगात थोडा बदल..
काळा रंग हळू हळू नाहीसा होत होता..
'कीं SS' चा आवाजही हळूहळू कमी होत होता..
मी पुन्हा जोरात ओरडलो.. संयम मुळातच नव्हता माझ्या अंगी..पण जरा थांबलो असतो तर चित्र स्पष्ट झालं असतं..पण नाही..
ओरडलो..
ह्या वेळी माझा आवाज मला आला..
पण, हा आवाज माझ्यासारखा वाटणारा, पण माझा नव्हता! ओरडण्याचाही नव्हता..
रडण्याचा होता… माझ्या वडिलांचा होता…
ह्या विचाराने मनावर काटा आला… अंगावर येणं शक्य नव्हतं..
एव्हाना अंधार नाहीसा झाला आणि उजेड केव्हा आला कळलंच नाही.. उजेड नाही..
पांढरा रंग..
पुन्हा तसाच.. गडद..
आणखी पांढरा होत जाणार…
जर्द पांढरा…
हळू हळू पूर्ण पांढरं असणारं चित्र धूसर होत गेलं.. आणि दिसू लागल्या आकृती..
पांढरा रंग कायम..
एक मृतदेह मधोमध.. ठिकाण ओळखीचं.. माणसांचे चेहरे अजूनही अस्पष्ट… पण त्या प्रेताचा चेहरा स्पष्ट.. निर्विकार.. ओळखीचा..
ते घरही ओळखीचं..
थोडा ताण दिला.. आणि कळलं माझाच मृतदेह होता तो..
माझ्याच घरात…
शेजारी मगाशी आलेला आवाज असणारे माझे वडील..टाहो फोडत होते.. ज्या माणसाला उभ्या आयुष्यात मी तोंड पाडलेलंही बघितलं नाही, तोच माणूस छाती बडवून रडत होता.. माझ्यासाठी..
पण मी असूनही नव्हतोच तिथे.. होतं फक्त शरीर माझं.. निर्विकार..
दुसऱ्या बाजूला एक चेहरा.. जो दिसल्यापासून कधी नजरेवेगळा केला नाही.. प्रेमच होतं तितकं.. माझी बायको..आशु.. ती मात्र शांत..
आणी माझ्यासारखीच निर्विकार.. फक्त जिवंत असून..
एकटक बघत होती माझ्याकडे.. तिला नेहमीच आवडायचं माझ्या डोळ्यात बघत रहायला… पण आज तेच डोळे मिटले होते.. तरी ती बघत होती एकटक… एकही शब्द न बोलता.. एकही अश्रू न ढाळता..
शेजारच्या खोलीतून आवाज येत होता खिदळण्याचा..
एक अश्राप जीव..
माझाच अंश.. मस्त खेळत होता त्याच्या आजीशी..
आई किती खमकी आहे हे आज पुन्हा जाणवलं मला..
तिचे डोळे तसेच निर्विकार.. अधूनमधून अश्रुधारा.. आणि नातवाचं लक्ष दुसरीकडे वळवून ते पुसायची केलेली केविलवाणी खटपट..
ती त्याच्यात मलाच शोधत होती.. मधेच त्याला कवटाळत होती..
तोही एक गोड पापा तिच्या गालांवर देऊन पुन्हा खेळू लागत होता..
एवढ्यात मला आवाज आला..
'का केलंस असं अभी..? मलाही सांगावंसं नाही वाटलं का रे तुला..?
इतकी परकी होते का रे मी..? सगळं छान आहे असं दाखवत का राहिलास..? म्हणून मला माहेरी जाऊन ये म्हणालास..? दे ना ह्या सगळ्याची उत्तरं..उठ ना अभी….'
मी बायकोकडे बघितलं… एक शब्दही नव्हता काढला तिने.. पण आता मला तिच्या मनातलंही ऐकू येऊ शकत होतं.. आता मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.. पण नजर तशीच एकटक माझ्यावर रोखलेली..आणि शरीर जिवंत असूनही निश्चल…
इतक्यात बाहेर हालचाल झाली.. काही मंडळी आत आली..
चेहरे हळू हळू स्पष्ट होत होते..
'बाबा SS' … दादूचा आवाज… चेहरा अजूनही अस्पष्ट..पण दादूच होता नक्की… बाबांना जाऊन बिलगला.. दादू.. माझा हिरो..
माझा आयडियल बिग ब्रदर.. आता वाटतं, एकदा दादूला फोन केला असता तर..? त्याने सगळं नीट केलं असतं.. फक्त कामामुळे लांब रहात होता तो..पण मनाने अगदी जवळ आम्हा सगळ्यांच्या..
