क्षण.. (भाग २)

भाग २

परत फोन करावा कि न करावा अशा संभ्रमात असतानाच बस आली..तिने पटकन फोन पर्स मध्ये टाकला आणि गर्दीत सामावून गेली.. डोक्यात मात्र 'कशाला बरं फोन केला असेल अजयने..?' हेच होतं.. तेवढ्यात तंद्री भंग करायला कंडक्टर आला..तिने तिकीट काढलं आणि परत विचार करण्यात मग्न झाली..
अजय आणि अनन्या खूप चांगले मित्र असूनही फोनवर फार बोलणं व्हायचं नाही..बोलणं खूप व्हायचं ते आधी मेसेजवर, मग whatsapp किंवा फेसबुक वर..कॉलेजमध्ये असेपर्यंत भेटायचे पण त्या नंतर मुद्दाम असे एक-दोनदाच भेटले होते ते..दोन वर्षं झाली असावीत शेवटच्या भेटीला..तिलाही नीटसं आठवेना..
हल्ली बरेच दिवसात बोलणंच झालं नव्हतं..दोघांचेही कामाचे व्याप वाढले होते, जबाबदारी वाढली होती आणि सहाजिकपणे स्वतःसाठी वेळ कमीच मिळायचा..

तिचा स्टॉप आल्यावर ती उतरली आणि घराकडे चालू लागली..
घरी पोहोचते न पोहोचते तोच अजयचा मेसेज आला..
'Hi..क्लास घेत होतीस का गं..?
Free झालीस कि फोन कर..थोडं महत्वाचं आहे.. :) '
तिला आपल्या श्वासाची लय वाढल्यासारखी वाटली.. 'महत्वाचं' म्हणजे काय ह्याचा तिला पूर्ण अंदाज होताच..
तिला काही सुचेनासं झालं..पण फोन तर कधीतरी करावाच लागणार होता..काय व्हायचं ते एकदाच होउदे असा विचार करुन तिने त्याला फोन लावला..
'Hi अनन्या..कशी आहेस..?'
त्याचा आवाज ऐकताच तिच्या पोटात गोळा आला होता..पण आवाज स्थिर ठेवत ती बोलू लागली..
'मी छान..तू कसा आहेस..? आज माझी आठवण कशी काढलीस..?'
'तुझी आठवण रोजच येते गं..'
दोन सेकंदाचा सस्पेन्स पॉझ..सावरुन घेत अजय पुन्हा म्हणाला
'अगं तुला सांगायचं होतं की माझं प्रोमोशन झालंय..आणि मला दुबईच्या ऑफिसला जॉईन व्हायचं आहे..'
तिला इतकं हायसं वाटलं..हे महत्त्वाचं होतं तर..
'अरे वाह..अभिनंदन..! कधी जाणार आहेस..?'
'दहा दिवसांनी..बुधवारचं फ्लाईट आहे..'
'अच्छा..मस्त रे..आई-बाबा खुश असतील ना..?'
'हो.. अगं मी काय म्हणत होतो…अ..जायच्या आधी मला एकदा भेटायचं होतं तुला..'
तिला परत धडधडू लागलं..पहिलाच अंदाज बरोबर होता तर..आता काय करु..?
इकडे त्याला मध्ये गेलेली दोन सेकंद सुद्धा तासासारखी वाटत होती..
शेवटी आला तिचा आवाज..
'अ…चालेल ना..भेटूया..'
'तुला पुढच्या रविवारी वेळ आहे का..? कारण मी आठवडाभर पुण्याला जाणार आहे..काही कामं पेंडिंग आहेत ती संपवायची आहेत..'
'अरे..पुढच्या रविवारी संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे MG theatreला..कथ्थकचा..सो सॉरी..'
'हो का…? मग…अ…हरकत नाही..मी येईन..
कार्यक्रम झाला की भेटू..चालेल..?'
'बरं..चालेल..'
'Done मग..मला कार्यक्रमाच्या डिटेल्स मेसेज करशील प्लिज..? मी करेनच तुला शनिवारी फोन..तरी..'
'हो..चालेल..नंतर बोलूया..? जस्ट घरी पोहोचले आहे रे...'
'हो हो…नो प्रॉब्लेम..बाय..!'

ओठांवर आलेला होकार आणि मनात असलेला नकार ह्यांची बेरीज वजाबाकी करत अनन्या कामाला लागली..

क्रमशः

- कांचन लेले 

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!