खम्माघणी राजस्थान! - भाग १

(जानेवारी २०१९ रोजी केलेल्या राजस्थान सफरीचं प्रवासवर्णन करण्याचा प्रयत्न!)

भाग १

त्यावेळी अनेक दिवस राजस्थान खुणावत होतं..
सतत कुठेतरी उल्लेख यायचा, एखादं आर्टिकल फेसबुकवर दिसायचं, कोणीतरी स्टोरी टाकायचं…असं सगळं बघत बघत पुढल्या वर्षी राजस्थानच करायचं असं  २०१८ साली ऑक्टोबर-नोव्हेम्बर दरम्यान नक्की केलं..
मग कित्येक दिवस ८ दिवसाचं प्लॅंनिंग होतच नव्हतं..इतकं विस्तीर्ण पसरलेलं राज्य आहे, की नेमक्या कुठल्या जागा निवडाव्या हेच कळत नव्हतं..शेवटी एक बेस्ट ऑफ राजस्थान आणि एक रेस्ट ऑफ राजस्थान (offbeat places) असं वर्गीकरण करावं आणि या वेळी फेमस जागा करून घ्याव्या असं ठरवलं..त्याप्रमाणे जयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूर करायचं असं नक्की केलं! तसा मॅप बघितला आणि कुठून कुठे जायचं त्याचा आराखडा केला..
फ्लाईट आणि ट्रेनची तिकिटं त्याप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच बुक केली! एक फ्लाईट आणि  एकूण चार ट्रेन प्रवास, आणि एक बस प्रवास या आठ दिवसात करायचे ठरवले!
आणि शेवटी २४ जानेवारीला पहाटेच्या फ्लाईटने जयपूरच्या दिशेने कूच केली!
पूर्ण दिवस मिळण्यासाठी नेहेमी शक्यतो पहाटेच्या फ्लाईटचं तिकिट बुक करावं..आणि पहाटेचे आकाशाचे बदलते रंग इतके मोहक दिसतात की अशी फ्लाईट म्हणजे एकदम पैसा वसूल!! (आदल्या दिवशी रात्री जाऊ शकतो, पण मग एका रात्रीचा रहायचा खर्च वाढतो  :D )
तर त्याप्रमाणे ८ वाजता जयपूर एअरपोर्टला आम्ही लँड झालो..बाहेर पडल्या पडल्या बॅग्स पण पटकन मिळाल्या आणि अक्षरशः १० मिनिटात बाहेर पडलो..बाहेर पडायच्या आधी एका सिक्युरिटी गार्डला विचारलं की लोकल टॅक्सी स्वस्त पडेल की कसं जावं..तर त्याने सरळ ओला करा असं सुचवलं..त्याप्रमाणे ओला केली आणि साधारण अर्ध्या तासात "Zostel" ला पोहोचलो. 
(Zostel ही हॉस्टेल्सची चेन आहे. जवळपास २५ शहरांमध्ये ही zostels आहेत. इथे डोर्मिटोरी असतात, साधारण ५०० रुपये भाडं असतं. तिथे सुविधा बऱ्याच असतात, त्यांचं किचनसुद्धा असतं जिथे आपण आपापला स्वयंपाक करून जेऊ शकतो..पाणी फ्री असतं..कॉमन रूम असतात जिथे वेगवेगळे गेम्स, कॉम्पुटर असं बरंच काही असतं. आणि मुख्य म्हणजे  आपल्यासारखंच फिरणारी लोकं भेटतात, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव कळतात, ओळखी होतात! मी या आधी गव्हर्नमेंट युथ हॉस्टेल मध्ये रहायची सोय करायचे, पण या वेळी सगळीकडे बुकिंग फुल असल्याने हा पर्याय शोधला!)

तर ओलाच्या ड्राइव्हरकडून बरीचशी माहिती काढून घेतली, कुठल्या जागा, त्यांच्या वेळा काय, जायला साधन काय, स्वस्तात मस्त लोकल शॉपिंग कुठे करावं इत्यादी इत्यादी..आणि त्याने आम्हाला zostel ला सोडलं. तिकडे चेक इन केलं..फ्रेश झालो..जरा अर्धा तास पडून घरच्यांना पोहोचल्याचं कळवून १० दरम्यान बाहेर पडलो..एक दोन किलोमीटर इकडे तिकडे फिरुन एका ठिकाणी नाश्त्याला आलू पराठा खाल्ला आणि तिथे चौकशी करुन "आमेर किल्य्याला" जायला बस पडकली. फक्त १० रुपयात साधारण ८-९ किलोमीटरचा प्रवास पार पडला..साधारण १२.३० दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो..या किल्ल्याची खासियत अशी की इथे हत्तीवरून किल्ला फिरता येतो! आसपास थोडी चौकशी केल्यावर कळलं की सकाळी ७.३०-११.३० या वेळेतच हत्तीची सवारी असते. आमेर किल्याहून पुढे नहरगढ आणि जैगढ असे दोन किल्ले आहेत तिकडे मात्र कुठलीही बस जात नाही. रिक्षा किंवा ओला करूनच जावं लागतं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच आमेर बघायला यायचं ठरवलं आणि तिथून "ओला रेंटल" बुक करून नहरगढ कडे निघालो. ओला रेंटल हा खूप चांगला पर्याय आहे. ह्यात गाडी काही तासांसाठी आपल्याला मिळते. त्याची किलोमीटर मर्यादा आणि किंमत विविध पॅकमध्ये ठरलेली असते. तर अशी रेंटल ओला केली, पुन्हा ड्रायव्हरशी गप्पा मारत नहरगढला पोहोचलो. 
(राजस्थानमध्ये सगळीकडे (टुरिस्ट places म्हणतात तिकडे) प्रवेश शुल्क आहे. आणि सगळीकडे विद्यार्थ्यांना सवलतसुद्धा आहे. तर विद्यार्थी असाल तर  कॉलेजचं ओळखपत्र कायम जवळ बाळगा! बरेच पैसे वाचतील!)

