Friday, 5 May 2017

जाने तू या जाने ना…(भाग ४)


जाने तू या जाने ना…?!

भाग ४

संध्याकाळी रिसेप्शन पार्टी सुरू होते...

अदितीने पोपटी आणि जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी नेसलेली असते..हलका मेकअप केलेला असतो..सुंदर दिसत असते..

जय काळ्या ब्लेझरमध्ये अगदी राजबिंडा दिसत असतो..

मुग्धा-अदितीच्या कॉलेजचे, शाळेचे सगळे मित्र-मैत्रिणी आलेले असतात..त्यातले बरेच जण अदितीभोवती उगाच घुटमळत आहेत असं जयला सारखं वाटत असतं..पण त्याला काहीच करता येत नसतं..
नवीन जोडप्यासाठी छान केक आणलेला असतो..
केक कापला जातो आणि काही गेम्स खेळले जातात..
दोघांच्या लहानपणीपासूनच्या आठवणी, कॉलेजचे किस्से रंगवले जातात  आणि शेवटी सगळे डान्सफ्लोरकडे वळतात..
वातावरण मस्त हलकं फुलकं आणि गुलाबी झालेलं असतं..
जय अदितीला शोधत असतो पण ती अचानक कुठे गायब होते त्याला कळतच नाही..
थोडं शोधल्यावर ती एका कोपऱ्यातल्या पाण्याच्या स्टॉलकडे दिसते..
तो झपझप पावलं टाकत तिथे पोहोचणार तोवर एक मुलगा तिच्यापाशी येतो..जयची गती एकदम मंदावते..
तो मुलगा तिला काहीतरी सांगत असतो..पण अदिती मानेने नकार देत असते असं जयला वाटतं..पण तो मुलगा काही जात नसतो..बोलतच असतो आणि अदिती चेहऱ्यावर स्मित ठेऊन त्याला नकार देत असते..जय पटकन पुढे होतो आणि अदितीला हाक मारतो..
ती सुद्धा सुटकेचा निश्वास टाकते आणि त्या मुलाला कटवते..
'Thank god!! नाही…thank you! देवासारखा धावून आलास..'
' अगं पण का इतकं ऐकून घेत होतीस त्याचं..? आणि होता कोण हा जोकर..?'
'एss जोकर काय म्हणतोस रे त्याला..!! माझा एकेकाळचा क्रश होता..oops! सांगू नको हा कोणाला..!!'
'ओह..मग you better carry on..मी जातो..'
'ओ मिस्टर सेंटिमेन्टल..होता म्हंटलं मी..लग्न झालं त्याचं मागच्यावर्षी..'
'तरी तुझ्यामागे…?'
'बघ ना..वाटलं नव्हतं असा असेल..! असो..तू कसा काय आलास इकडे…?'
'मी…अं…पाणी प्यायला…'
'चल चल..बंडल नको मारु!'
'काय..? बंडल नको मारु..? काय हि भाषा..'
'अरे कॉलेजचे दिवस आठवले एकदम..जाऊदे..सांग ना..'
'अगं तु कुठे दिसली नाहीस म्हणून बघायला आलो..'
'ओह..ओके..चल जाऊया….'
'अदिती..ऐक ना..'
'बोल ना..'
'May I have the pleasure beautiful lady..?'
इतकं म्हणून तो हात पुढे करतो…
'Oh my my! I would have loved to, पण मला डान्स वगैरे अजिबातच येत नाही..'
'मी आहे ना..!! Please..?'
ती त्याच्या हातात हात देते, आणि क्षणभर शहारते..
तिला सगळं स्वप्नवतच वाटत असतं!
दोघे डान्सफ्लोरवर येतात आणि सुरु होतो डान्स..
अगदी डोळ्यात डोळे घालून..पिक्चर मध्ये दाखवतात अगदी तस्सं..
'खूप सुंदर दिसतेस..अशीच रहात जा कायम…'
'हं…'
अदिती इतकी लाजत असते की तिला काही बोलताच येत नसतं..ती मान खाली वळवते..
जय अलगद तिची हनुवटी वर करतो..
दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात..
अदिती जयच्या डोळ्यातला ठामपणा बघत असते..
जय मात्र अदितीच्या डोळ्यांतले बदलते भाव बघत असतो..
आधी लाजणारी, मग फक्त हसणारी..
तो क्षण हेरुन जय व्यक्त होतो..
'I love you Aditi..'
मग हसू कमी कमी होत जातं..
आणि एका क्षणी अतिशय करुण भाव तिच्या डोळ्यात येतात..
ती एकदम स्वप्नाच्या कल्पनेतून बाहेर येते!
आणि जय काही विचारणार इतक्यात ती डोकं त्याच्या खांद्यावर ठेऊन रडू लागते…
तो तिला बाजूला घेऊन जातो..
तिला काही बोलवतच नसतं…तो तिला वेळ देतो..
शांत करतो..आणि मग विचारतो काय झालं..
'जय…जे नातं कधी निर्माणच होणार नाही..त्याचा पाया का रचतोय आपण…?'
'म्हणजे…? तुझं माझ्यावर प्रेम नाही..?'
'असं वाटतं तुला…?'
'कोड्यात बोलू नको..आपलं एकमेकांवर प्रेम आहे मग का नाही नातं निर्माण करु शकणार आपण…? का तुला लग्न नाही करायचं माझ्याशी..?'
'जय..तू अमेरिकेला जाणार आहेस ना…?'
'मी नाही..आपण..'
'हे आपण ठरवलं की तू…?'
'अगं..सगळ्यांनाच अब्रॉड जायची क्रेझ असते..आणि तुलाही आवडेल तिकडे..'
'प्रश्न माझ्या इच्छेचा आहे...माझ्या माणसांचा आहे..माझ्या प्रोफेशनचा आहे..'
'तू एकाच बाजूने विचार करते आहेस..'
'तुही तेच केलंस ना जय…? तुझी इच्छा कळल्यावर मी तुला अडकवलं तरी नाही…'
'मग तेव्हाच का नाही बोललीस अदिती…?'
'तू एकदाही माझं मत नाही विचारलंस..आणि तेव्हा मला नक्की माहित नव्हतं कि तुला काय वाटतं माझ्याबद्दल…'
'काय कटकट आहे यार..किती खुश होतो मी...'
'कटकट..? Okay..या पुढे तुला कटकट होणार नाही..सॉरी..'
इकडे मानस मुग्धाचा हात हातात घेत असताना अदिती जयचा हात सोडून निघून जाते, मागे न बघता…
जयच्या तोंडातून येणारी हाक आतल्या आतच विरुन जाते…
आणि नजर आपल्या रिकाम्या  राहिलेल्या हातावर स्थिरावते…

