Monday, 22 December 2025

Déjà Vu की सत्य...?! 🙂


प्रवास हा कायमच मला विविध सुखद अनुभव देत आला आहे.. त्याचाच पुनःप्रत्यय नुकताच आला! हम्पी, म्हणजेच विजयनगर मधे भ्रमंती करत असताना, एक दिवस बाजारात फिरत फिरत एका पेंटिंगच्या दुकानापाशी थांबलो..खूप सुंदर पेंटिंगस, लहान-मोठी..विविध पद्धतीची..एक बुजुर्ग काका तिथे बसून काही पेंटिंगस करत होते..

मी आत जाऊन एक चक्कर मारुन आले..एका सुंदर पेंटिंगने माझं लक्ष वेधलंच, त्यांना विचारलं तर किंमत खिशाला जड होती..माझा चेहरा त्यांनी वाचला असावा! मी तशीच बाहेर आले, त्यांना म्हंटलं खूप सुंदर आहेत पेंटिंगस, त्यांनीही विचारलं की तुम्हीही पेंटिंग करता का?, त्यावर मी नाही म्हणून फक्त बघायला आवडतं असं सांगितलं तर त्यांनी एक छोटा कागद घेतला..मला म्हणाले आपको पसंद है ना, देखो.. 

असं म्हणून एका शिंपल्यात काळा रंग आणि त्यात अगदी बाssरीक ब्रश बुडवून त्यांनी रेखाटायला सुरवात केली


 आणि अवघ्या मिनिटात एका सुंदर, सलज्ज स्त्रीची आकृती आणि त्याखाली त्यांचं नाव उमटलं होतं!

त्यांनी तो कागद माझ्याजवळ दिला, मी त्यांना विचारलं एक फोटो काढू का..तर ते म्हणाले, फोटो क्या? आपही के लिये बनाया है!

आणि त्यांनी असं म्हणताच कुठेतरी डोक्यात हललं काहीतरी..खरंतर त्यांनी चित्र रेखाटायला घेतलं आणि माझ्या डोक्यात हे असंच आधी झाल्याचं आठवू लागलं..आधी वाटलं Dejavu म्हणतात तसा प्रकार असेल, पण जसजसं ते चित्र आकार घेत होतं तसतशी मनात खात्री पटत होती आणि तेवढ्यात त्यांचं चित्र पूर्ण झाल्याने जी तंद्री भंगली ती "आपही के लिये बनाया है" ऐकल्यावर मला थेट राजस्थानात घेऊन गेली..तेही २०१९ सालात!

राजस्थान भटकंती दौऱ्यावर असताना, अशीच एका संध्याकाळी लहर आली म्हणून मी जोधपूरमधे फिरत होते..असंच एक पेंटिंगचं दुकान दिसलं, आत शिरले..तेव्हा तर कॉलेज मधे असल्याने पेंटिंग वगैरे विकत घ्यायला पैसे असायचा प्रश्नच नव्हता! त्यामुळे तिथे असलेल्या कलाकाराशी थोड्या गप्पा मारुन, कौतुक करुन मी निघणार तेवढ्यात तोही असंच म्हणाला होता...


एक छोटा कागद घेऊन, काळ्या रंगाच्या बारीक ब्रशने एका स्त्रीची आकृती काढून मला भेट म्हणून दिलेली!

सरसरसर सगळा स्क्रिनप्ले डोळ्यासमोरुन गेला आणि मी शेवटी त्या वेळचे फोटो फोनमधुन शोधून काढले!

ते लोड होईपर्यंत काकांनाही सांगितलं की साधारण असंच चित्र सहा वर्षांपूर्वी एका कलाकाराने मला भेट दिलेलं...ते फोटो लोड झाले..आणि मी tally केलं, तर फक्त रेखाटण्यात अनुभवाचा फरक होता, पण आकृती तीच!

काकांना दाखवलं आणि त्याबरोबर त्या कलाकाराचा फोटो पण दाखवला!


त्यांनी चष्मा नीट करुन बघितलं, आणि माझ्याकडे बघून म्हणाले "अरे ये तो मेराही बेटा है!"

क्षणभर एकीकडे जरा सगळंच अविश्वसनीय आणि दुसरीकडे खूपच हृद्य वाटून डोळ्यात टचकन पाणी सुद्धा आलं!

