कोकण कन्या!
कोकण कन्या! शिर्षकावरून साधारण लक्षात येऊ शकतं की अशा नावाची एक रेल्वे म्हणजेच ट्रेन आहे..आणि माझ्यामते त्या ट्रेनचं नामकरण करणारा माणूस थोर आहे!! कोकणची कन्या म्हणवून घ्यायला त्या निर्जीव ट्रेनला सुद्धा अभिमान वाटतो..तर आम्हाला किती वाटत असेल ह्याचा अंदाजच करावा! आमचो कोकण म्हणताना जे मूठभर मास चढतं त्याने मी सुद्धा थोडी जाड दिसत असेन! तर आज पुन्हा एकदा, बरेच वर्षांनी कोकण कन्येने प्रवास करायची संधी मिळाली…थोडं दुःख इतकंच की या वेळी कोकणात न जाता ती कन्या ह्या कन्येला गोव्यात सोडणार होती, सुखरूप! हो..कारण प्रवास एकटीने करायचा आहे! मला नेहेमीच एकटीने प्रवास करायला आवडतं..त्यात तो कोकणातला आणि ट्रेनने म्हणजे तर चार चांद! त्यामुळे reservation करताना ACचे पर्याय आणि घरातल्यांच्या सूचना सपशेल धुडकावून माझ्या लाडक्या साईड लोवर सीटचं स्लीपर कोचचं reservation केलं! कोकणात जाताना कसं खिडकी उघडीच पाहिजे..आमच्या कोकणातली हवा अशी अंगावर घेताना काय सुख मिळतं म्हणून सांगू..आणि इतकी स्वच्छ की तो जळ्ळा AC पण गुदमरत असेल तिकडे बंद डब्यात! आणि एवढं निसर्ग सौंदर्य दिसतं ते काय काचेआडनं बघायचं…...