आत गेल्यावर लगेचच एक पॉईंट आहे जिथून शहराचा हा सुंदर "view" बघायला मिळतो! 
आत जाताना एकीकडे "शिश महाल" आणि wax museum दिसतं..दोन्हीकडे जायला प्रत्येकी बहुदा ५०० रुपये तिकीट आहे. आम्ही तिकडे आत न जाता किल्ल्यात शिरलो. बाहेर राजस्थानी खासियत म्हणजे कटपुतळीचे खेळ करणारे काही लोक होते, काही वाजंत्री "पधारो म्हारे देस" वाजवत होते..थोडा आस्वाद घेऊन आम्ही तिथून सरळ आत गेलो. तिथे आत जाताच दगडांनी "मॉडर्न आर्ट" केलेलं होतं. त्या एक मजली वाड्यात तिथल्या राजाच्या ९ राण्यांसाठी त्याने ९ खोल्या केल्या होत्या, खालच्या आणि पहिल्या मजल्यावर…त्याच्या शेजारून जाणार पॅसेज असा केला आहे की एकाही राणीला कळणार नाही की राजा नेमका कुणाच्या महालात गेला, हे त्या आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य! त्या काळी खाली हिवाळ्यासाठी आणि वरती उन्हाळ्यासाठी अशा दोन खोल्या प्रत्येक राणीसाठी, आणि शिवाय तिच्या दासीसाठी केल्या होत्या. अर्थात आता तिथे फक्त खोल्या आहेत, आणि प्रत्येक खोलीत मॉडर्न आर्ट म्हणून काही न काही ठेवलेलं आहे, जे तितकंच बघण्यासारखं आहे.
सुरवातीला काही कळतच नव्हतं, गाईड घेतला नसल्याने. मग तिथल्याच एका पोलिसाला मी सहज विचारलं, तर त्याने गाईड घेतला नाही का विचारलं, कुठून आलात विचारलं..
मी पण अगदी बजेट ट्रिपवर आलो आहोत, विद्यार्थी आहोत असं सांगितलं आणि मग त्याने "चलो हम ही बता देते है!" असं म्हणून हे सगळं सांगितलं! मग त्याचे आभार मानून आम्ही बाकीच्या खोल्या आणि वरचा मजला फिरलो..नंतर बाहेर पडल्यावर तिथे एक खोल विहीर आहे, ती बघितली! आणि थोडं फिरून, फोटो काढून बाहेर पडलो..बाहेर खुप फळ विक्रेते आणि चना जोर गरम विकणारे असतात, त्याचाही आस्वाद घ्या!
मग तिथून जवळच असलेल्या जयगढ किल्ल्याला जायला निघाले.
प्रचंड विस्तीर्ण किल्ला आहे! हा किल्ला धन साठवायला, आणि आमेर किल्ल्याला सुरक्षितता म्हणून बांधला होता असं म्हणतात. आमेर किल्ल्यामध्ये जयगढ ला यायला एक भुयार सुद्धा आहे! जयगढला सगळ्या दिशांना उंच भिंत बांधलेली आहे, आमेर किल्ल्यावर कुठेही उभं राहिलं तरी ही भिंत दिसते. Great Wall of China सारखी बांधलेली ही भिंत तिच्या लाल रांगात एकदम भारी दिसते! जगातली सगळ्यात मोठी तोफ, जिचं वजन ५० टन आहे, ती या किल्ल्यात आहे..तिचं "जयवाण" असं नामकरण केलं आहे. जगातील सगळ्यात मोठी तोफ, ही ह्याच गडावर बनवली गेली, पण दुर्दैव असं की ती एकदाही वापरण्यात आली नाही! 
तर असा हा जयगढ! 
त्याचे विशेष फोटो काढले नाहीत, कारण तो इतका विस्तीर्ण पसरलेला आहे की फोनच्या कॅमेऱ्यात सहज कैद होणार नाही आणि दुसरं म्हणजे जानेवारी महिना असल्याने फार हिरवळही नव्हती त्यामुळे बाकीचा view काबीज करण्याचा प्रश्न नाही!
आम्हाला सगळं फिरायला साधारण ३.३०-४ वाजले…आणि या दरम्यान वातावरण प्रचंड बदलू लागलं..तसं आम्ही मुक्कामी जायचा निर्णय घेतला..आणि वाटेतच धुवाधार पावसाने आम्हाला गाठलं! तरी गाडी दारापर्यंत गेली हे नशीब! एवढं करून आम्ही पहिला दिवस जरा लवकरच संपवला, नाईलाजाने! पावसाने मजाही आली..पण प्रचंssड थंडी होती! मग जेवलो आणि गरमा गरम सूप करून प्यायलं आणि गप्पा मारुन झोपलो!

क्रमशः
©कांचन लेले

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!