आकाशात उंच झेप घेताना..!
आकाशात उंच झेप घेताना…
तारिख- ८ जून २०१६.
स्थळ- मुंबई.
स्थळ- मुंबई.
साधारण ५.३० च्या दरम्यान टॅक्सी विमानतळाच्या बाहेर थांबली..एक मोठी बॅग आणि एक माझं अर्धांग, म्हणजे पाठीवरची सॅक, अशा दोन बॅगा घेऊन प्रवेशद्वारातून पदार्पण केलं..थोडं पुढे गेल्यावर चेक-ईन लगेज जमा करायचं काउंटर होतं, तिकडे बॅगेचं वजन झालं आणि जशी ती आत जाऊ लागली तसा माझा ऊर भरुन येत होता..परत दिसेल ना, आहे तशीच पोहोचल्यावर मिळेल ना, ह्याच कार्गो मधून येईल ना ई. विचारांना झुगारुन पुढे गेले तरी एकदा वाटलंच कि एक काळी तीट लावायला हवी होती..
पुढे घेतलेले टॅग माहिती भरुन अर्धांगावर अडकवले आणि पुढे माझी आणि अर्धांगाची झडती झाली..सुखरुप सुटलो..आणि मग काय..आता जवळपास दीड तास होता..मग थोडा फेरफटका मारला आणि एके ठिकाणी बसले..थोड्यावेळ भ्रमणध्वनी तपासला आणि शेवटी हुकमी एक्का म्हणून एक जाड पुस्तक काढुन बसले..कसा वेळ गेला कळलं सुद्धा नाही..पुस्तक हातात घेतलं तेव्हाची तुरळक लोकसंख्या आता तुडुंब म्हणण्याइतपत झाली होती...रांगेत उभी राहिले आणि ५ मिनिटात झाला विमान प्रवेश..!
विंडो सीट आधीच घेतल्याने आरामात लाईनीत शेवटी उभी होते…बस आणि ट्रेन मध्ये असं रोज करता आलं असतं तर काय मज्जा ना..? असं आपलं उगाच माझ्यातल्या 'खिडकीप्रेमी मुंबईकर' मनाला वाटून गेलं..सीट अगदी मध्यावर म्हणजे विमानाच्या पंखाला लागुन होती..मी शेवटी असल्याने २-४ सोडता सगळे लोक बसले होते आणि नंबर बघत मी सीटपाशी आले.. (सीट रिकामी बघून काय बरं वाटलं..म्हणजे उगाच 'हमारा रिझर्वेशन है' असं सांगून बसलेल्या माणसाला उठवायला मला इतकं जिवावर येतं म्हणून सांगू….)…
तर बॅग वर ठेऊन मी एकदाची स्थानापन्न झाले.. एअर होस्टेस दोन फेऱ्या मारुन गेली…मी लगेच त्यांच्या भाषेतली 'कुर्सी कि पेटी' बांधून घेतली..मग हळूहळू कंपनं जाणवू लागली आणि उगाच माझ्या मध्यमवर्गीय पोटात एक पिटुकला गोळा येऊन गेला..मग अनौन्समेंट सुरु झाली..एअर होस्टेस जागोजागी उभं राहून त्याचं प्रात्यक्षिक दाखवत होते...आणि त्याच वेळी विमान पुढे जाऊ लागलं..शकलं झाली ओ काळजाची, काय सांगू..?..एकीकडे अज्ञानामुळे त्या एअर होस्टेस कडे लक्ष द्यावसं वाटत होतं आणि एकीकडे पहिल्या वहिल्या विंडो सीट विमान प्रवासाचे सुरवातीचे क्षण चुकवायचे नव्हते..मग अर्धं इकडे अर्धं तिकडे असं करत ५ मिनिटं गेली आणि थांबली एकदाची अनौन्समेंट..मग अगदी शहाण्या मुलासारखं एकटक लक्ष खिडकीकडे..!
आता विमान जरा वेग घेऊ लागलं आणि रेल्वेच आठवली..३०-४० सेकंद अगदी रेल्वेच वाटली..! आणि मग भरारी घेतली एकदाची आमच्या विमानाने…खाली माझी सुंदर मुंबई (विमानातून बरीच झोपडपट्टीच दिसली आधी..तरी) मागे सोडून जाताना जsssरा वाईट वाटल्याशिवाय राहिलं नाही..मग खालचा अथांग समुद्र दिसला आणि जीव सुखावला..आणि आता मी वाट बघत होते ती ह्याच्या पार जाण्याची..मऊ मऊ ढगांची..आणि हाकेसरशी आलेच ते लगेच…आहाहा…पांढऱ्या रंगाचं हे सौंदर्य पहिल्यांदाच अनुभवत होते मी..मधेच दूरवर निळसर रेघ दिसत होती..मग उगाच आपलं 'ढग एकमेकांना आपटले कि आवाज येतात..मग ढगांना विमान आपटलं तर आवाज येत असेल का..? विमानाचा तोल ढळत असेल का..? एका ढगामधुन विमान गेलं तर त्याचे दोन भाग होत असतील का..? असे प्रश्न सतावून गेले..
