ऋषिकेश-मसूरी - भाग ४!
आमचा adventourous दिवस उजाडला आणि आम्ही तयारीला लागलो. सकाळी ऑफिसचं थोडं काम केलं. नाश्ता न करता एक एक प्रोटीन बार खाल्ला आणि कमीत कमीत सामान वॉटरप्रूफ छोट्या बॅग मध्ये घेऊन राफ्टिंग साठी निघालो!
शक्यतो dryfit कपडे घालावे आणि पायात सँडल घालाव्या. मी चपला घातलेल्या ज्या नंतर गंगार्पण झाल्या!
आम्ही अनेक लोकांना विचारून नंतर आमच्या झॉस्टेलच्या अगदी जवळच असलेल्या माणसाकडे अवघ्या ४०० रुपयात बुकिंग केलं! झॉस्टेल मध्ये भेटलेल्या काही मुलांकडून त्याची माहिती मिळाली होती.
सगळ्यात मोठा फायदा हा होता की तो इथून पिक-अप आणि इथेच ड्रॉप देणार होता त्यामुळे ओलेत्याने ऋषिकेश फिरायची वेळ येणार नव्हती!
आम्ही गेलो आणि ऑफिसमध्ये बसलो.
त्याला विचारलं आणखी किती लोक आहेत तर तो म्हणाला आज वातावरण खूप थंड असल्याने दोघांनी बुकिंग कॅन्सल केलं आहे, त्यामुळे तुम्हीच दोघी आहात!
आता आली पंचाईत!
आम्हाला दुसऱ्या दिवशी मसुरीसाठी निघायचं होतं त्यामुळे पोस्टपोन होणं अवघड होतं, आमच्याबरोबर झॉस्टेल मध्ये असलेल्या मुलांनी दुसऱ्या दिवशीचं बुकिंग केलेलं त्यामुळे तो आम्हाला सांगत होता की तुम्ही उद्या त्यांच्याबरोबरच करा. आम्हीही जरा विचार करत होतो, पण म्हंटलं आधी आजची पूर्ण शक्यता पडताळून बघू म्हणून जरा त्याला - मग तुम्ही आधी कळवायला पाहिजे होतंत, आम्हाला आजच करायचंय, उद्या जमणार नाही - असं जरा कडक स्वरात सांगितलं.
मग त्याने दोन ठिकाणी फोन केला आणि आणखी दोघा जणांची व्यवस्था केली!
आता आम्ही एकूण चार जण होतो!
दोघींनीच जायला नकार देण्याचं कारण असं की एकतर आम्हाला दोघींनाही पोहता येत नाही आणि पाण्याची भीती वाटते. दुसरं महत्वाचं म्हणजे मी वाचलं होतं त्याप्रमाणे जितके जास्ती लोक, तितका चांगला बॅलन्स आणि पँडल करायला सपोर्ट मिळतो. आणि पुन्हा सेफ्टी हा मुद्दा असतोच दोघी मुली असताना.
त्यामुळे थोडं ठामपणेच त्याला सांगितलं आणि काम झालं!
मग एक माणुस मोठी जीप घेऊन आला आणि त्याच्या टपावर असलेल्या राफ्टचं दर्शन झालं!
मग ती दोन माणसं, आम्ही आणि राफ्ट असा प्रवास सुरु झाला!
मधे त्या दोन मुलांना घ्यायचं होतं, त्यांना घेतलं आणि गाडी पुढे जाऊ लागली!
बोलण्यावरुन कळलं की ते दोघे सुद्धा मराठी आहेत. मग आम्ही दोघी आणि त्या दोघांच्या आपापसात बोलण्यात दिल्लीहुन गेलं तर covid टेस्ट बंधनकारक आहे ह्याबद्दल चर्चा होताच आम्ही बोलायला लागलो. तेही मुंबईचेच होते, त्यांचीही फ्लाईट दिल्लीहून होती जी त्यांनी नुकतीच कॅन्सल केलेली!
किंचित दडपण आलं, पण म्हंटलं आजचं आधी हे नीट होउदे, त्यातून पार झालो तर मुंबईचं दर्शन नाहीतर! असो!
मध्ये आमच्या गाईडला घेतलं..मुंबईला गल्लीच्या तोंडावर सिगारेटी फुकत केस रंगवलेली अती स्टायलिश तरी कुपोषित दिसणारी पोरं असतात तसा हा माणूस!
पोहोचेपर्यंत कळलं नाही की हा गाईड आहे!
