खम्माघणी राजस्थान! - भाग ३

ते मनोहर दृश्य मनात साठवून आम्ही स्टेशनच्या आत गेलो, थोडावेळ वेटिंग रुम मध्ये थांबलो व नंतर प्लॅटफॉर्मकडे निघालो..जयपूर रेल्वे स्टेशनला लिफ्टची सुविधा सुद्धा आहे हे तिथे एक बोर्ड बघून कळलं, बॅग्स असल्याने आणि थंडीने हात सुन्न पडल्याने त्याचा खूप फायदा झाला..आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर अगदी वेळेत पोहोचलो..गाडी सुद्धा वेळेवर आली. 
 तशा आम्ही दोघीच मुली आणि रात्रीचा प्रवास, खरंतर घरचे नेहेमी अशावेळी AC चं तिकीट काढायला सांगतात..पण या वेळी मी ठरवून स्लीपर क्लासचंच तिकीट काढलेलं, फक्त त्यात लेडीज कोट्यात काढलं, ही सुद्धा एक उत्तम सुविधा भारतीय रेल्वे देत आहे. फक्त तोटा एवढाच होतो की स्लीपर क्लास मध्ये अंथरूण, पांघरूण दिलं जात नाही. पण आम्ही त्या तयारीनिशी गेलेलो, तरीही थंडी इतकी प्रचंड होती की खिडकीच्या फटीतून येणाऱ्या वाऱ्याने हुडहुडी भरत होती! तरी दमल्यामुळे पूर्ण गुर्गटून पांघरूण घेऊन झोपलो..आणि दुपारी १ दरम्यान जैसलमेरला पोहोचलो..
आमचा ठरलेला प्लॅन असा होता की जैसलमेरला दोन दिवस ठेवलेले, त्यापैकी आज आम्ही सरळ वाळवंटात, म्हणजे "सम" येथे जाऊन तिथे "Desert Camp" मध्ये रहाणार होतो, व दुसऱ्या दिवशी सकाळी जैसलमेरला जाऊन किल्ला वगैरे फिरणार होतो. या desert camp बद्दल मी बरंच सर्फिंग केलेलं, आणि online दिसणाऱ्या किमती खूप जास्ती वाटल्याने मी Spot booking करायचं असा निर्णय घेतलेला.
तर आम्ही स्टेशनबाहेर आलो. दृश्य असं होतं की बहुतांश लोकांना न्यायला हॉटेलच्या, कॅम्पच्या गाड्या आलेल्या. आणि बाहेर काही रिक्षा उभ्या होत्या आणि त्या सम ला जात नाहीत असं आम्हाला कळलं. प्रायव्हेट गाडीवाले मागे लागले, पण त्यांचे भाव ऐकून आम्ही त्यांना भाव दिला नाही! ;)
१ वाजून गेलेला, आणि ट्रेन मध्ये काही खायला मिळालं नव्हतं, डिंकाचे लाडू आणि Lays Kurkure सारख्या खाद्यावर असताना भूक लागली होती त्यामुळे आम्ही आधी तिथेच जेवायचं ठरवलं. जैसलमेर स्टेशनच्या बाहेर तसं प्रशस्त हॉटेल वगैरे काहीच नाही. अगदीच सुमार दर्जाची दोन तीन हॉटेल आहेत, पण भूक लागलेली असताना असलं काही सुचत नाही. म्हणून आम्ही सगळ्यात सेफ पर्याय म्हणून शेव भाजी आणि पोळ्या आणि ताक अशी ऑर्डर दिली. शेवभाजी पिवळ्या ग्रेव्ही मध्ये मी पहिल्यांदाच बघितली..म्हणजे ताकातली शेवभाजी म्हंटलं तरी गैर नव्हे! पण पुन्हा भूक लागलेली असताना पोटात ढकलणे यापलीकडे काही नाही! जेवण झाल्यावर आम्ही तिथल्याच एक दोन लोकांना पुन्हा विचारलं, पण ८००, १०००  असे वाट्टेल ते रेट आम्हाला फक्त समला पोहोचवण्याचे सांगण्यात आले. मग आम्ही रिक्षा असतात तिथे जाऊन एका अनुभवी (छप्पर उडालेल्या ;) ) रिक्षावाल्या काकांना गाठलं आणि शेरिंगच्या गाडीतूनच जायचं असेल तर कसं जायचं विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढे एक जागा आहे तिथून शेरिंगमध्ये गाड्या जातात, मग त्यांनाच तिथे सोडायला सांगितलं. त्या जागेला नाव आहे "हनुमान सर्कल" तिथे गेलो, काकांनी दोन तीन वेळा शेअर जीप समजून लोकांना विचारलं पण त्या भलत्याच होत्या. शेवटी त्यांनी आम्हाला तिथे सोडलं आणि गाडी येईल वाट बघा असं सांगितलं. काही वेळ असाच गेला, त्यातही एक दोन गाडीवाल्यांनी शेरिंग ने गेलात तर रात्र होईल पोहोचायला, फिरत जाते खूप, रस्ता खराब