ऋषिकेश-मसुरी - भाग ३!
खाली सुंदर बिच होता की!
म्हणजे अगदी पूर्ण वाळू नाही, वाळू आणि त्यावर खूप छोटे छोटे दगड…
अलीकडे मोठाले दगड, शिळा म्हणता येतील एवढे मोठे!
नेहेमीप्रमाणे बीच कडे न जाता त्यातलाच एक छान सपाटी असलेला उंच दगड शोधून त्यावर चढून जाऊन पसरलो!
खाली दिलेल्या फोटोचं वर्णन कुठल्याच शब्दात होऊ शकत नाही!!
कित्ती वेळ आम्ही इथे नुसत्या बसुन होतो! आधी किती वेळ शांत बसलो, मग गप्पा मारल्या, खाली दिसणाऱ्या लोकांचं निरीक्षण केलं तोपर्यंत सकाळी राफ्टिंगला गेलेले लोक परत येत होते. त्यामुळे त्यांना बघत होतो. काहि लोक उत्साहात आम्हाला हात करत होते, काही जोरजोरात गंगामय्याचा जयघोष करत होते! आणि आम्ही त्यांना बघून उद्याच्या या अनुभवासाठी मनाची तयारी करत होतो!!
मग काही वेळाने आम्ही तिथून उतरलो, खाली गेलो, तिथे थोडा वेळ फिरलो..तिथे वाळू आणि त्यात हे सुंदर दगड असे कितीतरी अंतरावर पसरलेले आहेत! मग थोडे फोटो काढून आम्ही लक्ष्मण झुल्याकडे जायला निघालो!
झुल्याच्या तोंडाशीच एक गोटी सोडाची गाडी होती! मनातला कोरोनाला पटकन त्यातल्या पहिल्या बाटलीत (फोटोत बघा दिसतो का ;) ) बंद करुन टाकला (त्या धडाकेबाज पिक्चर मध्ये लक्षा उर्फ गंगाराम नसतो का बाटलीत बंद? अगदी तस्साच!) त्यामुळे पहिली बाटली सोडून आमचा फोकस एकदम क्लियर झाला तो असा!!
आणि मग आम्ही त्याला दोन गोटी सोड्याची ऑर्डर दिली!
काय कमाल चव होती! आहाहा!
मग ते पवित्र जल प्राशन करुन आम्ही लक्ष्मण झुल्यावरून चालत चालत दुसऱ्या बाजूला पोहोचलो! झुल्यावर भरपूर माकडं असतात त्यामुळे फोन वगैरे फारच सांभाळून धरायला लागतं! त्यातलंच हे एक गोंडस माकड!
आणखी एक गंमत अशी की या दोन्ही झुल्यांचे पूर्ण फोटो काढणं हे फक्त अतिशय कसब असलेल्या माणसाचं काम आहे..ते सुद्धा ड्रोन सारखी आधुनिक सामग्री हाताशी असेल तर, नाहीतर खूपच शोधलं तर एखादा स्पॉट मिळू शकेल!
आम्ही आपलं ते मनमोहक दृश्य आणि माकडं बघत बघत पलीकडे आलो!
पलिकडल्या बाजूला पोहोचलो तर आणखी भरपूर गाड्या (अर्थात खदाडीच्या) आमची वाट बघत होत्या! मग कोरोनाला म्हंटलं बस बाटलीतच आणि मस्त आलू चाटची ऑर्डर दिली! हा एक वेगळाच प्रकार होता! गोड चटणीत केळ्याचे तुकडे टाकलेले पहिल्यांदाच बघितले! आणि विशेष म्हणजे पानांचे केलेले द्रोणतर फारच सुंदर!
ते खाऊन झाल्यावर न राहवून दोघीत एक गोटी सोडा घेतला आणि पुढे निघालो!
खूप छान छान छोटी-मोठी दुकानं आणि भरपूर आश्रम या बाजूला दिसत होते. इथे अनेक टिबेटी लोकांचं वास्तव्य असल्याने त्यांची अनेक दुकानं दिसतात. "हेम्प" च्या बॅग, चांदीचे आणि इतर अनेक प्रकारचे कानातले, पाऱ्याचं, स्फटिकाचं, दगडाचं शिवलिंग, विविध प्रकारची वाद्य, पाष्मीना शॉल/स्टोल आणि भरपूर प्रकारचे कपडे असं खूप काही ऋषीकेशमध्ये प्रत्येक गल्लीत बघायला मिळतं..
कपडे मिळण्याचं विशेष कारण म्हणजे इथे खूप फॉरेनर लोक येत असतात, व आपण जसे सहलीला जाताना भारंभार नवीन कपडे घेऊन जातो तसं न करता ते इथे येऊनच कपडे घेतात, आणि आपल्यासारखे रहातात! सध्या कोरोना असूनही आम्हाला बरेच टुरिस्ट दिसले!
