Friday, 12 May 2017

आंधळं प्रेम!

आंधळं प्रेम!

आज संध्याकाळनंतर अचानक पावसाळी वातावरण झालं..आणि काही मिनिटात विजांचा कडकडाट आणि मग जोरदार पाऊस…
पहिल्या पावसात भिजायचा नेम असल्याने पाय आपसूकच अंगणाकडे वळले..पण तेवढ्यात घरातून ओरड झाली की भिजू नको, पाऊस चांगला नाही हा!
मग जरा गती मंदावली..आणि पायऱ्यांवरूनच हात बाहेर काढले..
आणि बघितलं तर हात खरंच मातकट झाले होते..
पुन्हा निराशेने घरी आले..हात धुतले आणि बाल्कनीत पाऊस बघण्यात मग्न झाले…
मग नेमाने मातीचा गंध आला…
आकाश-धरतीच्या मिलनाचं प्रतीक असणारा…
वातावरण मातीच्या सुगंधात दरवळून गेले…
पाऊस चांगला असो किंवा वाईट,
वळीवाचा असो, धुवाधार मान्सून असो, किंवा
हल्ली भलत्याच ऋतूत बरसणार असो..
माती तितकीच आसुसून त्याचं स्वागत करते..
त्याला आपल्यात सामावून घेते..
तो आल्याच्या आनंदाने सुगंध पसरवते..
आणि आपणही ह्या अद्भुत प्रेमाचा आनंद घेत असतो,
अगदी कायम!
अशा या आगळ्या वेगळ्या नात्याने दिन ना बन जाये तरच नवल!
म्हणूनच कदाचित म्हणतात..
प्रेम आंधळं असतं! :)

- कांचन लेले

Saturday, 6 May 2017

जाने तू या जाने ना..(भाग ७, शेवटचा)

जाने तू या जाने ना…?!

भाग ७ (शेवटचा)

इकडे अदिती कामात मन गुंतवायचा प्रयत्न करत होती..
पण तरी सारखी जयची आठवण येईच…कोणीतरी कॉफी घेणार का विचारलं तरी तिला जय आठवे..
आणि अशातच जयचं पत्र तिच्यापर्यंत पोहोचलं..
त्या दिवशी..घरी जायला निघता निघताच रघूने, तिथे काम करणाऱ्या स्टाफने तिच्यासाठीचं पत्र तिला दिलं...
पत्रावरचं नाव बघून तिचा विश्वासच बसला नाही..
ती तशीच स्टाफरूम मध्ये गेली आणि ते पत्र वाचायला घेतलं..
प्रत्येक शब्दागणिक तिचं मन भरुन येत होतं..
डोळे केव्हाच वाहू लागले होते…
तिने किमान चार वेळा वाचलं असेल नसेल तोच रघू पुन्हा आला आणि तिला त्या अवस्थेत बघून म्हणाला
'मॅडम..काय झालं..? तुम्ही ठीक आहात ना..?'
अदितीला पटकन कळलंच नाही तो आलेला..त्याच्या आवाजाने ती भानावर आली..
'हो…खूप दिवसांपासून ह्या पत्राची वाट बघत होते..खूप आंनद झाला वाचून..म्हणून हे अश्रू…'
'मग वांदा नाही..आत्ता फक्कड चहा आणतो बघा..'
इतकं म्हणून तो वळतो तेवढ्यात अदिती त्याला हाक मारते..
'रघू…आज चहा नको…कॉफी आण..ब्लॅक कॉफी…'
मान हलवून रघू निघून जातो…
आणि अदिती पुन्हा पत्र वाचण्यात मग्न होते…!

कम्पनी कडून जयला ग्रीन सिग्नल मिळाल्याचा मेल येतो..पण प्रोजेक्ट पूर्ण करुनच जाता येणार असतं त्यामुळे तो झपाट्याने कामाला लागतो..
एकीकडे अदितीचा विचार आणि दुसरीकडे काम..अशी दोन चकांची गाडी एकटा ओढत असतो..

इकडे अदिती घरी येते..आणि रात्री खूप वेळ विचार करत बसते..
आणि विचारांती जयच्या पत्राला उत्तर पाठवायचं नाही असा ठाम निश्चय करते…

दिवस जात असतात..
जय अगदी अदीतीसारखा होत असतो, त्याच्याही नकळत..
तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याशा करत असतो,
आवडून घेत असतो..
तिचा वेंधळेपणा आठवून स्वतःशीच हसत असतो..
तिच्या आठवणीत रात्र काढताना चहाचे कप रिकामे करत असतो..

आणि इकडे अदिती तिच्या निश्चयावर ठाम असते..
पण तिच्याही नकळत ती आतून मोहरुन गेलेली असते..