ही ती दोन्ही चित्र! एक २०१९ साली २५ वर्षांच्या त्या कलाकाराने मला दिलेलं, आणि हे त्याच्याच वडिलांनी मला दिलेलं!


त्या दोघांनाही मला भेट म्हणून काहीतरी द्यावंसं वाटणं, त्यासाठी त्यांनी हीच आकृती निवडणं, आणि ती मला देणं! दोन वेगवेगळ्या प्रांतात, सहा वर्षांच्या अंतराने...हा काय विलक्षण योगायोग म्हणावा?

त्यानंतर काकांशी बऱ्याच गप्पा झाल्या..एकूणच एक आयुष्य उलगडलेला माणूस! हा योगायोग बघून सुद्धा त्यांनी असं खूप काही व्यक्त नाही केलं, छान स्मित हास्य करुन फोनमधला मुलाचा फोटो खूण म्हणून दाखवला आणि त्यांचे ते पूर्ण वेळ स्थितप्रज्ञच होते, आयुष्याच्या प्रवासाचा रस्ता उमगलेले...

पण आम्हाला भेटून त्यांना झालेला आनंद मात्र त्यांनी व्यक्त केला!

मग आम्ही त्यांच्याकडून एक छोटं पेंटिंग घेतलं, त्यांना नमस्कार केला, एक फोटो काढला आणि निघालो..


बघू, पुन्हा कुठल्या वाटा आणि कुठला प्रांत या धाग्याची आठवण करुन देतो!

- राधा

Monday, 6 October 2025

Whatsapp, Arattai इत्यादी!

Whatsapp चा जन्म हा २००९ साली ios साठी झाला आणि पुढे २०१० साली अँड्रॉइड वर ते सक्रिय झालं. माझ्याकडे अँड्रॉइड फोन बहुतेक २०१२ किंवा १३ साली आला आणि तेव्हापासून मी whatsapp वापरायला लागले आणि काही दिवसातच whatsapp म्हणजे संपर्काचा अविभाज्य घटक झाला. त्यावेळीही hike, telegram, Viber, Line  इत्यादी पर्याय आलेले होते पण ते विशेष वापरात दिसले नाहीत. माझ्यामते skype आणि ब्लॅकबेरी मेसेंजर हे त्या आधीपासून होते, पण सामान्य लोकांसाठी सगळ्यात user friendly म्हणजेच सोपा आणि उत्तम पर्याय म्हणजे Whatsapp होता.
मध्यंतरी २०२१ साली whatsapp ने privacy policy म्हणजेच गोपनीयता धोरणात बदल केले आणि तिथून त्यावरील विश्वासार्हता कमी होत गेली. त्या धोरणाप्रमाणे whatsapp वरील गोपनीय data त्याच्या parent कंपनीला म्हणजे Meta ला (आणि त्याद्वारे त्याच्या इतर कंपन्या म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम इ) पुरवला जाणार, आणि जर हे मान्य नसेल तर फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी accounts बंद होऊन त्यावरचा मागचा सगळा डेटा जाईल अशा आशयाचा तो बदल होता. त्यामुळे अनेक लोकांनी टेलिग्राम वर जाणं पसंत केलं तर अनेक लोकांनी तीव्र निषेध केल्याने आणि बरीच बदनामी होत असल्याचे लक्षात आल्याने बहुदा त्यांनी हा प्रस्ताव रद्द केला. तेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवहार ऑनलाइन चालत होते, अगदी शाळा, कॉलेज, ऑफिस सगळ्यासाठी फोन आणि पर्यायी whatsapp अविभाज्य घटक झालेलं. त्यातच यामुळे अनेक शाळा, कंपन्या इत्यादींनी टेलिग्राम हे माध्यम म्हणून वापरणं बंधनकारक केलं. बराच काळ ते टिकलंही, आणि पुढे त्यातही अनेक fraud होताना दिसले.
त्याचवेळी म्हणजे २०२१ साली तामिळनाडूतील झोहो कॉर्पोरेशनने "Arattai" हे भारतीय बनावटीचं app लाँच केलं होतं. पण त्याचा भाग्योदय मात्र २०२५ साली होताना दिसत आहे. Whatsapp ला पर्यायी असणारं पण पूर्णतः भारतीय असलेलं हे app आणि त्याची कंपनी आहे.
श्रीधर वेम्बु हे त्याचे फाउंडर असून ही कंपनी भरतासह ८० देशात कार्यरत असून, बिझनेससाठी त्यांचा झोहो सूट हे मायक्रोसॉफ्ट सूटला टक्कर देणारं पर्यायी सॉफ्टवेअर आहे.
आजपर्यंत गेल्या चार वर्षात Arattaiचं नाव ऐकिवात आलेलं नव्हतं पण अलीकडे भारत सरकारने पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला आणि Arattai एकदम उदयाला आलं. ३ दिवसात app च्या वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
श्रीधर वेम्बु यांच्याबद्दल जरुर गूगल बाबाला विचारा. कोट्यवधींची संपत्ती असणारा माणूस एका लहानशा गावात रहातो आणि रोज सायकलवर प्रवास करतो. मला वैयक्तिक दृष्ट्या फार माहिती नाही पण हे खूपच प्रेरणादायी आहे. 