याशिवाय ऋषीकेशमध्ये योग करायला येणार एक मोठा वर्ग आहे. योगा मॅट, तसे tshirts हे सुद्धा अनेक ठिकाणी मिळतं!
त्याच बरोबर अनेक प्रकारच्या सिगरेट प्रत्येक दुकानात दिसून येतात..आपल्याला त्यातलं काही कळत नसल्याने वर्णन करणं अवघड आहे! असो!
दुकानही तितकंच छान होतं आणि ही बाहुली आणि तिचे आईबाबा सुद्धा! आम्ही हात केला तर आम्हाला चक्क सलाम केलं तिने! मग आम्ही तिच्या आईकडून एक दोन वस्तू घेतल्या.. मला दोन अंगठ्या खूप आवडलेल्या, पण नेमकी कुठली घ्यावी ठरवता येत नव्हतं, म्हणून मग त्यांनाच विचारलं! तर त्यांनी एका अंगठिकडे बोट दाखवत इतक्या प्रेमाने म्हंटल "ये बोहोssत शुंदर दिखेगा" की मी लगेच ती घेऊन टाकली! त्यांच्या त्या विशिष्ठ उच्चारातला "शुंदर" प्रत्येक वेळी ती अंगठी घातल्यावर माझ्या कानात वाजतो!
मग त्यांचा निरोप घेऊन पुढे गेलो तर एक खास संगीत वाद्यांचं दुकान दिसलं ROCK INDIA MUSIC STORE नावाचं दुकान दिसलं आणि साधारण पुढचा अर्धा तास तिथे विविध वाद्य न्याहाळण्यात गेला! त्याला लागूनच पुढे आणखी काही अशीच दुकानं होती!
इथे विशेषतः बुद्धिस्ट chanting साठी वापरले जाणारे bowls खूप दिसून येतात!
पण मला विशेष आकर्षित केलं ते HAPI ड्रम या वाद्याने! पण ते फक्त मनाला, खिशाला काही आकर्षित करता आलं नाही त्याला आजच्या दिवशी! प्रगती हळूहळू होते, ती पुढे वाचालच!
तर त्या दुकानातूनही बाहेर पडलो, पुढे खूप दुकानं बघितली आणि एक मोमोची गाडी दिसली! कोरोनाला त्या बाटलीतच सोडून आल्याने मस्त एक प्लेट मोमो हाणले! आणि ते इतके कमाल होते की पुढे बहुतेक रोजच त्याच्याकडे एक प्लेट मोमो खाल्ल्याचं आठवतंय मला!
पुढे आणखी थोडं भटकून Pumpernickel German Bakery मध्ये शिरलो!
एक मस्त चॉकलेट croissant खाल्ला! इथे बाल्कनी मध्ये बसून इतका सुंदर view दिसतो! तिथे बसल्यबसल्या माझ्या मैत्रिणीने केलेली ही सुंदर calligraphy!
अशीच भरपूर कलाकुसर आणी हे सुंदर अक्षर बघण्यासाठी तिच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम हँडलला जरुर भेट द्या!!
https://www.facebook.com/The-WRITE-brains-269368226924693/
https://instagram.com/thewritebrains?igshid=dlpmf39thjsl
हा…तर मग आम्ही एक सँडविच खाल्लं, थोडा वेळ छान तो view बघत बसलो, फोटो काढले आणि पुढे निघालो!
आता थंडी जाणवू लागली होती त्यामुळे जॅकेट वगैरे घातलं आणि चालायला लागलो!
पुढे गेलो तर तसा बऱ्यापैकी ओसाड रस्ता लागला..तिथे दोन पर्याय लागले, एक म्हणजे मुख्य रस्ता वाहनांसाठी होता तो आणि दुसरा म्हणजे मस्त टाईल्स वगैरे लावलेला रस्ता! मॅप वर बघितलं तर टाईल्स असलेला रस्ता गंगेच्या कडेकडेने जाणारा होता! मग काय, आम्ही त्या टाईल्सच्या रस्त्याने चालायला लागलो.. छान शांत लांबलचक रस्ता आहे! बऱ्यापैकी पुढे गेलं की बसायला बाकडे ठेवलेले आहेत, तिथेच मागे थोडी वस्ती आणि प्रवासीयांना उतरायची ठिकाणं आहेत! तिथे पोहोचेपर्यंत सूर्यास्त होत आलेला..आणि एका झाडाआड बारीक तांबूस रंग दिसला आणि त्याचा माग घेत आम्ही पार खाली घाटापर्यंत धावत गेलो..राम झुल्याच्या पलीकडे होणारा सुंदर सूर्यास्त बघितला आणि पुढे गंगा आरतीसाठी परमार्थ निकेतन आश्रमाच्या प्रांगणात गेलो!
