ऋषिकेश-मसुरी - भाग १

पाच सहा वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं, की दर वर्षी महाराष्ट्राच्या बाहेर एका राज्यात जाऊन फिरुन यायचं..
त्याप्रमाणे या वर्षी म्हणजे २०२०च्या मे महिन्यात Unplanned हिमाचल ट्रिप करायचा प्लॅन होता. आणि तो अर्थात हिमालयाच्या बर्फात विलीन झाला!
मग साधारण सप्टेंबरच्या आसपास डोक्यात पुन्हा चक्र सुरू झालं की कुठे जाऊ शकतो..
कोकणात परवानगी नव्हती, गोकर्ण कडे मन झुकत होतं पण ट्रेन बंद होत्या, उत्तरेकडे मन झुकत तर होतं पण खिसा नको म्हणत होता!
पण अखेर नोव्हेंम्बर मध्ये ऋषिकेश आणि मसुरीला जायचं नक्की केलं!
नेहेमीप्रमाणे माझी मैत्रीण आणि मी..
मनाचा हिय्या करुन मुंबई देहरादून फ्लाईट बुक केलं आणि येताना मसुरी-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई असा ट्रेन प्रवास नक्की केला..तेव्हा कुठे माहीत होतं ते फार महागात पडणार आहे! असो!
तर २३ तारखेला पहाटेच्या फ्लाईट ने देहरादूनला जायचं, त्यामुळे आम्ही मध्यरात्रीच एअरपोर्टला पोहोचलो..
अनेक लोकांनी घाबरवलं होतं की एअरपोर्टला खूप गर्दी असते ४ तास आधीच जा वगैरे पण खरंतर तशी खूप गर्दी नव्हती..सगळं वेळेत आटोपून आम्ही गेटजवळ जाऊन बसलो..फक्त बोर्डिंग खूप लवकर झालं आणि उतरताना सुद्धा बराच वेळ फ्लाईट मध्येच बसवून ठेवलं होतं, आणि त्यात ती face shield पूर्ण वेळ घालून बसल्याने डोकं धरलं होतं..त्याचा मात्र थोडा कंटाळा आला..पण ठीक हैं!
बाकी फ्लाईट दरम्यान मोहक सुर्योदयाचं दर्शन झालं..
आणि नंतर पिंजलेल्या कापसाच्या थरातून खाली येत
 आम्ही थेट देवभूमी उत्तराखंड मध्ये उतरलो!
बाहेर पडताच अंगावर सर्रर्रकन काटा आला कारण वातावरण एकदम थंड आणि त्यात वारा, त्यामुळे सगळ्यात आधी बाहेर ठेवलेलं जॅकेट चढवलं आणि बॅग्स घेऊन आम्ही एअरपोर्ट बाहेर आलो.
देहरादूनचं विमानतळ अतिशय छोटं आहे, त्यामुळे तिथे विशेष सुविधा उपलब्ध नाहीत. 
बाहेर आलो तर प्रीपेड टॅक्सी, ओला, उबर इत्यादी महागडे पर्याय होतेच..
पण अर्थात आमच्या ट्रिप्सचा हा महत्वाचा भाग असतो की जिथे अनावश्यक आहे तिथे खर्च टाळणे.
त्यामुळे आधी गूगल बाबाच्या सहाय्याने research केल्यामुळे मला हे माहीत होतं की साधारण एक दीड किलोमीटर बाहेर चालत गेलं की मेन रोडवरुन रिक्षा मिळतात. त्यामुळे आम्ही आधी तिथल्या सगळ्या पर्यायांचे भाव विचारले, व ते अवाजवी असल्याने आम्ही सामानासकट बाहेर चालायला लागलो.