मी स्वतः गेले काही दिवस whatsapp चा अतिशय कमी वापर करुन पाहिलं, आणि गेले तीन दिवस तर पूर्णतः बंद ठेवूनही पाहिलं. फार काही फरक पडला नाही. अर्थात आजवर त्याचा अतोनात वापर केला आहे आणि त्यासाठी कृतज्ञ आहे.

Arattai हे ऐकल्यावर मात्र सुरवातीला माझ्या कानांना त्रास होत होता. ते ऐकायला फार छान आणि सोपं वाटत नव्हतं.
पण कुतूहल म्हणून गूगल केलं असता Arattai हा तामिळ शब्द असून याचा अर्थ  (अनौपचारिक) गप्पा असा होतो. जसं आपण what's up म्हणणारं whatsapp आपलंसं केलं, तसंच भारतीय भाषांमधील सगळ्यात प्राचीन मानल्या जाणाऱ्या तामिळ भाषेतील त्याच अर्थाच्या शब्दाचं शीर्षक असणारं Arattai ही नक्कीच आपलंसं करु शकतो की!
तामिळ ही मातृभाषा नसलेल्या लोकांना सुरवातीला थोडंसं नाव जड जाऊ शकतं, पण ते जर एका तामिळ माणसाने निर्माण केलेलं असेल आणि त्याच्या भाषेचा अभिमान म्हणून त्याने हे नाव दिलं असेल तर आपण ते नक्कीच आनंदाने स्वीकारावं.
कुठल्याही जात, प्रांत, राजकीय पक्ष, विचारसरणी इत्यादींना फाटा देऊन केवळ आणि केवळ स्वदेशी या नाऱ्याखाली जे जे स्वदेशी पर्याय उपलब्ध आहेत ते आपलेसे करणं हे भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहेच. कारण इंग्रज एकदा येऊन आपल्या "डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा" म्हणणाऱ्या भारताची दुरावस्था करुन गेले, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, आपलेच लोक त्याला जबाबदार आहेत. पण त्याही वेळी स्वदेशीचा नारा दिला गेला होता आणि आज आपण पुन्हा तिकडेच जात आहोत. त्यातही सगळ्यात मोठा धोका हा चीन पासून आहेच कारण पिन पासून फोन पर्यंत बहुतांश सगळं तिकडूनच येतं आणि कधी स्वस्त म्हणून तर कधी भारतीय चांगले पर्याय उपलब्ध नाही म्हणून आपल्याकडून बेमालूमपणे त्याचा वापर होत आहे. पण आपल्या आणि पुढच्या अनेक पिढ्यांच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी उपत्पादनं वापरणं हे आपलं भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे.
Arattai हे त्याचं चांगलं निमित्त होऊ शकतं. जरुर डाउनलोड करुन वापरून बघा, आणि आपल्या सर्व सुहृदांनाही यासाठी आवाहन करा. Whatsapp वरील आपले सर्व ग्रुप - ग्रुप admin असणाऱ्यांनी तिथे पुन्हा create करुन त्याचं invite whatsappच्या मूळ ग्रुपवर पाठवा जेणेकरुन ग्रुपवरच्या सगळ्याच लोकांना हे स्थित्यंतर सुलभ जाईल!

