दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो, नाश्त्याला वेळ न घालवता घरुन नेलेले डिंकाचे लाडू खाल्ले आणि पुन्हा बसने आमेरकडे निघालो..आमेरला जाताना वाटेतच जल महल सुद्धा दिसतं!
आत जात असताना अनेक गाईड तुमच्या मागे लागतात.. नजर काम करते. माणूस पारखून घेणं अतिशय महत्वाचं आहे, तरच दिलेले पैसे वसूल होतात! अशा चार पाच लोकांना नाही म्हणून सहाव्याला नाही म्हंटलं आणि तो मागे मागे नाही आला. बऱ्यापैकी वयस्कर आणि अनुभवी दिसत होते काका. मागे गेले त्यांना म्हंटलं किती घेणार तर म्हणाले २००. म्हंटलं १५० फायनल. आणि ते आमच्याबरोबर आले. (खरं हत्तीवरून जायचं म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो, पण त्याचं तिकीट ₹११०० हे ऐकून रद्द केलं!)
सुरवातीलाच आत शिरताना उजवीकडे एका वाड्याचे भग्न अवशेष दिसतात..पण ते ही खरंतर आकर्षक दिसतात!
पुढे थोडं वरती गेलं की खाली माओटा तलाव दिसतो..आणि त्याच्या मध्ये दिसते ती केशर बाग..राजा काश्मीरला गेले होते तेव्हा त्यांना केशर खूप भावलं आणि त्यांनी एक मोठी रक्कम देऊन ते इकडे लागवड करायला आणलं, पण राजस्थानातील हवामानामुळे तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही! पुढे आतल्या टोकाला गेल्यावर मागे जयगढ किल्ल्याची भिंत दिसते! नंतर तिथे तिकीट काढून आत जावं लागतं. आत जायच्या आधी उजवीकडे एक शिला देवीचं मंदिर आहे. सुंदर प्रसन्न असं हे मंदिर. आत जाताना दारावरच चांदीच्या पत्र्यावर नव दुर्गा आणि दहा महाविद्या कोरलेल्या आहेत. संपूर्ण मंदिर संगमरवरी आहे. आत गेल्यावर काही विशिष्ट ठिकाणी पायाखाली छोटी छिद्र येतात, ज्यातून थंड हवा येताना पायाला जाणवते! Ventilation ठेवण्यासाठी तेव्हाच्या अशा अनेक क्लुप्त्या राजस्थानातील वास्तूंमध्ये दिसून येतात..
दर्शन घेऊन बाहेर आल्यावर किल्ल्यात प्रवेश केला..
आमेर किल्ल्याचं नाव मुळात अंबा मातेवरून आंबेर असं पडलं होतं. कालांतराने त्याचं "आमेर" झालं. परंतु आजही इंग्रजीत "Amber" असाच उल्लेख सगळीकडे येतो. या किल्ल्यावर आजही बळी द्यायची प्रथा सुरू आहे. आधी मनुष्य बळी दिला जायचा, आता दर रोज एक जनावर बळी म्हणून चढवलं जातं. ही प्रथा मात्र आजवर मला कळली नाही! जो जन्म देतो त्याला प्रसन्न करायला मृत्यू कसा चालेल?!
असो..तर पुढे किल्ल्यात फिरल्यावर सगळं भव्य दिव्य दिसून येतं.
इथल्या किल्ल्यांवर एक विशिष्ट नक्षीकाम केलेलं दिसतं.
याचं वैशिष्ट्य असं की हे रंग नैसर्गिक असतात. फळ-भाज्यांपासून हे रंग त्याकाळी बनवत असत व आज चारशेहुन जास्त वर्ष झाली तरीही तो रंग तसाच्या तसा आहे हे विशेष! पुढे एके ठिकाणी आत गेल्यावर एक रहाट दिसला..
बरंच फिरुन आम्ही बाहेर पडलो..तिथून खाली आल्यावर, थोडं लांब मीराबाईंचं मंदिर आहे..काका आम्हाला तिकडे घेऊन जात असताना मधे रस्त्यात काही वादक "रावणहट्टा" नावाचं वाद्य सुंदर वाजवत होते!
