माझी धाकटी मुलगी कांचन... मला तिच्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे.
लहानपणी बुद्धीने अतिशय तल्लख पण लाजरी बुजरी असणारी.. तीन वर्षाची असल्यापासून बरेच श्लोक, स्तोत्र तोंडपाठ पण स्पर्धेसाठी कुठे नेलं आणि तिचं नाव घेतलं की रडायला सुरवात आणि आमची वरात परत घरी. मी नेहमी विचार करायचचे, करायचं काय हिचं?
हीच्यावेळी गरोदरपणात मी गुरुग्रहाचा बराच जप केला होता, आपण म्हणतो ना गर्भसंस्कार करावेत...त्यामुळे मला असे वाटते त्या जपाचा चांगलाच परिणाम झाला आणि मुलगा झाला नाही पण मी शंभर नंबरी सोन्यासारख्या मुलीला जन्म दिला. कांचन लहानपणापासून खूप सद्गुणी..मग तो जेवणाचा विषय असो की अभ्यास. मला कधी ओरडावं लागलंच नाही. उलट तनुजा, माझ्या मोठ्या मुलीला आम्ही सांगायचो की बघ कांचन कशी जेवत्ये.
खरंतर हे मनोगत मी ह्या वर्षी लीहित्ये कारण हा लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस आहे. आणि नेहमी प्रमाणेच तिच्या लग्नानंतरच्या पाच महिन्यात तिच्या सर्व वागणुकीने मला पुन्हा आश्चर्यचकित केलंय आणि कृतकृत्य केलय.
लहानणापासूनच कांचन अतिशय शांत, नम्र. तिच्याकडे नुसतं बघून कधी कळणार नाही की ती खूप हुशार आणि बुद्धिमान आहे, पण तिच्या प्रत्येक कृतीमधून हा प्रत्यय येत राहतो. अशी किती उदाहरणं आहेत की आमची कांचन कुठलंही काम लीलया पार पाडते.
बाबा तर तिला just dial म्हणतात! कारण काम कोणतंही असो म्हणजे रंगकाम, वस्तुखरेदी, घराचे cleaning, कोणाकडे काही वस्तू पाठवायची, कांचन ते काम चुटकीसरशी करते. कधी - कसं जमेल? होईल की नाही?, असं तिचं काही नसतंच.
ती all rounder आहे. अभ्यास, वक्तृत्व, खेळ, हार्मोनियम वादन, गाणे सर्वच गोष्टींमध्ये सहभाग. बाकीचे काम तर आहेच.
चौथ्या इयत्तेत असल्यापासून कांचन अंकुश दीक्षित सरांकडे गाणे शिकत आहे. ते वारकरी पंथाचे असल्याने आळंदी-देहू-पंढरपूर येथे नेहमीच भजन, कीर्तनाला जाणे, प्रवचन तसेच सप्ताह अश्या सर्व गोष्टी कांचन सुद्धा बरेच वर्ष करते आहे. ह्या सर्व संस्कार आणि वातावरणामुळे तिचं व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे घडत गेले.
आणि निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम तिच्या वर्तणुकीत दिसून येतो.
ताई आणि तात्या लिमये म्हणजे माझी मोठी नणंद आणि तिचे यजमान आमच्या बाजूच्याच खोलीत राहत होते. त्यांनी माझ्या मुलींवर खूप प्रेम केलं. तनुजा आत्याची आणि कांचन उर्फ पप्या तात्यांची अशी वाटणी झालेली होती. तात्यांची सर्व बाहेरची कामं करण्यासाठी हक्काचा विश्वासू माणूस म्हणजे कांचन. बँकेचं पासबुक भरायचं, चेक भरायचे, पैसे काढायचे, औषधं आणायची, दिवाळीला आकाशकंदील आणायचा-लावायचा सर्वच कामं कांचन बिनबोभाट करायची.
सर्व बाहेरची कामं कुशलतेने करणारी माझी मुलगी घरातील कामात मात्र फार क्वचितच मदत करायची. मी तर नेहमी म्हणायचे कांचन आमच्याकडे पेईंग गेस्ट आहे. कारण ती कधी दिवसा घरी सापडणे कठीणच असे.
तिचा अजून एक अतिशय चांगला गुण म्हणजे माणसं जोडणे, जमेल तेवढी सर्वांना मदत करणे आणि एखाद्या कामात झोकून देणे. तन मन धन अर्पून मदत करणे. कोणालाही काही गिफ्ट द्यायचे असेल तर लगेच त्या माणसाबद्दल सर्व माहिती विचारून घेणार आणि मगच त्याला साजेसं गिफ्ट घेणार. उगाच द्यायचं म्हणून द्यायचं नाही असं तिचं ठाम मत.
कोणतंही काम मन लावून करायचा हा तिचा स्वभावच आहे. भाज्या तर इतक्या बारीक आणि एकसारख्या कापते की बघतच रहावं!
घरातील काम, स्वयंपाक कधीही न करणारी माझी ही मुलगी. एका वर्षी नवरात्रीत माझ्या आईच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती त्यामुळे दसऱ्याला मी घरी नव्हते. पण हिने बाबांना कळू नये म्हणून स्वयंपाकघराचा दरवाजा लावून घेतला आणि पोळी भाजी आमटी भात कोशिंबीर सर्व स्वयंपाक करून बाबांना नैवेद्य दाखवायला सांगितला आणि मला फोटो पाठवला!
