ऐसा आनंद सोहळा!

काल, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी आमच्या गुरुजींचा वाढदिवस असतो…असायचा…
गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला गुरुजींचं देहावसान झालं..

गुरुजी गेल्यानंतर, त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करायचा हे गेल्या वर्षीच ठरलं होतं, त्याप्रमाणे अतिशय अल्प अवधीत नियोजन करुन तो गेल्या वर्षी पार पडला..
पण त्याचं नेमकं स्वरुप हे या वर्षी स्पष्ट झालं..
काल प्रचंड उत्साहात आणि लोकांच्या अलोट गर्दीत संपन्न झालेल्या "पंडित तुळशीदास बोरकर जयंती समारोहाच्या" द्वितीय वर्षाचे पहिले कलाकार होते, श्री.केदार नाफडे..गुरुजींचे ज्येष्ठ शिष्य..जे अमेरिकेत स्थायिक आहेत व आपलं करियर सांभाळून संवादिनीचा, पी.मधुकर घराण्याचा प्रचार व प्रसार सातासमुद्रापार यशस्वीपणे करीत आहेत.. त्यांनी गुरुजींचे गुरु, पी. मधुकर यांनी निर्मिलेला राग मधूयमनीने सुरवात केली..त्यानंतर त्यांनी "नच सुंदरी करु कोपा हे नाट्यगीत सादर केलं त्यानंतर एक द्रुत तीनतालातील दिनकरराव अमेम्बल यांची सुंदर रचना सादर केली व सादरीकरणाचा शेवट केला गुरुजींना प्रिय असलेल्या उस्ताद बिस्मिल्ला खान यांची एक धून वाजवून..
गुरुजींवरच्या श्रद्धेपोटी ते फक्त दोन दिवस, या कार्यक्रमासाठी अमेरिकेहून मुंबईत आले यातच सगळं येतं!
त्यांच्या वादनाची खासियत म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं त्यांच्याकडून ऐकायला मिळतं! त्यांनी गेल्या वर्षी अमेरिकेत गुरुजींवर केलेल्या एका कार्यक्रमाची लिंक खाली देत आहे, तो पूर्ण कार्यक्रम youtube वर जरूर बघावा!
(https://youtu.be/nfnn3ZmV7XU)
त्यांना अतिशय बोलकी आणि सुबक साथ केली ती श्री.यती भागवत यांनी..तबल्यावर लीलया फिरणारी त्यांची बोटं आणि त्यातून उमटणारा गोड नाद तरुण पिढीतील साधकांना नक्कीच आश्वस्त करत असेल अशी खात्री वाटते!
यती दादा त्याच्या "शाश्वतसूर" नावाच्या संस्थेमार्फत अतिशय संवेदनशील काम करत आहे..त्या पेजची लिंक सुद्धा खाली देत आहे! (https://www.facebook.com/shashwatsoor/)
स्वरमंडलवर साथ केली ती श्रीधर भट यांनी, तर माझं भाग्य की मला तानपुऱ्यावर संगत करण्याची संधी मिळाली..
त्यानंतर छोटंसं मध्यंतर होऊन पुढील कार्यक्रमाला प्रारंभ झाला..
देवकी ताईंनी सुरवात केली ती मोहक रागेश्रीने..त्यात विलंबित व द्रुत बंदिश... त्यानंतर शंकरा मध्ये मध्यलय झपतालातील आणि द्रुत एकतालातील बंदिश गाऊन त्या शेवटच्या पुष्पाकडे वळल्या.. व "सब सखीया समझावत"ने त्यांच्या सादरीकरणाचा शेवट केला..त्यांना तानपुऱ्यावर साथ केली ती हृदया कटोटी यांनी...
तर तबल्यावर साथ केली ती श्री.मंदार पुराणिक ह्यांनी..अतिशय डौलदार ठेका आणि एकूणच गाणं खुलवत नेणारी संगत..संवादिनी साथ केली श्री.सिद्धेश बिचोलकर यांनी..देवकी ताईंनी घेतलेली एक तान अगदी हुबेहूब वाजवली तेव्हा काही दिवसांपूर्वी अगदी व्हायरल झालेला गुरुजींचा राशीद खान यांच्याबरोबरच्या साथीचा व्हिडीओ आठवल्याशिवाय राहिला नाही..आत्ताचा सिद्धेश दादा म्हणजे गुरुजींची एक छोटी आवृत्ती असं मी म्हंटलं तर ते धाडसी ठरेल पण खोटं ठरणार नाही..
