झोपेतून उठलो तर काय?!
बातम्या, whatsapp मेसेज आणि शेवटी घरुन आलेला फोन!
झालं असं होतं की दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना कोव्हिड टेस्ट बंधनकारक केली होती. आधी आम्हाला वाटत होतं फ्लाईट ने जाणाऱ्यांसाठीच आहे ते, पण नाही..ट्रेन, फ्लाईट किंवा अगदी by road जाणाऱ्यांसाठी सुद्धा तोच नियम केलेला. त्याशिवाय आमच्या रुम मधली एक मुलगी म्हणाली ती दुसऱ्या दिवशी देहरादुनला जाऊन टेस्ट करुन घेणार आहे म्हणून..
आता ती टेस्ट करण्यापेक्षा देहरादुनला जाऊन यायचा खर्च तिप्पट होणार होता. पुढचा एकच दिवस मसुरीत होतो, तिसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडून, फिरून मग रात्रीची ट्रेन दिल्लीला जायला होती. मग तिथे माझा मित्र भेटणार होतो जो जवळजवळ दोन वर्षे भेटला नव्हता!! मग दिवस काढून रात्री तिथून पुढे दिल्ली-मुंबई ट्रेन..
आता सगळाच गोंधळ झालेला..
डोक्यात विचारांचा गोंधळ..प्रवासाचा थकवा..त्यात उपास.. आणि मसुरीच्या एका डोंगराळ कोपऱ्यात असल्याने कुठलीही साधनं नाहीत..
अशावेळी खरं एकतर प्रचंड चिडचिड होऊ शकते, किंवा एकदम depressed वाटू शकतं..
पण आम्ही pros and cons बघायचं ठरवलं!
जर टेस्ट करायची झाली तर देहरादूनशिवाय पर्याय नव्हता. आणि टेस्ट करायला तिथवर जायचं आणि अख्खा दिवस खर्च करायचा असेल तर परत येण्यात काही पॉईंट नव्हता. म्हणजे उद्याचं बुकिंग पाण्यात घालून मसुरी न बघता उद्याच checkout करुन देहरादूनला जाऊन तिथेच रहायची व्यवस्था करायची आणि मग पुढे आधीसारखं. म्हणजे जायचा, रहायचा आणि टेस्टचा खर्च वाढणार, मसुरी अनुभवताच येणार नाही आणि पुन्हा ती टेस्ट आहे त्याचं टेन्शन! म्हणजे ऋषीकेशला एक मुलगा भेटला तो म्हणाला होता, टेस्ट करा ठीक आहे पण केल्यावर positive आली तर काय करणार आहात!
ते होतंच डोक्यात..इथल्या मुलींनी बाकीचे किस्से पण सांगितले की कसे पैसे दिल्यावर negative टेस्ट येते, नाहीतर positive येते वगैरे वगैरे..त्यामुळे डोक्यात सगळं कॉकटेल!
आता दुसरा पर्याय..म्हणजे डेहरादून-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई ट्रेन कॅन्सल करुन सरळ आलो तसं परतीचं देहरादून-मुंबई फ्लाईट बुक करायचं! टेस्ट करायची गरज नाही आणि प्रवास सुद्धा थोडक्यात होईल! पssण! या सगळ्या गोंधळामुळे जे काही फ्लाईटचे दर आकाशात गेलेले, त्यामुळे धाडस होईना..
त्यात जायच्या तारखांवर दिवस होते शनिवार-रविवार..त्यामुळे तर किंमत आणखीनच जास्ती!
डोळे बंद केले..
एकीकडे कोव्हिड टेस्ट....दुरीकडे...गंगा....
झालं पक्कं, सोमवारी पहाटेची फ्लाईट त्यातल्यात्यात स्वस्त होती...ठरवली!
पटकन एक दोन साईट शोधल्या ज्यावरून थोडा डिस्काउंट मिळू शकेल..coupons शोधली..आणि बुकिंग करुन टाकलं!
ते कन्फर्म झाल्या झाल्या ट्रेन कॅन्सल केल्या..
आता एवढाच प्रश्न होता, की शनिवारी सकाळी check out होतं इथून..शनिवारी रात्री ट्रेन असल्याने मी त्या दिवशीचं बुकिंग न करता ते पैसे वाचवलेले! त्यामुळे आता शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हातात होते..त्याची रहायची व्यवस्था करणं गरजेचं होतं!
इथे दोन पर्याय होते खरं..एकतर मुळात मसुरीत रहायचं की नाही..इथून सुरवात..रहायचं तर इथेच रहायचं की वर जिथे सगळे पॉईंट आहेत तिकडे रहायचं..
पण या सगळ्या विचारांना बगल देऊन आम्ही मसुरीवर पाणी डोडून सरळ ऋषिकेश निवडलं!
तिकडे एक बजेट मध्ये बसणारं आणि चांगलं रेटिंग असलेलं हॉटेल बघितलं..आणि शनिवार-रविवार साठी बुकिंग करुन टाकलं!! विशेष म्हणजे गेल्या वेळी आम्ही राम झुल्याच्या अलिकडे राहिलो होतो...त्यामुळे या वेळी लक्ष्मण झुल्याच्या पलीकडे रहायचं ठरवलं!
