Thursday, 25 July 2019

पहिलं वहिलं!

टिंग टॉंग..
नील पसाऱ्यातून वाट काढत दारापर्यंत पोहोचतो आणि दरवाजा उघडतो!
कस्तुरी - Surprise!
नील - ये बात!! काय वेळेवर आलीस म्हणून सांगू! मी विचारच करत होतो आता हा पसारा कसा आवरावा!
कस्तुरी - शहाणाच आहेस! मी एवढ्या लांबून तुला surprise द्यायला आले तर तुला पसाऱ्याचं पडलंय! लोकं होणाऱ्या बायकोला फुलासारखं जपतात..आणि तू..?
नील - छे छे.. तू काही आवरु नकोस..मदत कर आपली थोडीशी! हे एवढं शिफ्टिगचं काम झालं की जपेन हा तुला फुलासारखी!
कस्तुरी - बघूया हा! आत्ता आधी हा गोंधळ आवरुया! तरी सांगत होते movers and packers कडे देऊ..ते सगळं करतात नीट!
नील - सामान उचलायला बोलावलंच आहे की त्यांना उद्या! पण त्यांना कसं कळणार कुठल्या आठवणी एकत्र ठेवायच्या आणि कुठल्या वेगळ्या आणि कुठल्या मागे सोडून जायच्या.?
कस्तुरी - बरं बाबा..हरले! पण हे मात्र खरं हा..प्रत्येक वस्तूत एक आठवण दडलेली असते! ह्या घरात राहून सुद्धा आता ५ वर्षं होतील ना तुला..?
नील - हो..४ वर्षं १० महिने आणि १३ दिवस!
कस्तुरी - Yes Mr. Perfectionist!
नील - खूप आठवणी आहेत ह्या घरात सुद्धा! पहिल्यांदा एकटं रहायचा अनुभव इथूनच घेतला मी..तेव्हा ५ जण एकत्र रहायचो..मग एक एक कमी होत गेले..आणि नंतर मी नवीन लोकं शोधली सुद्धा नाही..आधी बरोबर मित्र असलेले आवडायचे..आणि एकट्याला परवडणं सुद्धा शक्य नव्हतं..नंतर एकटं रहाणं आवडू लागलं आणि सेटल झाल्यामुळे परवडू लागलं!
कस्तुरी - या शहरात एक जादू आहे असं वाटतं! मी तर लहानपणापासून सांगलीतच होते..त्यामुळे असं शहरात एकदम वेगळं वाटतं! पण मावशीकडे यायचे तेव्हा नेहेमी वाटायचं आपण इकडेच यावं रहायला!
नील - आणि मग तुझं स्वप्न पूर्ण करायला मी तुझ्या आयुष्यात आलो!
कस्तुरी - आवरा..तू काही आला नाहीस, मीच आणलं तुला!
नील - अगंsss परत तेच!! मी खरंच नव्हतं reject केलं बाई तुझं proposal..चुकून झालेलं! आता आयुष्यभर हे ऐकावं लागतंय मला!
कस्तुरी - लागणारच..किती हिरमोड झालेला माझा! पूर्ण वचपा काढणारे!
नील - ते काय ते लग्न झाल्यावर काढ..आत्ता जरा चहा टाक ना! आई केव्हाही येईल त्याच्या आत मला हे अवरायचंय!!
कस्तुरी - कर सुरवात..आलेच मी!
नील - ए कस्तु! हे बघ…माझं पहिलं गोल्ड मेडल! कशात मिळालेलं माहित्ये का..?
कस्तुरी - कशात रे..?
नील - चमचा लिंबू! हीही..पण तरी मला ते सगळ्यात प्रिय आहे कारण ते पहिलं आहे!!
कस्तुरी - हो..हे मात्र खरं हा..आयुष्यात येणाऱ्या सगळ्या पहिल्या गोष्टी खूप स्पेशल असतात! जसा तू आहेस माझ्यासाठी!! My first love!
नील तिच्याकडे बघून हसतो..आणि पुन्हा वस्तू बघण्यात मग्न होतो!
कस्तुरी - तू same here म्हणाला नाहीस..म्हणजे काहीतरी आहे जे मला माहित नाही! हो ना नील..?!
नील - अगदी तसंच काही नाही..पण हो..तुझा अंदाज खरा आहे!
कस्तुरी - मग सांगणार नाहीस मला..?
नील  - अगं खूप सांगण्यासारखं काहीच नाही..होती एक मुलगी..मला वाटायचं माझं प्रेम आहे तिच्यावर! तेव्हा कुठे प्रेम-आकर्षण यातला फरक कळत असतो..
कस्तुरी - मग..? तिचं पण होतं प्रेम तुझ्यावर..?
नील - अगदी typical बायको झालीयेस की तू!
कस्तुरी - हो का..? जा..नको सांगूस मग. विचारणार सुद्धा नाही पुन्हा काही.
नील - झाला नाकाचा शेंडा लाल! इकडे बघ..गंमत दाखवतो तुला! पण हसायचं नाही हा..नाहीतर खरंच नाही सांगणार!
कस्तुरी - हे काय आहे..?
नील - निलराजे यांनी आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेलं प्रेमपत्र! जे आजवर त्यांच्याकडेच आहे! आणि दुसरं तुझ्याकडे आहे! :)
कस्तुरी - म्हणजे..? तू दिलंच नाहीस तिला..?! नीट सांग ना मला सगळं!
नील - अगं तसे आम्ही छान मित्र होतो..मग थोडं त्यापुढे जाऊ असं वाटलं. कबुली कोणीच दिली नव्हती एकमेकांना..त्यासाठीच लिहिलेलं मी हे! आणि ते द्यायच्या आधी असाच काहीतरी विषय चाललेला ग्रुप मधे..तेव्हा पत्रांचा विषय निघाला..तर ती पटकन म्हणाली "पत्र वगैरे किती बोरिंग असतं..समोर येऊन बोलावं हवं ते..पत्र काय लिहीत बसतात डरपोक!"
कस्तुरी - आणि म्हणून तू हे पत्र दिलंच नाहीस तिला..?
नील - अर्थात..काय उपयोग झाला असता..? मैत्री पण गेली असती आणि प्रेम वगैरे तर प्रश्नच नव्हता!
कस्तुरी - अरे पण कदाचित तू दिलेलं म्हणून तिला स्पेशल वाटू शकलं असतं!
नील - नाही कस्तुरी..माझ्यासाठी पत्र म्हणजे जवळपास त्या व्यक्तीचं मन आपल्या हातात असतं.. त्या कागदाला त्या व्यक्तीचा स्पर्श असतो..ती शाई आपल्याशी बोलत असते..मधेच कुठेतरी लिहिताना पडलेलं एखादा अश्रू अक्षरं खराब करून गेलेला असतो..तो दिसल्यावर आपल्याला आणखीच भरुन येत असतं! आणि मुळात म्हणजे ते आपल्याबरोबर कायम रहातं..आयुष्यभर..
हे जर तिला कळणारच नव्हतं तर काय उपयोग ना! आणि ह्या गोष्टी आपोआपच कळाव्या लागतात गं!
कस्तुरी - तेही खरंच आहे..मला आधी वाटलं नव्हतं तू एवढा sensitive असशील..infact जरा भीती वाटायची की आपलं जमेल ना..पण तू पत्र पाठवलंस ना..तेव्हा खरंच उडून इकडे यावं आणि तुला घट्ट मिठी मारावी असं वाटलं होतं!
नील - यायचं होतंस की मग! मी किती वाट बघितली तुझी!
कस्तुरी - ओ रोमिओ! आईंचा फोन येतोय बघा!
नील - रोमिओ नाही गं..श्रावणबाळ म्हण मग ;) !
कस्तुरी - श्रावणबाळ गुणी होता म्हंटलं..आता तू जो ओरडा खाणारेस त्यावरुन तरी असं वाटत नाही!
नील - हो ना..आता काही खरं नाही माझं! तरी तुला सांगत होतो बोलण्यात वेळ वाया घालवू नको, मदत कर मला आता, येतायत ना ते अर्ध्या तासात!
कस्तुरी -  वा..म्हणजे चूक माझीच का..? आळशी आहेस तू आणि खापर माझ्यावर! जा तू त्यांना आणायला.. हे बघते मी!
नील - आम्हास आपणाकडून हीच अपेक्षा होती राणीसाहेब!
कस्तुरी - तू पाठवलेलं पत्र आठवलं म्हणून माफ आहे हे तुला! कारण मला मिळालेलं ते पहिलं वहिलं प्रेमपत्र आहे ना! तेवढंच एक काम चांगलं केलंयस आयुष्यात!
नील - चला..पहिल्यांदा नाही तर, दुसऱ्यांदा तरी पत्राने हेतू सफल झाला म्हणायचा!  ह्या घरातल्या ह्या शेवटच्या आठवणी सुद्धा स्पेशलच आहेत की गं! किती मोकळेपणाने बोललो आपण!
कस्तुरी - हो रे.. आणि आता गेला नाहीस तर शेवटचा ओरडा सुद्धा याच घरात खावा लागणारे तुला! किती स्पेशल ना!
नील - दुष्ट आहेस तू! कामं कर! येतो मी!
©कांचन लेले
Image Source - Internet

