ऐसा आनंद सोहळा!
काल, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी आमच्या गुरुजींचा वाढदिवस असतो…असायचा… गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला गुरुजींचं देहावसान झालं.. गुरुजी गेल्यानंतर, त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करायचा हे गेल्या वर्षीच ठरलं होतं, त्याप्रमाणे अतिशय अल्प अवधीत नियोजन करुन तो गेल्या वर्षी पार पडला.. पण त्याचं नेमकं स्वरुप हे या वर्षी स्पष्ट झालं.. काल प्रचंड उत्साहात आणि लोकांच्या अलोट गर्दीत संपन्न झालेल्या "पंडित तुळशीदास बोरकर जयंती समारोहाच्या" द्वितीय वर्षाचे पहिले कलाकार होते, श्री.केदार नाफडे..गुरुजींचे ज्येष्ठ शिष्य..जे अमेरिकेत स्थायिक आहेत व आपलं करियर सांभाळून संवादिनीचा, पी.मधुकर घराण्याचा प्रचार व प्रसार सातासमुद्रापार यशस्वीपणे करीत आहेत.. त्यांनी गुरुजींचे गुरु, पी. मधुकर यांनी निर्मिलेला राग मधूयमनीने सुरवात केली..त्यानंतर त्यांनी "नच सुंदरी करु कोपा हे नाट्यगीत सादर केलं त्यानंतर एक द्रुत तीनतालातील दिनकरराव अमेम्बल यांची सुंदर रचना सादर केली व सादरीकरणाचा शेवट केला गुरुजींना प्रिय असलेल्या उस्ताद बिस्मिल्ला खान यांची एक धून वाजवून.. गुरुजींव...