हा सगळा गोंधळ होईस्तोवर रात्र झालेली..बाहेरच पडता आलं नव्हतं..आणि आता बाहेर पडणं म्हणजे गोठून जाण्यासारखं होतं! त्यामुळे आम्ही कसेबसे खाली जाऊन थोडंसं खाऊन आणि गरम पाणी पिऊन आलो..वरती आलो, ब्लॅंकेट घेऊन पसरलो आणि एक पिच्चर बघितला..आणि गप्पा मारुन झोपलो!
कुठल्याही ट्रिपला किंवा काहीही कारणासाठी जेव्हा आपण घरापासून लांब जातो, तेव्हा एक रक्कम emergency साठी बाजूला ठेवणं अतिशय गरजेचं असतं! ते केल्यामुळे फक्त पैसे जास्ती गेल्याचं दुःख झालं, भार नाही आला..
तssर! दुसऱ्या दिवशी उठलो..प्रचंड भूक लागलेली!
सगळ्यात आधी खाली जाऊन मस्त आलू पराठा, मॅग्गी, हॉट चॉकलेट आणि चहा! असं सगळं खाल्लं...काल आलो तेव्हा दमल्यामुळे आणि प्रवासामुळे बाकी काहीही दिसलच नव्हतं..सरळ खोलीत जाऊन थडकलो..मग सगळा गोंधळ उरकून रात्रीच खाली उतरलो होतो, त्यामुळे ह्या जागेचं खरं सौंदर्य आत्ताच बघत होतो!
खाऊन झालं, पोटात गेल्याने जरा थंडी वाजायची कमी झाली...मग मस्त हातात कप घेऊन आम्ही बाहेरच्या थंडीत येऊन बसलो!
एक विशेष म्हणजे, काल आल्यापासून वाहत्या पाण्याचा आवाज येत होता..त्याचं रहस्य आज उलगडलं!
इथे कॅफेच्या शेजारीच वाहत्या पाण्याचा झरा आहे...ज्याचा खूप मस्त आवाज सतत येत रहातो... थोडं खाली गेलं की झोस्टेल ने विशेष बांधलेलं "Stream House" आहे...couples साठी अगदी खास!
कॅफेखाली कॉमन रूम आहे..तिकडे सुंदर झोपाळा आहे...आणि जुन्या लाकडाचा वापर करुन अतिशय सुंदर सुशोभित केली आहे!
बाहेर आवारात बरीच जागा मोकळी ठेवली आहे...सगळीकडे दगडातून पायऱ्या केल्या आहेत...हा मसुरीच्या थंडीतला तळपता सूर्य! समोर तिन्ही बाजूला डोंगर..सतत येणारा वाहत्या पाण्याचा आवाज..कडक थंडी, मस्त ऊन..आणि अशी कमाल जागा!!
कशाला कुठे जावंसं वाटतय..?
आम्ही त्या दिवशी कुठेच गेलो नाही..थोड्या वेळाने सगळं फिरून वर गेलो..अंघोळी केल्या..मग छान गप्पा मारल्या..फिरण्यातून काय काय शिकता येतं, मैत्री, करियर, आयुष्य कसं जगावं आणि काय काय!
काही काही वेळेला ह्या गप्पा होणं सुद्धा खूप गरजेचं असतं.. गेले दहा महिने बाहेरच्यांशी प्रत्यक्ष संवाद असा झालाच नव्हता..आणि नाही म्हंटलं तरी अनेक गोष्टी या काळाने बदलून टाकल्या होत्या...त्यामुळे जसं मुंबईतून बाहेर पडल्यावर हवापालट झाल्याने शरीराला बरं वाटलं, तसंच साचलेलं विचार वाहू लागल्याने शेवाळलेल्या मनाची वाहती नदी झाली होती! (आमच्या मागच्या पाटीवर काय लिहिलंय ओळखा बरं..?!)
मग छान गॅलरीत बसलो, आणि सूर्य हळूहळू डोंगरामागे जाताना वातावरणात होणारा बदल अनुभवू शकलो! आधी पूर्ण ऊन, कडकडीत..मग अक्षरशः सूर्य डोंगरामागे गेल्यावर एकदम थंडी..म्हणजे आपण वाळूत उभे असतो, आणि अचानक लाट येते तेव्हा कसं भसकन गार गार वाटतं..?! अगदी तसंच..
मग काय बाहेर थांबतोय?! पुन्हा आत पळालो..मग एक सिरीज बघितली..आणि जेवायला गेलो...मग जेवण झाल्यावर पुन्हा वर गेलो..आणि झोपलो!
थोडक्यात काय तर आम्ही फिरायला आल्यावर करतात ते काहीही आज केलं नाही! और उसका गम भी नही!
आमच्या टॅक्सीवाल्या अंकलला गाडी पाठवायला सांगितलेली..तो म्हणाला त्याचा भाऊ येईल..त्यामुळे सकाळी लवकर निघायचं होतं.. गप गुमान जाऊन झोपलो!
क्रमशः