आज तोच माझा खमका हिरो दादू रडत होता बाबांना मिठी मारून..
काय केलं हे मी…?
स्वतःचं रडणं थांबण्यासाठी इतका स्वार्थी झालो मी..?
बसलेल्या लोकांचे चेहरे स्पष्ट होत होते..
माझे भाऊ, बहिणी, जुन्या ऑफिस मधले कलीग..
बाहेर एकीकडे डोळे पुसत तिरडी बांधणारे मित्र.. खरंच जीवाला जीव देणारे मित्र.. नाही.. आज मीच त्यांच्यावर अविश्वास दाखवला आहे.. जीवाला जीव देणारे होते मग का नाही मी त्यांना विश्वासात घेऊ शकलो..? का…?
इतक्यात एक गाडी येऊन थांबली..
एक बुजुर्ग व्यक्ती उतरली.. देशमुख सर…
माझे शिक्षक..शाळेचे मुख्याध्यापक.. आणि बाबांचे जिगरी दोस्त..
त्यांच्या शिकवणीत लहानाचा मोठा झालेलो मी.. कुठे कमी पडले ते शिकवण्यात..? किती अभिमान होता त्यांना माझा..
मी इतका करंटा कसा निघालो..? काय वाटत असेल आज त्यांना..?
आवाज वाढु लागले..
सगळे रडण्याचे.. सांत्वनाचे शब्दही फिके पडत होते..
आवाज वाढत होते.. असहाय्य होण्याइतके वाढत होते..
मी पुन्हा दोन्ही हात कानावर ठेऊन ओरडलो 'थांबाss'
पण आवाज आलाच नाही.. घशातून निघालाच नाही..
मी मात्र आणखी केविलवाणा..
आता वाटत होतं परिस्थिती बिकट नक्कीच होती, पण एकदा बोलायला हवं होतं.. कोणाशीही.. कोणीही समजून घेतलं असतं आपल्याला… आपणच दोन वेळा दोघा मित्रांना ह्यापासून परावृत्त केलं होतं.. मग आज तसंच कोणी आपल्यालाही केलं असतं..
परिस्थिती सुधारली असती.. आणि अगदी नसती लगेच सुधारली तरी तशाही परिस्थितीत मला कोणी सोडून, टाकून गेलं नसतं..
नाहीच.. हे तेव्हा का नाही कळलं.. माझे झाले त्यापेक्षा कैकपटीने हाल हे सगळे लोक ह्या क्षणी भोगत होते..बघवत नाही मला…
'थांबाSSS'
मी सैरावैरा पळत होतो.. एकेकापुढे जात होतो..
'बाबा..नका रडू.. दादू.. नको ना रे.. हस ना पुन्हा पहिल्यासारखा..'
माझे शब्द फुटतंच नव्हते..
मी आईपाशी गेलो.. अर्णव, माझं पिल्लू.. त्याच्या डोक्यावर हात ठेवताच तो आरपार गेला.. पुन्हा प्रयत्न केला..तरी तेच.. मग आईचे गुडघे धरुन हलवलं तिला..म्हंटलं 'बघ ना माझ्याकडे एकदा तरी..' तिने हात पुढे केला.. आणि अर्णवच्या डोक्यावरुन फिरवला..
'अभी..' असे अस्पष्ट शब्द तिच्या तोंडून आले.. तिला कळलं होतं का माझं अस्तित्व..?
'अभिजीत असं नाव ठेवलं रे तुझं.. असा हरून का गेलास…?'
तिने एक शब्दही काढला नव्हता..तिचं मन बोलत होतं..
तिने चटकन अर्णवला कवटाळलं..
मी पुन्हा हतबल होऊन बाहेर आलो..
'आशु.. तू तरी ऐक ना गं माझं..'
तिची नजर माझ्या शरीरावर स्थिरावलेली..
माझ्या भिरभिरणाऱ्या आत्म्याची मात्र तिला जाणीवही नाही..
मी पुन्हा बघितलं स्वतःकडे..
दोन हात - दोन पाय - एक तोंड.. सगळं तर होतं..
का नव्हतो दिसत कोणाला मी..
मी पुन्हा जिवाच्या आकांताने ओरडलो..
'आशुSSSS' … आवाज आला फक्त रडण्याचा.. इतरांच्या..
वाढत गेला.. मी पुन्हा स्वतःकडे बघितलं.. मग माझ्या निपचित पडलेल्या शरीराकडे बघितलं..
शरीर अजूनही शाबूत..
नव्हता फक्त श्वास,
त्यात जीव आणणारा...
©कांचन लेले

Image Source - Internet

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...