जाने तू या जाने ना...(भाग २)
जाने तू या जाने ना…?!
भाग २
गाडी आत लागते आणि सगळे सामान काढत असतात..तेवढ्यात जय येऊन पोहोचतो..
अदितीच्या एका हातात तिचा रुमाल, मोबाईल, एक बॅग आणि दुसऱ्या हातात गॉगल आणि आणखी एक पिशवी..जय आलेला बघताच त्याला भेटायला म्हणून ती पुढे होते तेवढ्यात तिच्या पायात काहीतरी अडकतं आणि तिचा तोल जातो..तिची एक मैत्रीण तिला सांभाळते तोपर्यंत तिच्या हातातलं अर्धं सामान विखुरलेलं असतं..आणि समोर जय उभा असतो!
त्याला कळतच नसतं नक्की हसावं कि रडावं..
तो पटकन सामान उचलायला मदत करतो..आणि अदितीकडे बघतो..
एक साधा टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलेली..पायात चपला चढवलेली..केस बऱ्यापैकी अस्ताव्यस्त असलेली..
वेळेवर न येणारी..आणि झालेल्या प्रकारावरुन वेंधळी वाटणारी अदिती त्याच्यासमोर सॉरी म्हणत उभी असते..
तोही जुजबी बोलून सगळ्यांना घेऊन आत जातो...
सगळे फ्रेश होतात..एकमेकांची ओळख होते..चहा-कॉफी सेशन होतं..आणि मग सगळ्यांनी जवळच असलेल्या एका-दोन पॉईंटना जायचं असं ठरलेलं असतं..त्याप्रमाणे सगळे निघतात..
फक्त अदिती आणि तिच्या बरोबर एक मैत्रीण आणि एक मित्र ऑफिसचं काही काम करण्याच्या कारणाने मागे थांबतात..
सगळे बाहेर पडल्या-पडल्या इकडे हे तिघे कामाला लागतात..
आणलेल्या सामानाच्या मदतीने त्या फार्महाऊसचं रूपच बदलून टाकतात..समोर असलेल्या गार्डन मध्ये रंगीत पडदे-फुगे आणि फोटो अशी सजावट करतात..त्यात असलेल्या लिइटिंगचा उत्तम वापर करतात..मध्ये एक सेन्टर टेबल ठेऊन त्यावर आणलेला सुंदर केक ठेवतात...त्याच्या मागे वधू-वराच्या फोटोंचं मोठं पोस्टर केलेलं असतं ते लावतात..तेवढ्यात कॅटरिंगची ऑर्डर येते..त्यांना एका बाजूला जागा करुन सूचना दिल्या जातात..ह्यांची तयारी जेमतेम होत आलेली असते इतक्यात फोन येतो की सगळे जवळपास पोहोचले आहेत..
तिघेही अवतारातच असतात..ते पटकन तयार व्हायला आत रूम्स मध्ये जातात..अदिती फ्रेश होऊन येते न येते तोपर्यंत बाहेर गाड्यांचे आवाज येतात..तिला काहीच सुचत नाही..ती पटकन चेंज करुन त्यांना वेलकम करायला म्हणून बाहेर येते पण त्या आधीच सगळे आलेले असतात आणि गार्डन मध्ये अवाक होऊन बघत असतात..इतकी सुंदर सजावट झालेली असते..!
तेवढ्यात अदिती आलेली दिसते..मुग्धा तर तिला जाऊन मिठीच मारते..सगळे जण टाळ्या वाजवून कौतुक करतात..
जयलाही खूपच सुखद धक्का असतो..हे मागे थांबून पार्टी अरेंज करणार ह्याची कल्पना असूनही ती इतकी सुंदर असेल हे त्याच्या गावीही नसतं! त्याने सुरवातीलाच अदितीला सुचवलेलं असतं की टाऊन मध्ये एखादी जागा रेंटने घेऊ, जवळपास मस्त पब बघू पार्टी करु आणि रात्री घरी गेम्स वगरे करू..पण अदितीच्या हट्टाने ह्या वस्ती नसलेल्या निसर्गरम्य ठिकाणी यायचं ठरवलेलं असतं..
