Wednesday, 5 February 2025

गोष्ट एका चहाची!


खरंतर हा अनुभव लिहिताना मलाच गंमत वाटत्ये, पण लिहिल्याशिवाय रहावत नाहीये. खरंतर ही फार छोटीशी गोष्ट आहे, पण माणुसकी celebrate करणारी आहे त्यामुळे सांगितल्याशिवाय रहावत नाहीये!


तर झालं असं की मी आणि आई माझ्या सासरी म्हणजेच हर्णै (दापोलीला) गेलो होतो व आमची रविवार संध्याकाळची परतीची गाडी बुक केलेली होती. एक दोन ठिकाणी जायचं होतं आणि मग दापोलीतून गाडीचं बुकिंग होतं त्यामुळे आम्ही सकाळी सामान गाडीत टाकून हिंडत होतो..कोकणात म्हणजे अनेक ठिकाणी रेंज यायची बोंब, त्यात नेट चालणं आणखीनच अवघड! त्यातच मधे बराच वेळ रेंज नव्हती आणि मग अगदी ऐन वेळेला रेंज आल्यावर गाडी कॅन्सल झाल्याचा मेसेज पाहण्यात आला आणि सगळी गडबड सुरु झाली..! एसटी, खाजगी बस, शेअरिंग गाड्या, ट्रेन असे सगळे प्रकार हुडकून झाल्यावर शेवटी ४ वाजता खेडला येणारी मांडवी ट्रेन पकडून जायचं ठरवलं. आम्ही अगदीच काट्यावर होतो..दापोलीतून खेडला जायचा रस्ता खराब, त्यात अगदी मोजका वेळ हातात आणि बाबांनी अशी एकदम ड्रायव्हर स्टाईल गाडी दामटत खेडपर्यंत आणली आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये इकडे आमची गाडी रस्त्यावरून स्टेशनाबाहेर थांबायला आणि तिकडून मांडवी रुळावर दिसायला..मग ही पळापळ, बॅग्स गाडीतून काढून फलाटावर धाव घेतली, तोवर अनिरुद्धने जनरलची तिकिटं काढून आणली..म्हंटलं आता जाऊन tc ला गाठू आणि काही कॅन्सलेशनच्या सीट असतील त्याचं तिकीट करुन घेऊन असं म्हणत पळत पळत फलाटावर आलो आणि बघतो तर काय, डबे पूर्ण भरलेलेच दिसत होते..म्हंटलं आता झालं कल्याण! त्यातही एकटी असते तर कसाही प्रवास झाला असता पण बरोबर आई होती आणि ४-५ लहान मोठ्या बॅग्स! पण म्हंटलं जर इतक्या गडबडीत सुद्धा ही ट्रेन मिळणं आपल्या नशिबात असेल, तर प्रवास सुद्धा यानेच व्हायचा असेल! म्हणून घेतलं देवाचं नाव आणि चढलो ट्रेन मधे. तसं आम्हा दोघींनाही प्रवासाची चांगलीच सवय असल्याने फार काही वाटलं नाही..थोडं आत गेलो, सामान सगळं ठेवल्यावर लक्षात आलं एक हँडबॅग आहे ज्यात विशेष काही गरजेचं नाही, ती तशीच परत पाठवली..दुसरी लॅपटॉपची बॅग ट्रॉली बॅगमध्ये टाकली..आता पसारा थोडा आवाक्यात आला. एका साईड लोवर बर्थवर एक तरुण मुलगा टेकून अर्धवट पाय सोडून बसलेला, तिथे आईला बसवलं. नशिबाने त्याच बर्थखाली पुरेशी जागा होती त्यात सगळं सामान बसवलं! गाडी एव्हाना सुटली होती..आजूबाजूला माणसंच माणसं दिसत होती! त्या मुलाला विचारलं ही सीट तुमची आहे का तर तो हो म्हणाला..म्हंटलं बरं. आईला म्हंटलं बस, मी मागे पुढे बघून येते कुठे सीट रिकामी आहे का. एक फेरी मारली, गणित असं होतं की हा स्लीपर कोच आहे आणि दिवसा काय कोणी अप्पर बर्थ वर वगैरे जात नसतं, २-४ बर्थ तरी रिकामे असतील मग तिथे तरी बसता येईलच. पण हो तोबा गर्दी बघून भर दुपारी सुद्धा लोक अप्पर काय, पण मिडल बर्थवर सुद्धा पडून होते! एक दोन अप्पर बर्थ रिकामे होते, नुसत्याच बॅग्स होत्या..मला जरा आशा वाटली मग तिथे बसलेल्यांना विचारलं तर दोन्हीकडच्या बायका म्हणाल्या आम्ही बसणार आहोत तिथे..म्हंटलं ठीक आहे..आणि परत आले..तर दुसऱ्या बाजूने tc काका येताना दिसले..म्हंटलं बघूया काही होतंय का म्हणून त्याच्या दिशेने जाऊ लागले तर ते तिथे एका साईड अप्पर वर बसलेल्या मुलांवर ओरडत होते की साध्या तिकिटावर इथे येऊन बसतात आणि त्यांना हाकलत होता (मनात म्हंटलं झालं कल्याण आता)..तेवढ्यात आणखी एक मुलगा त्यांना विचारायला आला की एखादी सीट आहे का, लेडीज आहेत बरोबर तर त्याच्यावर पण खेकसले की लेडीज आहेत तर मी काय करु एकही जागा नाहीये जनरल मध्ये जा..आता म्हंटलं विचारुन उपयोग तर नाही, पण विचारलं नाही तर हे अशीही हकालपट्टी करणारच त्यापेक्षा विचारुया..म्हणून (जितका करता येईल तितका केविलवाणा चेहरा करुन) धाडसाने पण हळूच त्यांना विचारलं तर मलाही तेच उत्तर मिळालं फक्त जssरा सौम्य शब्दात 😁 ....तोपर्यंत ती मुलं खाली उतरुन निघून गेली तशी tc काकांनी शेजारच्या साईड लोवर बर्थला बसलेल्या ताईंना सांगितलं तुम्ही तो अप्पर बर्थ घ्या..