 थंडी प्रचंड जाणवत होती त्यात रात्रीपासून निघालेलो आणि विशेष खाल्लं नसल्याने थंडी जास्तच जाणवत होती. सुदैवाने साधारण अर्धा किलोमीटर चालून गेल्यावरच तिथे काही टॅक्सिचालक उभे होते. त्यांनी आम्हाला लगेचच विचारलं व जवळजवळ प्रीपेड टॉक्सिच्या अर्ध्या भावात आम्हाला न्यायला तयार झाले. रिक्षातून गेलो तर एकतर रिक्षा मिळायला लागणारा वेळ आणि त्यात पुन्हा प्रचंड वारा सोसत जाणं आलंच, त्यामुळे तिथे आणखी काटकसर न करता आम्ही टॅक्सी केली आणि सरळ ऋषिकेशकडे रवाना झालो.

ओला-उबर स्वस्तात मिळाली तरी ड्रायव्हर चांगला असेलच असं नाही. पण टॅक्सी करताना, नजर अनुभवी असेल तर माणूस हेरुन घेता येतो. त्याप्रमाणे आमचा टॅक्सीचालक अगदी चांगला निघाला! पुढे सुद्धा त्याने आम्हाला मदत केली, ते तुम्ही पुढे वाचालच!
तर टॅक्सीत बसल्यापासून नेहेमीच्या सवयीने लागणारी सगळी माहिती म्हणजेच अगदी हवामानाच्या अंदाजापासून  खाद्यवैशिष्ठ्यापर्यंत सगळं त्याला विचारुन घेतलं. आणि साधारण अर्ध्या-पाऊण तासात आम्ही आमच्या निर्धारित स्थळी म्हणजे Zostel Rishikesh 2.0 येथे पोहोचलो!
ह्याची सुद्धा एक गंमत आहेच. Rishikesh मध्ये जे मूळ zostel होतं ते दुरुस्तीखाली असल्याने तिथे बुकिंग करता येत नव्हतं. त्यामुळे नाईलाजाने आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी रूम रिझर्व्ह करुन ठेवली होती. (नुसतं रिझर्व्ह करणं म्हणजे पैसे तिथे पोहोचल्यावर देणं, आणि बऱ्याचदा त्याला फ्री कॅन्सलेशन सुद्धा असतं.) तर अशी रूम रिझर्व्ह केलेली.
आणि आम्ही निघायच्या २-३ दिवस आधी ऋषिकेश मधल्या या दुसऱ्या zostelचं अनावरण झाल्याचं कळलं!
मग काय! त्वरित तिकडचं कॅन्सल करून इकडे बुकिंग करून टाकलं!
त्यात आणखी एक मेख अशी की, या zostel franchisee ने lockdown दरम्यान काही ऑफर दिल्या होत्या. त्यातली एक ऑफर अशी होती की काही दिवसांचं बुकिंग आधीच विकत घ्यायचं..म्हणजे समजा आपण 5 रात्री घेतल्या तर आयुष्यभरात तुम्ही केव्हाही एखाद्या zostel मध्ये जाऊ इच्छित असाल तर तिथे तसं कळवून हव्या तीतक्या दिवसांचं बुकिंग redeem करु शकता. तेव्हा मला 3700 रुपयांना १० दिवस अशी स्कीम मिळाली होती त्याचा एकदम फायदा झाला! (आत्ता सुद्धा ही स्कीम चालू आहे, पण आत्ताचा भाव ५५०० ला १० रात्री असा आहे!)
तर…आम्ही पोहोचलो, सगळ्या formalities पूर्ण केल्या व डॉर्म मध्ये गेलो. अंघोळी केल्या, घरी फोन केले आणि परंपरा म्हणून घरून आणलेले ठेपले, लाडू, चिवडा असा नाश्ता केला!
शक्यतो पहिल्या दिवशीचा नाश्ता घरचा करावा, प्रवासाचा थकवा असतो, वणवण फिरुन खात्री नसलेलं काहीतरी खाण्यापेक्षा घरचं चविष्ट, पौष्टिक बसल्या जागी खावं, सुरवात उत्तम होते!
पूर्ण सुट्टी नव्हती, work from home होतं त्यामुळे थोडंसं काम केलं मग चार माजल्यांचं zostel पूर्ण बघून आलो. 