Arattai ची लिंक बरोबर देत आहे -

https://play.google.com/store/apps/details?id=com.aratai.chat

किंवा इथून थेट डाउनलोड करा - Arattai Download 

जय हिंद, जय भारत!

तुम्ही Arattai वापरलं का ते खाली कमेंट्स मधे मला जरुर सांगा!

- सौ. कांचन लेले-गोळे

Wednesday, 5 February 2025

गोष्ट एका चहाची!


खरंतर हा अनुभव लिहिताना मलाच गंमत वाटत्ये, पण लिहिल्याशिवाय रहावत नाहीये. खरंतर ही फार छोटीशी गोष्ट आहे, पण माणुसकी celebrate करणारी आहे त्यामुळे सांगितल्याशिवाय रहावत नाहीये!


तर झालं असं की मी आणि आई माझ्या सासरी म्हणजेच हर्णै (दापोलीला) गेलो होतो व आमची रविवार संध्याकाळची परतीची गाडी बुक केलेली होती. एक दोन ठिकाणी जायचं होतं आणि मग दापोलीतून गाडीचं बुकिंग होतं त्यामुळे आम्ही सकाळी सामान गाडीत टाकून हिंडत होतो..कोकणात म्हणजे अनेक ठिकाणी रेंज यायची बोंब, त्यात नेट चालणं आणखीनच अवघड! त्यातच मधे बराच वेळ रेंज नव्हती आणि मग अगदी ऐन वेळेला रेंज आल्यावर गाडी कॅन्सल झाल्याचा मेसेज पाहण्यात आला आणि सगळी गडबड सुरु झाली..! एसटी, खाजगी बस, शेअरिंग गाड्या, ट्रेन असे सगळे प्रकार हुडकून झाल्यावर शेवटी ४ वाजता खेडला येणारी मांडवी ट्रेन पकडून जायचं ठरवलं. आम्ही अगदीच काट्यावर होतो..दापोलीतून खेडला जायचा रस्ता खराब, त्यात अगदी मोजका वेळ हातात आणि बाबांनी अशी एकदम ड्रायव्हर स्टाईल गाडी दामटत खेडपर्यंत आणली आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये इकडे आमची गाडी रस्त्यावरून स्टेशनाबाहेर थांबायला आणि तिकडून मांडवी रुळावर दिसायला..मग ही पळापळ, बॅग्स गाडीतून काढून फलाटावर धाव घेतली, तोवर अनिरुद्धने जनरलची तिकिटं काढून आणली..म्हंटलं आता जाऊन tc ला गाठू आणि काही कॅन्सलेशनच्या सीट असतील त्याचं तिकीट करुन घेऊन असं म्हणत पळत पळत फलाटावर आलो आणि बघतो तर काय, डबे पूर्ण भरलेलेच दिसत होते..म्हंटलं आता झालं कल्याण! त्यातही एकटी असते तर कसाही प्रवास झाला असता पण बरोबर आई होती आणि ४-५ लहान मोठ्या बॅग्स! पण म्हंटलं जर इतक्या गडबडीत सुद्धा ही ट्रेन मिळणं आपल्या नशिबात असेल, तर प्रवास सुद्धा यानेच व्हायचा असेल! म्हणून घेतलं देवाचं नाव आणि चढलो ट्रेन मधे. तसं आम्हा दोघींनाही प्रवासाची चांगलीच सवय असल्याने फार काही वाटलं नाही..थोडं आत गेलो, सामान सगळं ठेवल्यावर लक्षात आलं एक हँडबॅग आहे ज्यात विशेष काही गरजेचं नाही, ती तशीच परत पाठवली..दुसरी लॅपटॉपची बॅग ट्रॉली बॅगमध्ये टाकली..आता पसारा थोडा आवाक्यात आला. एका साईड लोवर बर्थवर एक तरुण मुलगा टेकून अर्धवट पाय सोडून बसलेला, तिथे आईला बसवलं. नशिबाने त्याच बर्थखाली पुरेशी जागा होती त्यात सगळं सामान बसवलं! गाडी एव्हाना सुटली होती..आजूबाजूला माणसंच माणसं दिसत होती! त्या मुलाला विचारलं ही सीट तुमची आहे का तर तो हो म्हणाला..म्हंटलं बरं. आईला म्हंटलं बस, मी मागे पुढे बघून येते कुठे सीट रिकामी आहे का. एक फेरी मारली, गणित असं होतं की हा स्लीपर कोच आहे आणि दिवसा काय कोणी अप्पर बर्थ वर वगैरे जात नसतं, २-४ बर्थ तरी रिकामे असतील मग तिथे तरी बसता येईलच. पण हो तोबा गर्दी बघून भर दुपारी सुद्धा लोक अप्पर काय, पण मिडल बर्थवर सुद्धा पडून होते! एक दोन अप्पर बर्थ रिकामे होते, नुसत्याच बॅग्स होत्या..मला जरा आशा वाटली मग तिथे बसलेल्यांना विचारलं तर दोन्हीकडच्या बायका म्हणाल्या आम्ही बसणार आहोत तिथे..म्हंटलं ठीक आहे..आणि परत आले..तर दुसऱ्या बाजूने tc काका येताना दिसले..म्हंटलं बघूया काही होतंय का म्हणून त्याच्या दिशेने जाऊ लागले तर ते तिथे एका साईड अप्पर वर बसलेल्या मुलांवर ओरडत होते की साध्या तिकिटावर इथे येऊन बसतात आणि त्यांना हाकलत होता (मनात म्हंटलं झालं कल्याण आता)..तेवढ्यात आणखी एक मुलगा त्यांना विचारायला आला की एखादी सीट आहे का, लेडीज आहेत बरोबर तर त्याच्यावर पण खेकसले की लेडीज आहेत तर मी काय करु एकही जागा नाहीये जनरल मध्ये जा..आता म्हंटलं विचारुन उपयोग तर नाही, पण विचारलं नाही तर हे अशीही हकालपट्टी करणारच त्यापेक्षा विचारुया..म्हणून (जितका करता येईल तितका केविलवाणा चेहरा करुन) धाडसाने पण हळूच त्यांना विचारलं तर मलाही तेच उत्तर मिळालं फक्त जssरा सौम्य शब्दात 😁 ....तोपर्यंत ती मुलं खाली उतरुन निघून गेली तशी tc काकांनी शेजारच्या साईड लोवर बर्थला बसलेल्या ताईंना सांगितलं तुम्ही तो अप्पर बर्थ घ्या..

