जाने तू या जाने ना...(भाग ६)

जाने तू या जाने ना…?!

भाग ६

त्याने नंबर चेक केला..हाच नंबर होता तिचा..त्याच्याकडे दुसरा नंबर नव्हता..अगदी घरचाही नाही..त्याने न राहावून मानसला फोन केला..तो झोपेतच त्याने घेतला..त्याला आदीतीबद्दल विचारताच ती शिफ्ट झाल्याचं जयला कळलं..आणि मुख्य म्हणजे ती एकटीच शिफ्ट झाली होती..कोणाला काही सांगितलं नव्हतं..नंबर बदलला होता, सोशल साईट्स वरची अकाऊंट बंद केली होती..मुग्धाशीही काही बोलली नव्हती..काहीच कळायला मार्ग नव्हता..
मुग्धाने त्याला इतकंच सांगितलं की घरुन लग्नासाठी खूप फोर्स करत होते म्हणून ती खूप डिस्टर्ब असायची तेव्हा बोलायची तिच्याशी..त्यानंतर तिला युनिव्हर्सिटीत जॉबसाठी इंटरव्ह्यू दिल्याचं सांगितलं होतं तिने..पण ती अशी तडकाफडकी निघून का गेली हे कोणालाच कळलं नाही...
जयची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती..मुग्धा ही शेवटची आशा होती त्याची..
त्याने लगेच त्याच्या बॉसला फोन केला आणि परत जाण्यासंबंधी विचारलं..त्याला लगेच जाता येणार नव्हतं..एका महिन्याचा नोटीस पिरियड होता..आणि शिवाय त्याचं प्रमोशनही धोक्यात येणार होतं..पण त्याने मागचा पुढचा विचार न करता  त्याच दिवशी फॉर्मॅलिटीज् पूर्ण केल्या..आणि मग फेसबुक उघडून मुग्धाने टाकलेले फोटो बघत बसला..
अदिती कुठे असेल, काय करत असेल हे आणि असेच विचार सारखे डोक्यात येत होते…

इकडे झालं असं होतं की अदितीला लग्न करायचं नव्हतं..पण त्याचं कारणही ती घरात सांगत नव्हती..त्यामुळे घरात सारखे वाद होत होते..अशातच तिला जवळच्या शहरात युनिव्हर्सिटीमध्ये जॉब वेकन्सी असल्याचं कळलं..तिने लगेच अप्लाय केलं..इंटरव्ह्यू झाला..आणि काही दिवसातच तिला तो जॉब मिळाल्याचं कळलं..
तिने शिफ्ट व्हायचं ठरवलं..घरच्यांचा विरोध न जुमानता..
मुग्धाशी खूप दिवसात बोलणं झालं नव्हतं..तिला शिफ्ट होण्याचं काळवावं असं अदितीच्या मनात होतं, पण ते राहून गेलं..तिने रोजच्याप्रमाणे एकदा जयचं फेसबुक अकाउंट बघितलं..तिला वाटलं नेहेमीप्रमाणे जैसे थे असेल..पण त्याला टॅग केलेले..एका क्लबमधले फोटो होते…आणि त्यात त्याला खिटलेली लिसा होती..तिथे मात्र अदितीच्या सगळ्या आशा संपल्या…पार कोलमडून गेली ती मनातुन..आणि तिने रागात सगळी अकाउंट बंद करून टाकली आणि सिमकार्ड बंद केलं…आठवड्याने जायची होती ती लगेच तिसऱ्याच दिवशी निघून गेली..

इकडे जय कसेबसे दिवस रेटत होता..मुग्धाकडून ती कुठल्या शहरात गेली आणि का गेली हे त्याला कळलं होतं..पण तिचा फोन नंबर काही मिळाला नव्हता..त्याला फक्त आता तिला जाऊन भेटायचं होतं..दिवस जाता जात नव्हते आणि रात्र खायला उठत होती…
एका अशाच रात्री त्याला झोपच लागत नव्हती..तो उठला आणि डेस्क वर कागद पेन घेऊन बसला..

'प्रिय अदिती,
हे पत्र वगैरे कधीच लिहिलं नव्हतं गं..ई-मेल सुद्धा कामाचाच केला कायम..पण आज लिहावं वाटतंय..तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होते आहे पण काही दिवस तरी मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही..म्हणून शेवटी हा मार्ग..
अदिती..मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय..
माझ्या महत्वकांक्षा माझ्यासाठी कायमच महत्वाच्या होत्या..अगदी सगळ्यांपेक्षा..पण आज तसं नाहीये..मी बदललो आहे..
तुझ्यासाठी..किंबहुना..तुझ्यामुळे…
मला परत तुझ्याकडे यायचं आहे..आणि मी येणार आहे लवकरच..
फक्त तोपर्यंत खूप उशीर झाला नसेल ना गं...? अशी भीती वाटत राहते सारखी..माझी अदिती तशीच असेल ना माझ्यासाठी..? माफ करेल ना मला…?
उत्तर पठवशील मला..? मी खूप वाट बघतो आहे तुझी..
खूप बोलायचं आहे तुझ्याशी..पण मला आणखी लिहिता येत नाही..एवढं लिहिता आलं हेच खूप…
मी १४ तारखेला दुपारी १२ वाजता लॅंड होईन तिकडे..
कधी एकदा तुला बघेन असं झालं आहे…
तुझाच,
जय..'

त्याने लेटर सरळ यूनिव्हर्सिर्टीत अदितीच्या नावे पाठवलं..ती मराठीच शिकवत असणार त्यामुळे डिपार्टमेंटचं नावही घातलं..आणि आता त्याच्या हातात होत फक्त वाट बघणं..

जय लेटर पोस्ट करून आला…डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं..तो कॉफी करायला किचन मध्ये गेला..आणि स्वतःशीच हसला..मग कपाटातल्या टी बॅग्स काढल्या आणि चहा करु लागला…
तिच्या विरहाची कडू टी बॅग..
तिच्या आठवणींचा गोssड शुगर क्यूब..
तिला पुन्हा मिळवण्याच्या सकारात्मकतेची मिल्क पावडर..
आणि
तिच्या रंगात मिसळून जाण्याचं प्रतिक म्हणून पाणी…

त्याला कधीही न आवडलेला चहा आज मात्र खूपच प्रिय वाटत होता…

क्रमशः

- कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!