गिरनार - एक अद्भुत अनुभव..!
काल एका पोस्ट मध्ये गिरनारचा उल्लेख आला आणि फेब्रुवारी २०१६ रोजी केलेल्या गिरनार यात्रेच्या आठवणी ताज्या झाल्या..
आम्ही १४ जण होतो..साधारण वयोगट १२-७२..गिरनार ला जायच्या आधी ८ दिवस आमचा श्री क्षेत्र सोमनाथ येथे मुक्काम होता..कारण होतं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण..हा योग साधून आला तो माझे गुरू श्री.अंकुश दीक्षित यांच्यामुळे, ज्यांच्याकडे मी संगीत शिकत आहे (आम्ही त्यांना सर असं संबोधतो..पुढील उल्लेख तसाच येईल)..मुंबईतून निघताना गिरनार कडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक challenging trek असा होता..९,९९९ पायऱ्या असलेले तीन डोंगर असं सारखं घुमत होतं डोक्यात…पण सोमनाथ मधले दिवस जसे उलटत गेले तसा दृष्टिकोनही बदलत गेला..आता ओढ लागून राहिली होती ती दत्तगुरूंच्या दर्शनाची…
गाथा पारायण झाल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो गिरनार कडे..साधारण रात्री ९ च्या दरम्यान पोहोचलो आणि गाडीतून खाली उतरता क्षणी डोळ्यात भरली ती डावीकडे दिसणारी दीपमाळ…मिट्ट काळोख आणि जणूकाही हवेतच तरंगत असलेले पांढरे दिवे गिरनारच्या पहिल्या टप्प्याची उंची दाखवत होते..नुसतं बघत रहावं असं दृष्य.. राहायची व्यवस्था करून, जेऊन, झोपायला १२ वाजून गेले..पहाटे ३ वाजता सुरु करायचं ठरवलं होतं व त्याप्रमाणे ३ च्या दरम्यान बाहेर पडलो, काठ्या घेतल्या व पायथ्याशी पोहोचताच सरांच्या मार्गदर्शनाने एकत्र प्रार्थना व ओंकार करून चढण्यास प्रारंभ केला.. ऐकून होतो कि तीन डोंगर आहेत एकूण, पण दिसताना एकच दिसत होता, अंदाज बांधत बांधत मार्गक्रमण करत होतो.. हवेत गारवा होता..जसजसं वरती जात गेलो तसतसं हवेतल्या गारव्याच्या विशेषणाची जागा घेतली शीतलतेने…ती शीतलता होती एका शक्तीचं अस्तित्व जाणवून देणारी, भिऊ नकोस निर्धास्त होऊन चढ, मी आहे…असं सांगणारी…
तब्बल सहा तासांनी 'अंबाजी' म्हणजेच पहिल्या डोंगराच्या टोकाला पोहोचलो…दर्शन घेऊन बाहेर बसल्याबसल्याच झोप काढली आणि पुढे निघालो..पुढचा डोंगर तसा तुलनेत छोटा होता..मात्र त्याच्या टोकावर गेल्यावर जे तिसऱ्या टप्प्याचं दर्शन घडलं त्याने एकीकडे जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं आणि दुसऱ्या क्षणी आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं अशक्य आहे असं वाटून गेलं..आम्ही असे नकारार्थी बोलायला लागलो कि आमचे सर आम्हाला तिथेच थांबवतात, या वेळीही तसंच झालं..आणि त्यांनी सुरवात केल्यावर आम्हाला जावंच लागलं.. पण प्रामाणिकपणे कबुल करावंसं वाटतं कि तिसरा टप्पा गाठताना सगळ्यात कमी क्षीण जाणवला..दर्शनाच्या ओढीने असेल कदाचित..आणि एक-दोन एक-दोन करत शेवटी आम्ही टेकडीवर असलेल्या इवल्याश्या मंदिरात पोहोचलो…दर्शन झालं..मूर्तीसमोर बसलो…
आता त्या शीतलतेची जागा घेतली शांततेने…शांतता मनाची, शांतता देहाची आणि शांतता विचारांची…आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो..तशी गर्दी होती खरंतर.. चपला काढल्या होत्या तिथे सर बसले आणि अचानक 'पैल मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी..' हा अभंग म्हणू लागले..मी नजरेनेच आत जाऊया का असं विचारलं आणि ते तत्काळ उठले..आत बसले..मग दत्तगुरूंसमोर सर, त्यांच्या पायाशी पायरीवर मी आणि समोर त्यांची कन्या..असे तिघं मिळून गात होतो..विशेष म्हणजे त्या दहा मिनिटात तिथे फक्त एक किंवा दोन भक्त आले..आता हि दत्तगुरूंची सेवा रुजू करून घ्यायची इच्छा म्हणा, किंवा निव्वळ योगायोग…कृतार्थ होऊन आम्ही परत दर्शन घेऊन खाली निघालो…….
आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..डोळ्यासमोरुन दत्तगुरूंची प्रतिमा हलत नव्हती..कानात 'पैलमेरुच्या शिखरी' अभंग घुमत होता..त्या भारावलेल्या अवस्थेतच तो डोंगर उतरून खाली आलो, तिथे दोन वाटा होत्या..एक परतीचा रस्ता होता आणि दुसरा रस्ता अन्नदान होत होतं त्या जागी नेणारा होता.. आम्ही चढत असताना काही लोक खांद्यावर-डोक्यावर पोती घेऊन जाताना दिसले होते, एक माणूस तर चक्क सिलेंडर घेऊन गेला..आम्हाला जिथे पाठीवरच्या छोट्या बॅगेचं ओझं वाटत होतं तिथे या लोकांमध्ये एवढं वजन तिसऱ्या डोंगराच्या पायथ्याशी आणायची शक्ती येते कुठून….? हे फक्त शारीरिक सामर्थ्य आहे का..?
नक्कीच नाही..त्यामागे एक शक्ती आहे जिच्यामुळे आजतागायत गिरनार येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तास अन्नदान होतं.. कधी काही कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही..सूर्य चांगलाच तळपत होता आणि पुढचा पल्ला बघता आम्ही अनिच्छेनेच पहिला, परतीचा रस्ता धरला.. जिथे पायऱ्या उतरतानासुद्धा पायाला झिणझिण्या येत होत्या तिथे आम्ही आता दुसऱ्या डोंगराचं चढण सुरु केलं....
सलग काही पायऱ्या चढायच्या, मग दोन मिनिटं थांबायचं असा प्रवास सुरु होता..उन्हाच्या चांगल्याच झळा लागत होत्या, पण मनाला मिळालेल्या थंडाव्यापुढे अजूनही फिक्याच होत्या.. मधे-मधे पाणी-लिंबु सरबत-छास असं घेत होतो..खाणं मात्र टाळत होतो..एवढं असूनही १२ तासात शरीरधर्माची जाणीव झालेली मला आठवत नाही…एवढ्या तळपत्या उन्हात सुद्धा दोन ठिकाणी थांबलो तिथे काही मिनिटंच का होईना पण शांत झोप लागली आणि परत चढाईसाठी आम्ही ताजेतवाने झालो..
खाली येईपर्यंत पाय मात्र चांगलेच भरुन आले होते…तरी हळू हळू मार्गक्रमण करत आम्ही रहात होतो तिथे पोहोचलो…
रात्री जेवायला बाहेर पडलो तेव्हा परत पहिल्यावेळी दिसलेलं दृष्य दिसलं..मिट्ट काळोख आणि त्यात मार्ग दाखवणारे पांढरे दिवे....शरीर अशा स्थितीत होतं कि उठता-बसता धड येत नव्हतं तरी ते दृश्य बघुन परत जायचा मोह झाल्यावाचून राहिला नाही...पण इलाज नव्हता, दुसऱ्या दिवशी पहाटे समाधानाने भरुन तरीही जड अंतःकरणाने पुढच्या नियोजित प्रवासाला निघालो….
खाली काही फोटो जोडले आहेत त्यातले पहिले दोन दत्तात्रयांच्या स्थानाचे आहेत..दुसऱ्या डोंगरावरुन दिसलेलं दृश्य हे होय..मागच्या लेखात मंदिराला 'इवलंसं' म्हणायचं कारण दुसऱ्या फोटोत दिसून येईल..ते मंदीर कसं बांधलं असेल, आजवर ते कसं टिकलं असेल असे प्रश्न पडले नाहीत, कारण श्री क्षेत्र केदारनाथ येथे गेलो असता तिथेही हि प्रचिती आली होती..सगळं उध्वस्त झालं तेव्हा मंदिराला मात्र धक्कासुद्धा लागलेला नाही..असो..
उर्वरित फोटो प्रथम पल्ला गाठल्यावर तिथून काढलेले आहेत..एका फोटोत एक प्रचंड शिळा, त्यावर झेंडा आणि फासलेलं शेंदूर दिसतं.. पण ती शिळा अश्या ठिकाणी आहे, कि तिथपर्यंत पोहोचणं निव्वळ अशक्य आहे..
आणि एक फोटो माझा विशेष आवडता आहे..दोन डोंगर आणि त्यातून जाणारी चिंचोळी वाट...संकटाचे कितीही डोंगर आयुष्यात आले तरी त्यातून एक चिंचोळी का होईना वाट असते, ती आपण शोधायची असते..जणू असंच काहीसं सांगणारं ते दृश्य..
एकूणच गिरनारचा संपूर्ण प्रवास सुंदर अनुभव देऊन गेला..
आणि हा अनुभव पुन्हा पून्हा घेण्याची इच्छा उरी बाळगून इथेच थांबते..! :)

- कांचन लेले
-कांचन लेले
Comments
Post a Comment