आंडू गुंडू थंडा पाणी!
काल एका बाल मैत्रिणीने एक 'meme' पाठवलं..
त्यात एक जण दुसऱ्याला म्हणत असतो - "ए तो बघ south indian!"
आणि दुसरा लगेच ओरडतो - "ए आंडू गुंडू थंडा पाणी!"
एवढं वाचल्याबरोबर माझ्या मनाचं टाइम मशीन अचानक सुरू झालं आणि मला एक दशक किंवा आणखी थोडं जास्ती मागे घेऊन गेलं!
आत्ता मूर्खपणा वाटत असेल पण खरंच आम्ही असं करायचो तेव्हा..दाक्षिणात्य लोकांना आंडू गुंडू म्हणायचो, सरदारजी दिसला की चंगोटी (पहिली दोन बोटं टोकाला टोक जुळवून धरायची, म्हणजे त्यातून एक भोक होतं आणि मग कोणीतरी त्यात बोट घालून ते फोडायचं!), केस कापले की 'ताजी' मारणं, नवीन वस्तू घेतली आणि कळलं की जोरात धपाटा मारणं, birthday bombs मारणं! इत्यादी इत्यादी!
हे झाले जनरल खेळ..मग शाळेतले खेळ वेगळे!
ऑपस्-बँट्स, जॉली, पेन फाइट, स्केल फाइट..हे न लिहिता खेळायचे खेळ..आणि लिहून खेळायचे तर कहरच!
त्यात दोन प्रकारचे लोक! एक म्हणजे कुठल्याही वहीच्या मागे हे खेळ खेळणारे, तर दुसरे बाकी सगळ्या विषयाच्या वह्या रिकाम्या असल्या तरी त्याला हात न लावता एका वर्षात साधारण ५-६ रफ बुक भरणारे! (म्हणजे माझ्यासारखे!! आणि मग पुढच्या वर्षी विषयांच्या रिकाम्या वह्या रफ बुक म्हणून वापरणारे!!)
तर ह्या खेळात मुख्यत्वे "नाव-गाव-फळ-फुल", बिंगो, एक अक्षर घेऊन जास्तीत जास्त नावं लिहिणं आणि लिहून दम-शेराज (चित्रपटांच्या नावाचा)! हे असायचे! कित्येक वेळा शिक्षक शिकवतानाच ते खेळले जायचे हे वेगळं सांगणे न लगे!
बाकी अगदी लहानपणी चिठ्या टाकून चोर पोलीस वगैरे बरेच खेळ खेळलेलो!
पण आज माझ्याकडे काही वह्या जपून ठेवल्या आहेत त्यात हे सगळे खेळ आहेत! आज बघताना इतकं छान वाटतं..आम्हाला कधी फोनची गरज नाही पडली खेळायला!
आता माझाही वडीलधाऱ्यांसारखा 'आमच्या वेळी…' असा सूर लागतोय पण त्याला पर्यायच नाही!
अलीकडे एका शाळेतल्या मैत्रिणीबरोबर शाळेच्या बाहेरच्या रस्त्याने जाताना आम्ही थांबलो आणि बराच वेळ बदललेली शाळा बाहेरूनच बघितली..
सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या!
खरंतर त्या भागात गेले की नेहेमीच माझा १०० चा स्पीड अचानक २० वर येतो आणि पावलं रेंगाळतात!
एक एक जागा आजही आठवते! इथे कैरीवाला असायचा, इथे बाबू वडापाववाला, इथे झोपडी..
आज यातली अगदी एक दोनच लोकं आहेत..पण ती अजूनही ओळखतात आम्हाला!
त्या झोपडीत पेप्सीकोला, गोळ्या, चिंचेची एक दोन प्रकारची चॉकलेट्स, पेपरमिंटच्या सिगारेट ज्या आमच्यासाठी त्या वेळी 'swag' ची परिसीमा असायच्या! त्या पेप्सी कोला मध्ये सुद्धा दोन प्रकार असायचे! एक जाड जी आठ आण्याला मिळायची आणि दुसरी खूप लांब, कोपरापासून बोटांपर्यंत लांब आणि बारीक जी एक रुपयाला मिळायची!
एकदा जाड पेप्सी संपल्या होत्या तेव्हा मी आणि मैत्रिणीने आठ-आठ आणे एकत्र करून मोठी लांब पेप्सी घेतली..आणि एका बाजूने तिने आणि दुसऱ्या बाजूने मी खाल्ली! किती वेडेपणा!
आता ही मजा कधी घेता येणार..?!
आणखी एक जबराट आठवण म्हणजे..
