उधळण...!
कधी कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जर वेड असेल तर त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. किंवा ते वेड तुम्हाला खेचून घेतं असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये..शेवटी बाबासाहेबांनी शिवकल्याण राजा मध्ये म्हणूनच ठेवलं आहे, 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही!'..आपल्याला काही इतिहास घडवायचा नाही, पण असो!
तर काल संध्याकाळी काम आटपून असाच बसलो होतो. सहज बाहेर लक्ष गेले. पावसाने जरा विश्रांती घेतली होती. मस्त वारं सुटला होते. थोडे थोडे निळे आकाश दिसत होते. हे वातावरण म्हणजे 'between the lines' म्हणतात तसं म्हणायला हरकत नाही..कोसळणाऱ्या पावसाचं सौंदर्य सगळ्यांनाच दिसतं..पण ह्या वातावरणातही एक वेगळंच सौंदर्य दडलेलं आहे..आणि त्याच सौंदर्याच्या ओढीने पटकन गाडी काढली, बायको (कॅमेरा)ला बरोबर घेतले आणि पटकन ARAI टेकडी गाठली. पावसामुळे गर्दी कमी होती. असलं भारी वाटलं...! आणि जरा दृष्टी फिरवली तर निसर्गाचे अनोखे रुपडे दिसत होते.
मधे निळे, मधेच काळे, त्याच्या बरोबर मधेच सांजवेळेचा केशरट पिवळा, खाली धरतीच हिरवा अशी सुरेख रंगात माखलेली सृष्टी दिसत होती!
मागच्या बाजूला गेलो. बोटावर मोजण्या एवढीच लोक होती. प्रचंड भारी वाटत होते. फोटो काढून घेतले. नंतर एका दगडावर जाऊन शांत पणे निसर्गाचा अनुभव घेत बसलो. हा सुद्धा 'between the lines' आनंद असतो बरं का!
देवही आपल्या आकाशरूपी कॅनव्हास वर मुक्त हस्ताने ब्रश फिरवत होता, निराळे रंग दाखवत होता. एकूणच मस्त वाटत होतं... मधेच एक पावसाची छोटी सर आली. जणू त्या चित्राला मिळालेली उत्स्फूर्त दादच! तीही एका वेगळ्याच आनंदात न्हाऊ घालून गेली!
'आयुष्याची आता, झाली उजवण।
येतो तो तो क्षण अमृताचा..'
बाकीबाब यांचे शब्द आपोआपच कानात रुंजी घालू लागले...
'संधीप्रकाशात अजून जो सोने,
तो माझी लोचने मिटो यावी..'
खूप शांत वाटत होतं. आनंद म्हणजे वेगळा काय असतो..?
बाजूला गायी मस्तपैकी चरत होत्या. कुठलं दडपण नाही-व्यथा नाही, निसर्गाच्या कवेत, त्यानेच मांडलेल्या मेजवानीचाच जणू आस्वाद घेत होत्या..!
अशा रम्य वातावरणात तृप्त न वाटेल तरच नवल!
वेळ पुढे सरकत होती तसे रंग पालटत होते..एका वेगळ्या दुनियेला उजळून टाकायला, तेही प्रवास करत होते..
आणि ते परत येईपर्यंत आपल्यावर पांघरूण घालायला मागून आला अंधार.. त्यातही एक वेगळंच सौंदर्य आहेच की! शेवटी काळा हा सुद्धा रंगच आहे ना!
मग मनाचे काही तुकडे झाले…एक तुकडा त्या जाणाऱ्या रंगांबरोबर गेला..दुसरा गाईंबरोबर त्यांच्या घरी निघाला..तिसरा माझ्याबरोबर माझ्या घरी निघाला आणि चौथा मात्र त्या अंधाऱ्या सौंदर्याचा आनंद घेत आणि घेतलेला अमृतानुभव गाईंसारखा रवंथ करत तिथेच घुटमळला..!
©कांचन लेले
Photo & Write-up Concept Credit - स्वप्नील भदे
Comments
Post a Comment