आहे असं वाट्टेल ते सांगायचा प्रयत्न केला पण आम्ही भुललो नाही, आणि थोड्या वेळातच समोरच्या बाजूला गाडी दिसल्यावर धावत जाऊन आधी सीट रीझर्व केल्या. ती Open jeep होती! पुढे कव्हर, मध्ये चार जण बसतील अशी आडवी सीट, आणि मागे उभ्या दोन सीट, अशी तवेरा सारखी बसण्याची सोय. पण आमच्याकडे ट्रॉली बॅग्स होत्या त्यामुळे तो जरा कटकट करू लागला, मग अनुभव पणाला लावून त्याला म्हंटलं चार सीटचे पैसे देते, मधे कोणालाही बसवू नको. आणि अशा प्रकारे आम्ही आणि आमच्या दोन बॅग्स ओपन जीप सफारीला अवघ्या २०० रुपयात निघालो! भर दुपारी त्या जीपमध्येसुद्धा इतकी थंडी वाजत होती, आणि ड्रायव्हर म्हणजे शुमाकरचा भाऊ शोभावा अशी गाडी चालवत होता. त्यामुळे आम्ही असेल नसेल ते सगळं अंगावर चढवून, डोक्याला बांधून बसलेलो!  ड्रायव्हरशी आधीच बोलून बघितलेलं, माणूस बरा वाटला, मग त्यालाच संगीतलेलं की आम्हाला एखादा चांगला desert camp सुचवायला..साधारण सव्वा तासाने आम्ही तिथे पोहोचलो, त्याने आम्हाला कॅम्प बघून घ्यायला सांगितलं आणि तो थांबला तोपर्यंत. सगळं व्यवस्थित, अगदी अद्ययावत नाही आणि अगदी सुमार नाही असं बघून, बार्गेनिंगचं कौशल्य पणाला लावून, दोघींचे मिळून १६०० रुपयात फायनल केलं, ह्यात संध्याकाळचा चहा-नाश्ता, उंटांची राईड, रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम, जेवण आणि सकाळचा चहा नाश्ता असं सगळं आलं. आणि ज्या माणसाने आम्हाला सोडलं त्यालाच दुसऱ्या दिवशी आणायला यायलाही सांगितलं. तिथे टेंट आणि कॉटेज असे दोन पर्याय होते. सेफ्टीचा विचार करून आम्ही भक्कम दार असलेलं कॉटेज निवडलं. नंतर एक दीड तास विश्रांती घेऊन आम्ही उंटाची सवारी करायला निघालो!
उंटावर बसणं आणि बसून रहाणं दोन्ही अवघडच आहे तसं!
तसं बघायला गेलं तर हल्ली (racing) bikeची सवय असणाऱ्यांना ते छान जमेल!! 
कुठल्याही जीवावर स्वार होताना मनात संमिश्र भाव येऊ शकतात..
जयपूरला हत्तीवर स्वारीला जाणं टाळलं त्याचं किंमत हे एक कारण होतंच, पण दुसरं कारण असं होतं की त्यांच्या डोळ्यात मला उदासीनता दिसली..जी बहुतांशवेळेला मला प्राणी संग्रहालयात असणाऱ्या प्राण्यांच्या डोळ्यात दिसते! तसंच उंटावर बसतानाही वाटलं…पण शक्यतो त्याला पाय लागू न देता आणि संधी मिळेल तेव्हा त्याच्या डोक्यावर, पाठीवर प्रेमाने हात फिरवून, थांबल्यावर त्याच्याशी गप्पा मारून मी ते भरुन काढलं!
तिथे मधे एक माणूस एक छोटं वाद्य तोंडाने वाजवत होता..कानाला तो आवाज लांबूनच कळला, मग उंटवाल्या भाईंना तिकडे न्यायला सांगितलं..खाली उतरलो आणि थोडावेळ ऐकलं..
नंतर त्या माणसाशी बोलल्यावर कळलं त्या वाद्याचं नाव "मोरचंग" किंवा बरंच प्रचलित असलेलं "मोरसिंग". ते वाद्य असं दिसतं..
त्यांचे आभार मानून पुढे निघालो!
सनसेट पॉईंट पर्यंत गेल्यावर उंटवाल्या भाईने आम्हाला खरं "थार" वाळवंट आणखी पुढे आहे, जिथे त्यांच्या भाषेत "लेहरे" दिसतात…म्हणजे वाळूवर येणारी विशिष्ट नक्षी दिसते…म्हंटलं इथवर आलो आहोत तर जाऊया…तिथेही जोरदार बार्गेनिंग करुन..आम्ही कशा त्याच्या बहिणीसारख्या आहोत असं सांगून ४०० रुपयात जवळपास तासभर आत वाळवंटात फेरफटका मारला…सूर्यास्त होईपर्यंत तिथेच वाळूवर पथारी पसरुन यथेच्छ डोळे भरून सूर्यास्त बघितला…आणि मग पुन्हा कॅम्प कडे वळलो..
क्रमशः
©कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!