आता जरा कानात दडे बसू लागले होते..आणि आईने कानात घालायला दिलेला कापूस आपण हुशारीने बॅगेतच विसरलो होतो हे लक्षात आलं..मग काय आलिया भोगासी असावे सादर..! जरा गरगरल्यासारखं पण होत होतं.. पण त्याच्या तयारीतच होते मी..!
मग परत लक्ष बाहेर गेलं..आता सूर्यराव चांगलेच दिसू लागले होते..आणि आणखी वर गेल्याने ढग सुद्धा खूप दिसत होते..एकदा वाटलं टुणकन उडी मारुन खिडकीला लागून असलेल्या पंख्यावर जावं आणि लोकं 'वॉटर सर्फिंग' करतात तसं 'क्लाऊड सर्फिंग' करावं..विचारानेच गुदगुल्या झाल्या आणि परिणाम चेहऱ्यावर झाला..मग लक्षात आलं कि शेजारचा माणूस तिरक्या नजरेने काय गडबड आहे बघत होता..तसा मी परत चौकोनी चेहरा पांघरला आणि मोर्चा खिडकीकडे वळवला…
सूर्यराव चांगलेच फॉर्मात आले आणि मी अनिच्छेने खिडकीचं शटर खाली केलं..मग अधून मधून डोकावून बघत होते..मधेच मात्र एक निराशेचा विचार येऊन गेला..लहानपणी प्रश्न पडायचा कि देवबाप्पा कुठे रहातो..? मग मोठी माणसं उत्तर द्यायची वरती आकाशात रहातो..
विमान जसजसं ढगात प्रवेश करत होतं तसतसं मला अगदी १ टक्का का होईना पण वाटत होतं कि आता एका टुमदार ढगावर शेषशाही विष्णू आपल्या खास पहुडलेल्या पोझ मध्ये दिसतील..साक्षात निळकंठ रामाचं ध्यान करताना दिसतील आणि झालंच तर आपले लाडके बाप्पा ढगावर मांडा ठोकून मोदकाचं ताट रिकामं करत असतील…पण छे…फसवलं सगळ्यांनी आपल्याला…
मग आपल्या वेडेपणाचं परत हसू आलं पण ह्या शुष्क होत चाललेल्या जगात आजही अपल्यायतलं निरागस मुल जिवंत आहे ह्या अनुभवने मात्र सुखावले मी..आणि त्या सुखाच्या आड लँडिंगची अनौन्समेंट आली तसं लगेच मी खिडकीचं शटर उघडलं..हळू हळू खालची हिरवळ दिसू लागली होती..पुढे परत समुद्र दिसला तेव्हा विमान तिरक्या दिशेत खाली जात होतं..
मग उगाच वाटून गेलं मगाशी सेफ्टी अनौन्समेंट नीट ऐकली पाहिजे होती..पण सुदैवाने तोवर परत जमीन दिसू लागली अन हायसं झालं..आता हळूहळू चेन्नई शहर नकाशासारखे दिसू लागले होते..हिरवे चौकोन-गोलाकार भाग, मातीचे चौकोन-गोलाकार-आयताकृती भाग..खेळण्यातल्या वाटाव्या अशा इमारती, मुंगीएवढ्या गाड्या आणि आणखी खाली आलो तेव्हा नीट बघितलं तर काय मस्त रंगीबेरंगी इमारती दिसल्या..आपला चॉईस चुकला नाही राव..छान दिसतंय शहर...अश्या विचारात असतानाच मोssठ्ठी मोकळी जागा दिसली..परत जीवात जीव आला..विमान जमिनीला टेकलं.. परत ३० एक सेकंद रेल्वेचा भास झाला..आणि मग थोडं कंपन स्थितीतून जाऊन विमानाने पूर्णविराम घेतला..!
अश्या प्रकारे आकाशात उंच भरारी घेण्याची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली…! :)
अश्या प्रकारे आकाशात उंच भरारी घेण्याची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली…! :)
- कांचन लेले
Comments
Post a Comment