Sunday, 7 July 2019

Folks-Wagon - एक सर्वांगसुंदर सांगीतिक अनुभव!


संगीत हे विश्वव्यापक आहे हे निर्विवाद सत्य आहे..
भारतीय संगीत हे विविधतेने नटलेलं, सौंदर्यपूर्ण आहे हे सुद्धा निर्विवाद सत्यच आहे..
शास्त्रीय, उप-शास्त्रीय, सुगम, लोकसंगीत व हल्ली चर्चेत असलेलं पाश्चात्य संगीत असे ठळक प्रकार बहुदा सगळ्यांना माहीत असतात.
भारतात भाषा आणि संगीत हे प्रांताप्रांताप्रमाणे बदलत जातं, तसंच प्रत्येक प्रांताच्या संगीतात वापरली जाणारी वाद्य सुद्धा बदलत जातात. प्रत्येक प्रांतात आपलं म्हणावं असं विशेष संगीत आहे आणि त्यालाच आपण लोकसंगीत असं म्हणतो, कारण ते त्या त्या लोकांचं संगीत असतं..

ह्याच लोकसंगीताचा ध्यास घेतलेला एक वेडा मुसाफ़िर म्हणजे मधुर पडवळ आणि त्याबरोबरच त्याचा अख्खा फ्लोक्सवॅगन हा बँड..ह्या ग्रुपचं नावंच मुळी "Folks-Wagon" असं ठेवलं आहे..वॅगन म्हणजे काही वस्तू इकडून तिकडे नेणारी गाडी..तसंच सगळ्या प्रांतातील सांगित रसिकांपर्यंत पोहोचवणारा यांचा हा बँड, फोक्स-वॅगन!
ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही मंडळी त्या त्या राज्यात, प्रांतात जाऊन, तिथे राहून तिथल्या कलाकारांकडून हे संगीत शिकतात, वाद्य शिकतात आणि त्यांचा निश्चय बघून तिथले लोक ही कुठेही न मिळणारी वाद्य स्वतः त्यांना देतात..
कधी ती सहज मिळतात, कधी ह्या लोकांचा विश्वास संपादन करायला वेळ लागतो, कारण कलाकाराला कायमच त्याची निष्ठा सिद्ध करायला लागते, तेव्हाच समोरच्याचा विश्वास बसत असतो!
पण जातील तिथे लोकांची मनं जिंकून घेणाऱ्या मधुर आणि त्याच्या सहकाऱ्यांबद्दल हा विशेष लेख!

नुकताच यशवंत नाट्यमंदिराला फोक्स वॅगनचा कार्यक्रम झाला, मी ऐकलेला हा फोक्सवॅगनचा चौथा कार्यक्रम!
 त्याचा आढावा घ्यावासा वाटला म्हणून हा लेख..
पडदा उघडला आणि अख्खा रंगमंच व्यापून टाकलेली वाद्य समोर आली!
डावीकडून आधी अनेक वेगवेगळी वाद्य ठेवलेली, त्या शेजारी गिटार, मागे अनेक बासऱ्या ठेवलेली एक केस, शेजारी कहोन बॉक्स व आणखी काही छोटी वाद्य, थोड्या अंतरावर तबला, शेजारी पेटी, कीबोर्ड, त्या मागे आणखी एक गिटार आणि त्या पुढे आणखी एक कहोन बॉक्स आणि एकदम कडेला अनेक पर्कशनची वाद्य..
आणि एक एक करुन हे सगळे कलाकार आपल्या स्थानावर आले..
कार्यक्रमाची सुरवात झाली "महाराज गौरीनंदना" या पारंपरिक लोक गीताने..पारंपरिक जरी असलं तरी त्याची सुंदर अरेंजमेंट करुन ते एका नव्या साजात सादर केलं गेलं...मंदार पिलवलकर याने खड्या आवाजात उत्तम सुरवात केली आणि बाकी सगळ्यांनीच त्याला उत्तम साथ दिली..गाण्याची अरेंजमेंट सुद्धा इतकी सुंदर केली आहे, की भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचा सुंदर मिलाफ प्रतयेक म्युझिक पीस मध्ये दिसून येतो..अगदी गिटारचा सुद्धा उत्तम वापर केला आहे..ढोलकी आणि बासरी तर विशेष लक्ष वेधून घेतात!
त्यानंतर सादर झालेलं "ओम-नमो" हे शंकराचं एक रॉक पद्धतीने असलेलं नमनच म्हणावं लागेल..कारण सुरवात झाली "ओम त्र्यंबकम यजामहे" या महामृत्युंजय मंत्राने, मग पुढे मधुरने त्यात काही इंग्रजी काव्य गायलं, त्याला लागून पुन्हा कैलास राणा हा श्लोक आला आणि शंकराच्या नामात ते संपलं..एक अतिशय उर्जादायक अरेंजमेंट असलेलं हे गाणं एक वेगळाच प्रभाव पाडून गेलं..सुरवातीच्या मंत्राला मंदारने लावलेला विशेष आवाज, तर मधुरच्या इंग्रजी गाण्यात दिमडीचा उत्तम वापर आणि त्याला कहोन बॉक्सची मिळालेळी उत्तम साथ आणि अर्थात गिटार आणि सुंदर कोरस याने एकूणच मजा आली! आणि विशेष म्हणजे हे फोक्स वॅगनचं स्वरचित गाणं होतं!

नंतर एका गोड बंगाली गाण्याचं सादरीकरण झालं जे बाऊल फोक मधील होतं,
मधुरने "दोतारा" हे बंगाली स्वरवाद्य तर मयुरेशने "खमुख" हे वाद्य वाजून त्यात सुंदर साज भरला!
बंगाली भाषेचा गोडवा, त्यात खुद्द बंगाली लोक संगीत, ती वाद्य आणि त्याचं खुसखुशीत सादरीकरण याने तोंड गोड न होतं तरच नवल!

 त्यानंतर आर.डी.बर्मन या महान संगीतकाराला एक ट्रिब्युट म्हणून त्यांच्या काही गाण्यांची मेडली सादर झाली..जिंदगी के सफर मे पासून सुरू झालेली ही गाडी दम मारो दम, बचना ए हसिनो, मेरी प्यारी बिंदू, या स्टेशनांवर थांबून शेवटी एक चतुर नारच्या कार शेड मध्ये जाऊन थांबली! जरी या सगळ्या चाली जुन्या असल्या, गाणी रेकॉर्ड झालेली असली, तरी प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणात अनेक विविध वाद्यांचा वापर करुन, तरी मूळ गाण्याला कुठेही धक्का न लावता अतिशय सुंदर पद्धतीने ती पोहोचवली गेली!