बरं आता पुढची पंचाईत म्हणजे ते tc काका आई बसलेली त्याच दिशेला जाणार होते आणि त्यांनी सीट नाही म्हंटल्याने मलाही यू टर्न घेऊन तिकडेच जाणं भाग होतं म्हणून वळले आणि हळू हळू जायला लागले तर मधे एक दोन जण उभे होते आणि एक विक्रेता आला म्हणून त्याला जागा द्यायच्या बहाण्याने दोन बर्थच्या मधल्या जागेत शिरले..तेवढ्यात तो विक्रेता, त्याच्या मागे एक माणूस आणि मग tc काका असे सगळे पुढे गेले..हुश्शss

नशिबाने आई माझ्याकडेच बघत होती, तिला हातानेच खूण केली की बसून रहा..नशिबाने tc काका पुढे निघून गेले..मग मी परत मागे वळले आणि त्या साईड लोवरला बसलेल्या ताईंना गाठलं, म्हंटलं "तुम्ही त्या अप्पर बर्थवर बसणार आहात का?" तर त्या नाही म्हणाल्या..म्हंटलं मग "माझी आई आहे बरोबर तिला बसवू का?" तर म्हणाल्या "माझी हरकत नाही पण tc आला तर तुम्ही बघून घ्या मला अजिबात मधे घेऊ नका!" म्हंटलं चालेल! तेव्हाचं तेव्हा बघता येईल! म्हणून तडक आईला गाठलं, तिने तोवर त्या मुलाला विचारलेलं की तुम्हाला झोपायचं आहे का तर तो नाही म्हणलेला म्हणून ती एका कोपऱ्यात बसून होती..पण तरी तिला म्हंटलं नको..तिकडे वर आहे जागा तर तिकडे बस, मी सामानापाशी इथे थांबेन! तिला घेऊन तिकडे जाते तोवर ती मगाशी tc काकांनी उठवलेली मुलं (एक मुलगा एक मुलगी) परत तिथे बसायला जात होती..आता त्यांना नाही कसं म्हणणार कारण सीट काही आपली नाही..म्हणून मग ती दोघं आणि आई असे तिघे तिकडे वर बसले..मग मी परत सामानापाशी आले.. फक्त पाठीवरची बॅग त्या मुलाच्या बर्थ वर कोपऱ्यात ठेवली आणि बाजूला उभी राहिले. मला उभं रहाणं सहज शक्य होतं, आणि दुसरीकडून विचार केला की आपण प्रवास करताना अशी तिकीट नसलेली माणसं आपल्या जागेवर अतिक्रमण करायला लागली तर आपल्यालाही त्रास होतोच की! त्यामुळे त्या मुलाने आईला बसायला दिलं हेच खूप होतं माझ्यासाठी..कारण ज्या दोन बायकांनी "आम्ही (रिकाम्या) अप्पर बर्थवर जाणार आहोत" असं सांगितलं त्या प्रवास संपेपर्यंत तिकडे फिरकल्याही नाहीत, ना त्यांना ती जागा आम्हाला द्यावी वाटली. फारतर काय आम्हाला बसायचं असेल तेव्हा उठा, किंवा थोड्यावेळ बसा असंही त्यांना म्हणता आलंच असतं की! पण छे! असो.. म्हणून त्या मुलाने दिलेल्या जागेचं मोल मला जास्ती वाटलं!