बरं आता पुढची पंचाईत म्हणजे ते tc काका आई बसलेली त्याच दिशेला जाणार होते आणि त्यांनी सीट नाही म्हंटल्याने मलाही यू टर्न घेऊन तिकडेच जाणं भाग होतं म्हणून वळले आणि हळू हळू जायला लागले तर मधे एक दोन जण उभे होते आणि एक विक्रेता आला म्हणून त्याला जागा द्यायच्या बहाण्याने दोन बर्थच्या मधल्या जागेत शिरले..तेवढ्यात तो विक्रेता, त्याच्या मागे एक माणूस आणि मग tc काका असे सगळे पुढे गेले..हुश्शss

नशिबाने आई माझ्याकडेच बघत होती, तिला हातानेच खूण केली की बसून रहा..नशिबाने tc काका पुढे निघून गेले..मग मी परत मागे वळले आणि त्या साईड लोवरला बसलेल्या ताईंना गाठलं, म्हंटलं "तुम्ही त्या अप्पर बर्थवर बसणार आहात का?" तर त्या नाही म्हणाल्या..म्हंटलं मग "माझी आई आहे बरोबर तिला बसवू का?" तर म्हणाल्या "माझी हरकत नाही पण tc आला तर तुम्ही बघून घ्या मला अजिबात मधे घेऊ नका!" म्हंटलं चालेल! तेव्हाचं तेव्हा बघता येईल! म्हणून तडक आईला गाठलं, तिने तोवर त्या मुलाला विचारलेलं की तुम्हाला झोपायचं आहे का तर तो नाही म्हणलेला म्हणून ती एका कोपऱ्यात बसून होती..पण तरी तिला म्हंटलं नको..तिकडे वर आहे जागा तर तिकडे बस, मी सामानापाशी इथे थांबेन! तिला घेऊन तिकडे जाते तोवर ती मगाशी tc काकांनी उठवलेली मुलं (एक मुलगा एक मुलगी) परत तिथे बसायला जात होती..आता त्यांना नाही कसं म्हणणार कारण सीट काही आपली नाही..म्हणून मग ती दोघं आणि आई असे तिघे तिकडे वर बसले..मग मी परत सामानापाशी आले.. फक्त पाठीवरची बॅग त्या मुलाच्या बर्थ वर कोपऱ्यात ठेवली आणि बाजूला उभी राहिले. मला उभं रहाणं सहज शक्य होतं, आणि दुसरीकडून विचार केला की आपण प्रवास करताना अशी तिकीट नसलेली माणसं आपल्या जागेवर अतिक्रमण करायला लागली तर आपल्यालाही त्रास होतोच की! त्यामुळे त्या मुलाने आईला बसायला दिलं हेच खूप होतं माझ्यासाठी..कारण ज्या दोन बायकांनी "आम्ही (रिकाम्या) अप्पर बर्थवर जाणार आहोत" असं सांगितलं त्या प्रवास संपेपर्यंत तिकडे फिरकल्याही नाहीत, ना त्यांना ती जागा आम्हाला द्यावी वाटली. फारतर काय आम्हाला बसायचं असेल तेव्हा उठा, किंवा थोड्यावेळ बसा असंही त्यांना म्हणता आलंच असतं की! पण छे! असो.. म्हणून त्या मुलाने दिलेल्या जागेचं मोल मला जास्ती वाटलं!