मग हा संच वळला तो पूर्वोत्तर व उत्तरभारताकडे..आसाम आणि हिमाचल या दोन राज्यातील दोन गीत प्रकार लागोपाठ सादर झाले..आसाम मधलं शिंगांचं वाद्य मधुरने असं काही वाजवलं की सगळे बघतच राहिले...इतका दमसास!
हिमाचलचं गाणं "माइये नी मिरिये" हे एका आई आणि मुलीचा असलेला संवाद, तिन्ही मुलींनी उत्तम गायलं..त्याला एका अनोख्या तंतू-ताल वाद्याचं मिश्रण असलेल्या "रिवाना" वाद्याची साथ मधुरने दिली..
आधी आसामच्या गाण्यात शिंगाच्या वाद्याचा वापर झाल्याने ते थोडं लाऊड झालं होतं, पण त्या पाठोपाठ लगेच हे अतिशय शांत गाणं सादर झालं आणि खरंच झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर ताकाचा घोट घेतल्यावर जसं वाटतं, अगदी तसं वाटलं!
ह्या नंतर एक मूड चेंजर नंबर आला!
एका महान पियानिस्टला Chick Corea यांना ट्रीब्युट म्हणून एक गाणं झालं ज्यांचं नाव होतं "स्पेन"..ह्यात गिटार आणि पर्कशन भलताच प्रभाव पाडून गेले..
यावरुन इतकं नक्कीच सिद्ध झालं की फक्त भारतीय संगीत नाही, तर ह्या सगळ्या लोकांचा पाश्चात्य संगीताचा अभ्यास सुद्धा उत्तम आहे!

ह्या नंतर आलेली एक मेडली थोडी खेदजनक होती.
कारण सुरवातीलाच मधुरने सांगितलं ही ह्या पुढे येणारी गाणी ही बॉलिवूड मधली प्रसिद्ध गाणी आहेत, पण मुळात हे वेगवेगळ्या प्रांतातील लोक संगीत आहे, जे उचलून वापरलं आहे, पण त्या प्रांताचा, तिथल्या लोकांचा नामोल्लेख सुद्धा ह्या दिगग्ज संगीतकारांनी केलेला नाही..
ह्यातील जवळपास सगळीच गाणी प्रत्येकाच्या ओठावर असणारी होती..
अर्थात ती सादर उत्तम प्रकारे केली गेली..शेवटी निमुडा निमुडाला तर लोक नाचायचेच बाकी राहिलेले...जबरदस्त ढोलकने सुरवात झाली आणि त्यानंतर मंदार बरोबच सुजेश मेननच्या खड्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं..
 पण तरी कलेच्या क्षेत्रात हा चोरी करण्याचा पसरत चाललेला रोग, विकृतीच खरंतर, अतिशय खेदजनक आहे..

असो, पुढे एका छोट्या मध्यंतरानंतर पाच-सहा जण चोंडकं आणि त्याच जातीतील, फक्त विविध प्रांतातून आलेली वाद्य घेऊन उभे होते, त्यांच्या साथीला बासरी आणि टाळ!
ह्या सगळ्यांनी एक जबरदस्त उत्स्फूर्त जुगलबंदी सादर केली!

त्यानंतर युरोप-साऊथ अमेरिका-गोवा आणि मग रॉक अँड रोल आणि बरंच काही असं जबरदस्त, पॉवर पॅक सादरीकरण झालं..
एक छोट्या अकॉर्डियन सारखं वाद्य घेऊन मधुर ने सुरवात केली..एक मस्त मूडचा अम्मल प्रेक्षकांवर झाला आणि थेट गोव्यात येऊन पोहोचला! गोवन भाषेचे परफेक्ट उच्चार, तो मूड, लहेजा सगळं इतकं सुंदर सादर होत होतं की संपूच नये असं वाटत होतं!
त्या नंतर मयुरेशने लॅटिन अमेरिकन वाद्य "काँगा" ने अप्रतिम सुरवात केली व त्यात झिंगोsss च्या गाण्यात सगळे झिंगून गेले!
आणि मग रॉक अँड रोल ने तो नंबर संपला!

त्यानंतर या पथकाचं आगमन झालं ते थेट राजस्थानात!
 केसरीया बालमच्या आर्त स्वरात सगळे न्हाऊन निघाले...आणि मग "छाप तिलक सब छिनी रे तोसे नैना मिलैके" मध्ये रंगून गेले..सिद्धांतने हार्मोनियमच्या आधारे ते सुंदर भरुन काढलं! या सादरीकरणात विशेष लक्ष वेधलं ते "रावणहत्था" आणि "खरताल" या वाद्यांनी! शेवटी मंदारचा सरगम आणि मधुरचा खरताल वरचा आविष्कार ही जुगलबंदी सुद्धा मज्जा आणून गेली!
आणि या नंतर वेळेअभावी शेवटच्या सादरीकरणाकडे वळावं लागलं..आणि ते होतं ट्रीब्युट टू  ए.आर.रहमान!
बासरीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी ह्या सादरीकरणाला सुरवात झाली आणि एकसे एक अप्रतिम गाणी सादर करुन शेवट केला गेला तो "माँ तुझे सलाम" ने...हे ऐकताना डोळ्यात पाणी न येतं तरच नवल...
अवघ्या १० जणांच्या संचाने आम्हाला जगभराची सफर अवघ्या दोन-अडीच तासात घडवून आणली..
ह्यातील मला जाणवलेली काही खास वैशिष्ट्य म्हणजे, ह्यातील कोणीच, कुठल्याच गाण्याला रिकामं बसलेलं नव्हतं..
गाणारा मंदार पिलवलकर हा स्वतः उत्तम तबला वादक आहेच, त्यामुळे त्याने अनेक वाद्य वाजवली, त्याच बरोबर सुजेश मेनन जो सुरवातीला कहोन आणि हातात दिमडी व शेजारी आणखी काही वाद्य घेऊन बसलेला त्याने त्याच्या खणखणीत आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं..
ब्रेसिला डिसुझा, संचिता गर्गे आणि क्षितिजा जोशी ह्या अप्रतिम गायल्याच पण त्याचबरोबर तिघींनी शेकर्स आणि आणखी अशी छोटी वाद्य वाजवली..
हार्मोनियम, कीबोर्ड, pianica अशी स्वर वाद्य वाजवणारा सिद्धांत जाधव मध्येच एका गाण्याला तबला वाजवायला बसलेला दिसला!
सुरवातीच्या महाराज गौरीनंदना मधून माधुर्यपूर्ण वाजणारी बासरी शेवटपर्यंत मोहिनी घालत होती..ती वाजवणाऱ्या विक्रांत तरे ह्याच्या मागे अनेक लहान मोठ्या बासऱ्यांची केस दिसत होतीच, पण त्यानेही मध्येच दोन तीन गाण्यांना 'इवी' हे अनोखं वाद्य वाजवलं!
पर्कशन वर असणाऱ्या मयुरेश शेर्लेकरने सुरवातीच्या गाण्यालाच अप्रतिम ढोलकीने सुरवात केली, व मग ढोलक, चोंडकं, या अनेक लहान-मोठ्या भारतीय वाद्यांपासून कहोन बॉक्स, तुंबा, दरबुगा ही पाश्चात्य वाद्य सुद्धा अतिशय खुबीने वाजवली, गोव्याच्या पॅटर्नला त्याने पटकन घातलेली टोपी सुद्धा नजरेतून सुटली नाही!
ह्यातून प्रत्येक गोष्टीचा किती आनंद घेत हे सगळे सादर करतात ते दिसून येतं!
आणि मधुर बद्दल तर काय बोलावं, तो गात होता, भरपूssर वेगवेगळी वाद्य वाजवत होता पण हे सगळं करताना त्याचा स्टेजवरचा वावर विशेष लक्षात येण्यासारखा होता..
एखादी दिव्य अनुभूती झाल्यावर जसं बेभान व्हायला होतं, तसाच मधुर संपूर्ण स्टेजभर बेभान वावरत होता..निवेदकाची भूमिका सुद्धा बजावत होता, प्रेक्षकांना सतत आपल्या हातातील वाद्यांनी अचंबित व्हायला भाग पाडत होता!
आणि इंग्लिश मध्ये म्हणतात तसं Last but not the least! The most patient guy of this band!
Bass गिटार वर असणारा रोहन चवाथे..अतिशय शांतपणे, प्रसन्न मुद्रेने प्रत्येक गाण्याचा पाया भरणारा हा मुलगा! इतके सतत बदल होत असताना एका गोष्टीत स्थिर रहाणं अतिशय कठीण असतं, आणि ते त्याने उत्तम साधलं!!
आणि ह्याच बरोबर आणखी एक विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ध्वनीक्षेपकाचा! कारण मी मुद्दाम कुतूहल म्हणून मोजलं तर स्टेजवर साधारण २०-२२ माईक सतत लावलेले होते..आणि शिवाय इलेक्ट्रॉनिक वाद्य! हे सगळं सांभाळाऱ्याला सलाम...कारण प्रत्येक वाद्याचा स्वभाव वेगळा, कुठल्या गाण्याला कुठलं वाद्य वाजणार, त्या क्षणी कमी जास्ती करायचा बॅलन्स..ह्यासाठी प्रचंड संयम, समयसूचकता आणि तंत्रांचं उत्तम ज्ञान या त्रिवेणीची गरज असते!

