शकुन..

'हे लागलं शेवटचं कपाट! आणि त्याबरोबर आपलं नवीन घरही!'
'किती उशीर झालाय पण..आणि इकडे आसपास काहीच नाही..अनिल, आपण परत एकदा विचार करायला हवा असं नाही वाटत तुला..?'
'रेवा..तू ऐक माझं..हे सगळे विचार सोड आणि ह्या निसर्गाचा आस्वाद  घे फक्त!'
'अरे पण माझ्या ह्या अशा अवस्थेत काही लागलं सवरलं तर..?'
'मी त्याचा विचार केला नसेल असं वाटतं का तुला..? फोनजवळ सगळ्यात पहिला नंबर ambulance चा आहे..जी फक्त ५ किलोमीटर लांब असते इथून. आणि ती सुविधा आपल्याला २४ तास मिळणार आहे. तू अजिबात काळजी करू नको. प्रश्न फक्त तीन महिन्यांचा तर आहे आणि आपण तुला सोबतीला बाई शोधत आहोतच ना..?'
'हो..बरं..'
'चल मी पटकन चहा करतो आपल्यासाठी! मग स्वयंपाकाचं बघू! तू थोडावेळ बाहेर बस बरं शांतपणे..आलोच मी..'
रेवा बाहेर जाऊन तिथे ठेवलेल्या खास आरामखुर्चीत बसते..
थंड वारा वाहात असतो..दुरुन नदीच्या खळाळण्याचा आवाज अस्पष्ट  कानी येत असतो..ती डोळेभरून आजूबाजूची हिरवळ न्याहाळत असते..अनिल वनविभागात अधिकारी असतो, पण कसल्या इंस्पेक्शनच्या कारणाने त्याला ह्या जंगलात येऊन काही दिवस रहावं लागणार असतं..
अनिलला हे जरी सवयीचं असलं तरी रेवामात्र अशी एकटी, लोकांपासून दूर कधीच राहिलेली नसते, त्यामुळे इथे आल्यापासून तिला एक विचित्र एकटेपणाची जाणीव होत असते, त्यात ती गरोदर असल्याने आणखीनच असुरक्षित वाटत असतं..
पण आता मात्र हे निसर्गवैभव तिला मोहिनी घालत असतं..
आतून चहाचा वास हवेबरोबर बाहेर येतो, आणि त्याच बरोबर कानावर पडतो अनिलचा आवाज..
'जेव्हा तुझ्या बटांना…
उधळी मुजोर वारा...'
रेवाचं आवडतं गाणं…तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य विलसतं..
ती डोळे बंद करुन मागे टेकते..खुर्ची हळूहळू मागेपुढे होत असते..
गाणं कानाला सुखावत असतं आणि थंड-स्वच्छ-शुद्ध हवा शरीराबरोबरच मनालाही स्पर्शून जात असते..
इतक्यात अनिल चहाचा कप तिच्या समोर धरतो!
त्याच्या जवळ आलेल्या आवाजाने ती आपोआप डोळे उघडते आणि समोर तो गात चहाचा कप समोर धरून वाकून उभा असतो!
ती हसून तो घेते..त्याचं गाणं संपतं!
'कधीपासून हे हसू तुझ्या चेहऱ्यावर बघण्यासाठी प्रयत्न चालू आहेत माझे..आज कामियाबी हासिल हुई!'
'काहीही हा तुझं..पण खरंच खूप सुंदर जागा आहे ही..इथे असं बसून अगदी प्रसन्न वाटतंय..'
'मग..?! मी सांगत होतो ना..अगं अशा छोट्या-मोठ्या जंगलांमध्ये मी जाऊन आलो आहे. ह्या निसर्गाच्या सानिध्यात कुठेही प्रसन्नच वाटतं..आणि ह्या शुद्ध हवेनी तुझी तब्बेत पण किती छान होईल बघ..चांगले विचार येतील आणि आपलं पिल्लू अगदी तसंच सुदृढ जन्माला येईल!'
'हो रे..इथे खरंच खूप फ्रेश वाटतं आहे मला..नाहीतर त्या शहराच्या धुळीत गुदमरल्यासारखं व्हायचं हा पोटात असल्यापासून!'
'हा..? ही म्हण..'
'हो रे बाबा..ही..खुश..?'
'ती झाल्यावर एकदम खुश!'
इतक्यात रेवा समोर बघून दचकते..
'काय गं..?'
