चंद्र!

चांदोबा/चांदोमामा, इथून सुरवात होते..त्याची ओळख होते..
त्याच्याशी लपाछपी खेळण्यात दिवस पुढे जातात..
मग त्याला शाप मिळाल्याची गोष्टही सांगतं कोणीतरी..
मग त्यावर बालवयाला शोभतील असे प्रश्नही पडतात..
मग शाळेत जायला लागल्यावर त्याच्याबद्दल वैज्ञानिक माहिती मिळते..मग त्याच्या कलेकलेने वाढण्याचं कारण कळतं, त्याच्या नाहीसं होण्याचं कारण कळतं..ग्रहणाबद्दल कळतं, पण अजूनही पगडा असतो तो बाप्पाने त्याला दिलेल्या शापाच्या गोष्टीचाच!

मग वय वाढत जातं आणि चंद्राचे विचार मागे पडत जातात..
मग कॉलेज मधे गेल्यावर गुलाबी दिवसांमधे पुन्हा चंद्राची आठवण होते…आणि पुढे जाऊन विरहात फक्त चंद्राचीच साथ उरते!
आयुष्य पुढे सरकत असतं, पण चंद्र मात्र कायम सोबत असतो..अगदी प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा!
कधी ग्रहणातल..तर कधी कोजागिरीचा..नजर ठरणार नाही असा!
अमावास्येला मात्र चंद्र दिसत नाही, पण जाणवतो…
डोळ्याला दिसला नाही तरी त्याचं अस्तिव जाणवल्याशिवाय रहात नाही…
हे संपूर्ण चंद्रचक्र खूप विचार करायला लावणारं आहे! निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवायचा प्रयत्न करत असतो…फक्त नजर पाहिजे!

अमावस्येने सुरवात करूया..
मगाशी म्हंटल्याप्रमाणे अमावास्येला चंद्र डोळ्यांना दिसत नाही, पण अस्तित्वात नसतो असंही नाही!
तसंच जीव गर्भात असताना डोळ्याला दिसत नाही, पण अस्तित्व असतंच की..
मग कलेकलेने वाढत जातो..
बालवयातील पौर्णिमा गाठतो!
ती गाठली की पुढचं पाऊल जरा मोठ्या जगात पडतं..स्थिरावायला  वेळ लागतो...कधीकधी नैराश्याची अमावस्या पुन्हा वेढा घालते..
पण त्यातून पुन्हा कलेकलेने वाढत जातो, तोच खरा चंद्र, तोच खरा माणूस!
पुन्हा वाढत जातो..प्रगतीकडे वाटचाल करतो..मग आयुष्यात अनेक अमावस्या-पौर्णिमा येत रहातात…कधी ग्रहण लागतं..तर कधी कोजागिरीच्या चंद्रासारखं डोळे दिपवणारं यश मिळतं!
पण तसे डोळे दिपण्यासाठी आधी अमावस्येच्या भयाण अंधाराला पार करावं लागतं..धैर्याने!
चंद्रग्रहणाकडे वाईट म्हणून मोठ्या प्रमाणावर बघितलं जात असलं, तरी त्याच ग्रहण लागलेल्या चंद्राकडे अप्रुपाने बघणारे लोक असतातच की, थोडे का असेना! तसेच माणसाच्या ग्रहण काळात त्याच्याकडे प्रेमाने बघणारे लोक म्हणजेच त्याची हक्काची माणसंही असतातच की..!
कधीकधी खूप मळभ येतं..आणि झाकून टाकतं अगदी पौर्णिमेच्या चंद्रालाही! पण त्याही परिस्थितीत त्या काळ्या ढगांना आपल्या तेजाने त्यांच्याआड दडून प्रकाश देतो, तोच खरा चंद्र...आपलं वाईट करू पाहणाऱ्या माणसांवर चांगुलपणाने मात करतो, तोच खरा माणूस !

आयुष्य हे एक अनमोल देणं आहे,
फक्त चंद्र होता आलं पाहिजे!

©कांचन लेले

Comments

  1. सुंदर कल्पना !!

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर!

    ReplyDelete
  3. Wa ! खूप छान लेख. लयदार लिखाण. आवडला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!