असा हा सर्वांगसुंदर फोक अनुभव, किंवा अनुभूती प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यावी हा माझा आग्रह आहे!





हे सगळे जे काम करत आहेत ते अतिशय मोठं आहे, आणि निरपेक्ष भावनेने केलेलं काम नेहेमीच थेट पोहोचतं, तसंच यांचं निर्मळ संगीत थेट हृदयाला हात घालतं!
मित्रांनो, ह्या बँडला, आपल्या संगीताला आपणच पुढे आणणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवूया..!
ह्या सगळ्यांना खूप यश मिळो..आणखी खूप नवीन सांगित प्रकार शिकायला मिळो, आणि त्यांच्यामार्फत ते आपल्याला ऐकायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Folks-Wagon च्या फेसबुक पेज आणि youtube चॅनेल च्या लिंक खाली देत आहे..नक्कीच एकदा बघा, आणि आणखी लोकांना बघायला द्या!

©कांचन लेले

Facebook Page - Folks-Wagon

https://www.facebook.com/Folks-Wagon-1426691574213698/

Youtube Channel -
https://www.youtube.com/channel/UCI0l9DZumA4ez0xsXMXTN0Q


Tuesday, 13 November 2018

वाढदिवस!

वाढदिवस, जन्मदिन, Birthday, सालगिराह इत्यादी इत्यादी अनेक शब्दांनी संबोधलेला एक खास दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच!
तसंच प्रत्येकाच्या जन्माची काहीतरी कहाणी असतेच..
केव्हातरी आपली आई, आजी, आत्या, काकू, बहीण वगैरे कोणीतरी सांगतंच…साधारण असं "काय सांगू तुला, इतकाss पाऊस पडत होता त्यादिवशी आणि नेमकं घरात कोणी नाही" किंवा "दिलेली तारीख होती महिन्यानंतरची आणि तुला कोण घाई झाली होती, आठव्याच महिन्यात अवतरलास" ..किंवा (विशेषतः आमच्या किंवा आमच्या आधीच्या "दुसऱ्या" मुलींच्या बाबतीत) मुलगी झाली म्हणून बघायला सुद्धा आल्या नव्हत्या सासूबाई"  किंवा "तुझ्या बाबांना कळवलं तेव्हा ते एका हॉटेलात जेवत होते, त्यांनी चक्क तिथे बसलेल्या सगळ्यांना गुलाबजाम द्यायला सांगितले!!"
एक ना दोन! अशी आपल्याच जन्माची कथा रंगवून रंगवून नातेवाईक सांगत असतात आणि आपण ऐकत असतो! तेवढंच काय ते आपल्याला समाधान!
कधी कधी बारीक विचार केला की कळतं आपल्या जन्माने आपण कित्तीsss लोकांना आनंद दिलेला असतो. आई-बाबांच्या डोळ्यात तो आयुष्यभर दिसतोच! आपण म्हणजे ज्यांची दुधावरची साय असतो त्या आजी-आजोबांच्या प्रत्येक स्पर्शात तो दडलेला असतो..
आपल्या मोठ्या भावंडांच्या चिडवण्यात तो दडलेला असतो, प्रत्येक लहान भावंडाला हमखास हे ऐकायला मिळतं - तू सावत्र आहेस, तुला कोंड्यावर घेतलं आहे वगैरे वगैरे!
हे झाले घरातले अगदी जवळचे लोक, ह्या नंतर येतात नात्याने जवळचे नसलेले, पण सहवासाने जवळचे असलेले म्हणजे शेजारी!
चाळ संस्कृतीत बघायला गेलं तर मुलं आपल्या घरी कमी आणि दुसऱ्याच्या घरीच जास्ती असतात..कारण सगळ्यांची दारं सतत उघडी असतात आणि कुणाच्याच घरात जायला संकोच वाटत नाही!
ह्या लोकांनी आपल्याला अंगा-खांद्यावर खेळवलेलं असतं..कित्येक वेळेला आपल्या आईने, " जरा ह्याच्याकडे बघा, मी पटकन भाजी घेऊन येते!" असं हक्काने सांगून निर्धास्तपणे आपल्याला ह्या सगळ्यांवर सोपवलेलं असतं! आपल्या नुसत्या खिदळण्याने ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो ते हेच सख्खे शेजारी!
त्यानंतर येतो उर्वरीत परिवार!
परिवारातील प्रत्येक व्यक्तीशी आपलं एक equation असतं!
काही भावंडं, मामा, आत्या इ. खूप हव्याशा वाटतात तर काहींना टाळावं कसं ह्याचे बहाणे शोधत असतो आपण! पण ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या येण्याने एक बारीकसा का होईना, फरक पडलेला असतोच!
मग कळायला लागल्यानंतर येतो मित्रपरिवार! केव्हातरी एखादा मित्र म्हणून जातो, "यार तू नसतास तर काय झालं असतं आज!"..
तसं बघायला गेलं तर हे वाक्य किती कॉमन आहे नाही..?
आपल्या भावनांच्या एखाद्या परमोच्च क्षणी आपण आपल्या तारणहार व्यक्तीला किती सहज हे म्हणून जातो!
पण अगदी शब्दशः विचार करत मागे गेलो आणि असं समजलो की आपण जन्मालाच आलो नसतो तर या प्रत्येकाच्या आयुष्यात काय फरक पडला असता…?
खरं या जगाचा अलिखित नियमच असा आहे की कोणावाचून काही अडत नसतं!
हे जरी खरं असलं, तरी प्रत्येकावाचून काहीतरी बदल होत असतात! काही अडत नसेल नक्की, पण फरक नक्कीच पडत असतो!
आपण जन्माला येतो, आणि बहुतेक वेळा प्रत्येक जन्माला आलेला जीव आनंद घेऊन असतो…काही अपवाद असणारच!
आपल्या येण्याने आणि आपल्या असण्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांना किती फरक पडतो हे बरेचदा आपल्याला माहीतच नसतं!
तसं असतं तर कदाचित आत्महत्यांचं प्रमाण इतकं जास्ती नसतं आपल्याकडे!
काहीही न करता आपल्याला एक सुंदर आयुष्य आयतं मिळत असतं..
त्याला आकार देणं मात्र आपल्या हातात असतं!
आता प्रत्येक जीव अगदी सुस्थितीत असलेल्या परिवारात जन्म घेईलच असं नाही, अनेकांना जन्मतः परिवार काय एक आई सोडल्यास कुणीच नसतं..पण तरी असे अनेक लोक आपल्या आयुष्याला सुंदर आकार देत असतात आणि दुसऱ्यांपुढे आदर्श ठेवत असतात, त्या प्रत्येकाला एक कडकडीत सलाम!
काही महाभाग असेही असतात की असलेल्या सुस्थितीत तंगड्या पसरुन वर उद्धटपणे तोंड वर करुन आपल्यालाच सांगतात आमच्या सात पिढ्या बसून खातील इतकी इस्टेट आहे आमची!
पण त्यांना बिचाऱ्यांना असा प्रश्न कधी पडत नसेल का की आपला जन्म काय इस्टेट वाया जाऊ नये म्हणून झाला काय..?
असो..
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातल्या एका सुंदर आणि सगळ्यात महत्वाच्या आठवणीचा उजाळा करणारा दिवस असतो!
प्रत्येक वर्षी आपण वयाने, शरीराने, बुद्धीने वाढत असतो!
पण प्रत्येक वाढदिवसाला आपलं आयुष्य एका वर्षाने कमी होत असतंच की!
वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे होतीच, पण त्याच्या पद्धतीत दिवसेंदिवस बदल होत चालला आहे!
पूर्वीच्या काळी वाढदिवसाला औक्षण केलं जायचं, झालंच तर एखादा नवीन कपड्याचा जोड मिळायचा..
नंतर नंतर आसपासच्या लहान मुलांना घरी बोलावलं जाई..
मग केक कापायची एक प्रथा रूढ झाली..
नंतर सगळ्यांना एखाद्या हॉटेल किंवा मूल लहान असेल तर हॉलमध्ये बोलावून जेवण द्यायची पद्धत आली..
मध्येच अनाथाश्रमात वाढदिवस साजरा करायची एक लाट येऊन गेली..
आणि सध्या म्हणजे सकाळी घरातून गेलं की पार्टी (पार्ट्या) करुन उत्तर रात्री घरी येण्याची प्रथा रूढ होत आहे!
अर्थात या सगळ्याची टक्केवारी ६०-८० टक्के असेल!
बाकी २०-४० टक्के लोकांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करणारे, एकट्याने साजरा करणारे, लक्षात असून साजरा न करणारे, लक्षातच नसणारे, मित्रांनी आग्रह केला म्हणून किंवा घरच्यांची हौस म्हणून साजरा करणारे इ. लोक येतातच!
प्रत्येक वाढदिवसाच्या आपल्या आठवणीही असतातच..
फोटोत बघितलेला पहिला वाढदिवस..
खरं पहिला वाढदिवस दणक्यात केला जातो, पण त्यात त्या मुलाला काय कळत असतं हा मोठा प्रश्नच आहे!
त्या नंतरचे लहान मुलांच्या घोळक्यात केलेलं वाढदिवस..
शाळेत नवी ड्रेस घालून केलेले वाढदिवस..
कॉलेजमध्ये मित्रांना पहिल्यांदा बाहेर पार्टी दिलेला वाढदिवस..
स्वतःच्या कमाईतून घरच्यांसाठी काहीतरी नेलेला वाढदिवस!
प्रेमात पडल्यानंतरच्या वाढदिवस!
(प्रेमभंगा नंतरचा एखादा sad वाढदिवस)
लग्नानंतरचा वाढदीवस!
आपल्या पोटच्या गोळ्याने पहिल्यांदा आपल्याला बोबड्या बोलात विश केलेला वाढदिवस!
नंतर मुलं मोठी झाल्यावर त्यांनी आपला साजरा केलेला वाढदिवस!
पन्नाशी, साठी, सत्तरी, पंचाहत्तरी, अंशी!
बघा किती आठवतायत ते!
हल्ली तो YOLO चा फंडा आलाय खरा, पण त्या बरोबरच प्रत्येक माणसाने वाढदिवशी मागे वळून त्या वर्षात आपण काय चांगलं केलं, काय शिकलो, इतरांना काय दिलं…एकूणच काय कमावलं आणि काय गमावलं ह्याचा विचार करुन तो दिवस साजरा करावा!
शेवटी प्रत्येक माणूस हा स्पेशल असतोच, अनेकांसाठी!
आणि सहज म्हणून हवंतर आपल्या वाढदिवसाला हा खेळ खेळून बघा, आपल्या जवळच्या लोकांना एवढंच विचारा की माझ्या असण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला…?!
ता.क. - मित्रांना विचारू नका, घोर निराशा झाल्यास मी जबाबदार नाही!
जाता जाता हा लेख त्याच्या स्फुर्तीस्थानाला, एका नवीन मैत्रीला आणि खास विसराळू मित्राला अर्पण,
ज्याने आज सहज मला सांगितलं, "अगं आपण उद्याच्या ऐवजी परवा भेटूया! माझ्या आत्ताच लक्षात आलं आहे की उद्या माझा वाढदिवस आहे!"
काय बोलणार आता…?!
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
जुग जुग जियो मित्रा! :)
©कांचन लेले
Photo Courtesy - Google