'अरे ते बघ..घुबड आहे ना त्या पलीकडच्या झाडावर..?'
'इतकंच ना..हो..काय क्युट आहे ना..?'
'घुबड आणि क्युट..? हा आवाज त्याचाच आहे का रे..?'
'हो..'
'आजी म्हणायची हा आवाज ऐकणं म्हणजे अपशकुन असतो..'
'वेडी आहेस का.? इंग्लड मध्ये घुबड विद्वत्तेचं लक्षण मानतात..आणि तुमचं काय..? अपशकुन म्हणे.. बघ हा...ते रागावून येईल तुझ्याकडे'
'त्याला कशाला मी दिसेन, घुबडांना दिसत नाही दिवसा..'
'अज्ञान अज्ञान! कोणी सांगितलं हे.? त्यांना चांगलं दिसतं दिवसा!'
'चल..मस्करी करतोस ना माझी..?'
'नाही गं बाई..खरंच त्यांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला दिसतं..फक्त रात्री जास्ती चांगलं दिसत आणि तेव्हा त्यांच्या शिकारीला दिसत नाही आणि त्याचा फायदा ते घेतात..म्हणून रात्री शिकार करतात..'
'ए खरंच का रे..? म्हणजे ते खरंच बघत आहे आपल्याला आत्ता..?'
'अगं हो बाई..चल तिकडे जाऊन सेल्फी काढूया का त्याच्याबरोबर..? चल चल'
'जा तूच..मी जाते आत..उगच मला घाबरवतोस..'
इतकं म्हणून ती उठून आत जाते..आणि अनिल तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत हसत असतो!
दोन-तीन दिवस छान जातात..अनिलचं कामही सुरळीत सुरू असतं, रेवाची तब्बेतही अजिबात कुरकुर करत नसते..फक्त अजून तिला सोबतीला कोणी मिळालेलं नसतं..
चौथ्या दिवशी अनिलला जंगलाच्या दुसऱ्या टोकाच्या चेक पॉईंटला रिपोर्ट करायचं असतं..तो तसं रेवाला सांगतो..
'काय रे..लगेच उद्याच..?'
'अगं हो..जरा अर्जंट आहे..'
'अजून सोबतीलाही कोणी नाही..तुझं असंच असतं नेहेमी..'
'शेवटी मी अनिल आहे ना! क्षणात इकडे..क्षणात तिकडे! हा जाऊन आलो..आणि काही लागलं तर गार्डचा नंबर आहेच..त्याला कळव.'
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिथली गाडी त्याला न्यायला येते..
'संध्याकाळी कदाचित थोडा उशीर होईल, पण मी लवकर यायचा प्रयत्न करतो' असं रेवाला सांगून तो लवकर निघतो..
रेवलाही आता थोडी सवय होत असते..दिवस कामात कसा जातो कळतही नाही..दुपारी वामकुक्षी उरकून ती चहा आणि नवीन नवीन शिकलेलं शिवणकाम करत बाहेर बसते..काही वेळाने तिला
थोड्या अंतरावर हलचाल जाणवते..ती काहीवेळ निरखुन बघायचा प्रयत्न करते पण तिला काही दिसत नाही..ती पुन्हा कामात मग्न होते..काही वेळाने पुन्हा हालचाल जाणवते..आणि माणसाचा आवाज ऐकू येतो..
आता मात्र ती सावध होते..ती आत जाते दार लावून घेते आणि सिक्युरिटी पॉईंटला फोन करते..पण गार्डच्या म्हणण्याप्रमाणे त्याने कोणालाही आत सोडलेलं नसतं..पण तो तरी तिला यायचं कबूल करतो..ती अनिलला फोन करायचा प्रयत्न करते..आता दिवस मावळलेला असतो..पण अनिलचा फोन काही लागत नाही..
काही वेळात दारावर टकटक असा आवाज येतो..
ती क्षणभर घाबरते..पण लगेचच गार्डचा आवाज येतो आणि ती दार उघडते..गार्ड तिला सांगतो की त्याने सगळीकडे बघितलं आहे, एका ठिकाणी पायाचे ठसे दिसले पण आसपास कोणी माणसं नाही, ती गेली असतील असा अंदाजही तो वर्तवतो आणि तिला दार बंद करायला सांगतो.
थोडावेळ तो तिथेच बाहेर बसून रहातो..पण काही हालचाल न जाणवल्याने तो तिला सांगून निघतो आणि आसपास पुन्हा एक चक्कर मारून जातो..