तर मग मी तिथे उभी होते, थोडा वेळ गेला आणि एक विक्रेता चहा घेऊन आला..माझ्या कानात हेडफोन्स होते..पण तो बराच वेळ माझ्या समोरच घरगुती चहा वगैरे काय काय बोलत होता..हेडफोन्स मुळे ऐकू येत नव्हतं पण लिप रीड केल्याने घरगुती चहा एवढं कळलं! तेवढ्यात एक बोगदा आला..तर तो मला खुणावू लागला की इथे जागा रिकामी आहे तर बसा (जिथे आई बसलेली, त्या मुलाच्या बर्थ वर)..मी हसून त्याला म्हंटलं आहे ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ..मग तो जरावेळ तिथे टेकला..बोगदा मोठा होता.. परत तो मला सांगायला लागला अहो बसा, जागा मिळत नाही पटकन...तरी मी म्हंटलं बसेन नंतर.. मग तेवढ्यात आणखी एक गृहस्थ आले, त्या मुलाचे कुणी नातेवाईक असावे, त्यांनी त्याला सांगितलं तुला तिकडे बोलावलंय..आणि ते तिथे बसले..बसले तसं त्यांनी मला बघितलं आणि तेही म्हणाले बसा ताई काही प्रॉब्लेम नाही..मग चहावाल्या दादांना कारणच मिळालं! ते लगेच म्हणाले अहो मी त्यांना तेच सांगतोय, आणि स्वतः जायला उठले आणि मला बसायला लावलं..मी पण म्हंटलं ठिके बसूया थोडावेळ..थोड्या वेळाने तो मुलगा परत आला तसं मी उठले आणि परत त्यांना म्हंटलं की तुम्ही दोघे बसा, मी उभी राहते...तर ते नंतर आलेले दादा स्वतःच उठले आणि मला म्हणाले की नाही नाही, तुम्ही बसा मी असंही दुसऱ्या डब्यात जातोय..आणि निघून गेले! मग काय, मस्त बसून प्रवास सुरु झाला..मग बऱ्याच वेळाने ते चहा विकणारे दादा सगळे डबे फिरून परत मागे आले..आणि माझ्यापर्यंत आले तरी पटकन त्यांच्या लक्षात आलं नाही..मग एकदम माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले बसलात ना तुम्ही, बरं झालं..आज गाडीला खूप गर्दी आहे..नशीब तुम्ही या डब्यात चढलात, मागे पुढे दोन्ही डब्यात पाय ठेवायला जागा नाही, हाच डबा त्यातल्या त्यात रिकामा आहे. मग गप्पा सुरु झाल्या, कुठे रहाता, गाव कुठलं काय करता..मग त्यांना सांगितलं आमची गाडी कॅन्सल झाली म्हणून अचानक यावं लागलं वगैरे..मग त्यांनी सांगितलं की ते खेडचेच आहेत..कुणाच्या हाताखाली नोकरी करायला आवडत नाही त्यामुळे हा व्यवसाय करतात, खेडमध्ये एक दुकान आहे तिथे आई बसते..एकूण बरं चाललंय! त्यात मधे दोनदा चहा घ्यायचा आग्रह केला, पण मी चहा/कॉफी घेतच नाही म्हंटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. मग बऱ्याच गप्पा झाल्यावर शेवटी ते म्हणाले तुम्ही एक घोट चहा पिउनच बघा, एकदम घरगुती आहे आणि एका कपात त्यांनी अगदी घोटभर चहा भरला. आता अगदी खरं सांगू तर मला चहा अजिबात आवडत नाही, पण मला नाही मोडवला त्यांचा आग्रह..अशी निर्मळ माणसं हल्ली दुर्मिळ झाली आहेत!