तर मग मी तिथे उभी होते, थोडा वेळ गेला आणि एक विक्रेता चहा घेऊन आला..माझ्या कानात हेडफोन्स होते..पण तो बराच वेळ माझ्या समोरच घरगुती चहा वगैरे काय काय बोलत होता..हेडफोन्स मुळे ऐकू येत नव्हतं पण लिप रीड केल्याने घरगुती चहा एवढं कळलं! तेवढ्यात एक बोगदा आला..तर तो मला खुणावू लागला की इथे जागा रिकामी आहे तर बसा (जिथे आई बसलेली, त्या मुलाच्या बर्थ वर)..मी हसून त्याला म्हंटलं आहे ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ..मग तो जरावेळ तिथे टेकला..बोगदा मोठा होता.. परत तो मला सांगायला लागला अहो बसा, जागा मिळत नाही पटकन...तरी मी म्हंटलं बसेन नंतर.. मग तेवढ्यात आणखी एक गृहस्थ आले, त्या मुलाचे कुणी नातेवाईक असावे, त्यांनी त्याला सांगितलं तुला तिकडे बोलावलंय..आणि ते तिथे बसले..बसले तसं त्यांनी मला बघितलं आणि तेही म्हणाले बसा ताई काही प्रॉब्लेम नाही..मग चहावाल्या दादांना कारणच मिळालं! ते लगेच म्हणाले अहो मी त्यांना तेच सांगतोय, आणि स्वतः जायला उठले आणि मला बसायला लावलं..मी पण म्हंटलं ठिके बसूया थोडावेळ..थोड्या वेळाने तो मुलगा परत आला तसं मी उठले आणि परत त्यांना म्हंटलं की तुम्ही दोघे बसा, मी उभी राहते...तर ते नंतर आलेले दादा स्वतःच उठले आणि मला म्हणाले की नाही नाही, तुम्ही बसा मी असंही दुसऱ्या डब्यात जातोय..आणि निघून गेले! मग काय, मस्त बसून प्रवास सुरु झाला..मग बऱ्याच वेळाने ते चहा विकणारे दादा सगळे डबे फिरून परत मागे आले..आणि माझ्यापर्यंत आले तरी पटकन त्यांच्या लक्षात आलं नाही..मग एकदम माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले बसलात ना तुम्ही, बरं झालं..आज गाडीला खूप गर्दी आहे..नशीब तुम्ही या डब्यात चढलात, मागे पुढे दोन्ही डब्यात पाय ठेवायला जागा नाही, हाच डबा त्यातल्या त्यात रिकामा आहे. मग गप्पा सुरु झाल्या, कुठे रहाता, गाव कुठलं काय करता..मग त्यांना सांगितलं आमची गाडी कॅन्सल झाली म्हणून अचानक यावं लागलं वगैरे..मग त्यांनी सांगितलं की ते खेडचेच आहेत..कुणाच्या हाताखाली नोकरी करायला आवडत नाही त्यामुळे हा व्यवसाय करतात, खेडमध्ये एक दुकान आहे तिथे आई बसते..एकूण बरं चाललंय! त्यात मधे दोनदा चहा घ्यायचा आग्रह केला, पण मी चहा/कॉफी घेतच नाही म्हंटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. मग बऱ्याच गप्पा झाल्यावर शेवटी ते म्हणाले तुम्ही एक घोट चहा पिउनच बघा, एकदम घरगुती आहे आणि एका कपात त्यांनी अगदी घोटभर चहा भरला. आता अगदी खरं सांगू तर मला चहा अजिबात आवडत नाही, पण मला नाही मोडवला त्यांचा आग्रह..अशी निर्मळ माणसं हल्ली दुर्मिळ झाली आहेत!

