जाने तू या जाने ना..(भाग ३)

जाने तू या जाने ना…?!

भाग ३

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच उशिरा उठतात..
अदिती सगळ्यात आधी उठून सगळी आवरा आवर करायला लागते..एक-एक जण तिला येउन मदत करत असतं..सगळं आवरलं जातं..जय छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करतो..अदितीचं बरंच कौतुक करतो, मुग्धा-मानस सगळ्यांचे आभार मानतात आणि सगळे आपापल्या घरी जायला निघतात..

दुसऱ्या दिवशीपासून सगळे आपापल्या रुटीनमध्ये व्यस्त होतात..
Whatsapp च्या ग्रुप मुळे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात..पण ते अगदीच जुजबी..जयला राहून राहून अदितीची आठवण येत असते..आणि इकडे अदितीला सुद्धा आधी माजोरडा वाटलेला जय, 'इतकाही वाईट नाही' असं वाटायला लागलेलं असतं..
पण दोघेही पुढाकार घ्यायला तयार नसतात..!
दोन-तीन दिवस जातात आणि शेवटी जय अदितीला फोन करतो..
पार्टीच्या हिशोबाचं कारण काढून भेटायचं ठरवतो..

ठरलेल्या दिवशी दोघे भेटतात..आज अदितीही ऑफिसहून डायरेक्ट आल्यामुळे अपटूडेट असते..तिला तसं बघून उगाच जयला चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं..आणि त्याचं त्यालाच हसू येतं..!
सुरवातीला हिशोबाचं बोललं जातं..सगळं क्लीयर झाल्यावर थोड्या गप्पा सुरु होतात..
एकमेकांची ओळख दोघेही करुन घेत असतात..
दोघे अगदी दोन टोकं असतात..
ही चहा वेडी तर तो ब्लॅक कॉफी..किंवा फारतर ग्रीन टी..!
ही मराठीची प्रोफेसर तर तो पक्का कॉर्पोरेट माणूस..
हिची पाणीपुरी तर त्याचं चायनीज..
ही मराठी प्रेमी आणि तो साहेबाच्या भाषेचा भक्त!
पण opposites attract म्हणतात तेच खरं!
शेवटी बराच वेळ गप्पा झाल्यावर दोघे निघतात, अनिच्छेनेच!
दोघांच्याही मनात खूप बोलायचं असतं, काही सांगायचं असतं..
पण ते मनातच राहून जातं..!
काही दिवस असेच जातात..मेसेजवर थोडंफार बोलणं होत असतं..मानस आणि मुग्धाचं लग्न अगदी आठवड्यावर आलेलं असतं..गिफ्ट घ्यायच्या निमित्ताने दोघे पुन्हा भेटतात..
जय आज एकदम खुश दिसत असतो..!
अदितीलाही त्याला बघून आनंद होत असतो..
बरंच फिरुन गिफ्ट घेतात आणि मग जय तिला म्हणतो
'डिनरला जाऊया…? आज माझ्याकडून पार्टी..!'
'किस ख़ुशी मे…?'
'सांगतो ना..चल तर…!'
'चलो..!'
दोघे एका रेस्तराँ मध्ये जातात..
'बोल..काय खाणार…?'
'तुझी पार्टी ना…? मग तू मागवशील ते..!'
'नक्की..?'
'हो..'
'ओके..'
जय चायनीज फूड ऑर्डर करतो..
खरंतर अदितीला विशेष आवडत नसतं..पण ती तसं अजिबात दाखवत नाही..
'सांग ना आता..पार्टी कशाबद्दल…?'
'मला प्रोमोशन मिळालं..! एका मोठ्या प्रोजेक्ट साठी हेड म्हणून आपॉइंट केलं आहे..आणि ते प्रोजेक्ट कुठे असेल सांग बरं..?'
'कुठे..?'
'Guess तर कर..'
'अं..दिल्ली किंवा बँगलोर…?'
'हाहाहा..किती गं साधी तू अदिती..It's in US…finally..!!'

अदितीला काही कळेनासं होतं..एकदम तिचा सगळा मूडच जातो..पण ती क्षणात सावरते स्वतःला..तरी जयला ते जाणवतंच..
'काय गं..? Aren't you happy..?'
'अरे तसं काही नाही.. Heartiest Congratulations!'
'Thanks a lot…तू बघ आता मी कसा झपाट्याने प्रोग्रेस करेन..किती वर्षं हे स्वप्न बघितलं होतं मी…आत्ता हे प्रोजेक्ट मग पुढचं आणि मग तिकडेच दुसरा जॉब..काही वर्षांनी ग्रीन कार्ड..लाइफ सेट है बॉस!'
इतक्यात वेटर ऑर्डर घेऊन येतो..
मग स्पेशल चायनीज आणि बरोबर अमेरिका पुराण ह्यातच सगळा वेळ जातो…
त्या दिवसानंतर अदिती स्वतःला मागे ओढते…भाळलेल्या मनाला आवर घालते..पण तिला ते खूपच अवघड जातं..
कारण जय मात्र तिच्यात गुंतत चाललेला असतो..
तिला कळतच नाही की त्याची नक्की इच्छा काय आहे..
प्रेम तर दोघांचंही असतं एकमेकांवर..पण मग तो एकदाही मला अमेरिकेला जाण्याबद्दलचं मत का विचारत नाही….? का त्याचं प्रेमच नाही..? मलाच उगाच असं वाटतंय का..? मीच खूप अडकत चालले आहे का..? एक ना दोन..असंख्य प्रश्न तिला हैराण करत असतात..
काहीच कळत नाही..दिवस पटपट जात असतात..नेहेमीसारखंच बोलणं होत असतं..लग्न अगदी दोन दिवसांवर आलेलं असतं..त्यामुळे अदितीला ऑफिस आणि मुग्धाकडची फ़ंक्शन अशी कसरत करायला लागत असते..त्या सगळ्या गडबडीत आणि आनंदाच्या वातावरणामुळे तिच्या डोक्यातले विचार काही काळ का होईना पण बाजूला सरकवले जातात..आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडतो..

सकाळी पारंपरिक पद्धतीने लग्न होतं..अदितीची इतकी धावपळ असते की तिला कोणाकडे बघायला उसंतच मिळत नाही..अदितीने आजचा दिवस पूर्ण मुग्धासाठी द्यायचा असं ठरवलेलंच असतं...त्यामुळे सकाळपासूनच तिचा हसरा चेहरा कार्याची शोभा वाढवत असतो..
तिच्या आनंदात विरघळून जाणारी अदिती, जयच्या मनातही विरघळत असते, अगदी साखरेसारखी..!
जयसुद्धा कामात असतो..पण तरी खूप खुश असतो..
त्याला आणि अदितीला बोलायला वेळ मिळाला नसला तरी तिच्या सतत नजरेसमोर असण्यानेच त्याला खूप आनंद होत असतो…
लग्न होतं, जेवणं होतात आणि सगळे मानसच्या घरी जातात..
गृहप्रवेश होतो..आणि सगळे पुन्हा रिसेप्शनच्या तयारीसाठी आपापल्या कामाला आणि तयारीला लागतात..!

क्रमशः

- कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!