त्यामुळे मी तो कप घेतला आणि त्यांना म्हंटलं की असाच नका देऊ, पैसे घ्या तर म्हणाले ५-१० रुपये चालणार नाहीत, द्यायचे तर ५००-१००० द्या! आता काय बोलणार! मी त्या चहाच्या कपाचा एक फोटो काढला तो हा!

त्यांनी लगेच मला विचारलं हे काय केलं? तर म्हंटलं पुढे कधी हा फोटो बघताना या प्रसंगाची आठवण होईल म्हणून फोटो काढला, तसे ते हसले! 

आणि मी चहाची चव घेतली, कित्येक वर्षांनी चहा पीत होते बहुतेक..पण अगदी खरं सांगते, खरंच फार अप्रतिम चव होती त्यांच्या चहाची! मग त्यांना म्हंटलं थांबा, माझ्या आईला चहा फार आवडतो, फक्त तिने आधीच घेतला नाहीये ना विचारते म्हणून तिला फोन केला तर तिने नव्हताच घेतला चहा..मग त्यांना एक कप भरायला सांगितला तसे खुश झाले! मी बळच २० रुपयांची नोट देऊ केली आणि ठेवा म्हंटलं, पण त्यांनी अगदी प्रामाणिकपणे एक दहाचं नाणं माझ्या शेजारी बर्थ वर ठेवलं आणि म्हणाले मला उतरायचं आहे, तुम्हीच आईंना चहा नेऊन द्या..आणि जाता जाता सांगून गेले मी मांडवी, मंगलोर एक्सप्रेस आणि पॅसेंजरला मी कायम असतो..पुढच्यावेळी आलात की नक्की ओळखा मला आणि गेले सुद्धा! म्हणून म्हणतात ना, कोकणची माणसं साधीभोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी!


आता पुढील प्रवासात मी या दादांना कशी नाही ओळखणार सांगा? देव काय फक्त देव्हाऱ्यात नसतो, तो अशा माणसांच्या रूपाने कायम भेटत असतो, तुमची काळजी घेत असतो आणि तुम्हाला पदोपदी माणुसकी जपणारी अशी लाख मोलाची माणसं देत असतो! आता लोक म्हणतील एक साधा चहावाला काय भेटला तर आयुष्याची फिलॉसॉफी झाडायला लागली, म्हणूदे लेकाचे! पण अशा लहान लहान गोष्टीतला आनंद म्हणजेच भरभरुन जगणं असतं ना?


