Tom and Jerry!

टॉम अँड जेरी!
Tom and Jerry!
ड्राईव्ह करत असताना अचानक फोनने ओळखीची साद दिली..
निहारच्या नंबरला सेव्ह केलेल्या कस्टम रिंगटोनचा आवाज होता तो..
वैतागलेल्या रियाचा मूड एकदम बदलला..
तिला माहीतच होतं तो काही तिचा वाढदिवस विसरणार नाही..
पण रात्री १२ वाजता विश करायचा नेम मात्र त्याने आज मोडला होता..
पण आज त्याला ते माफ असलं पाहिजे होतं..
तिने आवाज ऐकताक्षणी मोबाईल घेण्यासाठी हात पुढे केला, आणि मग लगेच मागे घेतला..
'बघूदे थोडी वाट..मी नाही वाट बघितली रात्रीपासून..?
मान्य आहेत सगळी करणं...पण काय झालं असतं रात्रीच आठवणीने विश केलं असतं तर..आणि रात्री नाही केलं तर किमान सकाळी फोन तरी करावा..पण नाही..नेहेमीप्रमाणे मेसेज केला असेल..
आता विसरेलच तो मला..
आज इतके वर्षात पहिल्यांदाच वाढदिवसाला भेटणार पण नाहीये तो..
आता ह्याची सवयच करुन घेतली पाहिजे म्हणा..'
ड्राईव्ह करता करता स्वतःशीच अशी बडबड सुरु होती तिची..
'काय वेड्यासारखे विचार येतायत डोक्यात..त्याची बिचाऱ्याची काय चूक त्यात..? उगाच त्याला दोष देते आहे..आणि बदलत्या परिस्थिती प्रमाणे बदलायला नको का आपण..नवीन लोकांना सामावून पुढे गेलं पाहिजे....'
ताठ मनाच्या जुन्या बडबडीला बगल देऊन हळव्या मनाच्या ह्या नवीन बडबडीने तिला व्यापलं..
आणि मग न राहवून गाडी बाजूला घेऊन रियाने मोबाईल हातात घेतला.
'Happy Birthday Jerry :)'
दरवर्षीचाच पारंपरिक मेसेज इनबॉक्स मध्ये येऊन पडलेला होता..
'Thank You Tom'
पारंपरिक पद्धतीने तिने रिप्लाय दिला..
पण आज त्या रिप्लाय मध्ये स्मायली नव्हती...
त्याला मेसेज मिळताक्षणी तेवढाही फरक लगेच जाणवला..काहीसा अपेक्षितही होताच....
'Where's the party tonight..?'
लगेच निहारचा दुसरा मेसेज येऊन धडकला..
तिने मनात होणारी कालवाकालव शांत करण्याचा प्रयत्न करुन उत्तर पाठवलं..
'Out of your coverage area!'
त्याला हा मेसेज मिळताच त्याने तो शेजारी बसलेल्या मीराला
दाखवला...आणि दोघे मनसोक्त हसले..आणि मग त्याने
'Haha' एवढाच रिप्लाय पाठवला..
तिला थोडी आशा होती की तो म्हणेल मी पार्टी असेल तिथे येतो म्हणून..
पण छे..त्याचा रिप्लाय बघून तिचा मूड परत गेला..
फोन सायलेंटवर करुन तिने पुन्हा गाडी सुरु केली आणि ऑफिसला जायचा रस्ता धरला..
दिवसभर वाढदिवसाचे अनेक मेसेज, कॉल्स येत होते...
ऑफिसमधल्या कलीग्सनी साधंच पण छान डेकोरेशन केलेलं होतं..
लंच ब्रेक मध्ये केक कापला गेला...तिने सगळ्यांना पिझ्झा ट्रीट दिली..
पण मूड मात्र खास नव्हताच..
फक्त बाकीच्यांसाठी हसत होती ती..
एरवी दिवस कसा पटपट निघून जायचा..आज मात्र काही केल्या घड्याळाचे काटे पुढे सरकतच नाहीयेत असं वाटत होतं तिला..
४ च्या दरम्यान पुन्हा मेसेज आला निहारचा..
'See you at the airport by 8. Flight details in your mailbox'
तिने दोनदा तो मेसेज वाचला..एकदा तिला मस्करी वाटली...
मग एकदम आनंदाची उकळी फुटली..तिने त्याला लगेच कॉल केला..
'The number you have dialed is currently switched off..please try again later.'
ती परत हिरमुसली..पुन्हा मेसेज बघितला..
मग अचानक तिला आठवलं आपण ई-मेल चेक केला पाहिजे..
मेलबॉक्स उघडला पण त्याचा एकही मेल दिसला नाही..
रिफ्रेश केलं..तरी एकही नवीन मेल नाही..
आता मात्र तिला त्याचा प्रचंड राग येत होता..
तेवढ्यात नवीन मेल आल्याचा टोन वाजला..
तिने अधीरतेने बघितलं तर तो ऑफिसचाच मेल होता..