रोज अदितीच्या उत्तराची वाट बघणारा जय, दिवसेंदिवस थोडा खचत चाललेला असतो..पण हिम्मत हरत नाही..
कारण त्याचा विश्वास असतो त्याच्या प्रेमावर, त्याच्या अदितीवर..
तिला पत्र मिळालंच नसेल कदाचित..याच आशेवर तो दिवस काढत असतो..

बघता बघता निघायचा दिवस येतो,
मानस जयला आणायला येणार असतो एअरपोर्टला..
विमानात बसल्यापासून जय आणखीनच अधीर होतो..
त्याला अदितीची प्रत्येक आठवण सतावत असते..
आणि कधी एकदा भारतात पोहोचतो असं झालेलं असतं..

शेवटी एकदाची त्याची फ्लाईट लँड होते..
सगळे सोपस्कार करुन, सामान घेऊन जय बाहेर यायला निघतो..
गेटमधून बाहेर येताच समोर मानस हात करतो आणि जयला उजवीकडून बाहेर पडायला सांगतो..
जय त्या दिशेने बाहेर यायला निघतो..
गेटमधून बाहेर पडता पडता एका वायरवरुन ट्रॉली अडखळते आणि सगळ्यात वरती ठेवलेली बॅग खाली पडते..
जय ती उचलायला जातो तोवर त्याच्या हातातली बाटली घरंगळत पुढे जाते..आणि समोरच्या व्यक्तीच्या पायाशी थांबते..
दोघेही ती घ्यायला वाकतात आणि डोक्याला डोकं लागतं!
जय बघतो, हसणारी अदिती त्याच्याकडे बघत असते..
त्याचा विश्वासच बसत नाही..
दोघेही उभे रहातात…नखशिखांत एकमेकांना न्याहाळतात..
आपल्याला भास होतोय की काय असं जयला वाटत असतं..
डोळ्यांवर विश्वास बसत नसतो..
अदिती..
कडक इस्त्रीचा लॉंग कुर्ता..खाली लेग्गीन्गस..
व्यवस्थित बांधलेले केस..बारीकशी टिकली..हाताला घड्याळ
आणि उभं रहाण्याचा कॉन्फिडेंट स्टांस…
वेंधळा जय अपटूडेट अदितीला भेटत असतो..
आज त्याच्या पापण्या ओलावत असतात..
एक अपूर्ण नातं पूर्णत्वाकडे जात असतं..
आणि बॅग्राऊंडला उगच गाणं वाजल्यासारखं वाटतं…

जाने तू मेरी क्या है, जाने मै तेरा क्या था..
साथ तेरे हर पल, साथ हर लम्हा था..
जाने कैसी कशिश है, जाने कैसी खलिश है..
क्यूँ यह साँसे थमी है, आंखों में क्यूँ नमी है..
जाना दिल जाना कैसे मैंने न जाना..
के प्यार यही है, यह जाने तू या जाने ना..
जाना दिल जाना कैसे तूने न जाना..
ये प्यार ही है,
हाँ जाने तू या जाने ना…

समाप्त

- कांचन लेले

जाने तू या जाने ना...(भाग ६)

जाने तू या जाने ना…?!

भाग ६

त्याने नंबर चेक केला..हाच नंबर होता तिचा..त्याच्याकडे दुसरा नंबर नव्हता..अगदी घरचाही नाही..त्याने न राहावून मानसला फोन केला..तो झोपेतच त्याने घेतला..त्याला आदीतीबद्दल विचारताच ती शिफ्ट झाल्याचं जयला कळलं..आणि मुख्य म्हणजे ती एकटीच शिफ्ट झाली होती..कोणाला काही सांगितलं नव्हतं..नंबर बदलला होता, सोशल साईट्स वरची अकाऊंट बंद केली होती..मुग्धाशीही काही बोलली नव्हती..काहीच कळायला मार्ग नव्हता..
मुग्धाने त्याला इतकंच सांगितलं की घरुन लग्नासाठी खूप फोर्स करत होते म्हणून ती खूप डिस्टर्ब असायची तेव्हा बोलायची तिच्याशी..त्यानंतर तिला युनिव्हर्सिटीत जॉबसाठी इंटरव्ह्यू दिल्याचं सांगितलं होतं तिने..पण ती अशी तडकाफडकी निघून का गेली हे कोणालाच कळलं नाही...
जयची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती..मुग्धा ही शेवटची आशा होती त्याची..
त्याने लगेच त्याच्या बॉसला फोन केला आणि परत जाण्यासंबंधी विचारलं..त्याला लगेच जाता येणार नव्हतं..एका महिन्याचा नोटीस पिरियड होता..आणि शिवाय त्याचं प्रमोशनही धोक्यात येणार होतं..पण त्याने मागचा पुढचा विचार न करता  त्याच दिवशी फॉर्मॅलिटीज् पूर्ण केल्या..आणि मग फेसबुक उघडून मुग्धाने टाकलेले फोटो बघत बसला..
अदिती कुठे असेल, काय करत असेल हे आणि असेच विचार सारखे डोक्यात येत होते…

