ऐसी अक्षरे रसिके मेळवीन!
काल, २२ जानेवारी २०२० रोजी भेट दिली ती ज्येष्ठ सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांच्या कला प्रदर्शनाला!
(पत्ता - जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा, फोर्ट, मुंबई.
तारीख-वेळ - २७ जानेवारी २०२० पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत)
दार उघडल्यावर समोरच छोटीशी प्रस्तावना, त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा अगदीच ओझरता घेतलेला आढावा!
आणि तो दरवाजा उघडल्यावर सुरवात होते एका आगळ्या नयनरम्य कला सफरीचा!
आत गेल्यावर दोहो बाजुंनी भिंतीवर अनेक कलाकृती लावलेल्या आहेत..डावीकडे पहिलाच लावलाय तो एक फळा, हो, शाळेतला फळा ज्यावर रोज कोणीतरी सुविचार लिहीत असे! जिथून त्यांची सुरवात झाली, तेच हे अच्युत पालव!
ज्यांनी आपली मातृभाषा मोठी करायची ठरवली, त्यातलं सौंदर्य जाणून त्याला आणखी अलंकृत केलं तेच हे अच्युत पालव!
दोन्ही भिंतींवर लावलेली अप्रतिम, सुंदर, काही गूढ, काही अगम्य, काही abstract, काही पुराण काळातील भाषा दर्शवणारी तर काही खूप खोल सामाजिक संदेश देणारी पण सगळीच सौंदर्यपूर्ण "अक्षर"चित्र आहेत!
पण त्याच बरोबर अधे मधे एका मोड्यावर एक ट्रे ठेवला आहे, त्यात अनेक रफ पेपर वाटावे असे पेपर, त्यात अनेक कागद, प्रत्येक कागद एक वेगळीच कथा सांगणारा!
देशभरातील मराठी लोकांचं संमेलन भरवलं तर प्रत्येकाच्या लहेजाच्या वेगळेपणाने ते कसं सजेल ना..?
तसंच, अगदी तस्सच अनेक फॉन्ट प्रकाराने सजलेले ते कागद बघताना वाटतं!
विविध वाक्य त्याला साजेशा फॉन्ट मध्ये सुंदर प्रकारे लिहिलेली! त्या वाक्यातील अर्थ भाषा पोहोचवते, पण त्यातील भावना ही त्यासाठी निवडलेल्या फॉन्टमधून अगदी लख्ख स्पष्ट होते!
मला या अख्ख्या प्रदर्शनात सगळ्यात जास्ती भावला तो हा रफ कागदांचा ट्रे!
(याचे फोटो मुद्दाम काढलेले नाहीत. किंबहुना ते सौंदर्य कॅमेरा टिपूही शकणार नाही. हिमालयातून बर्फ का बांधून आणता येतो..? कोकणातली सुंदर हवा का बाटलीत बंद करता येते..? तसंच की ते! प्रत्यक्षच जाऊन बघावं, सगळंच इथे दिसलं तर काय मजा..?)
आणखी पुढे पसायदानाच्या एका अक्षरचित्राखाली ठेवल्या आहेत ते काही रोजनिशीचे नमुने, म्हणजे मराठीत डायरी हो!
१९९१, १९८६ असे फार जुन्याकाळी निर्मिलेली एक एक रोजनिशी निव्वळ नेत्रसुख देते...
रोजनिशी असल्याने त्यावर नित्याचे लिहिलेले वजा खरडलेले उल्लेख बघून असं वाटलं इतकी सुंदर रोजनिशी आपल्या हाती पडती तर ती जपून कपाटातच ठेवली जाती!
एकदम मध्यावर टाकाच्या म्हणजे पेनाच्या निबच्या आकाराचं अक्षरयान २०२० उभारलं आहे!
त्याभोवती अक्षर पताका, खाली अक्षर टेकू!
आणि समोर एक भव्य सुंदर कलाकृती, डोंगर, सूर्य आणि चराचर अक्षरांनी भरलेला! विचारांची भव्यता त्या तीन मोठ्या कॅनवसच्याहून कैक पटीने मोठी!
भाषा वैविध्य, कला, संतवांगमय, संगीत, अध्यात्म यांनी भरलेलं हे सुंदर प्रदर्शन जरुर अनुभवावं
पालवांनी सोयीस्करपणे माउलींच्या ओळींमधून
"ऐसी अक्षरे रसिके मेळविन" एवढीच उक्ती न घेता,
"माझा मराठाची बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके।"
या आधीच्या ओळींचाही मान ठेऊन आपली मातृभाषा मोठी केली, जगात पोहोचवली!
माउलींच्या शब्दांची भव्यता ही अख्खी दुनिया जाणेल,
पण ते शब्द, स्वप्न म्हणून उरी वाहणाऱ्या या जादूगाराला नक्की भेट द्या!
©कांचन लेले
व्वा, नक्कीच , आता हे वाचून ओढ अजून वाढली ते प्रदर्शनं बघण्याची, खरंच एखाद्या खऱ्या कलाकाराला पैशाने नाही तर रसिकांनी केलेल्या कौतुकाने मोठं व्हायचं असतं..नक्कीच लवकर भेट देईन आता, छान लिहिलं आहेस नेहमी प्रमाणे ..👌👍👍🙂
ReplyDelete