क्रमशः

- कांचन लेले

Thursday, 4 May 2017

जाने तू या जाने ना..(भाग ३)

जाने तू या जाने ना…?!

भाग ३

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच उशिरा उठतात..
अदिती सगळ्यात आधी उठून सगळी आवरा आवर करायला लागते..एक-एक जण तिला येउन मदत करत असतं..सगळं आवरलं जातं..जय छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करतो..अदितीचं बरंच कौतुक करतो, मुग्धा-मानस सगळ्यांचे आभार मानतात आणि सगळे आपापल्या घरी जायला निघतात..

दुसऱ्या दिवशीपासून सगळे आपापल्या रुटीनमध्ये व्यस्त होतात..
Whatsapp च्या ग्रुप मुळे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात..पण ते अगदीच जुजबी..जयला राहून राहून अदितीची आठवण येत असते..आणि इकडे अदितीला सुद्धा आधी माजोरडा वाटलेला जय, 'इतकाही वाईट नाही' असं वाटायला लागलेलं असतं..
पण दोघेही पुढाकार घ्यायला तयार नसतात..!
दोन-तीन दिवस जातात आणि शेवटी जय अदितीला फोन करतो..
पार्टीच्या हिशोबाचं कारण काढून भेटायचं ठरवतो..

ठरलेल्या दिवशी दोघे भेटतात..आज अदितीही ऑफिसहून डायरेक्ट आल्यामुळे अपटूडेट असते..तिला तसं बघून उगाच जयला चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं..आणि त्याचं त्यालाच हसू येतं..!
सुरवातीला हिशोबाचं बोललं जातं..सगळं क्लीयर झाल्यावर थोड्या गप्पा सुरु होतात..
एकमेकांची ओळख दोघेही करुन घेत असतात..
दोघे अगदी दोन टोकं असतात..
ही चहा वेडी तर तो ब्लॅक कॉफी..किंवा फारतर ग्रीन टी..!
ही मराठीची प्रोफेसर तर तो पक्का कॉर्पोरेट माणूस..
हिची पाणीपुरी तर त्याचं चायनीज..
ही मराठी प्रेमी आणि तो साहेबाच्या भाषेचा भक्त!
पण opposites attract म्हणतात तेच खरं!
शेवटी बराच वेळ गप्पा झाल्यावर दोघे निघतात, अनिच्छेनेच!
दोघांच्याही मनात खूप बोलायचं असतं, काही सांगायचं असतं..
पण ते मनातच राहून जातं..!
काही दिवस असेच जातात..मेसेजवर थोडंफार बोलणं होत असतं..मानस आणि मुग्धाचं लग्न अगदी आठवड्यावर आलेलं असतं..गिफ्ट घ्यायच्या निमित्ताने दोघे पुन्हा भेटतात..
जय आज एकदम खुश दिसत असतो..!
अदितीलाही त्याला बघून आनंद होत असतो..
बरंच फिरुन गिफ्ट घेतात आणि मग जय तिला म्हणतो
'डिनरला जाऊया…? आज माझ्याकडून पार्टी..!'
'किस ख़ुशी मे…?'
'सांगतो ना..चल तर…!'
'चलो..!'
दोघे एका रेस्तराँ मध्ये जातात..
'बोल..काय खाणार…?'
'तुझी पार्टी ना…? मग तू मागवशील ते..!'
'नक्की..?'
'हो..'
'ओके..'
जय चायनीज फूड ऑर्डर करतो..
खरंतर अदितीला विशेष आवडत नसतं..पण ती तसं अजिबात दाखवत नाही..
'सांग ना आता..पार्टी कशाबद्दल…?'
'मला प्रोमोशन मिळालं..! एका मोठ्या प्रोजेक्ट साठी हेड म्हणून आपॉइंट केलं आहे..आणि ते प्रोजेक्ट कुठे असेल सांग बरं..?'
'कुठे..?'
'Guess तर कर..'
'अं..दिल्ली किंवा बँगलोर…?'
'हाहाहा..किती गं साधी तू अदिती..It's in US…finally..!!'

