या सगळ्या दरम्यान अंगावर तीन थर होतेच…आणि परत जाताना थंडी आणखी वाढलेली..कॅम्प मध्ये गेल्यावर तिथे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची तयारी होत आलेली दिसली..अंधार बऱ्यापैकी पडला होता थोडं फ्रेश होऊन बाहेर येऊन बसलो…चहा-पोहे आले…तिकडचे पोहे म्हणजे गोड आणि भरभरून तेल असलेले…आणि कार्यक्रम सुरू झाला केसरिया बालम ने…दरम्यान आमच्या शेजारी थायलंडचे दोघे, बंधू-भगिनी येऊन बसले…त्यांच्याशी थोडी ओळख होत होती…एकीकडे कार्यक्रम गाण्यावरून नृत्याकडे आलेला..तिथले स्थानिक नृत्य प्रकार झाल्यावर काही थोडे अघोरी प्रकार (पापणीने सुई उचलणे, काचांवर चालणे इत्यादी) झाल्यावर डोक्यावर घागरी/घडे घेऊन नृत्य झालं…मग जेवण करुन, आणि दुसऱ्या दिवशी थायलंड जोडीबरोबर एकत्र जैसलमेरला जायचं ठरवून, एकमेकांचे नंबर घेऊन आम्ही आपापल्या ठिकाणी गेलो..
दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तो माणूस आम्हाला न्यायला आला..पुन्हा ओपन जीप सवारी आणि प्रचंड वाऱ्यात प्रवास झाला! त्या दिवशी आमचा मुक्काम नव्हता, रात्री उशिराची ट्रेन होती तरीही आम्ही झोस्टेलचं बुकिंग केलेलं..जो निर्णय अतिशय उत्तम ठरला!
राजपुत योध्दा रावल जैसल यांनी बांधलेला हा अत्यंत मनोहर सोनेरी किल्ला! याचं संपूर्ण बांधकाम हे पिवळ्या रंगाच्या दगड आणि रेतीने केल्यामुळे हा संपूर्ण किल्ला त्या रंगाचा दिसतो, आणि त्यात सूर्यदेवाची कृपा झाली की लखलखतं सोनेरी तेज असल्यासारखा भासतो! म्हणूनच त्याचं नाव सोनारदुर्ग आणि इंग्रजीत Golden Fort असं पडलं आहे!
हा संबंध किल्लाच म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे! अगदी रेखीव दरवाजे खिडक्यांपासून दालनांची आखणी, जिने इत्यादी प्रत्येक लहान सहान गोष्ट कलात्मक रित्या केलेली आहे! संपूर्ण राजस्थानातील हवेल्या आणि किल्ले हे म्हणजे नयनरम्य दृश्यच! म्हणजे विचार करताना तोचतोचपणा वाटू शकतो, पण त्यामुळे यातलं काहीही टाळू नका! प्रत्येक वास्तूत काहीतरी वेगळंच दिसेल हे नक्की!
आम्ही चौघे zostelच्या दिशेने रवाना झालो..आता हा जैसलमेरचा किल्ला म्हणजे गावच आहे! किल्ल्याच्या आतच हॉटेल, दुकानं, वस्ती, असं सगळं आहे! तिथेच आमचं झोस्टेलसुद्धा होतं..तिथली दोन माणसं आम्हाला लगेच न्यायला आली, अमच्याबरोबरच्या "वॅरीसा" आणि "विट" या दोघांना त्यांचं बुकिंग नसतानाही सामान ठेऊ दिलं आणि संध्याकाळी फ्रेश व्हायला यायलाही सांगितलं!! बाहेर पडल्यावर महाल बघायला गेलो..तिथेही आम्ही guide घेतलेला..मग तो guide आणि आम्ही अतिथींचे translator झालो! ;)
आत गेल्यावर सुंदर चित्रांनी आणि काचकामाने बहरलेला रंगमहल लक्ष वेधून घेतो, पुढे राजाचा महाल, राणीचा महाल, राज्याभिषेकाचं सिंहासन, जुनी नाणी (मुद्रा) इत्यादी अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत!
दरवाजा आणि खिडक्याचं इतकं सुंदर रेखीव काम सगळीकडे बघायला मिळतं!
त्याचबरोबर, तिकडे अख्या किल्ल्याचा एक नकाशा आहे, तो देत आहे!
वरती गच्चीत गेलं, की अख्या खालचं हे दिसणारं दृश्य!
नंतर आम्ही तिथल्या मुख्य जैन मंदिरात गेलो..मंदिरातील अतिशय रेखीव खांब आणि घुमट बघून मन निवतं..
