एक उनाड दिवस!


खूप दिवस काही वेगळं केलं नव्हतं…खरंतर काही केलंच नव्हतं असं तिला वाटत होतं..
मुंबईतलं आयुष्य म्हणजे मुंबईच्या गर्दीसारखंच झालं होतं..फक्त उभं राहिलं की गर्दी आपोआप तुम्हाला ट्रेनमध्ये चढवते आणि उतरवतेही…तसंच पहाटे गजर वाजला की यंत्रमानवासारखं एकामागून एक ठरलेली कामं करायची, घाई नेहेमीचीच..चहा सुद्धा एकीकडे भाजी हलवत प्यायचा..एका वेळी एक काम करणं म्हणजे तर पापच जणू..इतका वेळ वाया घालवायला तो काय झाडाला थोडीच लागतो..?
एकीकडे कणिक मळायला घेताना आधी कूकर गॅसवर ठेवायचा..कणिक भिजेपर्यंत भाजी चिरायला घ्यायची, कूकर होत असताना दुसरीकडे चहाचं आधण ठेवायचं..कूकर बंद केला की तो काढून कढई ठेवायची, भाजी फोडणीला द्यायची मग चहा होतोच तोवर..एकीकडे भाजी, दुसऱ्या हातात चहा आणि डोक्यात ७.३२ ची ट्रेन!
त्यात मुलांना उठवायचं, डबे भरायचे, सकाळचे केर-वारे कोणाला चुकले नाहीतच..संध्याकाळी येताना कुठली भाजी आणायची..? घरात कुठली भाजी आहे..? रात्री काय स्वयंपाक करायचा..? अरे देवा, उद्या उपवास आहे, रात्रीचं उरायला नको..मग साबुदाणे आहेत का..? येताना रताळी मिळतील का..? असे विचार करत, आदल्या दिवशीचं शिळं अन्न उभ्या उभ्याच, पर्स मध्ये सामान टाकता टाकता खायचं..मुलांना, नवऱ्याला एक दोन सूचना देऊन मग तसंच धावत पळत स्टेशनकडे जायचं..कशीबशी ट्रेन पकडायची..ऑफिसला जायचं..कामं करायची मग निघालं की परत मनात विचार सुरू..मग विचारांचा विचार करायचा..
किती विचार करतो आपण..एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा.. विचारचक्र सतत डोक्यात सुरूच असतं...कृष्णाच्या सुदर्शनासारखं..ते कधी थांबलेलं बघितलं असेल का कोणी..?
अरे बापरे..हे कसले विचार येतायत आपल्या मनात..नको देवा..उगच पाप लागायचं! इतक्यात स्टेशन आलं..आणि ती उभ्या उभ्याच बाहेर ढकलली गेली..नेहेमीसारखी..
पण आज स्टेशन बाहेर पडल्यावर तिने भाजी मार्केटचा रस्ता नाही धरला..काय मनात विचार आला, पुन्हा स्टेशनकडे गेली, पश्चिमेकडे जाणाऱ्या ब्रिज वर चढली आणि तिकडे असणाऱ्या गार्डनचा रस्ता धरला..
हे गार्डन बऱ्यापैकी मोठं होतं..तिची नजर रिकामा बाक शोधत होती पण तो काही तिला सापडेना..
शेवटी नाईलाजाने ती बाहेर पडली, शेजारी मुलांसाठी खेळायला जागा होती तिकडे खूप जागा होती बसायला..तिथे जाऊन ती बसली..आणि मुलांना बघायला लागली..ती निरागसता बघून तिचं मन आपोआप सुखावत गेलं..पलीकडे चालायचा ट्रॅक होता..एक वृद्ध जोडपं एकमेकांचा हात घट्ट धरून हळूहळू चालत होतं..नकळत एक smile तिच्याही चेऱ्यावर आली..आणि तितक्याच नकळत 'आपण या वयाचे होऊ तेव्हा आपण दोघांनी एकमेकांना अशीच साथ द्यायची' असं तिने मनोमन ठरवलंही..थोड्या वेळाने तिथून उठली..बाहेर पडली..बाहेर एक मुलगी गजरे विकत होती..'ताई घ्या ना, शेवटचे चार राहिले आहेत..कमी करून देते'
तिने एकवार त्या मुलीकडे पाहिलं..चटकन तिच्या डोक्यावरुन हात फिरवावा अशी तिची इच्छा झाली..एरवी तिने तसं केलं नसतं, पण आजचा दिवस वेगळाच होता..तिने तिच्याकडचे गजरे घेतले आणि तिला म्हणाली चल माझ्याबरोबर..
शेजारी एका हॉटेलात तिला घेऊन गेली..त्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक तिला दिसली..तिच्याशी गप्पा मारल्या, तिला पोटभर खाऊ घातल्यावर हिचंच पोट भरलं खरंतर..मग तिनेही आनंदाने पळ काढला, आणि ही पुन्हा तिच्या वाटेल लागली..
तेवढ्यात फोन वाजला
'अगं काय झालं..? कुठे आहेस..? बरी आहेस ना..?'
समोरून नवरा काळजीत बोलत होता..
'हो, थोडं काम निघालं, सांगायची विसरले..येतेच घरी..'
'हो का..ठीक आहे गं..घरी आलो तर तू दिसली नाहीस, काळजी वाटली..आणायला येऊ का..?'
'नको नको, येतेच मी!'
आपली काळजी करणारं कोणीतरी आहे ही भावना सगळ्यात सुखावह असते..हे तिला आज मनोमन पटलं..
जाता जाता घराजवळ नवीन उघडलेल्या restaurant मधून तिने चक्क बिर्याणी पार्सल घेतली..बरोबर ice-cream घेतलं..मनोमन आज मुलं खुश होणार असा विचार करतच ती घरी पोहोचली..
आजचा दिवसही नेहेमीसारखाच आला होता, पण जाताना मात्र वेगळा होऊन गेला होता..रोजच्या गडबडीत असे छोटे मोठे आंनद शोधणं हे आपलंच काम असतं! आणि आनंद म्हणजे तरी काय..? आपण मानतो ते..त्यासाठी युरोप टूरला जायची गरज नसते, आपलं युरोप आपल्या आसपासच असतं खरंतर..गरज असते त्यापर्यंत जायची..गरज असते केव्हातरी उनाड व्हायची..!
©कांचन लेले
Image Credits - Google

Comments

  1. khup chhan lihle aahe....aani observation pn changle aahe!!!!

    ReplyDelete
  2. एकदम अचूक भावना टिपल्या आहेस

    ReplyDelete
  3. खुप छान गोष्ठ आहे,आवडल मला।

    ReplyDelete
  4. उत्तम लिहीलयंस....उत्तम निरीक्षण , कामांची भाजणी, मांडणी आणि भाषेच्या वेगातून पकडलेला कामांचा वेग सगळंच खूप छान.....प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटणारा पण क्वचितंच मिळणारा एक उनाड दिवस छान वाटला

    पण वाचताना मनात एक असंच वाटून गेलं की खरंच एखाद्या पुरूषाला/(बाबांना) असा दिवस घालवावासा वाटंत असेल का ? स्वयंपाक आणि गृहिणीच्या जबाबदा-या नसल्या तरी कोणत्या वेगळ्याच जबाबदा-या आणि विचारांनी त्यांचं मन व्यापलं असेल का ? कसा असेल त्याचा उनाड दिवस ?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!