इकडे झालं असं होतं की अदितीला लग्न करायचं नव्हतं..पण त्याचं कारणही ती घरात सांगत नव्हती..त्यामुळे घरात सारखे वाद होत होते..अशातच तिला जवळच्या शहरात युनिव्हर्सिटीमध्ये जॉब वेकन्सी असल्याचं कळलं..तिने लगेच अप्लाय केलं..इंटरव्ह्यू झाला..आणि काही दिवसातच तिला तो जॉब मिळाल्याचं कळलं..
तिने शिफ्ट व्हायचं ठरवलं..घरच्यांचा विरोध न जुमानता..
मुग्धाशी खूप दिवसात बोलणं झालं नव्हतं..तिला शिफ्ट होण्याचं काळवावं असं अदितीच्या मनात होतं, पण ते राहून गेलं..तिने रोजच्याप्रमाणे एकदा जयचं फेसबुक अकाउंट बघितलं..तिला वाटलं नेहेमीप्रमाणे जैसे थे असेल..पण त्याला टॅग केलेले..एका क्लबमधले फोटो होते…आणि त्यात त्याला खिटलेली लिसा होती..तिथे मात्र अदितीच्या सगळ्या आशा संपल्या…पार कोलमडून गेली ती मनातुन..आणि तिने रागात सगळी अकाउंट बंद करून टाकली आणि सिमकार्ड बंद केलं…आठवड्याने जायची होती ती लगेच तिसऱ्याच दिवशी निघून गेली..

इकडे जय कसेबसे दिवस रेटत होता..मुग्धाकडून ती कुठल्या शहरात गेली आणि का गेली हे त्याला कळलं होतं..पण तिचा फोन नंबर काही मिळाला नव्हता..त्याला फक्त आता तिला जाऊन भेटायचं होतं..दिवस जाता जात नव्हते आणि रात्र खायला उठत होती…
एका अशाच रात्री त्याला झोपच लागत नव्हती..तो उठला आणि डेस्क वर कागद पेन घेऊन बसला..

'प्रिय अदिती,
हे पत्र वगैरे कधीच लिहिलं नव्हतं गं..ई-मेल सुद्धा कामाचाच केला कायम..पण आज लिहावं वाटतंय..तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होते आहे पण काही दिवस तरी मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही..म्हणून शेवटी हा मार्ग..
अदिती..मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय..
माझ्या महत्वकांक्षा माझ्यासाठी कायमच महत्वाच्या होत्या..अगदी सगळ्यांपेक्षा..पण आज तसं नाहीये..मी बदललो आहे..
तुझ्यासाठी..किंबहुना..तुझ्यामुळे…
मला परत तुझ्याकडे यायचं आहे..आणि मी येणार आहे लवकरच..
फक्त तोपर्यंत खूप उशीर झाला नसेल ना गं...? अशी भीती वाटत राहते सारखी..माझी अदिती तशीच असेल ना माझ्यासाठी..? माफ करेल ना मला…?
उत्तर पठवशील मला..? मी खूप वाट बघतो आहे तुझी..
खूप बोलायचं आहे तुझ्याशी..पण मला आणखी लिहिता येत नाही..एवढं लिहिता आलं हेच खूप…
मी १४ तारखेला दुपारी १२ वाजता लॅंड होईन तिकडे..
कधी एकदा तुला बघेन असं झालं आहे…
तुझाच,
जय..'

त्याने लेटर सरळ यूनिव्हर्सिर्टीत अदितीच्या नावे पाठवलं..ती मराठीच शिकवत असणार त्यामुळे डिपार्टमेंटचं नावही घातलं..आणि आता त्याच्या हातात होत फक्त वाट बघणं..

जय लेटर पोस्ट करून आला…डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं..तो कॉफी करायला किचन मध्ये गेला..आणि स्वतःशीच हसला..मग कपाटातल्या टी बॅग्स काढल्या आणि चहा करु लागला…
तिच्या विरहाची कडू टी बॅग..
तिच्या आठवणींचा गोssड शुगर क्यूब..
तिला पुन्हा मिळवण्याच्या सकारात्मकतेची मिल्क पावडर..
आणि
तिच्या रंगात मिसळून जाण्याचं प्रतिक म्हणून पाणी…

त्याला कधीही न आवडलेला चहा आज मात्र खूपच प्रिय वाटत होता…

क्रमशः

- कांचन लेले

Friday, 5 May 2017

जाने तू या जाने ना..(भाग ५)

जाने तू या जाने ना…?!