गेल्या दहाबारा वर्षातल्या भारतातील प्रवासात अशी अनेक देवमाणसं मला भेटली...आता हे लिहितांना वाटतंय एक सिरीजच करावी त्या भेटलेल्या माणसांच्या गोष्टींची!

बघू कधी सुचतंय!


आणि हो, पुढे माणगाव गेल्यावर काही वेळाने तो मुलगा उठला आणि मला म्हणाला बसा तुम्ही, मी जातोय आता! मग काय, आईला बोलावून घेतलं आणि उरलेला प्रवास देवाच्या कृपेने मस्त बसून गप्पा मारत, सुर्यास्ताचा आणि मग संधीप्रकाशाचा आनंद घेत केला!


अशी ही आमच्या अचानक झालेल्या कोकण रेल्वे प्रवासाची गंमत, तूर्तास इथेच थांबते..पुन्हा भेटू लवकरच!!


आणि हो, तुम्हाला हे दादा भेटले तर त्यांच्याकडचा घरगुती चहा जरुर घ्या बरं का!


 ©कांचन लेले



12 comments:

  1. चहा म्हणजे ओळख करण्याचे साधन

    ReplyDelete
  2. सुंदर विश्लेषण कांचन - राजेश आयरे, भांडुप

    ReplyDelete
  3. Shobha aatya kdun aashirvad. प्राजक्ताची फुले वेचावित त्या प्रमाणे असे आनंदाचे क्षण तू वेचत आहेस.ही जाण खूप कौतुक आहे.

    ReplyDelete
  4. "Red label चहा - जुळूया अतूट नाती" ऐवजी "घरगुती चहा - जुळूया अतूट नाती" 😃😃.... जोक्स अपार्ट पण सुंदर लिहिलं आहे.....बाकी #येतेवेळीलफडेआहे हे नशिबातच आहे आपल्या....पण चहावाल्या काकांनी परतीचा प्रवास सुखकर केला तुझा....(नाव लिहायची गरज वाटत नाही मला, तू ओळखलं च असशील)

    ReplyDelete
  5. जयवंत देशमुख5 February 2025 at 23:34

    लेखनाचा अत्यंत चांगला व सुस्त्य प्रयत्न त्याबद्दल अभिनंदन !!

    ReplyDelete
  6. विलास बर्वे
    ..,...... खरंच घोटभर चहाची घटभर कहाणी, खुप काही सांगून गेली. 👌

    ReplyDelete
  7. Very nice writeup. सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. Good job. Keep writing with smiling. Bharati Wayse.Seattle, USA.

    ReplyDelete
  8. खूप छान लिहिलं आहेस. काही वेळेला नकळत अशी माणसे भेटतात ज्यांची आठवण मनातून कधीही पुसली जात नाही. मुंबईचा रेल्वेतला माझा अनुभव असा आहे की पुरुष बायकांना पटकन बसायला जागा देतात पण बायका अजिबात उठत नाहीत .मग ती बाळंतीण असली
    तरीही. अजूनही गावाकडे, कोकणामध्ये माणुसकीची जाण असलेले लोक आहेत. खूप वर्षांनी परत ब्लॉग विश्वात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन !! इति सौ.मेधा केतकर.

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर लिहिले आहे, अप्रतिम लेख!!! 👌👌👌 आणि खरेच आहे, आपण केलेल्या प्रवासात अशी अनेक माणसे असतात, जी आपल्या छान स्वभावामुळे कायमची लक्षात राहतात. आपण आपल्या आयुष्यात नोकरीत, व्यवसायात, कुटुंबामध्ये कोणीही असलो तरी शेवटी आपण माणूस म्हणून कसे जगू शकतो, हे अशा लोकांकडून पाहायला, शिकायला मिळते! 😊

    ReplyDelete

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...