तिथे समोर गंगेत ही सुंदर शंकराची मूर्ती आहे,
छान आरती झाली..मग मी शर्वरीला म्हंटलं मी जरा खाली पायऱ्यांवर जाऊन उभी रहाते आणि मी तिकडे गेले. तो पायाला होणारा पाण्याचा स्पर्श अतिशय मोहक होता!
आरती झाल्यामुळे बरेच लोक गंगेत दिवे सोडत होते. का माहीत नाही पण क्षणभर एका दिव्याला बघून मला असं वाटलं की आपण पण एक दिवा सोडावा का?, पण लगेचच पर्यावरणवादी मनाने नको म्हंटलं, लगेच स्वतःच स्वतःला "पत्रं पुष्पम् फलं तोयं" आठवायचा उपदेश केला व मी स्वस्थ उभी राहिले. इतक्यात मागून एक बाई आली, हातात दिवा, मला वाटलं बाजूला होता का असं म्हणत्ये म्हणून मी जरा सरकले पण ती म्हणाली मी सॉक्स घातलेत, आणि वाकले तरी हात पाण्यापर्यंत जात नाहीये, तुम्ही एवढा दिवा सोडाल का पाण्यात?
ते कळायलाच मला काही क्षण गेले, मग मी तो दिवा आनंदाने तिच्याकडून घेतला आणि गंगामातेला अर्पण केला!
किती छोट्या गोष्टी असतात, म्हंटलं तर अगदी योगायोगच! पण आयुष्यभर लक्षात राहतात! कुणीतरी आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणतय ही भावना मात्र अशा अनुभवांनी दृढ होत जाते..
तर पुन्हा एकदा गंगा मातेला वंदन करुन मी पाठी फिरले आणि मग आम्ही मगाशी हेरलेल्या एका जागी जाऊन बसलो, ती जागा होती Honey Hut Cafe!
तिथे मधाचं महत्व सगळीकडे लिहिलेलं होतं, आणि मेनू मध्ये सुद्धा जास्तीत जास्ती पदार्थात मधाचा वापर केलेला..मेनू कार्ड सुद्धा सुंदर design केलेलं आपल्याला बघता येईल!
आम्ही एक मिल्कशेक मागवला.. खूप भारी वगैरे नव्हता तो, पण साखर टाळण्याचा पर्याय उत्तम होता म्हणून आवडला!
बरंच अंधारून आलेलं, थंडीही वाढत होती त्यामुळे आम्ही झोस्टेलवर परतायच्या वाटेवर चालू लागलो..राम झुला पार केला तर पलिकडे बरेच विक्रमी वीर अव्वाच्या सव्वा भाव सांगत उभे होतेच! आमच्या भावात ते न बसल्याने आम्ही त्यांना भाव न देता पुढे गेलो!
एका चिंचोळ्या गल्लीत एक गाडी होती, चाटची! पण त्यावर एक वेगळा पदार्थ दिसला, तो म्हणजे शकरकंद चाट!
साधं सोपं मस्त खाणं! तिथे एक गाय सारखी येत होती आणि तो माणूस तिला हुसकवत होता..मी त्याला सहज विचारलं म्हंटलं उन्हे दोगे क्या थोडा खाना, तर हो म्हणाला! मग त्याला पैसे दिले आणि त्या गाईला छान रताळी खाऊ घातली! मग आणखी वेळ न दवडता पुन्हा मुक्कामी आलो!
कारण दुसऱ्या दिवशीची तयारी करायची होती, कारण उद्या आम्ही करणार होतो white water rafting!!😍
क्रमशः
विशेष गंमत -
खरंतर दुसरा भाग लिहिला तेव्हाच हा भाग जवळजवळ पूर्ण झाला होता. पण मी वापरते त्या अँप्लिकेशन मध्ये काहीतरी घोळ झाला आणि अख्या फाईलची स्क्रिप्ट बदलली. बरेच प्रयत्न करूनही काही होईना, शेवटी आशा सोडून नवीन लिहायला घेतलेला, पण तेवढी मजा येईना.
शेवटी काल स्वप्नात मला दिसलं की मी तो जुना भाग उघडला तर तिथे वर recover असा ऑप्शन होता, तो केल्यावर पूर्ण भाग दिसला!!
सकाळी उठल्यावर गंमत म्हणून उघडून बघितलं, तर अर्थातच असा पर्याय नव्हता. पण म्हंटल आणखी एकदा प्रयत्न करु, म्हणून दुसऱ्या फोन मध्ये ती फाईल घेतली आणि खरंच खोटं वाटेल पण लगेच पूर्ण फाईल तशीच्या तशी दसली!!
त्या आनंदात आणखी थोडं लिखाण त्यात झालं व भाग बराच मोठा झाला. रटाळ झाला की काय असं वाटलं पण म्हंटलं तुम्ही तेवढ समजून घ्याल! :)
मस्तच. खूप मजा आली. वाचताना हृषिकेश मध्ये पोहोचता आले
ReplyDelete