भाग ५

अदिती निघून जाते..

जयला त्याची चूक कळते..पण तोपर्यंत अदिती निघून गेलेली असते..
आणि नंतर त्याला त्याच्या चुकीपेक्षा झालेली निराशा जास्ती मोठी वाटते…म्हणून तो तिला फोन करायचा प्रयत्न करत नाही..
अदिती इतकी दुखावलेली असते की तिलाही जयशी बोलायची इच्छा होत नाही…
दिवस जात असतात..उदासिनता वाढत असते…
पण पुढाकार कोणीच घेत नाही..
मानस-मुग्धा सुद्धा युरोप टूरला निघून गेलेले असतात..
त्यामुळे त्या बाजूनेही दोघांची निराशाच होते..
बघता बघता जयच्या अमेरिकेला जायच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात..व्हिसा मिळतो आणि अवघ्या दोन आठवड्यांनी त्याला निघावं लागणार असतं..
कामं आणि तयारी इतकी असते की त्याला बाकी कसला विचार करायला वेळच मिळत नाही…
तरीही रोज उशीवर डोकं टेकल्यावर..डोळे बंद केल्यावर फक्त आणि फक्त अदितीच समोर येते…
साधी-सरळ…गबाळी…पण हुशार…
जातिवंत सुंदर..पण त्याची जाणीवही नसलेली..
निरागस…सेन्सिटिव्ह..पण आता हट्टी वाटत असणारी..
आणि मग लगेच अमेरिकेचा नकाशा समोर येतो..
पण त्याच्या स्वप्नांचं पारडं जड ठरतं…

इकडे अदितीला माहीतही नसतं जय इतक्या लगेच जाणार आहे..
तिने आधी त्याला साफ विसरून जायचं असंच ठरवलेलं असतं..
पण तिलाही रोज एकदातरी प्रकर्षाने जयची आठवण येतच असते…
मग ती पुन्हा विचार करायचा असं ठरवते…
आपण खूप तडकाफडकी निर्णय घेतला असं तिला उगच वाटून जातं..
ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करु लागते
आणि दुसऱ्याच दिवशी जयचा मेसेज येतो..

'USला निघालो आहे..एअरपोर्टवर आहे..
Miss you..'
अदितीचा विश्वासच बसत नाही..तिला त्या क्षणी धावत जावंसं वाटत असतं..पण अंगात त्राणच उरलेले नसतात..
'Have a safe flight..'
इतकाच रिप्लाय ती कसाबसा करते..आणि फोन बंद करुन टाकते..
तिचा इतका कोरडा रिप्लाय बघून जयला खूप आश्चर्य वाटतं..आणि रागही येतो..आता मात्र तो तिला विसरायचं असं पक्क ठरवतो…
तसंच डोकं सीटवर टेकवतो..डोळे मिटून घेतो..
आणि फ्लाईट take off होते….

अदिती रात्री दचकून उठते…
फोन शोधते..तो अजूनही स्विच ऑफ असतो..
चेहरा ओढल्यासारखा वाटत असतो..उशी अजूनही ओली असते..
ती घाई घाई फोन सुरू करते..
तो सुरू होईपर्यंतही तिला धीर धरवत नाही..
सारखं वाटत असतं हे सगळं स्वप्नच असेल..त्याचा असा कुठलाही मेसेज आपल्याला आला नसेल..आणि तो कुठेही गेला नसेल..
तिच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तिचा फोन सुरू होतो..
ती मेसेज बॉक्स चेक करते…त्याचा मेसेज अजूनही तसाच असतो..
आणि 'miss you too' असा मेसेज तिच्या drafts मध्येच खितपत पडलेला असतो..
ती पुन्हा अंथरुणावर अंग टाकते…आता अश्रूही कोरडे झालेले असतात..