अदितीला काही कळेनासं होतं..एकदम तिचा सगळा मूडच जातो..पण ती क्षणात सावरते स्वतःला..तरी जयला ते जाणवतंच..
'काय गं..? Aren't you happy..?'
'अरे तसं काही नाही.. Heartiest Congratulations!'
'Thanks a lot…तू बघ आता मी कसा झपाट्याने प्रोग्रेस करेन..किती वर्षं हे स्वप्न बघितलं होतं मी…आत्ता हे प्रोजेक्ट मग पुढचं आणि मग तिकडेच दुसरा जॉब..काही वर्षांनी ग्रीन कार्ड..लाइफ सेट है बॉस!'
इतक्यात वेटर ऑर्डर घेऊन येतो..
मग स्पेशल चायनीज आणि बरोबर अमेरिका पुराण ह्यातच सगळा वेळ जातो…
त्या दिवसानंतर अदिती स्वतःला मागे ओढते…भाळलेल्या मनाला आवर घालते..पण तिला ते खूपच अवघड जातं..
कारण जय मात्र तिच्यात गुंतत चाललेला असतो..
तिला कळतच नाही की त्याची नक्की इच्छा काय आहे..
प्रेम तर दोघांचंही असतं एकमेकांवर..पण मग तो एकदाही मला अमेरिकेला जाण्याबद्दलचं मत का विचारत नाही….? का त्याचं प्रेमच नाही..? मलाच उगाच असं वाटतंय का..? मीच खूप अडकत चालले आहे का..? एक ना दोन..असंख्य प्रश्न तिला हैराण करत असतात..
काहीच कळत नाही..दिवस पटपट जात असतात..नेहेमीसारखंच बोलणं होत असतं..लग्न अगदी दोन दिवसांवर आलेलं असतं..त्यामुळे अदितीला ऑफिस आणि मुग्धाकडची फ़ंक्शन अशी कसरत करायला लागत असते..त्या सगळ्या गडबडीत आणि आनंदाच्या वातावरणामुळे तिच्या डोक्यातले विचार काही काळ का होईना पण बाजूला सरकवले जातात..आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडतो..

सकाळी पारंपरिक पद्धतीने लग्न होतं..अदितीची इतकी धावपळ असते की तिला कोणाकडे बघायला उसंतच मिळत नाही..अदितीने आजचा दिवस पूर्ण मुग्धासाठी द्यायचा असं ठरवलेलंच असतं...त्यामुळे सकाळपासूनच तिचा हसरा चेहरा कार्याची शोभा वाढवत असतो..
तिच्या आनंदात विरघळून जाणारी अदिती, जयच्या मनातही विरघळत असते, अगदी साखरेसारखी..!
जयसुद्धा कामात असतो..पण तरी खूप खुश असतो..
त्याला आणि अदितीला बोलायला वेळ मिळाला नसला तरी तिच्या सतत नजरेसमोर असण्यानेच त्याला खूप आनंद होत असतो…
लग्न होतं, जेवणं होतात आणि सगळे मानसच्या घरी जातात..
गृहप्रवेश होतो..आणि सगळे पुन्हा रिसेप्शनच्या तयारीसाठी आपापल्या कामाला आणि तयारीला लागतात..!

क्रमशः

- कांचन लेले

Wednesday, 3 May 2017

जाने तू या जाने ना...(भाग २)

जाने तू या जाने ना…?!

भाग २

गाडी आत लागते आणि सगळे सामान काढत असतात..तेवढ्यात जय येऊन पोहोचतो..
अदितीच्या एका हातात तिचा रुमाल, मोबाईल, एक बॅग आणि दुसऱ्या हातात गॉगल आणि आणखी एक पिशवी..जय आलेला बघताच त्याला भेटायला म्हणून ती पुढे होते तेवढ्यात तिच्या पायात काहीतरी अडकतं आणि तिचा तोल जातो..तिची एक मैत्रीण तिला सांभाळते तोपर्यंत तिच्या हातातलं अर्धं सामान विखुरलेलं असतं..आणि समोर जय उभा असतो!
त्याला कळतच नसतं नक्की हसावं कि रडावं..
तो पटकन सामान उचलायला मदत करतो..आणि अदितीकडे बघतो..
एक साधा टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलेली..पायात चपला चढवलेली..केस बऱ्यापैकी अस्ताव्यस्त असलेली..
वेळेवर न येणारी..आणि झालेल्या प्रकारावरुन वेंधळी वाटणारी अदिती त्याच्यासमोर सॉरी म्हणत उभी असते..
तोही जुजबी बोलून सगळ्यांना घेऊन आत जातो...