तो जातो आणि अनिलचा फोन येतो..त्यांची गाडी एक दलदलीच्या ठिकाणी अडकली असल्याने त्यांना पुढे चालत त्या पॉईंट पर्यंत जावं लागलं आणि आता त्याला सकाळशिवाय परत येता येणार नाही असं तो सांगतो…ती त्याला लवकर ये इतकंच सांगते..
मनातून मात्र घाबरलेली असते..
आता मिट्ट काळोख झालेला असतो..
ती पुस्तक घेऊन वाचत बसते..आणि विचार न करण्याचा प्रयत्न करते..
थोडा वेळ शांततेत जातो..
आणि अचानक तिला परत तोच आवाज ऐकू येतो!
घुबडाचा आवाज..
आधी तिला भास वाटतो, पण थोड्यावेळाने पुन्हा तोच आवाज ऐकू येतो..
आणि आजीचे शब्द आठवतात..'अपशकुन'!..
तिच्या मनात चर्रर्र होतं..ती देवाचं नाव घेते..
काहीवेळ पुन्हा शांतता..
पुन्हा घुबडाचा आवाज…
इकडे दोन लोक चोरी करायला त्यांच्या घराभोवती आलेले असतात..
सुरवातीला तिला बाहेर बघून ते चरकतात..मग गार्ड येतो..
त्यामुळे ते एका झाडावर चढून बसतात..
बसल्याबसल्या त्यांनाही घुबडाचा आवाज येत असतो..
त्यावर तेही कुठल्या अपशकुनी दिवशी बाहेर पडलो असा मनात विचार करत असतात..
जशी रात्र चढते तसे ते खाली उतरतात तेवढ्यात परत गार्डच्या बाईकचा आवाज कानावर येतो..ते परत वर चढतात..
अनिलचा निरोप मिळल्याने गार्ड पुन्हा रेवाकडे जायला निघालेला असतो..
इकडे रेवा डोळे मिटून बसलेली असते..इतक्यात दारावर पुन्हा टकटक होते..आता मात्र ती पूर्ण भेदरलेली असते..इतक्यात पुन्हा गार्ड तिला हाक मारतो आणि तिच्या जीवात जीव येतो..
तरी ती दार उघडत नाही..आतूनच त्याच्याशी बोलते..
तो ही तिला मी पहाटेपर्यंत थांबतो आहे बाहेरच, तुम्ही निश्चिन्त झोपा असं सांगतो..
हे लोक लांबून कानोसा घ्यायचा प्रयत्न करत असतात पण काहीच आवाज येत नाही..ज्या अर्थी गार्डच्या बाईकचा आवाज आला नाही त्या अर्थी तो तिथेच थांबला आहे असं ते समजतात..त्याच्याकडे असते बंदूक त्यामुळे ह्यांना पळून जायची सोयही उरत नाही..
फुकट अडकलो अशी त्यांच्यात चर्चा सुरू असते..मग थोडावेळ ते नशिबाला आणि घुबडाला दोष देण्यात घालवतात व काही वेळाने त्यांना तिथेच झोप लागते..
इकडे रेवा मात्र मधेच दचकून जागी होत असते..घुबडाच्या आवाजाने…पण मग ती दरवाजाकडे बघते..तिला बाहेरच्या आकृतीवरून गार्ड बसलेला आहे असं दिसतं व ती पुन्हा झोपायचा प्रयत्न करते..
रात्र सरत जाते..काहीच हलचाल होत नाही..सूर्योदय होतो आणि गार्ड  रेवाला उठवतो आणि जाऊ का असं विचारतो..
ती त्याला थांबायला सांगते..पटकन चहा करते..
त्याला पाणी आणि चहा देते व त्याचे आभार मानून त्याला जायला सांगते..
आता उजाडू लागलेलं असतं..
गार्डच्या बाईकच्या आवाजाने झाडावरचे दोघेजण जागे होतात..एक तर पडता पडता वाचतो..
ते परिस्थितीचा अंदाज घेतात..आणि काय करावं ह्यावर थोडी कुजबुज करुन पुन्हा खाली येतात..ह्या वेळी मात्र त्यांनी पूर्ण दक्षता घेतलेली असते आवाज न करता जाण्याची..
आणि अचानक पुढचा चालता चालता थबकतो..
