मन शांsत निजावे…
मन शांsत निजावे…
'काय कटकट आहे साला..रोज तेच तेच..वेळ देत नाही..बाहेर जाऊया…वेळ देत नाही..बाहेर जाऊया..
काय टाईम पास करत फिरत असतो का..? कामच करतोय ना..?
कोणासाठी करतो..? घरासाठीच ना..?
जगणं मुश्किल करुन टाकलंय तुम्ही दोघींनी माझं..
बाहेर कटकट..दिवसभर वणवण आणि घरी आलं की ही कटकट..वैताग आला जगायचा..'
ऋषीचा सगळा राग एकदम घरात बाहेर पडला..
आणि त्याची आई आणि बायको ऋचा बघतच राहिल्या..
ऋचाने आईंना नजरेनेच खुणावलं..तशा आई पुढे झाल्या आणि ऋषीच्या डोक्यावरुन हात फिरवला..
'शांत हो रे…आमचं चुकलं..पण तुला जरा बदल मिळावा म्हणून म्हणत होतो चार दिवस बाहेर जाऊया..गेले काही दिवस आम्ही बघतोय तू खूप टेन्शन मध्ये असतोस..काही सांगत नाहीस..लवकर जातोस..उशिरा येतोस..तब्बेत पण खराब होत चालली आहे तुझी…पण राहिलं..पुन्हा नाही बोलणार…'
काही वेळ शांततेत गेला..
आणि ऋषी बोलू लागला..
'मी तुम्हा दोघींपासून काहीतरी लपवलंय इतके दिवस..पण आज सांगून टाकतो…माझी नोकरी गेली आहे..आज महिना होईल..
रोज प्रयत्न करतोय नवीन नोकरी शोधायचे..पण हाती फक्त निराशाच येते आहे…आणि त्यात तुम्ही सारखं चार दिवस बाहेर जाऊ-बाहेर जाऊ म्हणताय…म्हणजे परत खर्च…काय करु मी..?
थकलो प्रयत्न करुन करुन…ओळखीच्या सगळ्या लोकांकडे शब्द टाकला..पण सगळ्यांनी पाठ फिरवली..
या जगात नक्की आपलं कोण आणि परकं कोण…?
का सगळेच अप्पलपोटी, स्वार्थी असतात...कोणीच का मदतीला येत नाही अशावेळी..?
तुम्हाला त्रास नको म्हणून तुमच्यापासून लपवलं..या आशेवर कि आज ना उद्या दुसरा जॉब मिळेल आणि मग सांगेन..
पण नाहीच..अस्वस्थतेशी झगडतोय रोज..जरा शांतता नाही मनाला..
आता नाही सहन होत…'
इतकं बोलून त्याने चेहरा दोन्ही हातात झाकून घेतला..
इतक्यात छोटी काव्या शेजारुन आली आणि
बाsबाss म्हणत त्याला बिलगली..
ऋषीनेही तिला घट्ट मिठीत घेतलं..
आई आणि त्याची बायको ऋचा एकमेकिंकडे बघत होत्या,
त्यांना मोठाच धक्का होता हा..पण एकमेकींना धीर देत होत्या...काव्यासमोर हा विषय नको असं खुणेने आईनी सांगितलं..ऋचाने होकारार्थी मान हलवली..
'बाबा तू रडतोयस…?'
काव्याने ऋषीचे डोळे पुसत विचारलं..
'नाही गं बाळा..'
'खोटं..बाबा खोटं बोलायचं नसतं ना..? Bad habit!
सांग ना का रडतोयस..?'
ऋषीने ऋचाकडे बघितलं..ऋचा समजली..लगेच म्हणाली..
'अगं काही नाही पिल्लू..बाबा थोडा sad आहे..तू एक poem म्हण बरं..म्हणजे बाबा एकदम हॅपी होईल..!'
'लगेच म्हणते..पण poem नाही..आजच काकू नवीन गाणं म्हणत होती..मी शिकव म्हंटलं..तर मला म्हणाली तुला नाही कळणार..पण मी हट्टच केला म्हणून दोन लाईन्स शिकवल्या तिने..म्हणते हा ऐक..
'ऐसे काही व्हावे..मन शांsत निजावे..
एकांताच्या वेळी, आकांत निमावे..
ऐसे काही व्हावे मन शांत निजावे…'
'कसं वाटलं बाबा..?'
'अ..? मस्त..एकदम छान..'
'मग हॅपी ना..?'