सगळे फ्रेश होतात..एकमेकांची ओळख होते..चहा-कॉफी सेशन होतं..आणि मग सगळ्यांनी जवळच असलेल्या एका-दोन पॉईंटना जायचं असं ठरलेलं असतं..त्याप्रमाणे सगळे निघतात..
फक्त अदिती आणि तिच्या बरोबर एक मैत्रीण आणि एक मित्र  ऑफिसचं काही काम करण्याच्या कारणाने मागे थांबतात..
सगळे बाहेर पडल्या-पडल्या इकडे हे तिघे कामाला लागतात..
आणलेल्या सामानाच्या मदतीने त्या फार्महाऊसचं रूपच बदलून टाकतात..समोर असलेल्या गार्डन मध्ये रंगीत पडदे-फुगे आणि फोटो अशी सजावट करतात..त्यात असलेल्या लिइटिंगचा उत्तम वापर करतात..मध्ये एक सेन्टर टेबल ठेऊन त्यावर आणलेला सुंदर केक ठेवतात...त्याच्या मागे वधू-वराच्या फोटोंचं मोठं पोस्टर केलेलं असतं ते लावतात..तेवढ्यात कॅटरिंगची ऑर्डर येते..त्यांना एका बाजूला जागा करुन सूचना दिल्या जातात..ह्यांची तयारी जेमतेम होत आलेली असते इतक्यात फोन येतो की सगळे जवळपास पोहोचले आहेत..
तिघेही अवतारातच असतात..ते पटकन  तयार व्हायला आत रूम्स मध्ये जातात..अदिती फ्रेश होऊन येते न येते तोपर्यंत बाहेर गाड्यांचे आवाज येतात..तिला काहीच सुचत नाही..ती पटकन चेंज करुन त्यांना वेलकम करायला म्हणून बाहेर येते पण त्या आधीच सगळे आलेले असतात आणि गार्डन मध्ये अवाक होऊन बघत असतात..इतकी सुंदर सजावट झालेली असते..!
तेवढ्यात अदिती आलेली दिसते..मुग्धा तर तिला जाऊन मिठीच मारते..सगळे जण टाळ्या वाजवून कौतुक करतात..
जयलाही खूपच सुखद धक्का असतो..हे मागे थांबून पार्टी अरेंज करणार ह्याची कल्पना असूनही ती इतकी सुंदर असेल हे त्याच्या गावीही नसतं! त्याने सुरवातीलाच अदितीला सुचवलेलं असतं की टाऊन मध्ये एखादी जागा रेंटने घेऊ, जवळपास मस्त पब बघू पार्टी करु आणि रात्री घरी गेम्स वगरे करू..पण अदितीच्या हट्टाने ह्या वस्ती नसलेल्या निसर्गरम्य ठिकाणी यायचं ठरवलेलं असतं..
दमून आलेले सगळे पटकन चेंज करायला जातात..अदिती अजूनही शेवटचा हात फिरवत इकडे तिकडे फिरत असते..

इतक्यात जय तिला शोधत येतो..
'Hi..छान जमवलस सगळं..!'
'Thanks..तुझी खूप मदत झाली..!'
'Oh..that was nothing..'
'Still..thanks!'
'तुला एक सांगू का..?'
'सांग ना..'
'अं…म्हणजे..please don't mind…'
'अरे तसं काही नाही..जे काही असेल ते सांग..'
'तू…तुझं ड्रेसचं कॉम्बिनाशन जरा चुकलंय का अशी फॅशन आहे सध्या…?'
अदितीला हे एकदमच अनपेक्षित असतं..! ती एकदा स्वतःकडे बघते आणि एकदम ओशाळल्यासारखी होते..
तिने  कुर्ता आणि ओढणीवर चक्क ट्रॅक पॅन्ट घातलेली असते..!
ती हळूच जयकडे बघते…आणि दोघेही हसू लागतात..!
'मी आलेच चेंज करुन…'
'लवकर ये..!'
अदितीच्या नाहीशा होणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे जय बराच वेळ बघत रहातो…ती गेली तरी..!