Thursday, 2 August 2018

नटखट लल्ला!

नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो,
नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो,
तेव्हा अनेक रूपाने चराचराला व्यापून टाकतो..!
आला की चैतन्यात येतो..
ढगात लपून बसला की मात्र नैराश्य देतो..
नकोसा वाटला की हक्काने समोर येऊन उभा रहातो,
आणि हवाहवासा वाटला की ढगांआडून हुलकावण्या देतो!
किती वाट पहायला लावायची...? असं म्हणून आपण दरडवावं तर इतका मोहक बरसतो की धरणीमाताच त्याची बाजू घ्यायला सुगंधाने उभी रहाते!
मग आपणही पुन्हा त्याच्या प्रेमात पडल्यावाचून राहूच शकत नाही!
तो असाच आहे..तुम्ही त्यावर प्रेम करा अथवा द्वेष करा,
तुम्ही त्याला टाळू शकत नाही..आणि आला की प्रेमात पडल्यावाचून राहू शकत नाही!
शेवटी सगळ्यांची तहान भागवणारा तो एकच तर आहे!
मग सांगा त्याला कृष्ण म्हंटलं तर चुकलं कुठे..?!
©कांचन लेले
Photo Credits - Google

Tuesday, 29 May 2018

अमावस्येचा चंद्र!


