क्षण.. (भाग ३)

भाग ३

घरातली कामं आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करुन अनन्या झोपायला गेली..पण काही केल्या झोप लागत नव्हती..ह्या कुशीवरून त्या कुशीवर असं सारखं चालू होतं.. तिला आठवत होता कॉलेजमधला अजय.. देखणा, हुशार पण रागीट आणि जssरा ताठ.. लोकांना वाटायचं श्रीमंत घरचा आहे म्हणून आखडतो..पण तिने त्याला ओळखलं होतं..त्याला एकटं किंवा ठराविक माणसांमध्येच रहायला आवडायचं..कदाचित तो तश्याच वातावरणात वाढला होता म्हणून असेल..कोणी हस्तक्षेप केला, जास्ती जवळीक साधायचा प्रयत्न केला तर साहेबांचा पारा चढलाच..आणि ह्या अगदी उलट होती अनन्या.. पाण्यात साखर विरघळावी तशी मिसळायची कोणातही.. जssरा हट्टी ती सुद्धा होतीच..एकुलती एक होती ना..पण अतिशय लाघवी होती..
तिचं आणि अजयचं ट्युनिंग कधी जमून गेलं कळलंच नाही तिला..

अजयने तिला पहिल्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा ते फर्स्ट इयर ला होते..तेव्हा तिने 'मला एवढ्यात ह्या सगळ्यात पडायचं नाही' असं म्हणून बोळवण केली होती त्याची..त्यानेही निमूटपणे ऐकलं आणि वाट बघितली होती…मग दुसऱ्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा तिचं ग्रॅज्युएशन होऊन तिने MCom ला ऍडमिशन घेतली होती..
तेव्हा तिने त्याला सरळच सांगितलं की 'मला फक्त तू एक चांगला मित्र म्हणून आवडतोस..'

अनन्याला सगळ्यांपेक्षा वेगळं मानणाऱ्या अजयला हे चोथा झालेलं उत्तर फारच अनपेक्षित होतं..त्याला खूप राग आला..पण प्रेमच इतकं होतं की तो राग तिच्यावर काढू शकला नाही..तो नकळत तिच्यापासून दुरावला..
तेव्हापासून त्यांचं बोलणं कमी झालं होतं..भेटणं तर दूरच..

अनन्याने परत कूस बदलली..झोप येत नव्हतीच..डोळे घट्ट मिटून घेतले ..पण व्यर्थ..बंद डोळ्यांसमोरही अजयचाच चेहरा येत होता..
परत चक्र फिरु लागली..

इजा-बिजा केव्हाच झाला होता..आता तिजा पण तसाच करावा लागणार का…?
तिला अजयला परत दुखावण्याचा विचारच सहन नाही झाला..
तो खरंच एक चांगला मुलगा होता..खरंतर तिला कळायचंच नाही तो तिच्या प्रेमात कसा पडला..कारण तसं बघायला गेलं तर सगळ्याच बाबतीत तो उजवा होता..अगदी दिसण्यापासून हुशारीपर्यंत..
नाकारण्यासारखं त्यात काही नव्हतंच…पण मग का तिने त्याला दोनदा नकार दिला…?
कारण एवढंच कि सगळं चांगलं आहे म्हणून होकार देण्यात तिला काहीच अर्थ वाटत नव्हता..

क्रमशः

-कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!