कांचनला नवीन गोष्टी शिकण्याचा कायमच उत्साह असतो. काहीतरी नवीन शोधायचं आणि ते शिकण्याची धडपड अखंड चालू असते. मेंदूला कायम खुराक. त्यामुळे उशिरा झोपणे, वेळेवर न जेवणे, आणि उशिरा उठणे हे ओघाने आलेच. मी काही प्रमाणात प्रयत्न केले पण अर्थातच निष्फळ झाले. पण तिच्या सर्व activities आणि speed ह्याला मॅच करणे एकंदरच अवघड आहे.
तनुजाने जेव्हा लग्न करते असं सांगितल तेव्हा मी आणि कांचन दोघींनी मिळून तिचं अनुरुपच्या साईटवरचं प्रोफाइल पूर्ण केलं. त्यानंतर लग्न ठरलं, साखरपुडा झाला आणि साधारण एक वर्ष झालं असेल, तनुजाने एके दिवशी सांगितलं की आता लग्न करण्यास हरकत नाही. दसऱ्याचा मुहूर्त होता आणि साधारण फक्त एक महिना असेल, पण कांचनने अगदी एकहाती स्वतःची नोकरी सांभाळून सर्व गोष्टी म्हणजे डेकोरेटर, हॉल, मेनू, खरेदी, फोटोग्राफर, मेकअप, गिफ्ट, दागिने, खोल्यांची साफसफाई त्यात गाद्या-फॅन इत्यादी, नाश्ता-जेवणाची व्यवस्था, घरचं डेकोरेशन, सर्वच अगदी सहज पार पाडले आणि बहिणीचे लग्न कोणतीही उणीव भासू न देता करोना असून सुद्धा दणक्यात केले.
त्यानंतर एका वर्षाने कांचनचे पण लग्न ठरले. ते सुद्धा जबरदस्त चाळणी लावूनच. अटी अतिशय साध्या, पण कडक. कुठेही अशा अटी नाहीत जिथे काही मुलाकडून अपेक्षा असेल जसं की पगार किती, मोठे घर, गाडी - काहीच नाही. अट फक्त एवढीच की शाकाहारी आणि निर्व्यसनी पाहिजे. मला खरंच खूप कौतुक वाटलं तिचं. मला सांगितलं होतं तिने की मला अजिबात सोनं नको लग्नात, त्याचा मोह नको, पण देव कसा असतो आपण नाही म्हटलं की ते आपल्या मागे लावून देतो, असो! लग्न ठरल्यानंतर तिने आणि अनिरुद्ध दोघांनी मिळून स्वतःचे छोटेसे घर घेतले, मला खूप आनंद झाला.
सर्वच गोष्टी अतिशय विचार करून, आपल्याला काय झेपेल हे बघून अतिशय ठाम निर्णय घेणे हा तिचा स्वभावच आहे. कांचनच्या लग्नात आदरणीय बंडातात्या कराडकर आले. सगळं भरून पावलं.
कांचनच्याच काहीतरी चांगल्या कर्माची फळं आम्हालाही मिळाली. कसं प्रेम असावं? एवढे मोठे संत माझ्या मुलीला आशिर्वाद देण्यासाठी प्रकृती ठीक नसतानाही लांब प्रवास करून आले. माझ्या जीवनाचे सार्थक झाले. अजून काय हवं आयुष्यात ?
साखरपुडा तर मुटाटला आमच्या गावच्या घरी झाला. काय तो सोहळा आणि काय ते कौतुक, अवर्णनीय! आणि ठरवून सुद्धा होणार नाही असं डेस्टिनेशन वेडिंग दापोलीला ज्ञानप्रसाद येथे फाटक काकांच्या नियोजनखाली, जेवण, व्यवस्था सगळंच अप्रतिम. कृतकृत्य झाले मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे सासू सासरे अतिशय हौशी आणि प्रेमळ आहेत याचा मला अतिशय आनंद वाटतो.
तिचं लग्न ठरल्यापासून मला नेहमी प्रश्न पडे तिच्या सासूबाई एकदम सुगरण, कांचन घरी स्वयंपाकाचं काय करेल? घरचं काम कसं करेल? आईचे भाबडे विचार. पण मला नेहमीच आश्चर्याचे धक्के नाही दिले तर ती कांचन कसली. पण ते माझे प्रश्न मी माझ्या मनातच ठेवले कारण मनात कुठे तरी तिच्याबद्दल विश्वास होताच. आणि तो तिने सार्थ ठरवला. कांचन सकाळी उठून अनिरुद्धला डबा देते हे कळल्यावर माझ्या काय भावना होत्या हे खरंच मी सांगू शकत नाही.
तसेच दोघं मिळून घरातील सर्व कामं करतात. मी धन्य झाले. कारण ती खरंच इथे होती तेव्हा खूपच बिझी असायची त्यामुळे घरातील कामांशी तिचा फारसा संबंध आला नाही.
हल्ली मी जेव्हा भजन-कीर्तन अशा कार्यक्रमांना तिच्याबरोबर जाते आणि कोणी ओळख करून दिली की ही कांचनची आई, की लगेच समोरचा म्हणतो तुम्हाला साष्टांग नमस्कार. त्यावर मी त्यांना म्हणते माझं काही नाही, तर तेच मला म्हणतात की तुम्ही तिला जन्म दिलात आणि चांगलं घडवलत हेच खूप आहे! काय अभिमान वाटतो. देवाची कृपा आहे आणि काही माझी पुण्याई...
अशी ही माझी संयमी, हुशार मुलगी, आईला भक्कम पाठिंबा देणारी, वेळ पडेल तेव्हा सल्ले देणारी, सर्वच जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पेलणारी. २९ जून हा तिचा वाढदिवस. तिला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो अशी देवाजवळ प्रार्थना करते आणि माझे मनोगत संपवते..!
- डॉ. सौ. पल्लवी लेले