दोन्ही सत्रातील कलाकारांचा आशीर्वादपर सन्मान गुरु माईंनी केला..तर संपूर्ण कार्यक्रमाचं सुंदर निवेदन हे श्री.संतोष जाधव यांनी केलं..
भैरवी झाली तरीही ही मैफल संपूर्णपणे पार पडली नव्हती..
शेवटी गुरुजींनी वाजवलेली भैरवी स्पीकरवर लावून, कार्यक्रम खऱ्या अर्थाने पूर्णत्त्वास आला असं म्हणता येईल.
कार्यक्रमाची सांगता सुधीर नायक यांनी शिष्य परिवाराच्या वतीने ऋणनिर्देश करुन केली.
विशेष भावलेल्या दोन मुख्य गोष्टींमधील पहिली म्हणजे १८ नोव्हेंम्बर ही तारीख न बदलता, कुठलाही वार आला तरी त्याच दिवशी हा समारोह साजरा करायचा हा निश्चय..आणि दुसरी म्हणजे कार्यक्रमाचं स्वरुप असं की गुरुजींच्या एका शिष्याचं संवादिनी वादन, आणि गुरुजींना भावलेल्या एका गायक/गायिकेचं शास्त्रीय गायन..
हा कार्यक्रम या वर्षी कुठे करायचा या बाबत चर्चा होत होती, विविध मोठ्या सभागृहांचा विचार होत होता, पण शेवटी गुरुजींचं मन ज्या वास्तूत कायम रमलं, त्या वास्तूत म्हणजेच बांदऱ्याच्या शारदा संगीत विद्यालायतच हा कार्यक्रम व्हायचा होता, आणि झाला सुद्धा! ही गुरुजींचीच इच्छा म्हणावी लागेल..
गुरुजींच्या पश्चात देखील गुरुजींवर आणि त्यांच्या समस्त शिष्यपरिवारावर तितकेच प्रेम करणारे श्री.सुरेश नारंग सर यांचा ही वास्तू प्रत्येक कार्यक्रमाला उपलब्ध करुन देण्यात फार मोठा वाटा आहे..
ते ही वास्तु उपलब्ध करून देतात म्हणण्यापेक्षा याच वास्तू मध्ये गुरुजींचा कार्यक्रम व्हावा असा त्यांचा प्रेमळ आग्रह असतो....या पवित्र वास्तूमुळे देखील गुरुजींची स्मृती सदैव स्मरणात रहाते...गुरुजी तिथेच असल्याचे भासते....
काल फक्त गुरुजी आमच्यात देहरूपी नव्हते..पण मी असं म्हणेन तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसात गुरुजी काही अंशी होतेच..
काल ना रविवार, ना सुट्टीचा वार..तरीही प्रत्येक माणूस आवर्जून आला आणि येणारच, कारण गुरुजींनी दिलेलं अलोट प्रेम प्रत्येकाच्या गाठीशी आहे..
काल प्रेक्षागृह संपूर्णपणे भरल्यामुळे शिष्यवर्गाला रंगमंचावर बसायची वेळ आली, इतकी अलोट गर्दी काल कार्यक्रमाला झाली..आमच्या माई आणि गुरुजींचा पूर्ण परिवार, शिष्य परिवार, शिष्यांचा शिष्य परिवार, स्नेही आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गुरुजींच्या आठवणी रंगवून कालच्या कार्यक्रमाचा सोहळा झाला आणि हाच खरा प्रेमाचा सोहळा असं मी समजते....
तसेच हे सर्व साध्य होण्यामागे पहाडासारखे निश्चल व खंबीर नेतृत्त्व असलेले आमचे "Captain of the Ship"..सुधीर दादा..
त्यांना नेमके किती हात आहेत? त्यांच्या दिवसाला नक्की किती तास आहेत? हा एक संशोधनाचा विषय आहे.....सर्व आघाड्यांवर विक्रमी घोडदौड सतत करणारे, आज शास्त्रीय संगीतातील एक मोठं नाव, पण तरी स्वभावाने अतिशय नम्र, मृदू, उत्साही असं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दादा..संपूर्ण शिष्यपरिवाराची मोट त्यांनी बांधून ठेवली आहे!
या विलक्षण परिवाराचा एक अगदी छोटासा भाग असल्याबद्दल आणि अगदी थोडा काळ का होईना, गुरुजींचं मार्गदर्शन, सहवास लाभल्याबद्दल कृतकृत्य वाटलं नाही तरच नवल..
©कांचन लेले

Picture Credits - 
Varsha Panwar

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!