एक उनाड दिवस!
खूप दिवस काही वेगळं केलं नव्हतं…खरंतर काही केलंच नव्हतं असं तिला वाटत होतं.. मुंबईतलं आयुष्य म्हणजे मुंबईच्या गर्दीसारखंच झालं होतं..फक्त उभं राहिलं की गर्दी आपोआप तुम्हाला ट्रेनमध्ये चढवते आणि उतरवतेही…तसंच पहाटे गजर वाजला की यंत्रमानवासारखं एकामागून एक ठरलेली कामं करायची, घाई नेहेमीचीच..चहा सुद्धा एकीकडे भाजी हलवत प्यायचा..एका वेळी एक काम करणं म्हणजे तर पापच जणू..इतका वेळ वाया घालवायला तो काय झाडाला थोडीच लागतो..? एकीकडे कणिक मळायला घेताना आधी कूकर गॅसवर ठेवायचा..कणिक भिजेपर्यंत भाजी चिरायला घ्यायची, कूकर होत असताना दुसरीकडे चहाचं आधण ठेवायचं..कूकर बंद केला की तो काढून कढई ठेवायची, भाजी फोडणीला द्यायची मग चहा होतोच तोवर..एकीकडे भाजी, दुसऱ्या हातात चहा आणि डोक्यात ७.३२ ची ट्रेन! त्यात मुलांना उठवायचं, डबे भरायचे, सकाळचे केर-वारे कोणाला चुकले नाहीतच..संध्याकाळी येताना कुठली भाजी आणायची..? घरात कुठली भाजी आहे..? रात्री काय स्वयंपाक करायचा..? अरे देवा, उद्या उपवास आहे, रात्रीचं उरायला नको..मग साबुदाणे आहेत का..? येताना रताळी मिळतील का..? असे विचार करत, आदल्या दिवशीचं शिळं अन्न उभ...