पुढे आम्ही पटवो की हवेली बघायला गेलो..ही इथली सगळ्यात पहिली बांधलेली हवेली आहे! आणि ही एक हवेली म्हणजेच पाच लहान हवेल्यांचं एकत्रित रूप आहे, तेही पाच मजली! पुन्हा अतिशय सुंदर आणि रेखीव काम इथे बघायला मिळतं, त्यात बरंच काचेचं काम भिंतीवर दिसतं..
त्यानंतर गेलो ते गडीसर लेक बघायला! तिथे आम्ही तिघींनी, बोटिंग सुद्धा केलं! आणि काही खूप सुंदर पक्षी सुद्धा बघितले!
दिवसभर उन्हात फिरल्यावर त्या पाण्याची शीतलता पूर्ण जाणवली!
शांत पाणी कायम आपल्याला शांतता देत असतं…आणि नदीचं खळाळतं पाणी कायम सकारात्मकता देत असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं..किंबहुना तो अनुभव मी कायम घेत असते!
आणखी एका गोष्टीचं कौतुक म्हणजे तिथे बाहेरच "सुलभ" सेवा आहे. बऱ्यापैकी मोठं, प्रशस्त आणि मुळात म्हणजे स्वच्छ स्वच्छतागृह बघून आनंद वाटला.
महाल, जैन मंदिर, हवेली आणि गडीसर लेक अस सगळं फिरुन, मधे एका ठिकाणी जेवून, अधे मधे थोडी खरेदी करुन आमचा दिवस एकदम मस्त गेला!
या संबंध दिवसात वॅरीसा आणि विट बरोबर गप्पा होत होत्या..दोन्ही देशांच्या परंपरा, संस्कृती इत्यादींची देवाणघेवाण होत होती! संध्याकाळी आम्ही झोस्टेलवर आलो तिथून सगळ्यात वरच्या मजल्यावरून दिसणारा अप्रतिम सूर्यास्त बघितला आणि मग तिथल्याच कॉमन रूम मध्ये "Jenga" या खेळाचे दोन चार डाव खेळून वॅरीसा आणि विट ला निरोप दिला! मग आम्ही बॅग पॅक केली आणि वरती किचन मध्ये सूप करुन प्यायलं..मग पॅकिंग केल्यावर थोडावेळ चक्कर मारुन जेवायला जायचं ठरवलं तर एकतर तितकं खावंसं वाटेना, आणि बऱ्यापैकी उशीर झाल्याने कुठल्याच हॉटेलमध्ये लोकं दिसेना आणि मग हॉटेलच्या जेवणावर पैसे घालवावेसे वाटेना..मग आम्ही एका दुकानातून मॅगीची पाकिटं घेतली आणि पुन्हा zostelच्या किचन कडे रवाना झालो..मग तिथल्या स्टाफबरोबर गप्पा मारत, पुढील टप्प्यांची माहिती काढत मॅगी केलं आणि मस्त ताव मारला!!
रात्री १ ची गाडी होती, १२ वाजता तिथल्याच स्टाफने आमच्यासाठी रिक्षा सांगितली होती. अगदी लागेल ती मदत करणारे इथले लोक मनाला एकदम भावले आणि खरंच अतिथी देवो भवः का म्हणतात ते कळलं!!
ट्रेन वेळेवर होती..आम्ही स्टेशनला पिहोचलो आणि प्लॅटफॉर्म वर जाऊन थांबलो..गाडी आल्यावर आमच्या बर्थ वर गेलो तर तिथे आणखी दोन स्त्रिया होत्या..(ladies कोट्यातून बुकिंग केल्याचे फायदे). त्यांनी थोडा वेळ आमच्या हालचाली, गप्पा ऐकल्या व मग आमचाच interview घ्यायला लागल्या, (एकीला मराठी थोडं येत होतं)की आम्ही दोघीच, बरोबर मोठं कोणी नाही, परराज्यात अशा रात्रीच्या कशा काय फिरतो वगैरे..मग त्यांच्या गरजेपूर्ती आणि थोड्या प्रबोधनापूर्ती ;) माहिती दिली!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं वेगळ्या शहरात, देशात एकटी गेली की पालकांना काळजी वाटणं स्वाभाविकच असतं, हे लक्षात घेऊन कायम बाहेर फिरायला गेलं की दिवसातून ४-५ वेळा स्वताहून कुठे आहोत, काय करतोय हे कळवलं की मला नाही वाटत कुठलेही पालक फार आडकाठी करतील..कारण त्यांना आपल्या सुरक्षिततेपलीकडे काहीही नको असतं!
तर त्याप्रमाणेच पुन्हा आपापल्या घरी गाडी मिळाल्याचे आणि सगळं नीट असल्याचे मेसेज करुन, असलेलं नसलेलं सगळं अंगाखाली, अंगावर घेऊन आम्ही जोधपुरमध्ये जागं होण्यासाठी झोपी गेलो!!
क्रमशः
©कांचन लेले