मग तोही चेंज करायला जातो..थोड्यावेळाने सगळे येतात..
एव्हाना संध्याकाळ झालेली असते..आणि आता लायटिंग आपली जादू करायला सुरुवात करत असतं..
सगळ्यांना वेलकम ड्रिंक्स सर्व केले जातात..मग
मानस-मुग्धा केक कापतात...
अदितीने त्यांच्यासाठी एक मस्त स्क्रॅप बुक तयार केलेली असते..सगळ्या जवळच्या लोकांच्या शुभेच्छा, आठवणी आणि फोटो कैद केलेले असतात...मानस-मुग्धा ते बघून भारावून जातात..मग दोघांसाठी रॅपिड फायर राउंड्स ठेवलेल्या असतात..सगळे जण एन्जॉय करत असतात..आणि मग अदिती म्युझिक सुरू करायचा इशारा करते…सुंदर लाइट म्युझिक लावलं जातं आणि सगळे आणखीनच खुश होतात...पार्टी रंगात असते..एक बाजूला डिनरचं काउंटर सुरू केलं जातं..डान्स-गप्पा आणि जेवण ह्यांचा उत्तम संगम होतो…

सगळं सुरळीत झाल्याचं बघून अदितीला खूप आनंद होतो..
ती एका बाजूला खुर्ची घेऊन जरा निवांत बसते..
जय दुसऱ्या कोपऱ्यातून तिच्यावर नजर ठेवूनच असतो..
ती जरा निवांत झाल्याचं बघून तोही एक खुर्ची घेऊन तिच्या शेजारी बसतो..पण अदिती डोळे मिटून बसलेली असते..अगदी तंद्रीत..
तिला कळतही नाही तो केव्हा येतो ते..मग तो पटकन दोघांसाठी जेवण घेऊन येतो…तरी मॅडम तंद्रीतच..
ती मधेच डोळे उघडते तेव्हा जय दोन हातात दोन प्लेट्स घेऊन तिच्याकडे बघत बसलेला असतो..
तिला खूपच आश्चर्य वाटतं…ती काही बोलणार इतक्यात तो नजरेनेच तिला प्लेट घ्यायला सांगतो…
ती प्लेट घेते आणि त्याला थँक्स म्हणते..
तो नुसताच हसतो…
आणि इकडे पार्टी सुरुच असते…सगळे एन्जॉय करतात..रात्र जगवत असतात....
आणि तिकडे हे दोघेही शांतपणे न बोलता जेवत असले तरी मौनाचा संवाद काही औरच सांगत असतो...

क्रमशः

- कांचन लेले

Tuesday, 2 May 2017

जाने तू या जानेना.. (भाग १)

#जानेतूयाजानेना
भाग १
ही गोष्ट आहे जय आणि अदितीची..
जय-अदिती म्हंटल्यावर एकदम जाने तू या जाने ना आठवलं का..?
छे छे…नाव तसं असलं तरी हे दोघे वेगळे आहेत बरं..आणि खास मित्र वगैरे अजिबातच नाही..दोघांची साधी ओळखही नसते!
पण परिस्थिती दोघांना एकमेकांसमोर आणते…
कशी..? चला बघूया..!
तर ही गोष्ट आहे जय आणि अदितीची..
आता बघूया ह्यांची ओळख कशी झाली!
जयचा यार मानस आणि अदितीची मैत्रीण मुग्धा ह्यांचं लग्न ठरलेलं असतं..
मानस आणि मुग्धाच्या pre wedding पार्टी साठी दोघांच्या मित्रांनी लोणावळ्यात मिळून एक फार्म हाऊस बुक केलेलं असतं..
ती पार्टी ऑर्गनाइझ करण्यात मुख्य हात असतो तो मानसचा खास मित्र जय आणि मुग्धाची जवळची मैत्रीण अदिती यांचा..दोघेजण आपल्या व्यापातून वेळ काढून फोन, whatsapp, ई-मेल, फेसबुकच्या माध्यमातून सगळं ठरवत असतात..
अदितीकडे खूप सुंदर आयडिया असतात पण त्या पूर्ण करण्याचं कौशल्य मात्र नसतं..आणि जय आयडिया वगरे विचार करण्याच्या भानगडीत न पडणारा माणूस, किंबहुना त्याला तितका वेळच नसतो! पण हे-हे असं-असं करुन हवंय असं सांगितलं की ते चोख पार पडणारा..
सुरवातीला जयला वाटलं अदितीला काहीच कळत नाही तर कशाला या भानगडीत पडायचं आणि इकडे अदितीला वाटायचं की हा इतका निरस माणूस आहे तर याने का या भानगडीत पडावं..
पण दोघांच्या मित्रांसाठी करायचं अशा विचाराने दोघे प्रयत्न करत होते..शेवटी अदिती प्लॅन करते आणि जयला सांगते..जयला तो आवडतो आणि  तो पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो..!
अदिती काय आणि कसं हवंय ते वेळोवेळी सांगत असते आणि जय त्याप्रमाणे जुळवून आणत असतो…पण अद्यापही त्यांची भेट झालेलीच नसते..सगळं काय ते फोनवरच सुरु असतं..
आणि शेवटी तो दिवस उजडतो...
तीन गाड्या करुन सगळ्यांनी लोणावळ्याला पोहोचायचं ठरलेलं असतं..त्याप्रमाणे जय त्याच्या ग्रुप बरोबर एका गाडीत, अदिती तिच्या ग्रुप बरोबर एका गाडीत आणि मानस-मुग्धा आणि त्यांचे भाऊ-बहिणी एका गाडीत असे सगळे आपापल्या ठरलेल्या ठिकाणाहून लोणावळ्याकडे निघतात..
अदितीला तयारी आणि काही शेवटी राहिलेलं सामान घेऊन निघायला उशीर होतो..तिला धड तयारही होता येत नाही..ती तशीच कामाच्या गडबडीत निघते..
इकडे जयने बुकिंग केलेलं असल्याने तो सगळ्यात आधी निघालेला असतो आणि त्याप्रमाणे तोच आधी पोहोचतो..आणि जागेचा ताबा घेतो..त्यांच्या नंतर थोड्याच वेळात मानस-मुग्धा सुद्धा पोहोचतात..
पण अद्याप अदितीचा पत्ताच नसतो..!
जयची नुसती चिडचिड होत असते..कारण तो टीपीकल अप-टू-डेट असणारा..कडक इस्त्रीचे कपडे घालणारा..रे-बॅनचा गॉगल सतत डोळ्यांवर लावणारा..क्लीन शेव आणि वेल ग्रूम्ड हेअर..आणि कायम वेळेत पोहोचणारा असा उमदा टॉल-फेअर-हँडसम महत्वाकांक्षी कॉर्पोरेट मुलगा असतो..
शेवटी वैतागून तो अदितीला फोन करतो..तर तिला पत्ता सापडत नाही असं म्हणते..हे ऐकून जय आणखीनच वैतागतो..
कारण आदितीनेच हट्टाने निसर्गरम्य जागी फार्महाऊस हवं असं सांगितलेलं असतं..आणि तिचं ऐकून जयने ही जागा ठरवलेली असते..त्याचं लोकेशन पाठवलेलं असतं..तरी व्यर्थ!
शेवटी तो फोन दुसऱ्या कोणालातरी द्यायला सांगतो आणि तिच्या मित्राला पत्ता नीट सांगतो आणि तो स्वतः बाहेर मेन रोडला जाऊन उभा रहातो..
शेवटी एकदाचा पत्ता सापडून अदितीच्या ग्रुपची गाडी पोहोचते..
बाहेर जय दिसतो आणि खुणेनेच गाडी आत घ्यायला सांगतो आणि तो चालत जातो..
क्रमशः
- कांचन लेले