दमून आलेले सगळे पटकन चेंज करायला जातात..अदिती अजूनही शेवटचा हात फिरवत इकडे तिकडे फिरत असते..
इतक्यात जय तिला शोधत येतो..
'Hi..छान जमवलस सगळं..!'
'Thanks..तुझी खूप मदत झाली..!'
'Oh..that was nothing..'
'Still..thanks!'
'तुला एक सांगू का..?'
'सांग ना..'
'अं…म्हणजे..please don't mind…'
'अरे तसं काही नाही..जे काही असेल ते सांग..'
'तू…तुझं ड्रेसचं कॉम्बिनाशन जरा चुकलंय का अशी फॅशन आहे सध्या…?'
अदितीला हे एकदमच अनपेक्षित असतं..! ती एकदा स्वतःकडे बघते आणि एकदम ओशाळल्यासारखी होते..
तिने कुर्ता आणि ओढणीवर चक्क ट्रॅक पॅन्ट घातलेली असते..!
ती हळूच जयकडे बघते…आणि दोघेही हसू लागतात..!
'मी आलेच चेंज करुन…'
'लवकर ये..!'
अदितीच्या नाहीशा होणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे जय बराच वेळ बघत रहातो…ती गेली तरी..!
मग तोही चेंज करायला जातो..थोड्यावेळाने सगळे येतात..
एव्हाना संध्याकाळ झालेली असते..आणि आता लायटिंग आपली जादू करायला सुरुवात करत असतं..
सगळ्यांना वेलकम ड्रिंक्स सर्व केले जातात..मग
मानस-मुग्धा केक कापतात...
अदितीने त्यांच्यासाठी एक मस्त स्क्रॅप बुक तयार केलेली असते..सगळ्या जवळच्या लोकांच्या शुभेच्छा, आठवणी आणि फोटो कैद केलेले असतात...मानस-मुग्धा ते बघून भारावून जातात..मग दोघांसाठी रॅपिड फायर राउंड्स ठेवलेल्या असतात..सगळे जण एन्जॉय करत असतात..आणि मग अदिती म्युझिक सुरू करायचा इशारा करते…सुंदर लाइट म्युझिक लावलं जातं आणि सगळे आणखीनच खुश होतात...पार्टी रंगात असते..एक बाजूला डिनरचं काउंटर सुरू केलं जातं..डान्स-गप्पा आणि जेवण ह्यांचा उत्तम संगम होतो…
सगळं सुरळीत झाल्याचं बघून अदितीला खूप आनंद होतो..
ती एका बाजूला खुर्ची घेऊन जरा निवांत बसते..
जय दुसऱ्या कोपऱ्यातून तिच्यावर नजर ठेवूनच असतो..
ती जरा निवांत झाल्याचं बघून तोही एक खुर्ची घेऊन तिच्या शेजारी बसतो..पण अदिती डोळे मिटून बसलेली असते..अगदी तंद्रीत..
तिला कळतही नाही तो केव्हा येतो ते..मग तो पटकन दोघांसाठी जेवण घेऊन येतो…तरी मॅडम तंद्रीतच..
ती मधेच डोळे उघडते तेव्हा जय दोन हातात दोन प्लेट्स घेऊन तिच्याकडे बघत बसलेला असतो..
तिला खूपच आश्चर्य वाटतं…ती काही बोलणार इतक्यात तो नजरेनेच तिला प्लेट घ्यायला सांगतो…
ती प्लेट घेते आणि त्याला थँक्स म्हणते..
तो नुसताच हसतो…
आणि इकडे पार्टी सुरुच असते…सगळे एन्जॉय करतात..रात्र जगवत असतात....
आणि तिकडे हे दोघेही शांतपणे न बोलता जेवत असले तरी मौनाचा संवाद काही औरच सांगत असतो...
क्रमशः
- कांचन लेले
Comments
Post a Comment