त्यामुळे मी तो कप घेतला आणि त्यांना म्हंटलं की असाच नका देऊ, पैसे घ्या तर म्हणाले ५-१० रुपये चालणार नाहीत, द्यायचे तर ५००-१००० द्या! आता काय बोलणार! मी त्या चहाच्या कपाचा एक फोटो काढला तो हा!

त्यांनी लगेच मला विचारलं हे काय केलं? तर म्हंटलं पुढे कधी हा फोटो बघताना या प्रसंगाची आठवण होईल म्हणून फोटो काढला, तसे ते हसले! 

आणि मी चहाची चव घेतली, कित्येक वर्षांनी चहा पीत होते बहुतेक..पण अगदी खरं सांगते, खरंच फार अप्रतिम चव होती त्यांच्या चहाची! मग त्यांना म्हंटलं थांबा, माझ्या आईला चहा फार आवडतो, फक्त तिने आधीच घेतला नाहीये ना विचारते म्हणून तिला फोन केला तर तिने नव्हताच घेतला चहा..मग त्यांना एक कप भरायला सांगितला तसे खुश झाले! मी बळच २० रुपयांची नोट देऊ केली आणि ठेवा म्हंटलं, पण त्यांनी अगदी प्रामाणिकपणे एक दहाचं नाणं माझ्या शेजारी बर्थ वर ठेवलं आणि म्हणाले मला उतरायचं आहे, तुम्हीच आईंना चहा नेऊन द्या..आणि जाता जाता सांगून गेले मी मांडवी, मंगलोर एक्सप्रेस आणि पॅसेंजरला मी कायम असतो..पुढच्यावेळी आलात की नक्की ओळखा मला आणि गेले सुद्धा! म्हणून म्हणतात ना, कोकणची माणसं साधीभोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी!


आता पुढील प्रवासात मी या दादांना कशी नाही ओळखणार सांगा? देव काय फक्त देव्हाऱ्यात नसतो, तो अशा माणसांच्या रूपाने कायम भेटत असतो, तुमची काळजी घेत असतो आणि तुम्हाला पदोपदी माणुसकी जपणारी अशी लाख मोलाची माणसं देत असतो! आता लोक म्हणतील एक साधा चहावाला काय भेटला तर आयुष्याची फिलॉसॉफी झाडायला लागली, म्हणूदे लेकाचे! पण अशा लहान लहान गोष्टीतला आनंद म्हणजेच भरभरुन जगणं असतं ना?


गेल्या दहाबारा वर्षातल्या भारतातील प्रवासात अशी अनेक देवमाणसं मला भेटली...आता हे लिहितांना वाटतंय एक सिरीजच करावी त्या भेटलेल्या माणसांच्या गोष्टींची!

बघू कधी सुचतंय!


आणि हो, पुढे माणगाव गेल्यावर काही वेळाने तो मुलगा उठला आणि मला म्हणाला बसा तुम्ही, मी जातोय आता! मग काय, आईला बोलावून घेतलं आणि उरलेला प्रवास देवाच्या कृपेने मस्त बसून गप्पा मारत, सुर्यास्ताचा आणि मग संधीप्रकाशाचा आनंद घेत केला!


अशी ही आमच्या अचानक झालेल्या कोकण रेल्वे प्रवासाची गंमत, तूर्तास इथेच थांबते..पुन्हा भेटू लवकरच!!


आणि हो, तुम्हाला हे दादा भेटले तर त्यांच्याकडचा घरगुती चहा जरुर घ्या बरं का!


 ©कांचन लेले



Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...