नातं.. (भाग ४)

भाग ४..

विहानला पूर्ण शुद्ध आली नव्हती..अर्धवट शुद्धीत तो बरळत होता..
'आदू..
अदिती…'
हे शब्द कानी पडताच त्याच्या आईने डोळ्यांना पदर लावला..वडिलांनी त्याला हाका मारुन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला…पण व्यर्थ..शेवटी न राहवून वडिल त्याला समजावत म्हणाले 'आदू येईल हा बाळा..तू लवकर बरा हो आधी..'
इकडे त्याच्या मित्रांना काहीच समजेना..तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याची लहान बहीण अदिती दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती..त्याचा त्याने खूपच धक्का घेतला होता..आणि म्हणूनच खरंतर ते वर्षभरापूर्वी जुनं सगळं सोडून ह्या शहरात रहायला आले होते..
पण इकडे आल्यापासून विहान बराच सावरला होता..मग असं मधेच काय झालं..? आणि तो जर नीरजाच्या धसक्याने असा झाला होता तर मग अदितीचं नाव का घेत होता..?
कोणालाच काही कळेना..शेवटी सगळे त्या दिवशी तसेच घरी गेले..

प्रितीने नीरजाच्या बाबांच्याच्या फोनवर फोन केला आणि तिला सगळं कळवलं..तिला मोठा धक्काच बसला..इतकं भयंकर काही होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं..तिला तिचं मन खात होतं..सुदैवाने ती दुसऱ्याच दिवशी सकाळच्या फ्लाईटने परतणार होती..आल्या आल्या पाहिलं विहानला जाऊन भेटायचं असं तिने ठरवलं..
दुसऱ्या दिवशी परत सगळे हॉस्पिटलला आले..विहान शुद्धीत आला होता पण काहीच बोलत नव्हता..नीरजा त्याच दिवशी परत येत होती हे प्रितीने ग्रुपमध्ये सांगितलं होतं..इकडे विहानची अवस्था शारीरिकदृष्ट्या थोडी सुधारली असली तरी मानसिक दृष्ट्या खालावलीच होती…डॉक्टरांनी ते जाणलं होतं आणि त्याला तपासायला सकाळीच सायकॉलॉजिस्ट येऊन गेले होते..त्यांनी विहानला लवकरात लवकर बोलतं करायचा सल्ला दिला होता..
अजून कोणीच त्याच्यासमोर नीरजाचं नाव काढलं नव्हतं..पण शेवटी तो कशालाच प्रतिक्रिया देत नाही असं बघून त्याच्या आईने निराजाबद्दल त्याला थेटच विचारलं..
नीरजाचं नाव आईच्या तोंडी ऐकताच विहानने त्याची क्षीण नजर क्षणभर तिच्यावर रोखून धरली…मग मात्र त्याचा बांध फुटला… त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं..तो आईकडे बघून बोलू लागला..'आई..आई…माझी आदू परत आली होती गं..'
त्याला पुढे बोलवेना…आई-बाबांनी त्याला शांत केलं..प्यायला पाणी दिलं…थोडं शांत झाल्यावर विहान बोलू लागला…
'माझी आदू होती तशीच..अगदी तशीच आहे नीरजा..एकदम डॅशिंग…तिच्या आवडी-निवाडीही बऱ्याच आदुसारख्या….आणि आई आदू जशी हसायची तश्शीच अगदी खळखळून नीरजा हसायची गं...मी पहिल्यांदा तिला हसताना बघितलं..आणि मला क्षणभर वाटलं की अदितीच समोर बसली आहे माझ्या…पण अदिती जिवंत नाही हे सत्य आहे…आणि आता..आता मी नीरजालाही गमावून बसलो आहे….'
असं म्हणून तो परत रडू लागला..

दारात नीरजा उभी होती…तिने हे सगळं ऐकलं मात्र तिला ते सहन नाही झालं आणि ती दारातच कोसळली…
त्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष दरवाज्याकडे गेलं आणि नीरजाला पडलेलं बघतच सगळे धावले…
थोड्याच वेळात नीरजा शुद्धीत आली…डोळे उघडले आणि पहिला दिसला तो विहानचा चेहरा…तिने चेहरा हातात झाकला आणि रडू लागली…विहान आता बराच सावरला होता…वास्तवाचं भान त्याला आलं होतं…त्याने नीरजाची समजूत काढली..तिची माफी मागितली..
नीरजा सावरली..तिनेही विहानची माफी मागितली..
सगळ्यांना खूप बरं वाटलं..आई-बाबांची मोठी काळजी मिटली..

विहानला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी आला..
घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी दाराची बेल वाजली..कोण आलं बघायला विहान दाराशी गेला तर समोर नीरजा उभी..
ती त्याला फक्त 'hi' म्हणून आत स्वयंपाकघरात गेली..विहानची आई तिथे होती...विहान तिच्या पाठोपाठ आत जाणार इतक्यात नीरजाचा आवाज आला
'विहान आत येऊ नको, बाहेर खुर्चीत बस..मी आलेच!'…
नाईलाजाने विहान बाहेर बसला..त्याचे बाबाही आतून येऊन बाहेर बसले..थोड्याच वेळात नीरजा आणि विहानची आई बाहेर आल्या..
नीरजाच्या हातात आरतीचं ताट होतं..
विहान काही विचारणार इतक्यात तिने त्याच्या कपाळावर कुंकवाची छान उभी रेघ काढली आणि त्याला ओवळलं..
विहानच्या समोर आणि नीरजाच्या मागे भिंतीवर आदितीचा फोटो लावला होता..नकळत विहानची नजर त्यावर स्थिरावली…!
'अरे कुठे हरवलास…? काय सांगते मी.. हात कर ना पुढे…!'
नीरजाच्या आवाजाने विहान भानावर आला..त्याने हात पुढे केला..
नीरजाने हातावर राखी बांधली..विहानच्या चेहऱ्यावर हास्य विलसलं आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या…नीरजाने हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला..आणि डोळ्यांनी त्याला शांत व्हायला खुणावलं..
'मला माहित आहे आज रक्षाबंधनाचा दिवस नाही..पण भावना व्यक्त करायला कधीकधी मुहूर्ताची गरज नसते ना..म्हणून वेळ न घालवता आजच आले..!'
विहान फक्त हसला..त्याचे आई-वडील भरल्या डोळ्यांनी समोरचं दृष्य पहात होते…
त्यांना गमावलेली लेक मिळाली होती..
एका भावाला दुरावलेली बहीण मिळाली होती...
हरवलेल्या रक्ताच्या नात्याची जागा मनाने घट्ट बांधलेल्या नव्या नात्याने अलगद भरुन काढली होती...

समाप्त

- कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!