इकडे जयचं फ्लाईट Dallas airport ला लॅन्ड होतं..
त्याला आता सेटल होईपर्यंत दुसरा विचार करणं शक्य नसतं..त्यात जेट लॅगमुळे काही सुचत नसतं..त्यामुळे तो मनातले विचार दाबून ठेवतो आणि अपार्टमेंटवर जाऊन बेडवर अंग झोकून देतो…

इकडे अदिती पुन्हा रुटीन प्रमाणे काम करायला लागते..तिच्यात झालेला बदल सगळ्यांनाच जाणवत असतो..पण अजून कोणालाही कारण कळलेलं नसतं…
तिकडे जयसुद्धा कामाला लागतो..नवीन ओळखी होत असतात..तिथली कामाची पद्धत समजून घेत असतो..आणि बदललेल्या वेळेशी जुळवून घेत असतो...
दोघांनीही कामात इतकं जुंपून घेतलं  असतं स्वतःला की बाकी काही विचार करायला वेळच मिळत नाही त्यांना..
त्यातच अदितीच्या घरुन लग्नासाठी स्थळं बघणं सुरू होतं...तिच्यावर कोणी जबरदस्ती करत नसतं, पण एकदा भेटण्याचा आग्रह मात्र खूप असतो..पण अदिती ठाम नकार देते..ती कोणाचंच ऐकत नाही...ह्यावरुन रोज घरात कटकटी सुरू झालेल्या असतात..आणि अदिती आणखी एकटी पडत जाते...

इकडे जयचा मित्रपरिवार वाढत असतो..वीकएंडला क्लबिंग आणि पार्टी जोरदार सुरू असतात...तो थोडा का होईना पण दारूचा आधार घेत असतो तिला विसरायला..
एका अशाच पार्टीत तो एका बाजूला ड्रिंक्स घेत बसला असतो..तेवढ्यात एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसते..
ड्रिंक्स ऑर्डर करते आणि बोलायला लागते..ती त्याच्या एका कलीगची मैत्रीण असते..लिसा..ती जवळच्याच दुसऱ्या शहरात रहात असते..क्लब मध्ये असल्याने बोलणं थोडच होतं..पण डान्स भरपूर होतो..आणि पुढच्याच्या पुढच्या वीकएंडला भेटायचं नक्की करून ती त्याचा निरोप घेते..जवळपास रोजच दोघांची फोनाफोनी किंवा मेसेजवर बोलणं सुरू होतं..जवळीक वाढत असते…आणि आता भेटीला एकच दिवस राहिला असतो....
जयसुद्धा खुश असतो...त्यादिवशी तो खूप दिवसांनी सहज फेसबुक चाळायला घेतो.. मुग्धाने त्यांच्या लग्नातले फोटो टाकलेले असतात...सुंदर आलेले असतात फोटो..अदिती खूप सुंदर दिसत असते…त्याचं मन पुन्हा त्या आठवणींमध्ये रमू लागतं..
अदितीचा फोटो बघत तो सगळ्या आठवणी ताज्या करत असतो.. इतक्यात फोनवर लिसाचा फोटो फ्लॅश होतो..तिचा फोन आलेला असतो...
दोन क्षण त्याला खूप विचित्र वाटतं..तो फोन सायलेंट करून बाजूला ठेऊन देतो..त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं...
सगळा अंधार दिसत असतो…
फक्त अंधार….

जयला जाग येते ती सकाळी दार वाजवण्याच्या आवाजाने…तो खडबडून उठतो..काही आठवत नसतं..
डोकं जड झालेलं असतं..शेजारी रिकामी बाटली पडलेली असते..खाली ग्लास फुटलेला असतो..तो तिरमिरतच दाराकडे जातो...डोळे चोळत दार उघडतो तर समोर लिसा..त्याला काही कळायच्या आत ती त्याला मिठी मारते…दोन क्षण त्याला सावरायला लागतात..आणि मग त्याला काल झालेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात..
अदिती आठवते..तिच्या आठवणीत रमलेला तो आठवतो..
मग लिसाचा आलेला फोन, अचानक वाटलेली हुरहूर, अस्वस्थता..
आणि ते सगळं पचवायला घेतलेल्या ड्रिंक्स…तरी अदितीचा चेहरा डोळ्यासमोरुन हलत नाही म्हणून केलेली आदळ-आपट..आणि मग थकून अश्रूंच्या साहाय्याने आलेली झोप….

लिसा अजूनही मिठीतच असते…तो एकदम तिला दूर लोटतो…आणि जायला सांगतो…कसंबसं सॉरी म्हणतो, पण ती आल्यापावली रागातच निघून जाते..तो दार लावतो आणि तिथेच मटकन खाली बसतो…त्याला सगळंच असहाय्य होत असतं..तो तसाच उठतो आणि फोन शोधु लागतो..फोन मिळताच तो लगेच अदितीचा नंबर लावतो..
काही क्षणांनी समोरून आवाज येतो…
'The number you have dialled is currently not in service.'

क्रमशः

- कांचन लेले

जाने तू या जाने ना…(भाग ४)


जाने तू या जाने ना…?!

