ऋषिकेश-मसुरी - भाग २!

आम्ही पोहोचलो आणि आम्हाला न्यायला आमची नवीन छोटी मैत्रीण धावत आली! 
हिचं नाव सई! ताईची मोठी लेक! आणि धाकटी लेक नुकतीच एका महिन्याची झालेली, तिचं नाव सिया! अर्थात लाडक्या मोठ्या बहिणीने ठेवलेलं!
तर सई आम्हाला घेऊन वरती गेली. छोटंसं सुखी कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आनंदाने ऋषीकेशमध्ये रहात आहे!
यांच्याविषयी थोडं लिहिल्याशिवाय मला रहावत नाही.. पल्लवी आणि महेश देवस्थळे.. दोघेही आईचे विद्यार्थी. दोघांचंही नर्सिंग मध्ये शिक्षण झालेलं. नंतर लग्न करून मुंबईत बस्तान बसलेलं, सई सुद्धा झाली होती. पण त्यांनी ऋषिकेश मध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि आज इकडे ते दोघे, त्यांच्या दोन्ही मुली आणि दोघांच्याही आया असे एकत्र आनंदात रहात आहेत! दोघांचंही करियर उत्तम सुरू आहे, दोघेही आपल्या परिवाराला घट्ट धरुन आहेत आणि दोन गोंडस मुलींचे सुजाण पालक आहेत! किती गोष्टींचा आदर्श घेण्यासारखा आहे!
लोकांना मुंबई सोडवत नाही, बाहेरून लोक मुंबईत येण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात..पण हे असं सगळं सेट असताना असा निर्णय घेणं नक्कीच अवघड गेलं असेल, पण त्याचे चांगले परिणाम आज दिसत आहेत!

तर आम्ही वर गेलो, महेश दादा मस्त गच्चीत बार्बेक्यू लावत होता. आमच्या गप्पा सुरु होत्या, मी जवळजवळ १२-१३ वर्षांनी तिला भेटत होते! लहानपणी यांची कॉलेजची पिकनिक जायची तेव्हा आम्ही आईबरोबर जायचो, आणि या सगळ्या मुली आम्ही त्यांच्या मॅडमच्या मुली म्हणून त्यांना काय अप्रूप वाटायचं, आमचे खूप लाड करायच्या! खूप गप्पा झाल्या, तोपर्यंत सईने बाबाकडे मोर्चा वळवलेला आणि त्याला हवी ती मदत अगदी तत्परतेने करत होती!
मग आम्ही सुद्धा मोर्चा गच्चीकडे वळवला!
कडकडीत थंडी, वर मोकळं आकाश आणि सुंदर चंद्र अशा गच्चीत बसून आयत्या गरमा गरम बार्बेक्यू वर ताव मारणाऱ्या अमच्यासारख्या सुखी आम्हीच असं आजही वाटतं! त्यानंतर जेवण झालं..पुन्हा गप्पा झाल्या आणि मग मात्र निघायची वेळ झाली!
मी गमतीत सईला म्हंटलं, की तुला घेऊन जातो आता आमच्याबरोबर मुंबईला तर ती पटकन म्हणाली मुंबईत नाही आवडत मला!! हा पहिला धक्का!
त्यावर तिची आजी तिला चिडवत म्हणाली अगं त्यांच्याकडे किती मोठा समुद्र आहे, त्यावर क्षणात सई उत्तरली, 
माझ्याकडे गंगा आहे!
आणि काय सांगू काय वाटलं..अंगावर काटा येणं वगैरे फारच लांब..पण खरतर मनच भरुन आलं!
एवढीशी सई, आता तिला काय गंगेची महती किंवा तिचं धार्मिक महत्व थोडीच माहीत असणारे? पण तरीही तिची नाळ घट्ट जोडली गेली आहे तिच्या गंगेशी! 
ही निरागसता असते मुलांची, त्यांनाच खरं चांगलं वाईट पटकन कळत असतं!
मग महेश दादा आणि सई आम्हाला zostel पर्यंत सोडायला आलेले, आम्ही पोहोचलो, ते निघून गेले तरीही बार्बेक्युची चव आणि सईची गंगेची ओढ दोन्ही मनात रेंगाळत होती!
मग पुन्हा corona "पाळायचे" सोपस्कार केले आणि वरती कॉमन रूम मध्ये लॅपटॉप घेऊन रवाना झालो!
थोडं काम, त्याबरोबर आवडतं हॉट चॉकलेट आणि काही नवीन ओळखी, मग गप्पा! 
झोस्टेलचा हा एक फायदा असतो, खूप वेगवेगळे लोक भेटतात..सगळ्यांची आयुष्य भिन्न, त्याच्या स्टोऱ्या भिन्न पण फक्त फिरायची आवड सारखी!!

तर असा आमचा पहिला दिवस सार्थकी लागला!