मग आम्ही शिवपुरीला पोहोचलो, इथून आमच्या १६ किलोमीटर प्रवासाला सुरवात होणार होती.
थोडी राफ्टिंग बद्दल माहिती अशी की हे चार वेगवेगळ्या टप्प्यात करता येतं. ९, १६, २४ आणि ३५ किलोमीटर असं. अगदी तासभरापासून दोन दिवसांपर्यंत!
राफ्टिंग शिवायही अनेक adventure स्पोर्ट ऋषिकेश मध्ये करता येतात. बंजी जम्पिंग, ग्रेट स्विंग वगैरे.
काही ऑर्गनाईझर एका पेक्षा जास्ती adventures चे कॉम्बो पॅकेज सुद्धा देतात!
तर आम्ही तिथे जमलो. आमच्याकडून एक डिक्लरेशन फॉर्म भरुन घेतला गेला. त्या दोन मुलांनी wet suit घातले! आम्ही मात्र कडाक्याच्या थंडीत खतरो के खिलाडी! Tshirt आणि पॅन्ट घालून ते अतिशय सुगंधी लाईफ जॅकेट आणि हेल्मेट घालून तयार झालो!
आमची बॅग आमच्या गाईड कडे दिली राफ्ट मधल्या dry bag मध्ये ठेवायला आणि खाली उतरलो!
आमच्याबरोबर आणखी ३ मोठे ग्रुप्स होते, सगळ्यांकडे प्रत्येकी ६-८ लोक. त्यातल्या एका गाईडने सगळ्या सूचना दिल्या. बऱ्याच लोकांनी शंका निरसन केलं, त्यात राफ्ट उलटण्याचे चान्स किती हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न! त्यात पोहता येत नसेल तर काय ? इत्यादी इत्यादी.
तो इतका सय्यमाने आणि जबाबदारीने सगळ्यांना समजवत होता आणि आमचा गाईड राफ्ट मध्ये निवांत पसरुन बसलेला! त्याचं वर्णन करणं...अबब! म्हणजे साधारण हा गाईड असेल तर आज आपण नक्की गंगार्पण असं वाटावं असा आमचा गाईड अमित! तसं झालं नाही नशीब...त्याने व्यवस्थित नेलं आम्हाला!
त्या सगळ्या सूचना ऐकल्या, एकदा शेवटचा विचार करुन घेतला..मग पुढे जाऊन गंगा मातेचं दर्शन घेतलं, पाणी डोळ्याला आणि कपाळाला लावलं आणि प्रवेश केला राफ्ट मध्ये!
अमितने कुणी कुठे बसायचं सांगितलं. ती दोन मुलं सगळ्यात पुढे, आम्ही त्यांच्या मागच्या विभागात आणि शेवटी हा! त्याने त्याच्या उच्च आंग्ल accent मध्ये आम्हाला पॅडल कसं धरायचं, तो काय काय सूचना देणार, वजन कसं बॅलन्स करायचं, पाय कसे मधल्या जागेत रोवून ठेवायचे वगैरे सांगितलं.
झालं..आता खरा तो क्षण आला! आमची राफ्ट पाण्यावर तरंगत होती! किमान एवढी हिंमत तरी केली असा विचार करुन स्वतःलाच बुस्ट करत होतो!
तसं बऱ्यापैकी पाणी संथ असतं आणि मधे मधे उसळतं पाणी असतं त्याला "रॅपिड" असं म्हणतात, ते खरं पांढरं धोप दिसतं, म्हणून व्हाइट वॉटर राफ्टिंग म्हणत असावे बहुतेक.
तर असे तीन मोठे आणि ८ लहान असे एकूण ११ रॅपिड असणार होते. बाकीच्या राफ्ट पुढे गेलेल्या, त्यांचं काय होतंय हे आम्हाला दिसणार होतं! एका अर्थी चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा!
ते पुढे व्यवस्थित गेले तर उत्तमच! पण जर कुणी पडलं, राफ्ट उलटली तर मात्र तिथल्या तिथे गाळण उडणार हे निश्चित होतं!
दोन्ही बाजूला डोंगर/झाडी..आणि समोर हिरवंगार पाणी!! Sea Green म्हणजे नेमका कुठला कलर ते इथे आल्यावर कळलं! आणि मधेच पांढरं धोप दिसणारं तेच पाणी! काय किमया आहे निसर्गाची!!
तर!