भाग ४

संध्याकाळी रिसेप्शन पार्टी सुरू होते...

अदितीने पोपटी आणि जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी नेसलेली असते..हलका मेकअप केलेला असतो..सुंदर दिसत असते..

जय काळ्या ब्लेझरमध्ये अगदी राजबिंडा दिसत असतो..

मुग्धा-अदितीच्या कॉलेजचे, शाळेचे सगळे मित्र-मैत्रिणी आलेले असतात..त्यातले बरेच जण अदितीभोवती उगाच घुटमळत आहेत असं जयला सारखं वाटत असतं..पण त्याला काहीच करता येत नसतं..
नवीन जोडप्यासाठी छान केक आणलेला असतो..
केक कापला जातो आणि काही गेम्स खेळले जातात..
दोघांच्या लहानपणीपासूनच्या आठवणी, कॉलेजचे किस्से रंगवले जातात  आणि शेवटी सगळे डान्सफ्लोरकडे वळतात..
वातावरण मस्त हलकं फुलकं आणि गुलाबी झालेलं असतं..
जय अदितीला शोधत असतो पण ती अचानक कुठे गायब होते त्याला कळतच नाही..
थोडं शोधल्यावर ती एका कोपऱ्यातल्या पाण्याच्या स्टॉलकडे दिसते..
तो झपझप पावलं टाकत तिथे पोहोचणार तोवर एक मुलगा तिच्यापाशी येतो..जयची गती एकदम मंदावते..
तो मुलगा तिला काहीतरी सांगत असतो..पण अदिती मानेने नकार देत असते असं जयला वाटतं..पण तो मुलगा काही जात नसतो..बोलतच असतो आणि अदिती चेहऱ्यावर स्मित ठेऊन त्याला नकार देत असते..जय पटकन पुढे होतो आणि अदितीला हाक मारतो..
ती सुद्धा सुटकेचा निश्वास टाकते आणि त्या मुलाला कटवते..
'Thank god!! नाही…thank you! देवासारखा धावून आलास..'
' अगं पण का इतकं ऐकून घेत होतीस त्याचं..? आणि होता कोण हा जोकर..?'
'एss जोकर काय म्हणतोस रे त्याला..!! माझा एकेकाळचा क्रश होता..oops! सांगू नको हा कोणाला..!!'
'ओह..मग you better carry on..मी जातो..'
'ओ मिस्टर सेंटिमेन्टल..होता म्हंटलं मी..लग्न झालं त्याचं मागच्यावर्षी..'
'तरी तुझ्यामागे…?'
'बघ ना..वाटलं नव्हतं असा असेल..! असो..तू कसा काय आलास इकडे…?'
'मी…अं…पाणी प्यायला…'
'चल चल..बंडल नको मारु!'
'काय..? बंडल नको मारु..? काय हि भाषा..'
'अरे कॉलेजचे दिवस आठवले एकदम..जाऊदे..सांग ना..'
'अगं तु कुठे दिसली नाहीस म्हणून बघायला आलो..'
'ओह..ओके..चल जाऊया….'
'अदिती..ऐक ना..'
'बोल ना..'
'May I have the pleasure beautiful lady..?'
इतकं म्हणून तो हात पुढे करतो…
'Oh my my! I would have loved to, पण मला डान्स वगैरे अजिबातच येत नाही..'
'मी आहे ना..!! Please..?'
ती त्याच्या हातात हात देते, आणि क्षणभर शहारते..
तिला सगळं स्वप्नवतच वाटत असतं!
दोघे डान्सफ्लोरवर येतात आणि सुरु होतो डान्स..
अगदी डोळ्यात डोळे घालून..पिक्चर मध्ये दाखवतात अगदी तस्सं..
'खूप सुंदर दिसतेस..अशीच रहात जा कायम…'
'हं…'
अदिती इतकी लाजत असते की तिला काही बोलताच येत नसतं..ती मान खाली वळवते..
जय अलगद तिची हनुवटी वर करतो..
दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात..
अदिती जयच्या डोळ्यातला ठामपणा बघत असते..
जय मात्र अदितीच्या डोळ्यांतले बदलते भाव बघत असतो..
आधी लाजणारी, मग फक्त हसणारी..
तो क्षण हेरुन जय व्यक्त होतो..
'I love you Aditi..'
मग हसू कमी कमी होत जातं..
आणि एका क्षणी अतिशय करुण भाव तिच्या डोळ्यात येतात..
ती एकदम स्वप्नाच्या कल्पनेतून बाहेर येते!
आणि जय काही विचारणार इतक्यात ती डोकं त्याच्या खांद्यावर ठेऊन रडू लागते…
तो तिला बाजूला घेऊन जातो..
तिला काही बोलवतच नसतं…तो तिला वेळ देतो..
शांत करतो..आणि मग विचारतो काय झालं..
'जय…जे नातं कधी निर्माणच होणार नाही..त्याचा पाया का रचतोय आपण…?'
'म्हणजे…? तुझं माझ्यावर प्रेम नाही..?'
'असं वाटतं तुला…?'
'कोड्यात बोलू नको..आपलं एकमेकांवर प्रेम आहे मग का नाही नातं निर्माण करु शकणार आपण…? का तुला लग्न नाही करायचं माझ्याशी..?'
'जय..तू अमेरिकेला जाणार आहेस ना…?'
'मी नाही..आपण..'
'हे आपण ठरवलं की तू…?'
'अगं..सगळ्यांनाच अब्रॉड जायची क्रेझ असते..आणि तुलाही आवडेल तिकडे..'
'प्रश्न माझ्या इच्छेचा आहे...माझ्या माणसांचा आहे..माझ्या प्रोफेशनचा आहे..'
'तू एकाच बाजूने विचार करते आहेस..'
'तुही तेच केलंस ना जय…? तुझी इच्छा कळल्यावर मी तुला अडकवलं तरी नाही…'
'मग तेव्हाच का नाही बोललीस अदिती…?'
'तू एकदाही माझं मत नाही विचारलंस..आणि तेव्हा मला नक्की माहित नव्हतं कि तुला काय वाटतं माझ्याबद्दल…'
'काय कटकट आहे यार..किती खुश होतो मी...'
'कटकट..? Okay..या पुढे तुला कटकट होणार नाही..सॉरी..'
इकडे मानस मुग्धाचा हात हातात घेत असताना अदिती जयचा हात सोडून निघून जाते, मागे न बघता…
जयच्या तोंडातून येणारी हाक आतल्या आतच विरुन जाते…
आणि नजर आपल्या रिकाम्या  राहिलेल्या हातावर स्थिरावते…