'येस!' ऋषी छान हसतो आणि तिला जवळ घेतो..
'काव्या..चल झोपायची वेळ झाली..उद्या शाळा आहे ना..'
'हो गं आज्जी..थोडा वेळ..'
'नको..बाबा दमून आलाय..चल..'
'ओके..गुड नाइट बाबा..'
'गुड नाइट बेटा..'
ऋषीची आई काव्याला घेऊन आतल्या खोलीत जात असते इतक्यात काव्या पुन्हा मागे येते आणि ऋषीला विचारते
'बाबा..पण या गाण्याचा अर्थ काय..?'
'उद्या सांगतो…'
'बरं..गुड नाइट..!'
इतकं बोलून ती खोलीत पळते..
ऋषी तसाच उठतो आणि शेजारी जातो..
'वहिनी…काव्याला आज कुठलं गाणं शिकवलंत तुम्ही..?'
'अ..अहो नवीन गाणं आहे..परवाच ऐकलं..खूप आवडलं मला..ते गुणगुणत असताना तिने ऐकलं..'
'मला ऐकायला मिळेल..?'
'हो..थांबा हा..cdच देते तुम्हाला..'
'बरं..'
'हि घ्या..'
'हं..थॅंक यू..मी उद्या देतो परत…'
'हो हो..काही घाई नाही..'
ऋषी घरी येतो..त्यांच्या खोलीत जातो आणि cd लावतो..
'ऐसे काही व्हावे…मन शांsत निजावे..
एकांताच्या वेळी..आकांत निमावे…
बघ संध्येच्या वक्षी, कुणी भिरभिरता पक्षी..
वाटेs त्याचेs गाव पुसावे…
ऐसे काही व्हावे…मन शांsत निजावे…
असल्या वेळी, मंद गति..
विरुन जाती, तीन मिती..
पाचही प्राणांच्या ज्योती,
सौम्यपणाने, मिणमिणती..
अस्वस्थाचे ओझे..क्षणी विसरुन जावे…
कोण आपुले, परके कोण..?
परिचित कोणी..उपरे कोण..?
असते कोण, नसते कोण..?
असल्यावेळी उरते कोण..?
पैलामधले काही, मग उजळून यावे...
ऐसे काही व्हावे, मन शांsत निजावे…'
गाणं संपतं…एक विचित्र शांतता खोलीत उरते..
ऋषीच्या मनात घोळणारे असंख्य विचार क्षणात थांबतात..
खरंच..असं मन शांत निजलं असतं काही वेळ तर किती बरं झालं असतं…सगळी कटकटच गेली असती…
त्याला सहज असं वाटून गेलं…
इतक्यात त्याच्या खांद्यावर एक हात स्थिरावला...ऋचा त्याच्या पाठी उभी होती...नेहेमीसारखी..
'काव्याच्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलंस मगाशी..सांग ना..काय अर्थ ह्या गाण्याचा..?'
'ऋचा…..'
'ऋषी…तू किती मोठी चूक केलीस कळतंय तुला..?
बाहेरच्या जगात आपली माणसं शोधत राहिलास..
आणि घरातल्यांना अंधारात ठेवलंस..? का…? तर
आम्हाला त्रास होऊ नये म्हणून..?
एक नोकरी गेली तर काय होतंय..? आम्ही काय तुला टाकून जाणार होतो का…?'
'तसं नाही गं..माझं मन स्थिर नव्हतं..'
'कारण ते तुला समजून घेणारं कोणी नव्हतं..विचार कर आम्हाला सांगितलं असतंस तर तुझ्या मनावरचं ओझं किती कमी झालं असतं..?'
'हं…पण..'
'काही बोलू नकोस…असं पुन्हा होता कामा नये..'
इतकं बोलून ऋचाने परत cd लावली..
आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली..
'सॉरी..'
'ह्या वेळी ऐकून घेते आहे..पहिल्यांदा आणि शेवटचं..कळलं..?'
'येस मॅडम…'
गाणं सुरुच होतं...
'अस्वस्थाचे ओझे…क्षणी विसरुन जावे…'
- कांचन लेले
०६-०२-२०१७
हृदयस्पर्शी ब्लॉग! उत्तम! 👍
ReplyDeleteपुढच्या ब्लॉगच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद काकू :)
Deleteछानच...
ReplyDeleteThank You :)
Deleteyou wove the poem really well into the story. beautifully written.
ReplyDeleteThanks a lot! :)
Delete