असेही व्रतस्थ..
प्रिय डायरी,
आज खूप दिवसांनी तुझ्याकडे आले म्हणून रुसली नाहीयेस ना गं..?
पण तुलाही सांगितलं होतंच की..आमचं लग्न ठरल्याचं..
त्यामुळे तुझ्याशी कमी आणि त्याच्याशीच बोलणं जास्ती व्हायचं...तेवढं तर घेशीलच की समजून...
लग्नाची तारीख अशी दोन महिन्यावर आली असताना हा कोरोना येऊन ठाण मांडून बसलाय..कुठे जाणं नाही, कुणाला, म्हणजे अगदी अमितलाही भेटणं नाही..खरेदी नाही, निमंत्रणं नाही..काही काही नाही..
आणि त्यात जीवाला सतत घोर..माझं ऑफिस सुरू नाहीये, मी घरूनच काम करतीये..आई-बाबा सुद्धा घरीच आहेत...पण आता एवढं एकच घर नाही ना माझं..?
अमित रोज कामावर जातोय..सुट्टी वगैरे सब झूठ..कधीकधी तर ऑफिस मध्येच रहातोय..ठिकठिकाणी जाऊन लोकांची परिस्थिती पडताळतोय..अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर्सची मुलाखत सुद्धा घेतोय..काय करावं अशा वेळी..? जीवाला घोर लागणार नाही तर काय..?
मग तर लग्नाची तारीख उलटून गेली तरी स्वस्थ बसून राहण्याशिवाय दुसरं काही करता आलं नाही...त्या दिवशी फक्त अमित ऑफिसला जाताना मित्राची बाईक घेऊन बिल्डिंग खालून गेला..काही मिनिटं थांबला..ती नजरानजर झाली तेवढीच...तो सुद्धा इतका लांब होता की हेल्मेट-मास्क यांच्या कचाट्यात डोळ्यातले भावही बंदिस्त झालेले जणू..इतक्या लांबून दिसलेच नाहीत...आमच्या बिल्डिंगमधे एक जण पॉसिटीव्ह आल्यामुळे बिल्डिंग सील केलेली..
अगदी हातातोंडाशी असलेला घास, पण घेता काही आला नाही...
काल त्याच्या एका कलीगचा रिपोर्ट पोसिटीव्ह आला..
उद्या अमितची टेस्ट होणारे..सध्या पूरतं एका हॉटेल मध्ये quarantine केलंय त्याला..फोनचा चार्जर सुद्धा न्यायचा राहिला..त्याने एक शेवटचा मेसेज केलाय फक्त..आणि त्यातही तो म्हणतोय "डोन्ट वरी, I will be fine"
कुठून आणतो एवढा धीर..? तोच जाणे..आता सगळं दोन दिवसांनी टेस्टचा रिपोर्ट आल्यावरच कळेल..तोपर्यंत चार्जर पोहोचवायची व्यवस्था होत्ये का बघत्ये आहेच मी..पण तरी...शांतता काही मिळत नाही..आपलं माणूस डोळ्यासमोर असलं तर काहीही एकत्र सहन करु शकतो आपण..पण तो इतका लांब, एकटा आहे हा विचारच मन खातोय..
घरात सुद्धा टेन्शनच आहे..त्यामुळे कुणाशी बोलून मन मोकळं करू..?
फक्त आता कान असुसलेत ते त्याच्याकडून टेस्ट निगेटिव्ह आल्याचं ऐकायला...आणि मग मी त्याला स्पष्ट सांगणारे..गपचूप घरी बसायचंय..नोकरी नको नी काही नको..आपलं घर आपली माणसं काळजीत टाकून काय करायची नोकरी..? कुठे घेऊन जायचा तो पैसा..?
(स्वतःशीच खिन्न हसली)
मग त्यावर तो शांतपणे म्हणेल..माझी नोकरी ही फक्त पैशासाठी नाहीये...हे मी घेतलेलं व्रत आहे असं समज हवंतर..
ही चर्चा काही पहिल्यांदा नाही होणार आमच्यात..गेल्या दोन तीन महिन्यात अनेकदा झाली आहे..भांडणं सुद्धा यावरूनच झाली आहेत..पण शेवटी खोल कुठेतरी मलाही माहीत आहे, आज अनेक लोकांचा तो आधार आहे..तो आणि त्याच्यासारखे असंख पत्रकार आणि त्यांची टीम..
आज ते आहेत, म्हणून आम्ही घरात बसून सर्व समाचार अगदी गरमागरम चहा पीत ऐकत आहोत..
त्यांना मात्र चहा-पाणी-ऊन-पाऊस-उपास-तापास कसली कसली तमा नाही..भय नाही, तक्रार नाही..आबाळ झाली तरी खंत नाही..कोरोना येवो, नाहीतर निसर्ग वादळ..यांचा झंझावात कायमच..कारण ते आहेत त्यांच्या व्रताशी बांधलेले व्रतस्थ..
©कांचन लेले