अमावस्येचा चंद्र!
अमावस्येचा चंद्र! काय…? हो…अमावस्येचा चंद्र!
शीर्षक वाचून हसू येईल कदाचित..पण इंग्रजीत म्हणतात तसं 'between the lines' या तत्वावर हे शीर्षक अगदीच योग्य आहे!
चंद्र…
सानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना अप्रूप असणारी अगम्य निर्मिती!
शीतलतेचं प्रतीक! सौंदर्याचा बावनकशी नमुना!
खरंतर लोभासवणा दिसतो तो पौर्णिमेचा चंद्र! किंवा प्रतिपदेची बाssरीक रेखीव कोर! पण अमावस्येचा चंद्र जितका हवासा वाटतो तितका कदाचित पौर्णिमेचाही नाही वाटत..
गमतीदार आहे नाही..?
तीस दिवसाच्या कालखंडात २९ दिवस चंद्र आकाशात असतो..
किती दिवस आपलं लक्ष जातं..?
पौर्णिमेला मात्र तो लक्ष वेधल्याशिवाय रहात नाही..आणि अमावस्येलाही!
अगदी शहराच्या भरमसाठ लाइट मध्ये सुद्धा तो जर्द काळोख जाणवला की मात्र मनात येऊन जातं 'आज अमावस्या असावी..'
कारण ३१ डिसेंम्बरला नवीन वर्ष साजरा करण्याच्या जमान्यात तिथी वगैरे कुठे बघत बसतायत लोक!
पण चंद्र काही वाईट वाटून घेत नाही…तो असतो सतत साक्षीला..
शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची तब्बेत सुधारत जाते..तो बाळसं धरत वाढणारा चंद्र जर रोज बघितला तर त्यासारखं सुख नाही! तो १५ दिवस असतो, पण लक्ष मात्र जातं आपलं फक्त पौर्णिमेला! त्यादिवशी नजर ठरत नाही असं रूप धारण करतो तो..
मग त्या दिवशी जरा ढगांआड गेलेला दिसला तरी आपण सारखे बघतो की ढग गेले की नाही, चंद्र पूर्ण दिसतो की नाही! जवळपास ढग म्हणजे त्याच्या उत्कर्षाला, सौंदर्याला लागणारी दृष्टच जणू!
पुढे वद्य प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत त्याची तब्बेत खालावत जाते..त्यातही एक वेगळं सौंदर्य धारण करून असतोच तो, फक्त आपलं लक्ष जात नाही! मग अचानक एक दिवस अंधःकार जाणवू लागतो…कदाचित या धकाधकीच्या आणि जलद जीवनपद्धतीत फक्त क्षणभर जाणवत असेल, पण तेवढा पुरून उरतो!
अचानक चंद्राचं महत्व कळतं..पण प्रतिपदेपर्यंत वाट बघावीच लागते!
म्हणून अमावस्येला चंद्र जास्त हवाहवासा वाटतो!
माणसांचंही काही वेगळं नसतं…
प्रत्येक व्यक्तिभोवती एक वलय असतं..
त्यात अग्रगण्य परिवार, मग नातलग, दोस्त मंडळी आणि आणि काही अशी नाती जी रक्ताची नसतात पण त्याहून सरस ठरतात!
ह्यातली काही माणसं सतत आपल्या अवतीभवती असतात, काही असतातच असं नाही, पण दोहोंपैकी कोणी लांब गेलं की पोकळी मात्र जाणवते!
उदाहरणार्थ घ्यायचं झालं, तर वडीलधारे आपल्या जन्मापासून-वयात येण्यापर्यंत पौर्णिमेचं शिखर गाठून जातात! पुढे एका एका कलेने बारीक होत जातात..तेव्हा गरज असते खरं लक्ष देण्याची! पण दुर्दैवाने बरेचदा आपलं लक्ष जातं ते एकदम अमावस्येलाच…
आणि सामान्यतः बघायचं झालं तर,
अनेक माणसांनी आपलं छोटंसं जग व्यापलेलं असतं..
ही माणसं सतत आपल्यासाठी असतात..काहींच्या संपर्कात आपण असतो सतत..पण काहींशी मात्र आपल्याला रोज संवाद साधता येतो, भेटता येतं असं नाही..ते त्यावर रागवतही नाहीत, ते सुद्धा असतात चंद्रासारखे सतत साक्षीला!
आणि कुठलंही नातं प्रेमाने आपलंसं केलं की ते दिवसागणिक कलेकलेने दृढ होत असतं.. ऋणानुबंध तयार होत असतात!
अशातच ज्या दिवशी ही मंडळी काही काळासाठी का होईना, पण लांब जातात असं दिसतं तेव्हा मात्र मन उचंबळून येतं!
डोळे पाणावतात! आपल्याला माहीत असतं की ती काही कायमची चालली नाहीत, सुट्टी संपली, काम झालं किंवा इतर असलेलं नियोजन साफल्य पावलं की ते येणार आहेत परत! पण तरी वेडं मन ऐकत नाही..
सतत आठवण काढत रहातं आणि मग आपणही खूप आतुरतेने वाट पहातो ती प्रतिपदेची!
कदाचित चंद्रही वाट पहात असतो प्रतिपदेची..
कारण अमावस्येला तुम्हाला तो दिसला नाही तरी तो बघत असतो तुम्हाला आणि असतो तुमच्या बरोबरच...कायम!
फक्त थोडासा ब्रेक घेतो अधूनमधून..कारण शेवटी
विरहाने नात्यातील प्रेम वाढत असतं ना!

काही विशेष लोकांना समर्पित ज्यांच्याशिवाय आयुष्य इतकं सुंssदर नसतं! I'm missing you all! लवकरच भेटू! :)
©कांचन लेले

Saturday, 12 May 2018

मातृत्व!


स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी..
असं पूर्वापार मानलं गेलं आहे…
आई!
या एका शब्दभोवती खूप मोठ्ठं वलय आहे…
आणि म्हंटलं तर तो फक्त दोन अक्षरी शब्द आहे!
म्हणजे कुठूनही घरात आलं आणि आईने दार नाही उघडलं की पहिला प्रश्न असतो "आई कुठंय?"
तिच्याकडे काही काम असतं असं नाही.. पण तरी तिचं असणं गरजेचं असतं..
बरं वाटत नसलं की कुणी म्हणतं डॉक्टरांकडे जाऊ..तेव्हा उत्तर एकच असतं..आधी आईला बोलवा..
कुठलीही वस्तू सापडत नसेल की वरवर शोधूनच पहिला फोन जातो आईला..मग अगदी लगेच सापडते…बरेच दिवस बाहेरगावी असलं की फोन करो ना करो, पण परतायच्या एक दिवस आधी जेवायला काय हवंय ते सांगायला फोन नक्की होतोच! एक ना दोन..म्हणून म्हंटलं..मोठ्ठं वलय आहे!
शाळेत असताना आम्हाला एक कविता होती..
आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर,
निळ्या आकाशाएवढा तिच्या मायेचा पदर!
डोक्याने खूपच लहान होतो तेव्हा..पण आईवर काहीतरी म्हणजे भारी ना..असं वाटायचं!
पण 'आकाशाएवढा पदर' असं वाचल्यावर घरी जाऊन दोन्ही हात पसरून तो मोजला नक्कीच असेल कोणीतरी! कारण त्या वयात 'मायेचा' या शब्दाचा अर्थ तितकासा कळत नसतो..
पण वर्षं उलटत जातात आणि अर्थही लागत जातात..
काही लोकांना वाटत असेल इतक्या लहान मुलांना हे काय कळणार..? नाहीच कळत..मान्य आहे..पण त्या लहान वयात शिकलेलं, मुलं कधीच विसरत नाहीत..त्यावेळी त्यांचा मेंदू टिपकागदाचं काम करत असतो.. आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा खरंच कळु लागतं, तेव्हा हे टिपलेलं सगळं रवंथ करत जातो..
संस्कार आणखी वेगळे काय असतात..?
फक्त चांगलं पेरत जायचं..इतकंच!
संस्कार म्हंटलं की पुन्हा आईचा त्यात सिंहाचा…अ…सिंहिणीचा वाटा असतो असंही मानलं जातं!
अगदी मातृत्वाची चाहूल लागल्यापासून एका स्त्रीचं, किंबहुना हल्ली बरेचदा एका बेफिकीर बिनधास्त मुलीचं रूपांतर 'आई'मधे होतं..मग चांगलंच खायचं, चांगलं ऐकायचं, चांगले विचार करायचे इत्यादींची मनात यादी केली जाते..गर्भसंस्काराची पुस्तकं पिंजून काढली जातात..पोथ्या पुराण वाढतं..स्वच्छता वाढते आणि कधी नव्ह ते प्रत्येक स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागते!
एखाद्या बिनधास्त मुलीच्या भावनांमध्ये तरंग उठत असतात..प्रत्येक गोष्टीवर 'react' व्हायचा 'angle' बदलत असतो..सगळी गणितं बदलत जातात..
लग्नाआधी 'मी नाही असलं काही करणार' असं म्हणणारी मुलगी बघता बघता कात टाकत असते!
हे सगळं बाळ गर्भात असताना..जन्माला आल्यावर तर बघायलाच नको..
जरा आधी म्हणायला गेलं तर बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो..त्या मरणप्राय यातना भोगल्यावरच एका जिवाच्या जन्माचा आनंद असतो! आपलं बाळ, आपल्या पोटचा गोळा!
पण जन्मा नंतर  मात्र त्या बाळाचे अनेक वाटेकरी असतात! फक्त गर्भात असताना ती एकटी मालकीण! त्या नंतर तिचं आयुष्यच बदलून जातं..खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होतो!
कारण ती स्वतःला विसरून जाते..आणि फक्त आई म्हणून जन्माला येते! अगदी सगळ्यात आवडत्या गोष्टीचा मोह सुद्धा ती सहज सोडून देते, कारण एकच असतं, घरी पिल्लू वाट बघत असेल!
खरंतर बरेचदा पिल्लू मजेत असतं, पण तिलाच करमत नाही त्याच्यावाचून!
पण हा आनंद प्रत्येक स्त्रीला अनुभवता येतोच असं नाही ना…?
मातृत्व हे कायम आईशी जोडलं गेलेलं आहे..
अर्थात ते सत्यही आहेच..पण खरंच या संज्ञेची व्याप्ती इतकीच आहे…?
नाही..नक्कीच नाही..जितकं मोठ्ठं वलय 'आई' या शब्दाभोवती आहे, त्याहून कितीतरी अधिक मोठं ते 'मातृत्व' या संज्ञेभोवती आहे!
पुराणातील उदाहरण घ्या, देवकी आणि यशोदा..
एक आई होती नात्याने, दुसरी ममत्वाने!
मातृत्व हे ममत्वाशी जोडलेलं आहे..
काही स्त्रियांना निसर्गाने गर्भधारणेचा अधिकार दिलेला नसतो, काहींना दिला असून त्याची कदर नसते, काहींचं लग्नच होत नाही, तर काही स्त्रिया आई होऊनही आपल्या मुलाला मातृत्वाने वाढवू शकत नाहीत!
अजब दुनिया आहे आपली..
पण म्हणून या जगात जन्माला येणारी मुलं वाढायची थांबत नाहीत ना..?
ज्यांना आई नाही, त्याची आई होणारं कुणीतरी असतंच ना..? मग ते अगदी बाबा, आजी, आजोबा, मावशी, आत्या, शाळेतल्या बाई, अनाथाश्रमातल्या बाई, पाळणाघरातल्या बाई इत्यादी इत्यादी..यादी खूप मोठी होऊ शकते..
कधी कधी एखादी मैत्रीणच आपली आई होऊन जाते..तर कधी अगदी अनपेक्षितपणे एखाद्या हळव्या क्षणी मित्र असा डोक्यावर हात ठेवतो की क्षणभर कळूच नये नेमका कोणाचा हात आहे ते!
कधी एखाद्या एकट्या मुलाने एखादी मांजर किंवा कुत्रा पाळला असेल तर त्याचं नीट निरीक्षण करून बघा..तो त्याची आई झालेला असतो केव्हाच!
जन्मलेल्या प्रत्येक जीवामध्ये मातृत्व दडलेलं असतं..आणि प्रसंगानुरूप ते बाहेर येत असतं!
म्हणून म्हंटलं खुप मोठी व्याप्ती आहे 'मातृत्वाची'!
आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी कळत नकळत प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात जेव्हा आई समोर नसते त्या क्षणाला..पण ती जागा तात्पुरती कुणीतरी भरून काढत असतं!
ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांना कधी कुणाच्या मुलांना सांभाळताना बघितलं आहे..?
पोटच्या गोळ्याला कुणी लावणार नाही इतका जीव ती माऊली कुठल्याही मुलाला सहज लावते..
निसर्गाची क्रूर चेष्टा तिच्यातील मातृत्व आणखी दृढ करते हे मात्र निश्चित!
अशा प्रत्येक माउलीला एक सलाम आणि लोकांमध्ये दडलेल्या मातृत्वाच्या ओढीला नम्र अभिवादन!
अशा अनेक जीवलगांनी आयुष्य सुंदर होत असतं..
गरज असते फक्त त्यांना धरून ठेवण्याची
आणि प्रत्येकाने आपल्यातील संवेदना जपण्याची, न जाणो तुम्हीच कधी कुणाची आई होऊन जाल!
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
©कांचन लेले

