आशा...
असाच एक रम्य दिवस सुरु झाला होता..
खरंतर दिवस उजाडायची वेळ होत आली होती..
ते जणू त्याची वाट बघतच पार्कात उभं होतं...
पण अजून तरी त्याची निराशाच झाली होती..
ऐन थंडीत रोज ढग कुठून येत होते हे कोडंच सुटत नव्हतं!
त्याने पुन्हा एकदा निराशेची नजर ढगांवर टाकली..आणि पुन्हा मान खाली घालुन उभं राहिलं..
आणि अचानक त्याला आठवली कालची सकाळ…
पार्कातल्या बेंचवर, अगदी त्याच्या बाजूच्याच, एक आज्जी-आजोबा येऊन बसले...आज्जी अगदी आजारी वाटत होत्या.. मूळची बारीक कुडी, सुरकुतलेला, निस्तेज चेहरा..आणि..आणि हरलेले डोळे…
आजोबा मात्र थोडे उंचेपुरे, देखणे..तोच सुरकुतलेला चेहरा, पण डोळ्यात एक आशा..एक उमेद, जगण्याची..
काही वेळ ते दोघे नुसते येऊन बसले…
कोणीच काही बोलेना..शेवटी आजोबांनी एक कटाक्ष आज्जींकडे टाकला..आणि त्यांचे पाणावलेले डोळे बघून तेही विरघळले..
त्यांनी हलकेच आज्जींच्या हातावर हात ठेवला…नजर मात्र अथांग पसरलेल्या आकाशाकडे लागली होती….
आणखी काही वेळ असाच गेला..मग…
'जगण्यासाठी काय लागतं गं….?'
आकाशाकडे लावलेली नजर न हटवत आजोबांनी प्रश्न केला..
'एक देह ज्याचा श्वास बंद होणं आपल्या हातात नाही....'
'चूक…लागते फक्त आशा..!'
'आशा…हं..बरोबर आहे..लहानपणी मोठं व्हायची आशा, थोडं मोठं झालं की स्वतंत्र होण्याची आशा, स्वतंत्र झालं की स्थिरावण्याची आशा..स्थिरावलं कि वंश वाढवण्याची आशा..मग मुलांना मोठं करण्याची आशा..त्यांना त्याच्या पायांवर उभं राहिलेलं पाहण्याची आशा..मग त्यांचा संसार बघण्याची आशा..मग नातवंडं बघण्याची आशा…कॉम्पुटर वर दिसली की प्रत्यक्ष बघण्याची आशा आणि ते होत नाही म्हणून होणारी घोर निराशा…'
एवढं बोलूनही धाप लागली आज्जींना..खूप दिवसांनी इतकं बोलल्या होत्या त्या..आजोबांना एका अर्थी बरं वाटलं..किमान त्या बोलून मोकळ्या तरी होत होत्या..
'बरोबर आहे ना माझं…?'
'हे सूर्यफूल बघितलंस…?'
'बदला विषय तुम्ही…'
'अहं..तसं अजिबात नाही हा..'
'मग कसं..?'
'सूर्यफुलाचा जीव कशात सांग..?'
'सुर्यात..'
'कुठंय सूर्य…?'
'हा काय….'
आणि आज्जींचं वाक्य अर्धवटच राहीलं..कारण आज ढगांनी सूर्याला पार झाकून टाकलं होतं..त्यांची नजर शेजारच्या सुर्यफुलांवरून फिरली..आणि मग तीच नजर आजोबांच्या नजरेला जाऊन भिडली..
अचानक मळभ दूर व्हावं आणि सूर्याचं तेज पसरावं तसे आज्जींचे डोळे चमकले…
पुन्हा डोळ्यांत एक आशा दिसू लागली..निस्तेज दिसत असणारा चेहरा अचानक प्रसन्न दिसू लागला…
आजोबा उठले आणि हलकेच हात पुढे केला..
आज्जींन्नी त्यांच्या हातात हात दिला..
आणि दोघे चालू लागले…
सूर्यफुलाची मान नकळत वर झाली..
कारण जादू झाल्यासारखेच ढग नाहीसे होत होते..
आणि
पुन्हा एक आशा घेऊन लकाकत होता,
एक नवा सूर्य,
एका नव्या दिवशी…
- कांचन लेले
निसर्गसुद्धा सजीव आहे याचा आपण कधीच विचार करत नाही . एखाद्या माणसात काही गुण असतात आणि काही अवगुणही.तेव्हा माणसाकडून काही शिकताना आपल्याला सतर्क आणि सजग रहावं लागतं ; पण निसर्ग हा इतका निर्मळ आहे की त्याची प्रत्येक गोष्ट शिकताना आपण कधीच मलीन होणार नाही .तो सदा सदगुणी आहे . आपण मात्र अशा निसर्गाकडून शिकण्याचा विचारही करत नाही , हीच खरी शोकांतिका आहे.
ReplyDeleteएकूणच मानवी भावभावना आणि नैसर्गिक चेतना आणि जाणीवा सजीवतेने टिपल्या आहेस तू राधा. असंच उत्फुल्ल लिहित रहा. मनापासून शुभेच्छा कांचन.
-कौस्तुभ बांबरकर
निसर्गसुद्धा सजीव आहे याचा आपण कधीच विचार करत नाही . एखाद्या माणसात काही गुण असतात आणि काही अवगुणही.तेव्हा माणसाकडून काही शिकताना आपल्याला सतर्क आणि सजग रहावं लागतं ; पण निसर्ग हा इतका निर्मळ आहे की त्याची प्रत्येक गोष्ट शिकताना आपण कधीच मलीन होणार नाही .तो सदा सदगुणी आहे . आपण मात्र अशा निसर्गाकडून शिकण्याचा विचारही करत नाही , हीच खरी शोकांतिका आहे.
ReplyDeleteएकूणच मानवी भावभावना आणि नैसर्गिक चेतना आणि जाणीवा सजीवतेने टिपल्या आहेस तू राधा. असंच उत्फुल्ल लिहित रहा. मनापासून शुभेच्छा कांचन.
-कौस्तुभ बांबरकर