क्रमशः

- कांचन लेले

Thursday, 4 May 2017

जाने तू या जाने ना..(भाग ३)

जाने तू या जाने ना…?!

भाग ३

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच उशिरा उठतात..
अदिती सगळ्यात आधी उठून सगळी आवरा आवर करायला लागते..एक-एक जण तिला येउन मदत करत असतं..सगळं आवरलं जातं..जय छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करतो..अदितीचं बरंच कौतुक करतो, मुग्धा-मानस सगळ्यांचे आभार मानतात आणि सगळे आपापल्या घरी जायला निघतात..

दुसऱ्या दिवशीपासून सगळे आपापल्या रुटीनमध्ये व्यस्त होतात..
Whatsapp च्या ग्रुप मुळे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात..पण ते अगदीच जुजबी..जयला राहून राहून अदितीची आठवण येत असते..आणि इकडे अदितीला सुद्धा आधी माजोरडा वाटलेला जय, 'इतकाही वाईट नाही' असं वाटायला लागलेलं असतं..
पण दोघेही पुढाकार घ्यायला तयार नसतात..!
दोन-तीन दिवस जातात आणि शेवटी जय अदितीला फोन करतो..
पार्टीच्या हिशोबाचं कारण काढून भेटायचं ठरवतो..

ठरलेल्या दिवशी दोघे भेटतात..आज अदितीही ऑफिसहून डायरेक्ट आल्यामुळे अपटूडेट असते..तिला तसं बघून उगाच जयला चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं..आणि त्याचं त्यालाच हसू येतं..!
सुरवातीला हिशोबाचं बोललं जातं..सगळं क्लीयर झाल्यावर थोड्या गप्पा सुरु होतात..
एकमेकांची ओळख दोघेही करुन घेत असतात..
दोघे अगदी दोन टोकं असतात..
ही चहा वेडी तर तो ब्लॅक कॉफी..किंवा फारतर ग्रीन टी..!
ही मराठीची प्रोफेसर तर तो पक्का कॉर्पोरेट माणूस..
हिची पाणीपुरी तर त्याचं चायनीज..
ही मराठी प्रेमी आणि तो साहेबाच्या भाषेचा भक्त!
पण opposites attract म्हणतात तेच खरं!
शेवटी बराच वेळ गप्पा झाल्यावर दोघे निघतात, अनिच्छेनेच!
दोघांच्याही मनात खूप बोलायचं असतं, काही सांगायचं असतं..
पण ते मनातच राहून जातं..!
काही दिवस असेच जातात..मेसेजवर थोडंफार बोलणं होत असतं..मानस आणि मुग्धाचं लग्न अगदी आठवड्यावर आलेलं असतं..गिफ्ट घ्यायच्या निमित्ताने दोघे पुन्हा भेटतात..
जय आज एकदम खुश दिसत असतो..!
अदितीलाही त्याला बघून आनंद होत असतो..
बरंच फिरुन गिफ्ट घेतात आणि मग जय तिला म्हणतो
'डिनरला जाऊया…? आज माझ्याकडून पार्टी..!'
'किस ख़ुशी मे…?'
'सांगतो ना..चल तर…!'
'चलो..!'
दोघे एका रेस्तराँ मध्ये जातात..
'बोल..काय खाणार…?'
'तुझी पार्टी ना…? मग तू मागवशील ते..!'
'नक्की..?'
'हो..'
'ओके..'
जय चायनीज फूड ऑर्डर करतो..
खरंतर अदितीला विशेष आवडत नसतं..पण ती तसं अजिबात दाखवत नाही..
'सांग ना आता..पार्टी कशाबद्दल…?'
'मला प्रोमोशन मिळालं..! एका मोठ्या प्रोजेक्ट साठी हेड म्हणून आपॉइंट केलं आहे..आणि ते प्रोजेक्ट कुठे असेल सांग बरं..?'
'कुठे..?'
'Guess तर कर..'
'अं..दिल्ली किंवा बँगलोर…?'
'हाहाहा..किती गं साधी तू अदिती..It's in US…finally..!!'