Saturday, 25 February 2017

आशा...


असाच एक रम्य दिवस सुरु झाला होता..
खरंतर दिवस उजाडायची वेळ होत आली होती..
ते जणू त्याची वाट बघतच पार्कात उभं होतं...
पण अजून तरी त्याची निराशाच झाली होती..
ऐन थंडीत रोज ढग कुठून येत होते हे कोडंच सुटत नव्हतं!
त्याने पुन्हा एकदा निराशेची नजर ढगांवर टाकली..आणि पुन्हा मान खाली घालुन उभं राहिलं..
आणि अचानक त्याला आठवली कालची सकाळ…

पार्कातल्या बेंचवर, अगदी त्याच्या बाजूच्याच, एक आज्जी-आजोबा येऊन बसले...आज्जी अगदी आजारी वाटत होत्या.. मूळची बारीक कुडी, सुरकुतलेला, निस्तेज चेहरा..आणि..आणि हरलेले डोळे…
आजोबा मात्र थोडे उंचेपुरे, देखणे..तोच सुरकुतलेला चेहरा, पण डोळ्यात एक आशा..एक उमेद, जगण्याची..
काही वेळ ते दोघे नुसते येऊन बसले…
कोणीच काही बोलेना..शेवटी आजोबांनी एक कटाक्ष आज्जींकडे टाकला..आणि त्यांचे पाणावलेले डोळे बघून तेही विरघळले..
त्यांनी हलकेच आज्जींच्या हातावर हात ठेवला…नजर मात्र अथांग पसरलेल्या आकाशाकडे लागली होती….
आणखी काही वेळ असाच गेला..मग…
'जगण्यासाठी काय लागतं गं….?'
आकाशाकडे लावलेली नजर न हटवत आजोबांनी प्रश्न केला..
'एक देह ज्याचा श्वास बंद होणं आपल्या हातात नाही....'
'चूक…लागते फक्त आशा..!'
'आशा…हं..बरोबर आहे..लहानपणी मोठं व्हायची आशा, थोडं मोठं झालं की स्वतंत्र होण्याची आशा, स्वतंत्र झालं की स्थिरावण्याची आशा..स्थिरावलं कि वंश वाढवण्याची आशा..मग मुलांना मोठं करण्याची आशा..त्यांना त्याच्या पायांवर उभं राहिलेलं पाहण्याची आशा..मग त्यांचा संसार बघण्याची आशा..मग नातवंडं बघण्याची आशा…कॉम्पुटर वर दिसली की प्रत्यक्ष बघण्याची आशा आणि ते होत नाही म्हणून होणारी घोर निराशा…'
एवढं बोलूनही धाप लागली आज्जींना..खूप दिवसांनी इतकं बोलल्या होत्या त्या..आजोबांना एका अर्थी बरं वाटलं..किमान त्या बोलून मोकळ्या तरी होत होत्या..
'बरोबर आहे ना माझं…?'
'हे सूर्यफूल बघितलंस…?'
'बदला विषय तुम्ही…'
'अहं..तसं अजिबात नाही हा..'
'मग कसं..?'
'सूर्यफुलाचा जीव कशात सांग..?'
'सुर्यात..'
'कुठंय सूर्य…?'
'हा काय….'
आणि आज्जींचं वाक्य अर्धवटच राहीलं..कारण आज ढगांनी सूर्याला पार झाकून टाकलं होतं..त्यांची नजर शेजारच्या सुर्यफुलांवरून फिरली..आणि मग तीच नजर आजोबांच्या नजरेला जाऊन भिडली..
अचानक मळभ दूर व्हावं आणि सूर्याचं तेज पसरावं तसे आज्जींचे डोळे चमकले…
पुन्हा डोळ्यांत एक आशा दिसू लागली..निस्तेज दिसत असणारा चेहरा अचानक प्रसन्न दिसू लागला…
आजोबा उठले आणि हलकेच हात पुढे केला..
आज्जींन्नी त्यांच्या हातात हात दिला..
आणि दोघे चालू लागले…