खरंतर नेहेमी फिरतो तेव्हा जितकं जास्ती ते शहर बघता येईल तेवढं बघायचं असं डोक्यात असतं.. पण या वेळी सगळी परिस्थिती आणि ८-९ महिने झालेली कोंडी बघून फक्त आराम करायला आणि मनभरुन निसर्ग बघायला आणि शरीरभर स्वच्छ हवा भरुन घ्यायला म्हणूनच आम्ही आलेलो.
आणि तसंच झालं. संध्याकाळच्या गंगा आरती नंतर असं वाटत होतं दुसरं काssही करु नये, फक्त दिवसभर घाटावर जाऊन शांततेत बसावं. काय त्या गंगेत जादु आहे देव जाणे!
आम्ही तिथेच ठरवून टाकलं होतं की कुठेही लांब काही बघायला जायचं नाही, जितकं गंगेच्या आसपास फिरता येईल तितकं फिरायचं! त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ऋषिकेश प्रदक्षिणेचा बेत मनात नक्की करूनच झोपलो!

ऋषीकेशचे दोन मुख्य केंद्रबिंदू आहेत, बहुतेक सगळ्यांना ते ऐकून माहीत असतीलच ते म्हणजे "राम झुला" आणि "लक्ष्मण झुला".
तर अशी आख्यायिका मानली जाते की आज ज्या जागेवर लक्ष्मण झुला आहे, तिथून खुद्द लक्ष्मणाने दोन दोऱ्यांच्या साहाय्याने गंगा पार केली होती. पुढे त्याच जागी या आठवणीच्या स्मरणार्थ १८८९ मध्ये तागाचा पूल बांधला होता. पण १९२४ ला आलेल्या पुरात तो नष्ट झाला.
आणि त्यानंतर १९२९ साली या लक्ष्मण झुल्याच्या बांधकामाला सुरवात झाली. लोखंडी असलेला suspended पूल! जमिनीतुन कुठलाही आधार नसल्याने जसा झोपाळा हलतो, तसाच हा झुला थोडासा हलतो, म्हणून पूल न म्हणता त्याला झुला म्हंटलं जातं!
खाली वाहणाऱ्या गंगेपासून साधारण ७० फूट उंचीवर आणि ४५० फूट लांबीचा हा भव्य लक्ष्मण झुला अतिशय देखणा आहे!
सुरवातीला हा एकच झुला बांधण्यात आलेला.. त्यानंतर १९८६ मध्ये लक्ष्मण झुल्याहून साधारण २-३ किलोमीटर लांब आणखी एक भव्य झुला बांधण्यात आला, जवळपास ७५० फूट लांबीचा आणि सहा फूट रुंदीचा, ज्याचं नामकरण झालं राम झुला! हा राम झुला छान तिरंगी रंगात सजलेला आहे!

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झुल्यांवरून जायला कुठलाही कर/तिकीट आकारलं जात नाही.
जर तुम्हाला हे झुले आहेत तसे बघायचे असतील तर लवकरात लवकर ऋषीकेशला जाऊन या, कारण येणाऱ्या काही काळात लक्ष्मण झुला बंद होण्याची किंवा त्याचं नूतनीकरण होण्याची शक्यता आहे. :(

तर!

सकाळी उठलो, आवरलं आणि पायीच निघालो!
आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे आमचं रहायचं ठिकाण घाटात होतं.. लाल खूण दिसते ते आमचं रहायचं ठिकाण!
तर तिथे घाटाने वळून खाली गेलं की तो रस्ता राम झुल्याकडे जायचा, आणि न वळता सरळ सरळ गेलं की तो रस्ता लक्ष्मण झुल्याकडे जायचा!  आम्ही त्या सरळ रस्त्याने चालू लागलो..तिथून सुरू करून मग लक्ष्मण झुला करुन पलीकडे जायचं ते पूर्ण अंतर पार करुन राम झुल्यावरून अलीकडे यायचं की मग प्रदक्षिणा होऊन मुक्कामी! असा बेत होता!

चालू लागलो..वातावरण खूप सुंदर होतं. आज थोडं थंडीला सरावलो होतो, त्यामुळे थंडीचे कपडे न चढवताच बाहेर पडलेलो!
पण खबरदारी म्हणून बॅगेत अशी सगळी सामग्री घेऊन निघालो होतो!
आसपासची दुकानं न्याहाळत आणि राफ्टिंगचा बोर्ड दिसेल तिथे चौकशी करत पुढे जात होतो. काही ठिकाणी छोटी मोठी खरेदी सुद्धा झाली!
इथे एका शॉर्टकट रस्त्यात खाली सुंदर छोटी छोटी दुकानं आहेत. अगदी नीटनेटकी लावलेली. आपल्याला काही घ्यायचं नसेल तरीही आत जाऊन सगळं बघण्याचा मोह काही आवरत नाही! तर अशी दुकानं बघत बघत पुढे जात होतो आणि एक वळण आलं. सरळ रस्त्याला धरुन गेलो असतो तर लक्ष्मण झुला लागला असता, पण विरुद्ध दिशेला एक चिंचोळा रस्ता खाली जात होता!
माझं नाक वाकडं असल्याने, मला अगदी नाकासमोर सरssळ जायची सवयच आहे!
लगेच त्या दिशेला वळलो..आणि..

क्रमशः

Comments

  1. thank you. khup chaan lihilayas, tumhi bhet dilit kharach khup bhari vatala, ani Pallavichya maherachi manasa bhetalyacha aanand hota to.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!