आणि तिथल्याच कॅफे मध्ये जेवलो. जेवल्यावर एक छान गुर्गटून एक झोप काढली! व दुपारी बाहेर पडलो..

त्या दिवशी रात्री आम्हाला माझ्या आईच्या विद्यार्थिनीकडे जेवायला जायचं होतं. त्यामुळे तिच्या रहाण्याचे ठिकाण मॅप वर बघून त्या दिशेला वाटेत बघण्यासारखं काय आहे हे बघून आम्ही पायी निघालो. आम्ही रहात होतो ते ठिकाण तिथल्या छोट्याश्या घाटात असल्याने चालताना दक्षतेने चालावं लागत होतं. एक वळण गेल्यावर उताराच्या रस्त्यावर आम्ही चालत होतो आणि डावीकडे झाडांच्या मधून अगदी बारीक pure sea green रंग दिसला
 तशी पावलांची गती वाढली आणि थोडंच पुढे गेल्यावर डाविकडे खाली गंगा मातेचं दर्शन झालं..इतका आनंद अनेक अनेक दिवसांनी मला होतं होता! तो रस्ता होता राम झुल्याकडे जाणारा.. थोडं पुढे गेल्यावर समोर राम झुला दिसतच होता. तिथे रस्त्यात दोन शॉर्टकट लागतात झुल्याकडे जाणारे. बऱ्याच पायऱ्या असलेले चिंचोळे रस्ते आणि त्यावर खूप माकडं!
झुल्यावरून पलीकडे जाण्याइतका वेळ नसल्याने आम्ही सरळ चालत राहिलो आणि पुढे रस्त्यालगतच घाटावर जायचा मार्ग सापडला. घाटावर खाली गेलो..तोपर्यंत सूर्यास्त होऊन गेला होता. हळूहळू प्रकाश मावळत होता आणि आम्ही गंगेचं सौंदर्य बघत होतो!
साधारण ८-९ महिने पूर्णतः चार भिंतीत, सिमेंटच्या जंगलात कोंडमारा झाल्यानंतर साक्षात गंगेसमोर जाऊन उभं रहाणं म्हणजे रणरणत्या उन्हात वळीवाच्या पावसाने मिळणारं समाधानच जणू! त्याहीपेक्षा कितीतरी अद्भुत आणि विलक्षण!
तसं बघायला गेलं तर काय विशेष..? वाहतं स्वच्छ पाणीच ते..
पण गंगा एवढा उच्चार झाला तरी काय पवित्र वाटतं! किंबहुना उलटपक्षी तिथे जाऊन बघितलं की लगेच कळतंच ही गंगामय्याच असणार!
तर आम्ही तिथे बसलो..तो शत्रुघ्न घाट होता..आणि तिथे गंगा आरती सुरु झाली! 
इतकी सुंदर आरती झाली की मन अगदी पहिल्याच दिवशी भरुन पावलं! तीन युवक पुजारी हातात ते प्रचंड आरतीचे दिवे घेऊन विशिष्ट पद्धतीने पण अगदी सुसूत्र असं ते नाचवत होते! ती आरती झाली आणि आम्ही मार्गस्थ झालो..कारण पुढे अर्धा तास प्रवास करुन नवीन जागी जायचं होतं!
तिथे जवळच टॅक्सी स्टँड आहे, त्याच्या बाहेर गेलो तर एक माणूस हरिद्वारला सवारी घेऊन जात होता..आमचं ठिकाण त्याच मार्गावर असल्याने आधी नाही नाही म्हणत शेवटी तो आम्हाला न्यायला तयार झाला! तिथे त्या share गाडी/रिक्षा/जीपला 'विक्रम' असं म्हणतात! ह्या गाडीची गंमत आहे..जशी शहराबरोबर बोली भाषा बदलते तसंच हिचं नावही बदलतं!
कधी जीप, कधी टमटम, कधी विक्रम तर कधी थेट डुक्कर सुद्धा म्हणतात!
तर अशा विक्रम मध्ये बसून ऋषिकेश दर्शन करत आम्ही त्या ताईकडे पोहोचलो..
क्रमशः 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!