जाने तू या जाने ना..(भाग ७, शेवटचा)
जाने तू या जाने ना…?!
भाग ७ (शेवटचा)
इकडे अदिती कामात मन गुंतवायचा प्रयत्न करत होती..
पण तरी सारखी जयची आठवण येईच…कोणीतरी कॉफी घेणार का विचारलं तरी तिला जय आठवे..
आणि अशातच जयचं पत्र तिच्यापर्यंत पोहोचलं..
त्या दिवशी..घरी जायला निघता निघताच रघूने, तिथे काम करणाऱ्या स्टाफने तिच्यासाठीचं पत्र तिला दिलं...
पत्रावरचं नाव बघून तिचा विश्वासच बसला नाही..
ती तशीच स्टाफरूम मध्ये गेली आणि ते पत्र वाचायला घेतलं..
प्रत्येक शब्दागणिक तिचं मन भरुन येत होतं..
डोळे केव्हाच वाहू लागले होते…
तिने किमान चार वेळा वाचलं असेल नसेल तोच रघू पुन्हा आला आणि तिला त्या अवस्थेत बघून म्हणाला
'मॅडम..काय झालं..? तुम्ही ठीक आहात ना..?'
अदितीला पटकन कळलंच नाही तो आलेला..त्याच्या आवाजाने ती भानावर आली..
'हो…खूप दिवसांपासून ह्या पत्राची वाट बघत होते..खूप आंनद झाला वाचून..म्हणून हे अश्रू…'
'मग वांदा नाही..आत्ता फक्कड चहा आणतो बघा..'
इतकं म्हणून तो वळतो तेवढ्यात अदिती त्याला हाक मारते..
'रघू…आज चहा नको…कॉफी आण..ब्लॅक कॉफी…'
मान हलवून रघू निघून जातो…
आणि अदिती पुन्हा पत्र वाचण्यात मग्न होते…!
कम्पनी कडून जयला ग्रीन सिग्नल मिळाल्याचा मेल येतो..पण प्रोजेक्ट पूर्ण करुनच जाता येणार असतं त्यामुळे तो झपाट्याने कामाला लागतो..
एकीकडे अदितीचा विचार आणि दुसरीकडे काम..अशी दोन चकांची गाडी एकटा ओढत असतो..
इकडे अदिती घरी येते..आणि रात्री खूप वेळ विचार करत बसते..
आणि विचारांती जयच्या पत्राला उत्तर पाठवायचं नाही असा ठाम निश्चय करते…
दिवस जात असतात..
जय अगदी अदीतीसारखा होत असतो, त्याच्याही नकळत..
तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याशा करत असतो,
आवडून घेत असतो..
तिचा वेंधळेपणा आठवून स्वतःशीच हसत असतो..
तिच्या आठवणीत रात्र काढताना चहाचे कप रिकामे करत असतो..
आणि इकडे अदिती तिच्या निश्चयावर ठाम असते..
पण तिच्याही नकळत ती आतून मोहरुन गेलेली असते..
रोज अदितीच्या उत्तराची वाट बघणारा जय, दिवसेंदिवस थोडा खचत चाललेला असतो..पण हिम्मत हरत नाही..
कारण त्याचा विश्वास असतो त्याच्या प्रेमावर, त्याच्या अदितीवर..
तिला पत्र मिळालंच नसेल कदाचित..याच आशेवर तो दिवस काढत असतो..
बघता बघता निघायचा दिवस येतो,
मानस जयला आणायला येणार असतो एअरपोर्टला..
विमानात बसल्यापासून जय आणखीनच अधीर होतो..
त्याला अदितीची प्रत्येक आठवण सतावत असते..
आणि कधी एकदा भारतात पोहोचतो असं झालेलं असतं..
शेवटी एकदाची त्याची फ्लाईट लँड होते..
सगळे सोपस्कार करुन, सामान घेऊन जय बाहेर यायला निघतो..
गेटमधून बाहेर येताच समोर मानस हात करतो आणि जयला उजवीकडून बाहेर पडायला सांगतो..
जय त्या दिशेने बाहेर यायला निघतो..
गेटमधून बाहेर पडता पडता एका वायरवरुन ट्रॉली अडखळते आणि सगळ्यात वरती ठेवलेली बॅग खाली पडते..
जय ती उचलायला जातो तोवर त्याच्या हातातली बाटली घरंगळत पुढे जाते..आणि समोरच्या व्यक्तीच्या पायाशी थांबते..
दोघेही ती घ्यायला वाकतात आणि डोक्याला डोकं लागतं!
जय बघतो, हसणारी अदिती त्याच्याकडे बघत असते..
त्याचा विश्वासच बसत नाही..
दोघेही उभे रहातात…नखशिखांत एकमेकांना न्याहाळतात..
आपल्याला भास होतोय की काय असं जयला वाटत असतं..
डोळ्यांवर विश्वास बसत नसतो..
अदिती..
कडक इस्त्रीचा लॉंग कुर्ता..खाली लेग्गीन्गस..
व्यवस्थित बांधलेले केस..बारीकशी टिकली..हाताला घड्याळ
आणि उभं रहाण्याचा कॉन्फिडेंट स्टांस…
वेंधळा जय अपटूडेट अदितीला भेटत असतो..
आज त्याच्या पापण्या ओलावत असतात..
एक अपूर्ण नातं पूर्णत्वाकडे जात असतं..
आणि बॅग्राऊंडला उगच गाणं वाजल्यासारखं वाटतं…
जाने तू मेरी क्या है, जाने मै तेरा क्या था..
साथ तेरे हर पल, साथ हर लम्हा था..
जाने कैसी कशिश है, जाने कैसी खलिश है..
क्यूँ यह साँसे थमी है, आंखों में क्यूँ नमी है..
जाना दिल जाना कैसे मैंने न जाना..
के प्यार यही है, यह जाने तू या जाने ना..
जाना दिल जाना कैसे तूने न जाना..
ये प्यार ही है,
हाँ जाने तू या जाने ना…
समाप्त
- कांचन लेले
Khup chhan
ReplyDelete