जाने तू या जाने ना..(भाग ५)

जाने तू या जाने ना…?!

भाग ५

अदिती निघून जाते..

जयला त्याची चूक कळते..पण तोपर्यंत अदिती निघून गेलेली असते..
आणि नंतर त्याला त्याच्या चुकीपेक्षा झालेली निराशा जास्ती मोठी वाटते…म्हणून तो तिला फोन करायचा प्रयत्न करत नाही..
अदिती इतकी दुखावलेली असते की तिलाही जयशी बोलायची इच्छा होत नाही…
दिवस जात असतात..उदासिनता वाढत असते…
पण पुढाकार कोणीच घेत नाही..
मानस-मुग्धा सुद्धा युरोप टूरला निघून गेलेले असतात..
त्यामुळे त्या बाजूनेही दोघांची निराशाच होते..
बघता बघता जयच्या अमेरिकेला जायच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात..व्हिसा मिळतो आणि अवघ्या दोन आठवड्यांनी त्याला निघावं लागणार असतं..
कामं आणि तयारी इतकी असते की त्याला बाकी कसला विचार करायला वेळच मिळत नाही…
तरीही रोज उशीवर डोकं टेकल्यावर..डोळे बंद केल्यावर फक्त आणि फक्त अदितीच समोर येते…
साधी-सरळ…गबाळी…पण हुशार…
जातिवंत सुंदर..पण त्याची जाणीवही नसलेली..
निरागस…सेन्सिटिव्ह..पण आता हट्टी वाटत असणारी..
आणि मग लगेच अमेरिकेचा नकाशा समोर येतो..
पण त्याच्या स्वप्नांचं पारडं जड ठरतं…

इकडे अदितीला माहीतही नसतं जय इतक्या लगेच जाणार आहे..
तिने आधी त्याला साफ विसरून जायचं असंच ठरवलेलं असतं..
पण तिलाही रोज एकदातरी प्रकर्षाने जयची आठवण येतच असते…
मग ती पुन्हा विचार करायचा असं ठरवते…
आपण खूप तडकाफडकी निर्णय घेतला असं तिला उगच वाटून जातं..
ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करु लागते
आणि दुसऱ्याच दिवशी जयचा मेसेज येतो..

'USला निघालो आहे..एअरपोर्टवर आहे..
Miss you..'
अदितीचा विश्वासच बसत नाही..तिला त्या क्षणी धावत जावंसं वाटत असतं..पण अंगात त्राणच उरलेले नसतात..
'Have a safe flight..'
इतकाच रिप्लाय ती कसाबसा करते..आणि फोन बंद करुन टाकते..
तिचा इतका कोरडा रिप्लाय बघून जयला खूप आश्चर्य वाटतं..आणि रागही येतो..आता मात्र तो तिला विसरायचं असं पक्क ठरवतो…
तसंच डोकं सीटवर टेकवतो..डोळे मिटून घेतो..
आणि फ्लाईट take off होते….

अदिती रात्री दचकून उठते…
फोन शोधते..तो अजूनही स्विच ऑफ असतो..
चेहरा ओढल्यासारखा वाटत असतो..उशी अजूनही ओली असते..
ती घाई घाई फोन सुरू करते..
तो सुरू होईपर्यंतही तिला धीर धरवत नाही..
सारखं वाटत असतं हे सगळं स्वप्नच असेल..त्याचा असा कुठलाही मेसेज आपल्याला आला नसेल..आणि तो कुठेही गेला नसेल..
तिच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तिचा फोन सुरू होतो..
ती मेसेज बॉक्स चेक करते…त्याचा मेसेज अजूनही तसाच असतो..
आणि 'miss you too' असा मेसेज तिच्या drafts मध्येच खितपत पडलेला असतो..
ती पुन्हा अंथरुणावर अंग टाकते…आता अश्रूही कोरडे झालेले असतात..