चित्र सौजन्य - Google

Friday, 11 May 2018

आंडू गुंडू थंडा पाणी!


काल एका बाल मैत्रिणीने एक 'meme' पाठवलं..
त्यात एक जण दुसऱ्याला म्हणत असतो - "ए तो बघ south indian!"
आणि दुसरा लगेच ओरडतो - "ए आंडू गुंडू थंडा पाणी!"
एवढं वाचल्याबरोबर माझ्या मनाचं टाइम मशीन अचानक सुरू झालं आणि मला एक दशक किंवा आणखी थोडं जास्ती मागे घेऊन गेलं!
आत्ता मूर्खपणा वाटत असेल पण खरंच आम्ही असं करायचो तेव्हा..दाक्षिणात्य लोकांना आंडू गुंडू म्हणायचो, सरदारजी दिसला की चंगोटी (पहिली दोन बोटं टोकाला टोक जुळवून धरायची, म्हणजे त्यातून एक भोक होतं आणि मग कोणीतरी त्यात बोट घालून ते फोडायचं!),  केस कापले की 'ताजी' मारणं, नवीन वस्तू घेतली आणि कळलं की जोरात धपाटा मारणं, birthday bombs मारणं! इत्यादी इत्यादी!
हे झाले जनरल खेळ..मग शाळेतले खेळ वेगळे!
ऑपस्-बँट्स, जॉली, पेन फाइट, स्केल फाइट..हे न लिहिता खेळायचे खेळ..आणि लिहून खेळायचे तर कहरच!
त्यात दोन प्रकारचे लोक! एक म्हणजे कुठल्याही वहीच्या मागे हे खेळ खेळणारे, तर दुसरे बाकी सगळ्या विषयाच्या वह्या रिकाम्या असल्या तरी त्याला हात न लावता एका वर्षात साधारण ५-६ रफ बुक भरणारे! (म्हणजे माझ्यासारखे!! आणि मग पुढच्या वर्षी विषयांच्या रिकाम्या वह्या रफ बुक म्हणून वापरणारे!!)
तर ह्या खेळात मुख्यत्वे "नाव-गाव-फळ-फुल", बिंगो, एक अक्षर घेऊन जास्तीत जास्त नावं लिहिणं आणि लिहून दम-शेराज (चित्रपटांच्या नावाचा)! हे असायचे! कित्येक वेळा शिक्षक शिकवतानाच ते खेळले जायचे हे वेगळं सांगणे न लगे!
बाकी अगदी लहानपणी चिठ्या टाकून चोर पोलीस वगैरे बरेच खेळ खेळलेलो!
पण आज माझ्याकडे काही वह्या जपून ठेवल्या आहेत त्यात हे सगळे खेळ आहेत! आज बघताना इतकं छान वाटतं..आम्हाला कधी फोनची गरज नाही पडली खेळायला!
आता माझाही वडीलधाऱ्यांसारखा 'आमच्या वेळी…' असा सूर लागतोय पण त्याला पर्यायच नाही!
अलीकडे एका शाळेतल्या मैत्रिणीबरोबर शाळेच्या बाहेरच्या रस्त्याने जाताना आम्ही थांबलो आणि बराच वेळ बदललेली शाळा बाहेरूनच बघितली..
सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या!
खरंतर त्या भागात गेले की नेहेमीच माझा १०० चा स्पीड अचानक २० वर येतो आणि पावलं रेंगाळतात!
एक एक जागा आजही आठवते! इथे कैरीवाला असायचा, इथे बाबू वडापाववाला, इथे झोपडी..
आज यातली अगदी एक दोनच लोकं आहेत..पण ती अजूनही ओळखतात आम्हाला!
त्या झोपडीत पेप्सीकोला, गोळ्या, चिंचेची एक दोन प्रकारची चॉकलेट्स, पेपरमिंटच्या सिगारेट ज्या आमच्यासाठी त्या वेळी 'swag' ची परिसीमा असायच्या! त्या पेप्सी कोला मध्ये सुद्धा दोन प्रकार असायचे! एक जाड जी आठ आण्याला मिळायची आणि दुसरी खूप लांब, कोपरापासून बोटांपर्यंत लांब आणि बारीक जी एक रुपयाला मिळायची!
एकदा जाड पेप्सी संपल्या होत्या तेव्हा मी आणि मैत्रिणीने आठ-आठ आणे एकत्र करून मोठी लांब पेप्सी घेतली..आणि एका बाजूने तिने आणि दुसऱ्या बाजूने मी खाल्ली! किती वेडेपणा!
आता ही मजा कधी घेता येणार..?!
आणखी एक जबराट आठवण म्हणजे..
एका स्पोर्ट्स डे ला मी आणि माझी मैत्रीण चक्क दादरहून कुर्ल्याला चालत आलो! कशासाठी..? तर चिंच आणि कैरी खायची होती पण पैसे नव्हते! म्हणून बसच्या तिकिटाचे पैसे त्यात घालून आम्ही ते खात खात चालत आलो! आता AC गाड्यातून येणाऱ्या पोरांना हे सांगितलं तर हसतील लेकाचे!
पण तेव्हा एवढं उन्हाचं चालून ना आम्ही आजारी पडलो ना आम्हाला कोणी पळवून नेलं! (हे धोक्याचं होतं हा विचारही तेव्हा बालमनाला शिवला नाही!)
असे अनेक किस्से आहेत! 
बिल्डिंग मध्ये खेळायचे खेळ आणखी निराळे
Red Letter, बॅडमिंटन, आणि अर्थातच क्रिकेट..आणि तेव्हाचं क्रिकेट आणी बॅडमिंटन खेळायचे विशेष नियम बरं! क्रिकेट म्हणजे अर्थातच एक टप्पा आउट! आणि बॅडमिंटन म्हणजे एकदा शटल खाली पडलं की गेला टर्न! काय मज्जा यायची पण!
गटारात बॉल गेला की हातानेच तो काढणं, सुदैवाने
आमच्या वेळी लाइफ बॉय हॅन्ड वॉश नव्हता बाई!
आणि तरी आम्ही धुवत रहा धुवत रहा…असं काही केलं नाही बाबा….असो! 
प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये किंवा सोसायटी मध्ये एखाद्या आजी असतातच ज्या कायम मुलांच्या खेळण्यावर डोळा ठेवून असतात! मग त्यांना मुद्दाम पिडणं आलंच! शाळेतही आम्ही कित्येक शिक्षकांना नावं पाडली होती, अर्थात टोपण नावं! मी तर एक चार पानी कविता सुद्धा केली होती!
एक ना दोन!
पण ह्या सगळ्या भानगडीत आम्ही कधीच मोठ्यांचा अनादर नाही केला..टिंगल मणभर केली, पण मन भरून आदरही दिलाच!