एका स्पोर्ट्स डे ला मी आणि माझी मैत्रीण चक्क दादरहून कुर्ल्याला चालत आलो! कशासाठी..? तर चिंच आणि कैरी खायची होती पण पैसे नव्हते! म्हणून बसच्या तिकिटाचे पैसे त्यात घालून आम्ही ते खात खात चालत आलो! आता AC गाड्यातून येणाऱ्या पोरांना हे सांगितलं तर हसतील लेकाचे!
पण तेव्हा एवढं उन्हाचं चालून ना आम्ही आजारी पडलो ना आम्हाला कोणी पळवून नेलं! (हे धोक्याचं होतं हा विचारही तेव्हा बालमनाला शिवला नाही!)
असे अनेक किस्से आहेत!
बिल्डिंग मध्ये खेळायचे खेळ आणखी निराळे
Red Letter, बॅडमिंटन, आणि अर्थातच क्रिकेट..आणि तेव्हाचं क्रिकेट आणी बॅडमिंटन खेळायचे विशेष नियम बरं! क्रिकेट म्हणजे अर्थातच एक टप्पा आउट! आणि बॅडमिंटन म्हणजे एकदा शटल खाली पडलं की गेला टर्न! काय मज्जा यायची पण!
गटारात बॉल गेला की हातानेच तो काढणं, सुदैवाने
आमच्या वेळी लाइफ बॉय हॅन्ड वॉश नव्हता बाई!
आणि तरी आम्ही धुवत रहा धुवत रहा…असं काही केलं नाही बाबा….असो!
प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये किंवा सोसायटी मध्ये एखाद्या आजी असतातच ज्या कायम मुलांच्या खेळण्यावर डोळा ठेवून असतात! मग त्यांना मुद्दाम पिडणं आलंच! शाळेतही आम्ही कित्येक शिक्षकांना नावं पाडली होती, अर्थात टोपण नावं! मी तर एक चार पानी कविता सुद्धा केली होती!
एक ना दोन!
पण ह्या सगळ्या भानगडीत आम्ही कधीच मोठ्यांचा अनादर नाही केला..टिंगल मणभर केली, पण मन भरून आदरही दिलाच!
हा महिनाच असा "nostalgic" होण्याचा आहे नाही..?!
विशेषतः उन्हाळी सुट्यांमुळे!
प्रत्येकाच्या बालपणीच्या, उन्हाळी सुट्य्यांच्या, मामाच्या गावाच्या कित्ती आठवणी असतील ना..?
माझ्यामते आम्ही सगळ्यात भाग्यवान..आमचं बालपण कोकणात गेलं!
आंब्याचा वीट येण्याइतका अस्सल हापूस खाण्यात आणि नंतर गळवं आली की इंजेक्शन घेण्यात गेलं!
ते सुट्टीचे खेळ आणखीनच वेगळे!
जिना भो! किंवा डबा ऐस पैस..डोंगर का पानी, विष अमृत, इत्यादी! सकाळचा मऊ भात खाल्ला की मागे पाय लावून जे पसार व्हायचो ते दुपारी जेवायला हाका मारून बोलवायला लागायचं..पुन्हा निजा-निज झाली की कोणाच्यातरी माडीवर जमून लपाछपी, सोंगट्या, भातुकली वगैरे खेळायचं..किंवा ठकठक, चंपक, चांदोबा वाचायचं!
संध्याकाळी पुन्हा खळ्यात! मग सातच्या जरा आधी घरात जायचं, हात-पाय धुवायचे..आणि शुभंकरोती म्हणायला सगळे झोपळ्यावर! मग रात्र असायची पत्यांच्या नावावर! आणि शेवटी अगदी घाबरत असूनही लाइट घालवून भुताच्या गोष्टी ऐकायच्या, आणि सगळे झोपले की पांढरे पंचे हवेने हलले तरी रामरक्षा म्हणायला सुरवात करायची!
भाड्याने कॅसेट आणून पिक्चर बघणं! मारिओ सारखे खेळ खेळणं! फक्त मे महिन्यातच व्हायचं!
त्या वेळचे पिक्चर सुद्धा इतके भारी असायचे, मुख्य म्हणजे संपूर्ण परिवाराबरोबर बसून बघता यायचे..कारण सगळ्यात हॉट scene दाखवायचा असेल (म्हणजे थोडक्यात bedroom scene) की दोन फुल एकमेकांवर अपटायची आणि ब्लॅक आऊट होऊन पुढील सिन सुरू व्हायचा..समझने वाले समझते, बाकी सचमे pogo देखते!
हल्ली काही scenes दाखवायला bedroom लागतेच असंही नाही, आणि ते बघायला कोणाला बंदी करतात असंही नाही! Afterall we should give children their own space!
द्या स्पेस..आणि मग खऱ्या space मध्ये जायची स्वप्न बघायच्या ऐवजी वाया जातायत पोरं!