सूर्यफुलाची मान नकळत वर झाली..
कारण जादू झाल्यासारखेच ढग नाहीसे होत होते..
आणि
पुन्हा एक आशा घेऊन लकाकत होता,
एक नवा सूर्य,
एका नव्या दिवशी…

- कांचन लेले

Monday, 6 February 2017

मन शांsत निजावे…

मन शांsत निजावे…


'काय कटकट आहे साला..रोज तेच तेच..वेळ देत नाही..बाहेर जाऊया…वेळ देत नाही..बाहेर जाऊया..
काय टाईम पास करत फिरत असतो का..? कामच करतोय ना..?
कोणासाठी करतो..? घरासाठीच ना..?
जगणं मुश्किल करुन टाकलंय तुम्ही दोघींनी माझं..
बाहेर कटकट..दिवसभर वणवण आणि घरी आलं की ही कटकट..वैताग आला जगायचा..'
ऋषीचा सगळा राग एकदम घरात बाहेर पडला..
आणि त्याची आई आणि बायको ऋचा बघतच राहिल्या..
ऋचाने आईंना नजरेनेच खुणावलं..तशा आई पुढे झाल्या आणि ऋषीच्या डोक्यावरुन हात फिरवला..
'शांत हो रे…आमचं चुकलं..पण तुला जरा बदल मिळावा म्हणून म्हणत होतो चार दिवस बाहेर जाऊया..गेले काही दिवस आम्ही बघतोय तू खूप टेन्शन मध्ये असतोस..काही सांगत नाहीस..लवकर जातोस..उशिरा येतोस..तब्बेत पण खराब होत चालली आहे तुझी…पण राहिलं..पुन्हा नाही बोलणार…'
काही वेळ शांततेत गेला..
आणि ऋषी बोलू लागला..
'मी तुम्हा दोघींपासून काहीतरी लपवलंय इतके दिवस..पण आज सांगून टाकतो…माझी नोकरी गेली आहे..आज महिना होईल..
रोज प्रयत्न करतोय नवीन नोकरी शोधायचे..पण हाती फक्त निराशाच येते आहे…आणि त्यात तुम्ही सारखं चार दिवस बाहेर जाऊ-बाहेर जाऊ म्हणताय…म्हणजे परत खर्च…काय करु मी..?
थकलो प्रयत्न करुन करुन…ओळखीच्या सगळ्या लोकांकडे शब्द टाकला..पण सगळ्यांनी पाठ फिरवली..
या जगात नक्की आपलं कोण आणि परकं कोण…?
का सगळेच अप्पलपोटी, स्वार्थी असतात...कोणीच का मदतीला येत नाही अशावेळी..?
तुम्हाला त्रास नको म्हणून तुमच्यापासून लपवलं..या आशेवर कि आज ना उद्या दुसरा जॉब मिळेल आणि मग सांगेन..
पण नाहीच..अस्वस्थतेशी झगडतोय रोज..जरा शांतता नाही मनाला..
आता नाही सहन होत…'
इतकं बोलून त्याने चेहरा दोन्ही हातात झाकून घेतला..

इतक्यात छोटी काव्या शेजारुन आली आणि 
बाsबाss म्हणत त्याला बिलगली..
ऋषीनेही तिला घट्ट मिठीत घेतलं..
आई आणि त्याची बायको ऋचा एकमेकिंकडे बघत होत्या,
त्यांना मोठाच धक्का होता हा..पण एकमेकींना धीर देत होत्या...काव्यासमोर हा विषय नको असं खुणेने आईनी सांगितलं..ऋचाने होकारार्थी मान हलवली..
'बाबा तू रडतोयस…?'
काव्याने ऋषीचे डोळे पुसत विचारलं..
'नाही गं बाळा..'
'खोटं..बाबा खोटं बोलायचं नसतं ना..? Bad habit!
सांग ना का रडतोयस..?'
ऋषीने ऋचाकडे बघितलं..ऋचा समजली..लगेच म्हणाली..
'अगं काही नाही पिल्लू..बाबा थोडा sad आहे..तू एक poem म्हण बरं..म्हणजे बाबा एकदम हॅपी होईल..!'
'लगेच म्हणते..पण poem नाही..आजच काकू नवीन गाणं म्हणत होती..मी शिकव म्हंटलं..तर मला म्हणाली तुला नाही कळणार..पण मी हट्टच केला म्हणून दोन लाईन्स शिकवल्या तिने..म्हणते हा ऐक..