हा महिनाच असा "nostalgic" होण्याचा आहे नाही..?!
विशेषतः उन्हाळी सुट्यांमुळे!
प्रत्येकाच्या बालपणीच्या, उन्हाळी सुट्य्यांच्या, मामाच्या गावाच्या कित्ती आठवणी असतील ना..?
माझ्यामते आम्ही सगळ्यात भाग्यवान..आमचं बालपण कोकणात गेलं!
आंब्याचा वीट येण्याइतका अस्सल हापूस खाण्यात आणि नंतर गळवं आली की इंजेक्शन घेण्यात गेलं!
ते सुट्टीचे खेळ आणखीनच वेगळे! 
जिना भो! किंवा डबा ऐस पैस..डोंगर का पानी, विष अमृत, इत्यादी! सकाळचा मऊ भात खाल्ला की मागे पाय लावून जे पसार व्हायचो ते दुपारी जेवायला हाका मारून बोलवायला लागायचं..पुन्हा निजा-निज झाली की कोणाच्यातरी माडीवर जमून लपाछपी, सोंगट्या, भातुकली वगैरे खेळायचं..किंवा ठकठक, चंपक, चांदोबा वाचायचं!
संध्याकाळी पुन्हा खळ्यात! मग सातच्या जरा आधी घरात जायचं, हात-पाय धुवायचे..आणि शुभंकरोती म्हणायला सगळे झोपळ्यावर! मग रात्र असायची पत्यांच्या नावावर! आणि शेवटी अगदी घाबरत असूनही लाइट घालवून भुताच्या गोष्टी ऐकायच्या, आणि सगळे झोपले की पांढरे पंचे हवेने हलले तरी रामरक्षा म्हणायला सुरवात करायची!
भाड्याने कॅसेट आणून पिक्चर बघणं! मारिओ सारखे खेळ खेळणं! फक्त मे महिन्यातच व्हायचं!
त्या वेळचे पिक्चर सुद्धा इतके भारी असायचे, मुख्य म्हणजे संपूर्ण परिवाराबरोबर बसून बघता यायचे..कारण सगळ्यात हॉट scene दाखवायचा असेल (म्हणजे थोडक्यात bedroom scene) की दोन फुल एकमेकांवर अपटायची आणि ब्लॅक आऊट होऊन पुढील सिन सुरू व्हायचा..समझने वाले समझते, बाकी सचमे pogo देखते!
हल्ली काही scenes दाखवायला bedroom लागतेच असंही नाही, आणि ते बघायला कोणाला बंदी करतात असंही नाही! Afterall we should give children their own space!
द्या स्पेस..आणि मग खऱ्या space मध्ये जायची स्वप्न बघायच्या ऐवजी वाया जातायत पोरं!
अर्थात प्रत्येक generation मधे वाया जाणाऱ्या पोरांचा एक भाग असतोच, पण त्यात कमालीची वाढ होते आहे हे दुर्दैव! हल्लीची पोरं खूप शार्प आहेत..पण त्यांची ही हुशारी योग्य कामी येत नाही हे दुर्दैव!
अलीकडेच मी शाळेत गेले होते, प्रिन्सिपल कडे काही काम असल्याने ऑफिसच्या बाहेर बसले होते, तेवढ्यात एक टीचर आल्या..एक साक्षात्कारी नजर माझ्याकडे टाकली आणि म्हणाल्या "तुम्ही फाssर  बरे होतात गं!" मी सुद्धा गमतीत तेव्हा "बघा, तेव्हा आम्ही हे म्हणायचो तर तुम्हाला पटायचं नाही!" असं उत्तर दिलं खरं पण हल्लीच्या शिक्षकांची व्यथा तेच जाणे! आधी जनरेशन गॅप ही खरोखर एका पिढीची असायची, हल्ली ती दशकावर येऊन ठेपली आहे!
असो!
आमचं बालपण मात्र खूपच भारी होतं!
आठवणी काढू तेवढ्या थोड्याच!
रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी!
बरं त्या वयातल्या महत्त्वाकांक्षा तर इतक्या भारी असायच्या की दृष्टच काढावी स्वतःची!
रोज काहीतरी नवं व्हायचं असायचं आपल्याला..
काही उदात्त विचारांच्या लोकांना डॉक्टर वगैरे व्हायचं असायचं..पण मला आपलं इस्त्रीवाल्याला बघितलं की इस्त्रीवाला व्हायचं असायची, त्याचं ते सफाईदारपणे शर्ट सुरकुती न पाडता उलट करणं आणि कडक घडी करणं मला जाम आवडायचं!
मला बसची, कंडक्टर ओढतो ती दोरी आणि तिकीट पंच करायच्या स्टॅपलर सारख्या वस्तूची टिकटिक पण आवडायची..म्हणून मला कंडक्टर व्हायचं होतं..नंतर मला ACP प्रद्युमन व्हायचं होतं! जाऊदे लिस्ट फारच लांब होईल आणि उगच कशाला स्वतःची अक्कल पाजळा ना! 
पण आज मागे वळून बघितलं की वाटतं हे सगळं भांडवल आहे आपल्या आयुष्याचं!
हल्ली डिप्रेशन नावाचा एक साथीचा रोग पसरत चालला आहे...मला मनापासून वाटतं, जेव्हा असे क्षण येतील तेव्हा ह्या सगळ्या आठवणी किती मोठा आधार आहेत! एक गोष्ट जरी आठवली तरी चेहऱ्यावर सुंदर हास्य विलसतं! मग डिप्रेशनकी क्या हिम्मत मुझे हात लागये..?!
सुखी आयुष्याचा कानमंत्र सांगते..असं कधीही झालं की तुम्ही लहानपणी केलेल्या गोष्टी पुन्हा एकदा करून बघा! कल्ला करून बघा! शाळेतल्या मित्रांना भेटा! पुन्हा आयुष्य भरभरून जगावंसं वाटेल!
"पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे किती वाटते..
उतरून ओझे वयाचे चला रे, पहा कोवळे ऊन बोलावते!
वर्षांचे पूल आज, ओलांडून ये आल्याड!
घे तुला हवीच मधली सुट्टी!
थोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी!"
( कवी - संदीप खरे!)
सध्या परीक्षेचा काळ आहे..आणि मागच्या रिकामटेकड्या महिन्यात काही म्हणजे काही सुचलं नाही..आता कादंबरी लिहून होईल इतकं सुचतं आहे..आता येतं ह्याचं डिप्रेशन मला..पण उद्या त्यावर एक उपाय करणार आहे!
उद्या एखादा दाक्षिणात्य दिसल्यावर जोरात ओरडणार आहे
 'एsss आंडू गुंडू थंडा पाणी!!!!"

©कांचन लेले

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...