मृगजळ..

मृगजळ..
आज संध्याकाळी सहज डोकं वर काढलं व्यस्त दिनक्रमातून आणि घेतला कॅमेरा हातात..खरंतर ह्याचं कारण वेगळं होतं..काल कोजागिरी पौर्णिमा होती..रात्री घरी येताना मला सोबत करत होता तो गोल गरगरीत देखणा चंद्र..येतायेतच ठरवलं होतं की घरी जाऊन ह्याला कॅमेरात बंद करायचं, पण घरी आले आणि राहूनच गेलं..तीच रुखरुख दिवसभर छळत होती..म्हणून म्हंटलं चंद्राचा नाही तर निदान मावळत्या दिनकराचा तरी फोटो काढावा..तर..म्हणून कॅमेरा घेऊन गॅलरीत उभी होते. झाडांमधून दिसणारा मावळतीचा सूर्य म्हणजे अप्रतिम दृष्य..पण शेवटी तोही घड्याळाच्या काट्यावर चालणारा..गेला निघून..पण तरी दिवस मोठे असल्याने अजून काही अंधार पडला नव्हता..म्हणून गॅलरीतच रेंगाळले जरा..सहज नजर खाली गेली आणि दिसलं ते जास्वंदीचं झाड..! काय सुंदर दिसत होतं..पूर्ण हिरवं आणि मधेमधे आलेली लालबुंद फूलं..त्याच्या शेजारीच सदाफुलीचं झाड काय बहरलं होतं..
या सदाफुलीची मला गंमतच वाटते..तिच्यात आणि माणसामध्ये किती साम्य आहे नाही..? माणूस जसा थंडी-वारा-ऊन-पाऊस काही काही न बघता कामाचा गाडा ओढत असतो, तशीच हि सदाफुली..ऋतू कुठलाही असो, आपल्याला नेत्रसुख द्यायला सदैव सज्ज असते..मग विचार केला की इतकं साम्य असूनही ही सदाबहार सदाफुली हवीशी आणि माणसाचं दाव्याला जुंपलेल्या बैलासारखं केलेलं काम नकोसं का वाटतं…? सोपं आहे की…सदाफुली फुलते ती निस्वार्थ भावनेने, दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी आणि माणूस मात्र झटतो तो केवळ हव्यासाने, स्वार्थी भावनेने...काही माणसं  सदाफुलीचे गूण घेऊन जगत असतात..काही मात्र काल्पनिक सुखाच्या मृगजळामागे वेड्यासारखे धावत असतात…
मग आपण कशात मोडतो…?
अं…जाऊदे…
तो विचार नको म्हणून सदाफुलीवरुन नजर हटवली आणि समोर बघितलं..रस्त्यापालिकडे एक झाड इतकं छान बहरलेलं..छोट्या पिवळ्या फुलांनी मढलेलं..लाइटिंगची माळ लावावी अगदी तस्सं दिसत होतं..निव्वळ अप्रतिम..! पण इतके दिवस कसं नाही दिसलं हे झाड आपल्याला…? त्याचं नावही माहित नाही..कदाचित..कदाचित ते आपल्या फायद्याचं नाही म्हणून नसेल माहित….फायदा…म्हणजे..म्हणजे..मीही मृगजळामागे धावते आहे का…? छे…काहीतरीच..
तोही विचार नको म्हणून नजर फिरवली..आणि चक्रावलेच..!
शेजारच्या झाडावर पांढरे बगळ्यासारखे पक्षी होते..अरे हो..!
ह्याच पक्ष्यांचे फोटो काढण्याच्या निमित्ताने गेल्यावर्षी हट्टाने कॅमेरा घेतला होता की…आणि तो घेतल्यावर मनसोक्त फोटोही काढले होते..
अरेच्चा..! म्हणजे कॅमेरा घेऊन एक वर्ष झालं..?
Time flies! म्हणतात ते उगच नाही..
माणूस काळाशी शर्यत लावून धावतो आहे..घोड्यासारखी स्वतःच्या डोळ्याभोवती ढापणं लावून..
एका रम्य संध्याकाळी, समुद्रकिनारी उभं असताना माणसाला त्या समुद्राकडे, त्याच्या आजूबाजूच्या देखण्या दृष्याकडे बघून समाधान वाटत नाही..कारण त्याची नजर शोधत असते त्या समुद्राच्या न दिसणाऱ्या दुसऱ्या किनाऱ्याला…आणि मग सगळं सोडून 'तो' न दिसणारा किनारा शोधायला निघतो हा पठ्ठ्या समुद्रात होडी टाकून..होडी पुढे जात असते…मागचं दृश्य धूसर होत असतं..ह्या किनाऱ्यापासून त्याचं अंतर अधिकाधिक वाढत असतं…दुसरा किनारा गाठण्याच्या वेडापाई त्याला हे अंतर जाणवतच नाही…
खूप प्रवास केल्यानंतरही तो किनारा काही सापडत नाही तेव्हा थकलेला देह जरा दम खावा म्हणून क्षणभर थांबतो…मागे वळून बघतो…पण चहूबाजूंनी दिसतं ते निळशार पाणी…डोळ्यात भरणारं..
माणूस भेदारल्यासारखा होतो…थंडगार वाऱ्यात दरदरून घाम फुटतो…आणि दाटून येतात त्या मागे सोडलेल्या किनाऱ्याच्या आठवणी…मग तोंडचं पाणी पळतं आणि डोळ्यातून टचकन खाली पडतं...पन तरी
निर्धाराने माणूस उठतो.…व्याकुळ मनात दाटलेल्या किनाऱ्याच्या ओढीने नाव वळवतो…
आशा असते मागे सुटलेलं सगळं परत मिळवण्याची..
आशा असते मधल्या गेलेल्या काळाची पोकळी भरुन काढण्याची...
आणि आशा असते यापुढे न दिसणाऱ्या किनाऱ्याच्या विचार न करता दिसणाऱ्या समुद्राला बघण्यात आनंद मानण्याची…

- कांचन लेले 

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!