तिने रागाने फोन टेबलवर जवळपास आपटलाच..
आणि डोळे बंद करुन खुर्चीवर बसली..
डोक्यात असंख्य विचार..एकीकडे तो असं करणार नाही असा विश्वास तर दुसरीकडे राग अशी धुमश्चक्री सुरु होती..
काही वेळ असाच गेला..
गालांवर ओघळलेले अश्रू सुकूले होते..
आणि अचानक तिने चमकून डोळे उघडले...
मोबाईल हातात घेतला आणि ई-मेल अकाउंट ऑफिस वरुन पर्सनलला स्विच केलं..
मीराचा मेल तिची वाट बघत होता...त्यात फ्लाइट डिटेल्स होती...
तिला स्वतःचाच खूप राग आला...आणि तितकीच ती आनंदाने हरखून  गेली...अगदी सगळ्यांना ओरडून सांगावंसं वाटत होतं तिला..!!
घड्याळात बघितलं तर फक्त ५ वाजले होते..आता मात्र घड्याळाचे काटे पुढे सरकतच नाहीत असं वाटत होतं तिला..!
तिने लगेच सगळं आवरलं..ऑफिसमध्ये सांगून ती निघाली..
गाडीत अगदी आवडतं लता आणि रफीची ड्युएटस् असलेलं फोल्डर लावलं..
एअरपोर्ट जवळच्या मॉलपाशी गाडी उभी करुन ती आत गेली..
निहारसाठी तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट आणि मीरासाठी मात्र निहारचा आवडीच्या रंगाची कुर्ती घेतली..
आपल्या आवडीची चॉकलेट्स सगळ्यांसाठी घेतली..सगळी खरेदी झाली तरी घड्याळात मात्र ७ वाजले होते फक्त..मग काय करावं असा विचार करुन ती समोर दिसणाऱ्या कॉफीशॉपमध्ये गेली..
सगळं सामान ठेवलं आणि तिच्या आवडत्या कॅपुचीनोची ऑर्डर देऊन निवांत बसली..
सकाळपासून झालेलं सगळं आठवून तिला स्वतःचंच खूप हसू येत होतं..
तिने फोन मध्ये तिचे आणि निहारचे कॉलेजपासूनचे फोटो बघायला घेतले..सगळे फोटो एका वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवले होते तिने..
अगदी अकरावी-बारावीत असतानाचे ते दोघे..रिया अगदी बावळट आणि नुकतं मिसरुड फुटत असलेला निहार शेमळट दिसत होते!
इतक्यात तिची ऑर्डर घेऊन वेटर आला..
मग एक एक घोट घेता घेता एक एक वर्षाच्या आठवणी पुढे सरकत होत्या..एफ व्हाय..एस व्हाय..टी व्हाय..
अगदी ग्रॅज्युएशन पार्टी...मग नोकरी लागल्यावर पहिल्या पगारातून केलेली पार्टी..दर वर्षीची वाढदिवसाची पार्टी..मग दोन वर्षांनी निहार आणि मीराचं जमल्यावर केलेल्या पार्टीचे फोटो..मग अगदी आत्ताचे..त्या दोघांच्या लग्नाचे फोटो..
रियाने निहारची बिदायी करताना काढलेले स्पेशल वात्रट फोटो..
काही मिनिटात अनेक वर्षांच्या आठवणी डोळ्यापुढून गेल्या..
कप रिता झाला होता..आणि मन मात्र काठोकाठ भरलं होतं..
७.३० वाजून गेले होते..
तिने सामान घेतलं आणि गाडीत ठेवलं..आणि एअरपोर्ट कडे निघाली..
टर्मिनल गेटपाशी उभी राहून मिनिट मिनिट वर्षासारखं वाटत होतं तिला..आणि शेवटी दिसले दोघे..
ते येताच तिने दोघांना घट्ट मिठी मारली..
'आता काय गुदमरुन मारतेस कि काय..म्हणजे तुझा वाढदिवस आणि आमची पुण्यतिथी..!' इति निहार..
रिया त्याला मारत मारत 'लाज वाटते तुला थोडी तरी असलं बोलायला..? येणार होतास तर आधीच नाही सांगता आलं..मुद्दाम मला छळतोस..'
आणि तो तिचे फटके चुकवत चुकवत शेवटी मीरामागे लपला..
'का..? तुला एवढी खात्री नको कि आम्ही येऊ..? पण नाही..आता हनिमूनला गेलोय म्हणून मी तुला विसरणार..मग आता ह्याची तुला सवय केली पाहिजे..आता सगळं बदलेल असले भाकड विचार करत बसली असशील ना..?'
त्याच्या अचूक अंदाजानेसुद्धा रिया सुखावते..
मीरा आनंदाने दोन वेड्या मित्रांना भांडताना बघत असते..
आणि आजही
टॉम अँड जेरीचा खेळ सुरूच रहातो..!

- कांचन लेले

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!