अर्थात प्रत्येक generation मधे वाया जाणाऱ्या पोरांचा एक भाग असतोच, पण त्यात कमालीची वाढ होते आहे हे दुर्दैव! हल्लीची पोरं खूप शार्प आहेत..पण त्यांची ही हुशारी योग्य कामी येत नाही हे दुर्दैव!
अलीकडेच मी शाळेत गेले होते, प्रिन्सिपल कडे काही काम असल्याने ऑफिसच्या बाहेर बसले होते, तेवढ्यात एक टीचर आल्या..एक साक्षात्कारी नजर माझ्याकडे टाकली आणि म्हणाल्या "तुम्ही फाssर बरे होतात गं!" मी सुद्धा गमतीत तेव्हा "बघा, तेव्हा आम्ही हे म्हणायचो तर तुम्हाला पटायचं नाही!" असं उत्तर दिलं खरं पण हल्लीच्या शिक्षकांची व्यथा तेच जाणे! आधी जनरेशन गॅप ही खरोखर एका पिढीची असायची, हल्ली ती दशकावर येऊन ठेपली आहे!
असो!
आमचं बालपण मात्र खूपच भारी होतं!
आठवणी काढू तेवढ्या थोड्याच!
रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी!
बरं त्या वयातल्या महत्त्वाकांक्षा तर इतक्या भारी असायच्या की दृष्टच काढावी स्वतःची!
रोज काहीतरी नवं व्हायचं असायचं आपल्याला..
काही उदात्त विचारांच्या लोकांना डॉक्टर वगैरे व्हायचं असायचं..पण मला आपलं इस्त्रीवाल्याला बघितलं की इस्त्रीवाला व्हायचं असायची, त्याचं ते सफाईदारपणे शर्ट सुरकुती न पाडता उलट करणं आणि कडक घडी करणं मला जाम आवडायचं!
मला बसची, कंडक्टर ओढतो ती दोरी आणि तिकीट पंच करायच्या स्टॅपलर सारख्या वस्तूची टिकटिक पण आवडायची..म्हणून मला कंडक्टर व्हायचं होतं..नंतर मला ACP प्रद्युमन व्हायचं होतं! जाऊदे लिस्ट फारच लांब होईल आणि उगच कशाला स्वतःची अक्कल पाजळा ना!
पण आज मागे वळून बघितलं की वाटतं हे सगळं भांडवल आहे आपल्या आयुष्याचं!
हल्ली डिप्रेशन नावाचा एक साथीचा रोग पसरत चालला आहे...मला मनापासून वाटतं, जेव्हा असे क्षण येतील तेव्हा ह्या सगळ्या आठवणी किती मोठा आधार आहेत! एक गोष्ट जरी आठवली तरी चेहऱ्यावर सुंदर हास्य विलसतं! मग डिप्रेशनकी क्या हिम्मत मुझे हात लागये..?!
सुखी आयुष्याचा कानमंत्र सांगते..असं कधीही झालं की तुम्ही लहानपणी केलेल्या गोष्टी पुन्हा एकदा करून बघा! कल्ला करून बघा! शाळेतल्या मित्रांना भेटा! पुन्हा आयुष्य भरभरून जगावंसं वाटेल!
"पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे किती वाटते..
उतरून ओझे वयाचे चला रे, पहा कोवळे ऊन बोलावते!
वर्षांचे पूल आज, ओलांडून ये आल्याड!
घे तुला हवीच मधली सुट्टी!
थोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी!"
( कवी - संदीप खरे!)
सध्या परीक्षेचा काळ आहे..आणि मागच्या रिकामटेकड्या महिन्यात काही म्हणजे काही सुचलं नाही..आता कादंबरी लिहून होईल इतकं सुचतं आहे..आता येतं ह्याचं डिप्रेशन मला..पण उद्या त्यावर एक उपाय करणार आहे!
उद्या एखादा दाक्षिणात्य दिसल्यावर जोरात ओरडणार आहे
'एsss आंडू गुंडू थंडा पाणी!!!!"
©कांचन लेले
छाने.
ReplyDeleteएक सुधारणा: birthday bombs नाही, bums
वाह!!! सुरेख, अगदी झाडून सगळ्या आठवणी capture केल्यास की गं!!!
ReplyDeleteMasta Kanchan! Mala ekdum Mutat chi athvan ali he vachun! Kiti majja keley apan! :) :) :)
ReplyDelete>>गटारात बॉल गेला की हातानेच तो काढणं, सुदैवाने
ReplyDeleteआमच्या वेळी लाइफ बॉय हॅन्ड वॉश नव्हता बाई!
आणि तरी आम्ही धुवत रहा धुवत रहा…असं काही केलं नाही बाबा<<
खूपच मस्त लिहिलं आहेस ग, जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