नातं.. (भाग २)

भाग २..

'Hello..? कुठे तंद्री लागली आहे साहेब..? थंड होईल ना भाजी..टूट पडो!' ..दोघांनी पावभाजी फस्त केली आणि निघाले..
'चल मी निघते..उद्या कॉलेजला भेटू..'
'अगं मी येतो ना तुला सोडायला..'
'नको रे..इतका काही उशीर नाही झालाय..मला सवय आहे..'
'मला आत्ता काही काम नाहीये..आणि तेवढीच तुला कंपनी..!'
विहानने हट्टच केला..मग नीरजानेही ऐकलं त्याचं..तिला त्याचा एवढा आग्रह थोडा विचित्र वाटला पण तिने तितकं सिरियसली घेतलं नाही..
विहान गप्पा मारता मारता नीरजाच्या आवडी-निवडी, शाळा,
घरचे इ. बऱ्याच विषयांची माहिती काढून घेत होता..
आणि ते तिच्या घरापाशी पोहोचले..ती त्याला bye म्हणून निघाली..तो मात्र थोडा वेळ तिथेच रेंगाळला…
दुसऱ्या दिवशी मैत्रिणींनी नीरजाला आणि मित्रांनी विहानला खोपच्यात घेतलं…पण दोघांकडूनही निराशाच पदरी पडली..! 

पण त्या दिवसानंतर विहानचं वागणं मात्र बदलत चाललं होतं..
एरवी जोडप्यांच्या ग्रुपमध्ये बोर होतं असं म्हणणारा विहान आता सारखा ग्रुप बरोबर दिसू लागला..
काही दिवसांनी सगळ्यांना कॉलेजकडून स्टडी लिव्ह मिळाली...त्यामुळे कॅन्टीन आणि लायब्ररी दोन्हीकडे जास्ती वेळ जाऊ लागला..
वेगवेगळ्या वर्गात असल्याने आधी कमी होणाऱ्या भेटी आता खूप वाढल्या...दोघांची आता चांगलीच मैत्री झाली होती..

नीरजा त्याला चांगला मित्रच मानायची..पण ग्रुपमध्ये वेगळेच वारे वहात होते!
आता विहानचा जवळपास जोकर झाला होता…म्हणजे 'ग्रुपचा जोकर' अशीच त्याची ओळख झाली होती..आला रे आला की सगळ्यांना हसवायला सुरवात करायचा ते अगदी सगळे 'आता बास' म्हणेपर्यंत हसवायचा..त्याचा स्वभावच होता तो..पण अलिकडे त्या स्वभावाला जास्तीच उधाण आलं होतं..!
नीरजाचं खळखळून हसणं त्याला खूप आवडायचं…ती हसायला लागली की एकटक तिच्याकडे बघत हरवून जायचा..

इतर मित्रमैत्रिणी हा तिच्या प्रेमात पडला असं वाटून प्रोत्साहनच देऊ लागले..तो आला की नकळत इतर सगळ्यांची मिश्किल नजरानजर होऊ लागली..
त्याला मात्र या कशाचाच गंध नव्हता..
तो आपल्याच जगात होता..जे जग आता नीरजाभोवती फिरत होतं..

आणि तिला…?
सुरवातीला तिला काही विशेष नाही वाटलं..
नंतर ती त्याच्यावर लक्ष ठेऊन असायची..त्याचं तिच्याकडे एकटक बघणं तिला खटकू लागलं..त्याच्या डोळ्यात तिला नेहेमी काहीतरी वेगळंच दिसायचं..सगळे चिडवत असले तरी तिला खात्री होती की हे काही प्रेम नाही…
तिची खूप घुसमट होऊ लागली.. आणि इकडे
विहान मात्र दिवसेंदिवस नीरजाबाबत पझेसिव्ह होत होता..
ती त्याला टाळायचा प्रयत्न करायची पण हा कसंही करुन तिला भेटायचाच..
एक दिवस असहाय्य होऊन तिने प्रीतीला, तिच्या जवळच्या मैत्रिणीला हे सांगितलं कि काहीतरी गडबड आहे..पण प्रीतीने हसून त्यावर तिलाच ऐकवलं कि विहान तिच्या प्रेमात आहे एवढीच गडबड आहे!
नीरजाने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला की हे प्रेम नाही..पण प्रितीने तिलाच वेड्यात काढलं...
नीरजाला आता मात्र टेन्शन येऊ लागलं होतं..

तिचं हसणं विरुन गेलं होतं..सांगायचा प्रयत्न केला तरी ऐकणारं कोणी नव्हतं..घरी सांगितलं तर विहानचं काही खरं नव्हतं..पण तिला तसं करायचं नव्हतं..कारण तो तिला तसा काहीच त्रास देत नव्हता..तिच्यापाठी असला तरी flirt करत नव्हता हे तिला जाणवत होतं...त्याचा भाभडेपणा जाणवत होता…पण मग भानगड काय होती..? का तो असा विचित्र वागत होता..?
तिला काहीच कळेना...

क्रमशः

-कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!