सुरवात झाली आणि पहिला छोटा रॅपिड आला, गंमत म्हणजे या प्रत्येक रॅपिडला एक नाव सुद्धा ठेवलेलं आहे बरं! आपले गाईड ते आपल्याला सांगत असतात! आता तेव्हाची मानसिक स्थिती बघता ते सगळं लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य होतं! अमितच्या सूचनांप्रमाणे आम्ही थोडा वेळ पँडल करायचो, त्याने थांबायला सांगितलं की थांबायचो.
आम्ही जरा कुठे स्थिरावतो तोच पहिला लहान रॅपिड आला, लांबून हे लहान रॅपिड विशेष दिसत नाहीत, जवळ गेल्यावर अगदी फक्त ५-१० सेकंद आपली राफ्ट त्यात असते, पssण!
हा पण फार भयानक आहे, तेवढ्यात सुद्धा एक मोठ्ठा गोळा येतो पोटात!
आमचं लक्ष आमच्यापुढे गेलेल्या राफ्टकडे! त्या दोन्ही राफ्ट किंचित हेलकावे घेऊन पुढे गेल्या तसं जssरा जीवात जीव आला!
मग पाय आपोआप त्या मधल्या खाचेत घट्ट रोवले गेले..जिवाच्या आकांताने अमित सांगेल तसं आम्ही पँडल करत होतो...आणि एका पॉईंटला अमित जोरात म्हणाला
Okay Stop!
तेव्हा जरा मी शुद्धीत आले..मागे वळून बघितलं तर तो रॅपिड गेलेला, ती १० सेकंद मी कुठे होते ते माझं मलाच कळलं नाही! पोटातला गोळा पण हळूहळू कमी होत गेला..
रोवलेले पाय जरा ढिले सोडले न सोडले तोच अमित म्हणाला
आता पहिला मोठा रॅपिड येणारे!
झाssलं!
म्हंटलं आता जोर लावायचा आणि ओरडले
"गणपती बाप्पाssss" मग कसले विचार आणि कसलं काय!
मोरयाss म्हंटलं! गंगा मय्याकीsss जsss य!
जिवाच्या आकांताने आम्हीच ओरडत होतो आणि स्वतःलाच दिलासा देत होतो!
पुढच्या राफ्ट बघितल्या तर भयंकर परिस्थिती! जवळजवळ ७०-८०° एवढ्या हेलकावे घेत त्या पुढे गेल्या!! पण सुदैवाने कुणी पडलेलं दिसलं नाही..
त्यामुळे पुन्हा जोर लावून
"१ २ ३ ४...गणपतीचा जयजयकार" वगैरे झालं..मनातल्या मनात राम राम राम राम सुरु झालं..आणि आम्ही त्या रॅपिड मध्ये शिरलो!!
(काय वर्णन करु हाच प्रश्न आहे..इथे व्हिडीओ टाकायचा प्रयत्न करण्यातच एवढे दिवस लांबला हा भाग..पण ते काही झालं नाही! असो! )
समोर बसलेल्या मुलाच्या डोक्यावरचा गो प्रो कॅमेरा पाणी तोंडावर येऊन आदळल्याने खाली पडला..तो स्वतः बाजूच्या मुलाच्या पायाजवळ येऊन पडला..
त्याच्यामागे मी जवळ जवळ पडता पडता वाचले, फक्त अमच्याबाजूने राफ्ट वरती गेल्याने आम्ही पडलो असतो तरी आतच पडलो एवढं सुदैव!
त्यातून सावरतो न सावरतो तोच पलीकडच्या बाजूने राफ्ट वर गेली, पण थोडक्यात खाली आली म्हणून बचावलो!
संपूर्ण नाकातोंडात पाणी! पण त्या मानाने आम्ही पटकन सावरलो! पुढे संथ पाणी आलं तसं जीवात जीव आला आणि पहिला मोठा रॅपिड पार केल्याच्या आनंदात आम्ही पुन्हा गणपती बाप्पा आणि गंगा मय्याचा जयघोष केला!!
आणि मग अमितने आम्हाला शांतपणे सांगितलं की तुम्ही हे असं ओरडत राहिलात तर माझा आवाज तुम्हाला येणार नाही आणि महत्वाच्या सूचना कळणार नाहीत..शुद्ध शब्दात तोंडं बंद ठेवा असं सांगितलं त्याने आम्हाला!! 😂
मग पुढे एक छोटा रॅपिड आला आणि गेला कधी कळलंच नाही...सुदैवाने तो एवढा उसळत्या पाण्याचा नव्हता..आम्ही सहज तरून गेलो!