इकडे जयचं फ्लाईट Dallas airport ला लॅन्ड होतं..
त्याला आता सेटल होईपर्यंत दुसरा विचार करणं शक्य नसतं..त्यात जेट लॅगमुळे काही सुचत नसतं..त्यामुळे तो मनातले विचार दाबून ठेवतो आणि अपार्टमेंटवर जाऊन बेडवर अंग झोकून देतो…

इकडे अदिती पुन्हा रुटीन प्रमाणे काम करायला लागते..तिच्यात झालेला बदल सगळ्यांनाच जाणवत असतो..पण अजून कोणालाही कारण कळलेलं नसतं…
तिकडे जयसुद्धा कामाला लागतो..नवीन ओळखी होत असतात..तिथली कामाची पद्धत समजून घेत असतो..आणि बदललेल्या वेळेशी जुळवून घेत असतो...
दोघांनीही कामात इतकं जुंपून घेतलं  असतं स्वतःला की बाकी काही विचार करायला वेळच मिळत नाही त्यांना..
त्यातच अदितीच्या घरुन लग्नासाठी स्थळं बघणं सुरू होतं...तिच्यावर कोणी जबरदस्ती करत नसतं, पण एकदा भेटण्याचा आग्रह मात्र खूप असतो..पण अदिती ठाम नकार देते..ती कोणाचंच ऐकत नाही...ह्यावरुन रोज घरात कटकटी सुरू झालेल्या असतात..आणि अदिती आणखी एकटी पडत जाते...

इकडे जयचा मित्रपरिवार वाढत असतो..वीकएंडला क्लबिंग आणि पार्टी जोरदार सुरू असतात...तो थोडा का होईना पण दारूचा आधार घेत असतो तिला विसरायला..
एका अशाच पार्टीत तो एका बाजूला ड्रिंक्स घेत बसला असतो..तेवढ्यात एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसते..
ड्रिंक्स ऑर्डर करते आणि बोलायला लागते..ती त्याच्या एका कलीगची मैत्रीण असते..लिसा..ती जवळच्याच दुसऱ्या शहरात रहात असते..क्लब मध्ये असल्याने बोलणं थोडच होतं..पण डान्स भरपूर होतो..आणि पुढच्याच्या पुढच्या वीकएंडला भेटायचं नक्की करून ती त्याचा निरोप घेते..जवळपास रोजच दोघांची फोनाफोनी किंवा मेसेजवर बोलणं सुरू होतं..जवळीक वाढत असते…आणि आता भेटीला एकच दिवस राहिला असतो....
जयसुद्धा खुश असतो...त्यादिवशी तो खूप दिवसांनी सहज फेसबुक चाळायला घेतो.. मुग्धाने त्यांच्या लग्नातले फोटो टाकलेले असतात...सुंदर आलेले असतात फोटो..अदिती खूप सुंदर दिसत असते…त्याचं मन पुन्हा त्या आठवणींमध्ये रमू लागतं..
अदितीचा फोटो बघत तो सगळ्या आठवणी ताज्या करत असतो.. इतक्यात फोनवर लिसाचा फोटो फ्लॅश होतो..तिचा फोन आलेला असतो...
दोन क्षण त्याला खूप विचित्र वाटतं..तो फोन सायलेंट करून बाजूला ठेऊन देतो..त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं...
सगळा अंधार दिसत असतो…
फक्त अंधार….

जयला जाग येते ती सकाळी दार वाजवण्याच्या आवाजाने…तो खडबडून उठतो..काही आठवत नसतं..
डोकं जड झालेलं असतं..शेजारी रिकामी बाटली पडलेली असते..खाली ग्लास फुटलेला असतो..तो तिरमिरतच दाराकडे जातो...डोळे चोळत दार उघडतो तर समोर लिसा..त्याला काही कळायच्या आत ती त्याला मिठी मारते…दोन क्षण त्याला सावरायला लागतात..आणि मग त्याला काल झालेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात..
अदिती आठवते..तिच्या आठवणीत रमलेला तो आठवतो..
मग लिसाचा आलेला फोन, अचानक वाटलेली हुरहूर, अस्वस्थता..
आणि ते सगळं पचवायला घेतलेल्या ड्रिंक्स…तरी अदितीचा चेहरा डोळ्यासमोरुन हलत नाही म्हणून केलेली आदळ-आपट..आणि मग थकून अश्रूंच्या साहाय्याने आलेली झोप….

लिसा अजूनही मिठीतच असते…तो एकदम तिला दूर लोटतो…आणि जायला सांगतो…कसंबसं सॉरी म्हणतो, पण ती आल्यापावली रागातच निघून जाते..तो दार लावतो आणि तिथेच मटकन खाली बसतो…त्याला सगळंच असहाय्य होत असतं..तो तसाच उठतो आणि फोन शोधु लागतो..फोन मिळताच तो लगेच अदितीचा नंबर लावतो..
काही क्षणांनी समोरून आवाज येतो…
'The number you have dialled is currently not in service.'

क्रमशः

- कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!