पुन्हा घुबडाचा आवाज येतो..
'चल बे आता दिवस उगवलाय..'
'अरं पन म्हणून अपशकन टळतो व्हय..?'
'तू चल..पैकं गावल्यावर न्हाई आठवायचा अपशकन..'
दोन चोर चोरपावलांनी रेवाच्या घराजवळ येतात…
खिडकीतच घुबड त्यांची वाट बघत असतं..
पुढचा परत घाबरतो आणि मागे जातो..
'अरं मर्दा त्याला दिसत नसतंय आता..आपन त्याला काई नगं करायला. हाय काय नाय काय! आता बोलू नगं..'
दुसरा त्याच्या कानात कुजबुजत त्याच्या पुढे होत म्हणतो..
ते हळू हळू पुढे जात असतात..
इकडे रेवा बऱ्यापैकी सावरलेली असते..अनिलचा फोन येऊन जातो, तो निघालेला असतो, त्यामुळे तिला हायसं वाटत असतं..
पण पुन्हा घुबडाचा आवाज येतो..
ती पुन्हा विचार झटकायचा प्रयत्न करते..अनिलने सांगितलेली माहिती आठवते..व दोघांसाठी नाष्टा करायला लागते..
इकडे चोर पुढे सरसावत असतात..
ते खिडकीजवळ येतात..पलीकडच्या खिडकीतलं घुबड येऊन त्या खिडकीवर बसतं..पुढचा चोर त्याला हाताने हकलवायचा प्रयत्न करतो..पण ते काही हलत नाही..
रेवाला खिडकीपाशी काहीतरी आवाज आल्याची चाहूल लागून ती खिडकीकडे जायला निघते..
इकडे चोर घुबड घालवायला काठी-दगड बघायला खाली वाकतो..दुसरा तर घुबडाला बघून आधीच दोन पावलं मागे झालेला असतो..
तेवढ्यात रेवा खिडकीपाशी येते..तिला पक्षाची आकृती दिसते व क्षणात पक्षी उडून गेल्याचं दिसतं..त्यामुळे ती खिडकी उघडते..
बघते तर काय तोवर घुबडाने त्या माणसाच्या अंगावर झेप घेतलेली असते..समोर दोन माणसं आणि त्यात घुबड बघून ती खूप घाबरते..
इतक्यात त्या माणसाने घुबडाचा वार चुकवलेला तिला दिसतो..हे सगळं बघून दुसरा माणूस पळायला लागतो, पहिला त्या घुबडावर दगड मारायचा प्रयत्न करतो..पण घुबड झप झप करत त्याच्या दिशेने झेपावतं व अगदी त्याच्या बाजूने पुढे जातं...असं चार-पाच वेळा होतं व शेवटच्या फेरीत ते आपली चोच त्याच्या डोक्यावर मारतं..
क्षणात तिथून रक्त वहायला लागतं..व तो चोर जिवाच्या आकांताने पळायला लागतो..घुबड त्याचा पाठलाग करत जातं..
रेवा हे सगळं जीव मुठीत घेऊन बघत असते..अगदी खिडकीतून वाकून ते दिसेनासे होईपर्यंत बघत असते..
शेवटी ते दिसेनासे होतात..
ती क्षणभर भांबावते, मग लगेच जाऊन गार्डला फोन करून सगळं सांगते..तोही तिला दारं-खिडक्या लावून घ्यायची सुचना देऊन कामाला लागतो.. रेवा स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिते..
तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज येतो..
अनिल परत आलेला असतो..
रेवा दार उघडते आणि त्याच्या कुशीत शिरते..त्यालाही एकदम काही कळत नाही..एवढ्यात फोन वाजतो..अनिल फोन घेतो, गार्डचा फोन असतो..झालेली सगळी हकीकत तो अनिलला सांगतो व त्या चोरांना पकडल्याचंही सांगतो..
पुढील प्रक्रियेची चौकशी करून अनिल फोन ठेवतो..रेवाला सांगायला म्हणून वळतो तर रेवा तिथे नसतेच..तो पटकन गॅलरीत जातो तर रेवा तिथे उभी असते..समोर बघत..
समोरच्या झाडावर तेच घुबड असतं..
काही अपशकुन शकुनात बदललेले असतात..
आणि काहींसाठी मात्र अपशकुन ही व्याख्या आणखी दृढ झालेली असते..
©कांचन लेले
Photo Credits - Sameer Dixit

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!