आता थोडीशी किंचित सवय झाली त्या पाण्याची..
भीती भीती जी होती ती खूप कमी झालेली..
अगदी खरं सांगू तर हे राफ्टिंग गंगेत नसतं तर मी कधीच केलं नसतं कदाचित..
आधी सांगितल्याप्रमाणे मला पाण्याची भीती आहे..खरं तर पाण्याची नाही, पाण्यात बुडण्याची भीती आहे कारण मी लहानपणी स्विमिंग पूल मध्ये बुडले होते..तेव्हापासून ती भीती बसलेली आहे!
पण २०१४ साली माझ्या सुदैवाने मी उत्तराखंड मध्ये येऊन गेले होते..तेव्हा हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, यमनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ असं सगळं ध्यानीमनी नसताना अचानक झालेलं! अर्थात गुरुकृपा म्हणूनच!
त्या अधिपर्यंत मला समुद्राचं खूप वेड होतं.. कारण तोपर्यंत नदी बघितलेलीच नव्हती कधी!
२०१४ साली उत्तराखंडचा हा प्रवास झाला आणि मी खऱ्या अर्थाने "नदिष्ट" झाले!
सगळ्या नद्यांचे दर्शन झालं.. आधी गंगा, कालिंदी, यमुना, मंदाकिनी, अलकनंदा
आणि शेवटी...कधीही न विसरु शकणारी सरस्वती!!
माना गावात, भारताच्या एका सीमेवर माना गाव आहे, तिकडे गेलो असताना तिथे सरस्वतीचा प्रवाह आहे..अगदी छोटा! पण पांढरं शुभ्र वाहतं पाणी! आम्ही अक्षरशः आधाशासारखं ते पाणी प्यायलेलं मला आजही आठवतंय..आणि ती चव आयुष्यात कधी विसरुच शकणार नाही!!
त्यावेळी मलाही वाटलेलं, की विसावं वर्ष हे काय चारधाम करायचं वय आहे का..त्यामुळे मी नकारच देत होते...तसं मी आमच्या सरांना म्हंटलं सुद्धा! तेव्हा त्यांनी फक्त मला एकच प्रश्न विचारलेला, "तुझा माझ्यावर विश्वास आहे का?"
आणि पुढे त्या प्रवासाने मला प्रवासाच्या, निरसर्गाच्या, नद्यांच्या आणि अध्यात्माच्या प्रेमात पाडलं! Turning point!
असो..तर या पुढच्या रॅपिडकडे जाणाऱ्या turning कडे आम्ही आलो आणि अमित म्हणाला पुढचा रॅपिड हा सगळ्यात मोठा रॅपिड असणार आहे!
पुन्हा एक छोटा गोळा...पण एव्हाना आम्ही जरा सरावलो होतो! त्यामुळे थोडीशी मजा येउ लागली होती!
आम्ही यावेळी शक्कल केली, रॅपिड लांब असतानाच गणपती बाप्पा आणि गंगा मय्याला पाचारण गेलं, असं अंगभर रक्त उत्साहाने सळसळतय असं वाटत होतं!!
म्हणता म्हणता आम्ही जवळ आलोच..आणि पाण्याचा एक जोरदार तडाखा आला..सगळं पाणी तोंडावर...जवळजवळ पडतापडता वाचलेलो...काही दिसेनासं झालं..पण दिसलं तेव्हा सगळे राफ्ट मध्ये होते..फक्त शर्वरीने तिचे पॅडल सोडून दिलेलं आणि ते आता मस्त गंगेत डुंबत होतं!
आम्हाला हसावं की काय करावं कळेना..अजून आम्हीच त्या रॅपिडधक्यातून बाहेर आलो नव्हतो..पण मग अमितने पँडल भाई, आजा मेरे दोस्त वगैरे टाईमपास करत कसंबसं ते पॅडल मिळवलं..आणि मग जाम चेष्टा मस्करी करत आम्ही पुढे गेलो!
पण या वेळी अगदी मस्त वाटलं! म्हणजे लहान मुलाला आई कशी उंच हवेत उडवते आणि अलगद झेलते ना...अगदी तसं!!
थोडं पुढे आल्यावर अमित म्हणाला की आता पॅडल राफ्ट मध्ये लॉक करा आणि पटकन पाण्यात उतरा! थोडा विचार करून ते दोघे मुलं उतरले..
शर्वरीने त्याला एक दोन प्रश्न विचारले आणि ती सुद्धा उतरली! खाली राफ्टला एक जाड दोरी बांधलेली असते..तो म्हणाला त्याला धरुन रहा बस! लाईफ जॅकेट होतंच!