हे राजस्थानी वाद्य अनेक चित्रपट संगीतात आपल्याला ऐकायला मिळालं आहे!
थोडा त्याचा आस्वाद घेतला आणि पुढे गेलो..
मीरा बाईंचं मंदिर फारच सुंदर आहे! सहसा कोणी लोकांना तिकडे नेत नसावं, कारण किल्ल्यात खूप गर्दी असताना मंदिरात मात्र एक माणूसही नव्हता!
अतिशय प्रसन्न वाटावं असं मीराबाईंचं मंदिर बघितलं आणि काका आम्हाला तिथल्या गव्हर्मेंटच्या दुकानात घेऊन गेले…तिथे त्यांनी ब्लॉक प्रिंटिंग कसं करतात, तिथलेही रंग नैसर्गिक असतात, त्याचं तंत्र दाखवलं..तिथे साड्या, लेदर चप्पल, जयपूरची खास १०० ग्राम रजई, ड्रेस, ओढणी अशी खूप व्हरायटी आहे!
तिथून काकांना मुक्त केलं! अतिशय छान माहिती देत फिरवलं त्यांनी आम्हाला! मग जेवलो खास राजस्थानी दालबाटी थाळी!
पुढे तसंच अलबर्ट हॉल मुसीयम बद्दल वाचलं होतं त्यात ते एवढं आकर्षक वाटलं नाही, पण ती वस्तू मात्र अतिशय रेखीव आणि सुबक आहे..
त्यामुळे तिथे गेलो, बाहेरूनच तिचा आस्वाद घेतला आणि वेळे आभावी आत न जाता, City Palace कडे कूच केली..हा सिटी palace सवाई जय सिंह यांनी बांधलेला, पुढे उल्लेख येणार आहे तो हवा महलचा, तो बांधण्याचं श्रेय सुद्धा ह्यांच्याच पदरी जातं!
मुळात जयपूरच मुळी त्यांनी निर्माण केलं, आणि त्यांच्या नावावरुनच हे नाव ठेवलं आहे..
तर पुन्हा city palace कडे येताना, अतिशय भव्य दिव्य आणि नायनरम्य वास्तू!
आमच्या हातात वेळ कमी असल्याने खूप वरवर बघितलं..या महालाचा एकच भाग लोकांसाठी खुला आहे, एका भागात अजूनही इथल्या राजघराण्यातील लोकांचं वास्तव्य आहे..
तिथून पुढे आम्ही हवा महल बघायला गेलो..हवा महल खरंच अतिशय सुंदर बांधलं आहे! नजर हटत नाही इतकं अप्रतिम आहे!
फक्त ऐन मुख्य रस्त्यावर असल्याने शांतता मात्र त्याच्या वाट्याला अजिबात नाही! त्याच्या बरोब्बर समोर जागा हेरुन काही हुशार लोकांनी कॅफे सुरू केले आहेत..तिथे बसून हवा महलचा आस्वाद घेता येतो..(आम्ही मात्र वरती गेलो view साठी, पण कॅफे च्या दारातून छान फोटो काढून पैसे न उधळता तसेच खाली आलो ;) )
जयपूर आणि एकूणच राजस्थानात ५.३०-६ नंतर हळू हळू सगळं बंद होऊ लागतं. थंडी पडू लागते. त्यात आम्ही दोन दिवस असताना वातावरण पावसाने घेरलेलं, त्यामुळे आणखीनच कमी वेळ मिळाला सगळं फिरायला! त्याच दिवशी रात्रीची ट्रेन होती, जैसलमेरसाठी..त्यामुळे पटापट फिरुन zostel वर आलो, सामान पॅक केलं आणि स्टेशनकडे रवाना झालो!
तारीख होती २५ जानेवारी..स्टेशनला पोहोचल्यावर जे बघितलं त्याने मन भरुन गेलं आणि अशाप्रकारे तो दिवस उत्तम संपला!
क्रमशः
©कांचन लेले
No comments:
Post a Comment