Wednesday, 4 January 2017

नातं.. (भाग ३)

भाग ३..

नीरजाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं…
एकीकडे तिला विहानचं विचित्र वागणं छळत होतं..तर दुसरीकडे जवळ येणाऱ्या परीक्षेची काळजी छळत होती..
परीक्षेच्या दृष्टीने आत्ता कुठलीच हालचाल करणं योग्य नाही असं तिला खूप विचारांती लक्षात आलं होतं...
सध्या या सगळ्याकडे दुर्लक्ष करु, अभ्यास व्यवस्थित झाला आणि परीक्षा झाली की नंतर या प्रकरणाचा छडा लावू असं तिने मनाशी पक्के ठरवले..

विहानच्या खरेपणाबद्दल तिला मनोमन खात्री होती..पण तरी कुठेतरी एक धाकधूक होती की सगळे म्हणतात तसा खरंच तो प्रेमात पडला नसेल ना माझ्या..? पुन्हा मनात विचारांचा कल्लोळ उठला..तिने स्वतःला शांत केलं..आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम रहायचा निग्रह केला, पण त्याचबरोबर विहानला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन द्यायचं नाही असंही तिने ठरवलं.
.

दिवस जात होते...परीक्षा जवळ येत होती..अभ्यासाच्या निमित्ताने भेटी खूपच कमी झाल्या होत्या...पण तरी विहान रोज नीरजाला फोन करतच असे..मधेच एखाद दिवशी तिच्या घराजवळ जाऊन तिला फोन करुन खाली बोलवत असे व मग कधी 'सहजच इकडे आलो होतो म्हणून म्हंटलं भेटू तुला' तर कधी 'अमक्या विषयाच्या नोट्स हव्या होत्या' अशी कारणे देऊन तिला भेटत असे..नीरजा खूप शांतपणे हे सगळं हाताळत असली तरी आतून मात्र ती खूप कंटाळली होती ह्या सगळ्याला..

एक दिवस तिला एक कल्पना सुचली..
तिने परीक्षेनंतर सुट्टीत कुठेतरी बाहेर जाण्याचा हट्ट आई-बाबांकडे केला..त्याप्रमाणे काहीच दिवसात सुट्टीची व्यवस्था करुन आई-बाबांनी सुट्टीत केरळला जायचं नक्की केलं..बुकिंग झालं आणि नीरजा जरा निर्धास्त झाली..
तिने ह्या बाबतीत कोणालाच काही सांगितलं नव्हतं..विहानशी नेहेमीसारखंच वागत होती..त्यालाही अभ्यास करायला प्रोत्साहन देत होती..परीक्षा अगदी उद्यावर आली..नीरजा आणि विहानचं परिक्षाकेंद्र वेगळं होतं त्यामुळे परीक्षेच्या काळात तरी भेटण्याचा प्रश्न नव्हता..फोनवर वेळ निभावून नेता येत होती..

एक एक दिवस जात होते..आणि अखेर परीक्षा संपली..त्या दिवशी शेवटच्या पेपरनंतर सगळा ग्रुप एकत्र कॉलेजमध्ये भेटला..
एन्जॉय केलं आणि सगळे घरी गेले..पुढचे दोन दिवस नीरजाने फोनवरच विहानची बोळवण केली..आणि तिसऱ्या दिवशी सकाळीच ती घरच्यांसोबत केरळला गेली..तिने ठरवल्याप्रमाणे नेहेमीचा नंबर तात्पुरता बंद ठेवला होता...
इकडे विहान दिवसभर फोन करत होता पण फोन बंद असल्याचं कळलं..
संध्याकाळी तिच्या घरी जाऊन आला पण तिथे घराला कुलूप दिसलं..तो खूप अस्वस्थ झाला..
सगळ्या मित्र मैत्रिणींना फोन करुन चौकशी केली पण कोणालाच काही माहित नव्हतं..

असं पुढचे तीन दिवस चाललं..पण रोज त्याच्या हाती निराशाच येत होती..
तो पुरता अस्वस्थ झाला…नुसता मख्खासारखा कुठेतरी बघत घरात बसू लागला..
ह्या बरोबरच दिवसेंदिवस त्याचं खाणं-पिणं कमी होत होतं..पाचव्या दिवशी त्याने नेहेमीप्रमाणे सकाळी फोन केला, पण फोन बंदच होता..घरी जाऊन आला तर तिथेही कुलुपच होतं..

आता मात्र तो पुरता हैराण झाला होता..राग, काळजी, अस्वस्थता ह्या सगळ्यांच्या मिश्रणाने त्याची अवस्था फारच बिकट झाली होती..त्याने घरी येऊन स्वतःला कोंडून घेतलं..त्या दिवशी त्याने काहीच खाल्लं नाही..आधीच अशक्त झालेल्या त्याच्या देहाला हे सहन झालं नाही...

घरातल्यांना काही कळेना..त्याच्या मित्रांना विचारलं पण कोणी काही सांगेना..शेवटी अशक्तपणा येऊन दुसऱ्या दिवशी तो बेशुद्ध पडला..त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं..तेव्हामात्र घरच्यांनी सगळ्या मित्रांना बोलावून खडसावून विचारलं आणि त्यांना नीरजाबद्दल खरं सांगावं लागलं…
घरच्यांचा विश्वास बसेना...
इतक्यात विहानला शुद्ध आली..
आणि…आणि त्याचा क्षीण आवाज कानावर पडला…

'आदू……
अदिती…..'

क्रमशः

- कांचन लेले

No comments:

Post a Comment

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...