तरीही माझं पटकन धाडस होईना!
मग मी पण घेतलं गंगेच नाव आणि उतरले!! आणि काय सांगू..स्वर्गसुख काय म्हणतात ते हेच!! दोन्ही बाजूला डोंगर-झाडी...हिरवं-पांढरं पाणी...मधोमध आपण!!! आहाहा!!
बराच वेळ आम्ही तसेच होतो..
भीती वगैरे सगळं दूर..लहान मुलांना कसं कोणीतरी डोक्यावर बसवून मस्त घेऊन जातं तसं वाटत होतं!!
मग एकदम सरावल्यासारखे पुन्हा प्रवासाला लागलो..पुढे दोन चार बारीक बारीक रॅपिड गेले..एकदम मजा सुरू होती!
आणि मग आम्हाला दिसला मॅगी पॉईंट!!
मग राफ्ट तिकडे घेतली..सगळे उतरलो..मस्त मॅगीची ऑर्डर दिली! बाकीच्यांनी चहा घेतला..
सवयीप्रमाणे Emergency reuirement म्हणून मी प्लास्टिकच्या पिशवीत थोडे पैसे घेऊन पँटच्या खिशात ठेवले होते..त्याचा उपयोग झाला!
आणि मग अमितने विचारलं कोण कोण क्लिफ जम्प करणार?! त्यावर आमचा तर चान्सच नव्हता..त्या दोघांमधला एक जण म्हणाला करेन! मग अम्ही मस्त मॅग्गी खाल्लं आणि थोडं पुढे जिथून सगळे क्लिफ जम्प करत होते तिकडे गेलो..
क्लिफ जम्प म्हणजे काय तर तिथे उंचावर साधारण २० फुटावरुन खाली उडी मारायची पाण्यात..
मग आम्ही खालच्या दगडावर बसून जो कुणी उडी मारत होता त्याला जोरदार चियरिंग करत होतो! आणि हा आमचा ग्रेट गाईड अमित!
आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..मग पुढे येणारे रॅपिड काहीच वाटले नाही..अतिशय आनंद घेत आम्ही उर्वरित वेळ काढला..आणि काठावर येऊन पायउतार झालो! मग अमितचा फोन बंद पडला त्यामुळे गाडी यायला वेळ लागला..मग आम्ही पुन्हा एक एक प्लेट मॅगी खाल्ली! तिथे हा गोगो भेटला!! ह्याचं नावच गोगो! गोंडस! आमची मस्त गट्टी झाली..पण मग आम्हाला निघायला लागलं!!
येताना अमितला पैसे देऊन आमचे व्हिडीओ त्याच्याकडून घेतले आणि zostel जवळ त्यांनी आम्हाला सोडलं...(आपला गाईड आपले व्हिडीओ काढतो, व ते हवे असतील तर त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात. बऱ्याचदा सगळे contribute करुन देतात.)
येतानाच तिकडे फोन करुन geyser सुरु करायला सांगितलेला कारण पटापट आवरुन आम्हाला गाठायचा होता त्रिवेणी घाट..तिथली गंगा आरती सगळ्यात बघण्यासारखी असते असं म्हणतात!
त्याप्रमाणे आम्ही आवरलं आणि खाली जाऊन विक्रम चालकाशी bargain करुन करुन त्रिवेणी घाटाजवळ पोहोचलो...
भूक तर लागलीच होती...आणि आरतीला अजून अर्धा तास होता पण तिकडे आसपास काही विशेष नव्हतं..एका छोट्याशा टपरीवर जाऊन छोले समोसे खाल्ले..त्या माणसाला कोण आनंद झालेला आम्ही आल्याचा..समोसे देऊन जाताना म्हणाला इस्के बाद गुलाम जामून खिलाता हु आपको!
भूक तर लागलीच होती...आणि आरतीला अजून अर्धा तास होता पण तिकडे आसपास काही विशेष नव्हतं..एका छोट्याशा टपरीवर जाऊन छोले समोसे खाल्ले..त्या माणसाला कोण आनंद झालेला आम्ही आल्याचा..समोसे देऊन जाताना म्हणाला इस्के बाद गुलाम जामून खिलाता हु आपको!
आम्ही पण हसून सोडून दिलं..आणि समोसे खाऊन मग आणि आरतीसाठी येऊन स्थानापन्न झालो!
क्रमशः
Comments
Post a Comment