अदितीला काही कळेनासं होतं..एकदम तिचा सगळा मूडच जातो..पण ती क्षणात सावरते स्वतःला..तरी जयला ते जाणवतंच..
'काय गं..? Aren't you happy..?'
'अरे तसं काही नाही.. Heartiest Congratulations!'
'Thanks a lot…तू बघ आता मी कसा झपाट्याने प्रोग्रेस करेन..किती वर्षं हे स्वप्न बघितलं होतं मी…आत्ता हे प्रोजेक्ट मग पुढचं आणि मग तिकडेच दुसरा जॉब..काही वर्षांनी ग्रीन कार्ड..लाइफ सेट है बॉस!'
इतक्यात वेटर ऑर्डर घेऊन येतो..
मग स्पेशल चायनीज आणि बरोबर अमेरिका पुराण ह्यातच सगळा वेळ जातो…
त्या दिवसानंतर अदिती स्वतःला मागे ओढते…भाळलेल्या मनाला आवर घालते..पण तिला ते खूपच अवघड जातं..
कारण जय मात्र तिच्यात गुंतत चाललेला असतो..
तिला कळतच नाही की त्याची नक्की इच्छा काय आहे..
प्रेम तर दोघांचंही असतं एकमेकांवर..पण मग तो एकदाही मला अमेरिकेला जाण्याबद्दलचं मत का विचारत नाही….? का त्याचं प्रेमच नाही..? मलाच उगाच असं वाटतंय का..? मीच खूप अडकत चालले आहे का..? एक ना दोन..असंख्य प्रश्न तिला हैराण करत असतात..
काहीच कळत नाही..दिवस पटपट जात असतात..नेहेमीसारखंच बोलणं होत असतं..लग्न अगदी दोन दिवसांवर आलेलं असतं..त्यामुळे अदितीला ऑफिस आणि मुग्धाकडची फ़ंक्शन अशी कसरत करायला लागत असते..त्या सगळ्या गडबडीत आणि आनंदाच्या वातावरणामुळे तिच्या डोक्यातले विचार काही काळ का होईना पण बाजूला सरकवले जातात..आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडतो..

सकाळी पारंपरिक पद्धतीने लग्न होतं..अदितीची इतकी धावपळ असते की तिला कोणाकडे बघायला उसंतच मिळत नाही..अदितीने आजचा दिवस पूर्ण मुग्धासाठी द्यायचा असं ठरवलेलंच असतं...त्यामुळे सकाळपासूनच तिचा हसरा चेहरा कार्याची शोभा वाढवत असतो..
तिच्या आनंदात विरघळून जाणारी अदिती, जयच्या मनातही विरघळत असते, अगदी साखरेसारखी..!
जयसुद्धा कामात असतो..पण तरी खूप खुश असतो..
त्याला आणि अदितीला बोलायला वेळ मिळाला नसला तरी तिच्या सतत नजरेसमोर असण्यानेच त्याला खूप आनंद होत असतो…
लग्न होतं, जेवणं होतात आणि सगळे मानसच्या घरी जातात..
गृहप्रवेश होतो..आणि सगळे पुन्हा रिसेप्शनच्या तयारीसाठी आपापल्या कामाला आणि तयारीला लागतात..!

क्रमशः

- कांचन लेले

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...