'ऐसे काही व्हावे..मन शांsत निजावे..
एकांताच्या वेळी, आकांत निमावे..

ऐसे काही व्हावे मन शांत निजावे…'

'कसं वाटलं बाबा..?'
'अ..? मस्त..एकदम छान..'
'मग हॅपी ना..?'
'येस!' ऋषी छान हसतो आणि तिला जवळ घेतो..
'काव्या..चल झोपायची वेळ झाली..उद्या शाळा आहे ना..'
'हो गं आज्जी..थोडा वेळ..'
'नको..बाबा दमून आलाय..चल..'
'ओके..गुड नाइट बाबा..'
'गुड नाइट बेटा..'
ऋषीची आई काव्याला घेऊन आतल्या खोलीत जात असते इतक्यात काव्या पुन्हा मागे येते आणि ऋषीला विचारते
'बाबा..पण या गाण्याचा अर्थ काय..?'
'उद्या सांगतो…'
'बरं..गुड नाइट..!'
इतकं बोलून ती खोलीत पळते..

ऋषी तसाच उठतो आणि शेजारी जातो..
'वहिनी…काव्याला आज कुठलं गाणं शिकवलंत तुम्ही..?'
'अ..अहो नवीन गाणं आहे..परवाच ऐकलं..खूप आवडलं मला..ते गुणगुणत असताना तिने ऐकलं..'
'मला ऐकायला मिळेल..?'
'हो..थांबा हा..cdच देते तुम्हाला..'
'बरं..'
'हि घ्या..'
'हं..थॅंक यू..मी उद्या देतो परत…'
'हो हो..काही घाई नाही..'

ऋषी घरी येतो..त्यांच्या खोलीत जातो आणि cd लावतो..

'ऐसे काही व्हावे…मन शांsत निजावे..
एकांताच्या वेळी..आकांत निमावे…

बघ संध्येच्या वक्षी, कुणी भिरभिरता पक्षी..
वाटेs त्याचेs गाव पुसावे…
ऐसे काही व्हावे…मन शांsत निजावे…

असल्या वेळी, मंद गति..
विरुन जाती, तीन मिती..
पाचही प्राणांच्या ज्योती,
सौम्यपणाने, मिणमिणती..
अस्वस्थाचे ओझे..क्षणी विसरुन जावे…

कोण आपुले, परके कोण..?
परिचित कोणी..उपरे कोण..?
असते कोण, नसते कोण..?
असल्यावेळी उरते कोण..?
पैलामधले काही, मग उजळून यावे...

ऐसे काही व्हावे, मन शांsत निजावे…'

गाणं संपतं…एक विचित्र शांतता खोलीत उरते..
ऋषीच्या मनात घोळणारे असंख्य विचार क्षणात थांबतात..
खरंच..असं मन शांत निजलं असतं काही वेळ तर किती बरं झालं असतं…सगळी कटकटच गेली असती…
त्याला सहज असं वाटून गेलं…

इतक्यात त्याच्या खांद्यावर एक हात स्थिरावला...ऋचा त्याच्या पाठी उभी होती...नेहेमीसारखी..
'काव्याच्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलंस मगाशी..सांग ना..काय अर्थ ह्या गाण्याचा..?'
'ऋचा…..'
'ऋषी…तू किती मोठी चूक केलीस कळतंय तुला..?
बाहेरच्या जगात आपली माणसं शोधत राहिलास..
आणि घरातल्यांना अंधारात ठेवलंस..? का…? तर
आम्हाला त्रास होऊ नये म्हणून..?
एक नोकरी गेली तर काय होतंय..? आम्ही काय तुला टाकून जाणार होतो का…?'

'तसं नाही गं..माझं मन स्थिर नव्हतं..'
'कारण ते तुला समजून घेणारं कोणी नव्हतं..विचार कर आम्हाला सांगितलं असतंस तर तुझ्या मनावरचं ओझं किती कमी झालं असतं..?'
'हं…पण..'
'काही बोलू नकोस…असं पुन्हा होता कामा नये..'
इतकं बोलून ऋचाने परत cd लावली..
आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली..
'सॉरी..'
'ह्या वेळी ऐकून घेते आहे..पहिल्यांदा आणि शेवटचं..कळलं..?'
'येस मॅडम…'

गाणं सुरुच होतं...

'अस्वस्थाचे ओझे…क्षणी विसरुन जावे…'

- कांचन लेले
०६-०२-२०१७

विशेष टीप - सदर कवितेचे कवि संदीप खरे आणि  संगीतकार सलील कुलकर्णी आहेत.

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...