नातं.. (भाग १)

भाग १

विहानला आज त्यांची कॉलेजमधली, मित्रांनी घडवून आणलेली पहिली भेट आठवत होती..
त्याने शेवटच्या वर्षात कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली होती..पण त्याच्या खुशमस्कऱ्या स्वभावामुळे मुलांनी त्याला लगेच आपलंसं केलं होतं..त्याच्या मित्रांचा आणि आता त्यांच्या खास मैत्रिणींचा असा एक ग्रुप होता..
पहिल्या दोन वर्षात जोड्या जुळल्या होत्या..आणि त्यांच्या भल्या मोठ्या ग्रुप मध्ये एकट्या असणाऱ्या नीरजाबरोबर आता विहानची भर पडली होती...

नीरजा..दिसायला देखणी..टॉम बॉय म्हणतात तशी रफ अँड टफ असणारी...
मैत्रिणींनी चिडवले तर म्हणायची काय घाई लागलेली आहे तुम्हाला…? कॉलेज लाईफ एन्जॉय करुदे ना सुखाने…मग प्रेम करायला आयुष्य पडलं आहे..!
आणि इकडे विहान होता मित्रांना सरळच उडवून लावायचा..
प्रेम-बिम सब झूठ है असं त्याचं स्पष्टच मत होतं...!

तरी आता मित्र म्हणजे नाही म्हणेल तेच करायचं असा अलिखित नियमच असतो ना..!
एक दिवस ह्याच्या मित्रांनी आणि तिच्या मैत्रिणींनी कट करुन दोघांना एकटं पाडायचं ठरवलं..सगळे भेटले आणि जोड्यांनी काढता पाय घेतला..उरले फक्त विहान आणि नीरजा..तसे ते भेटले होते आधी त्यामुळे जुजबी ओळख होती…पण भला मोठ्ठा ग्रुप असल्याने कधी दोघांचीच अशी भेट झालीच नव्हती..आणि आज तर त्यांना प्रेमात पाडण्यासाठी म्हणून भेटवलं होतं..!

दोघांनाही चांगलंच माहित होतं की त्यांना मुद्दाम असं एकटं पाडलं आहे..एक मिनिटभर असंच अवघडल्या शांततेत, इकडे तिकडे बघण्यात गेलं..आणि दोघांची नजरानजर झाली..आणि..आणि.. दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला..!
दोघेही खूप हसू लागले…पण दुसऱ्या मिनिटाला विहान मात्र नीरजाकडे बघतच राहिला..खळखळून हसत होती ती...
शेवटी हसणं आवरतं घेऊन निरजानेच विचारलं
'निघूया…?'
त्यानेही सहज हो म्हणून टाकलं..आणि नंतर मात्र त्याला त्याचा पश्चाताप झाला..शेवटी दोघे बाहेर पडणार इतक्यात शक्कल करुन विहान म्हणाला 'आलोच आहोत तर एक पाव भाजी बनती है यार..!..खूप ऐकलंय इथल्या पाव भाजी बद्दल..पण..'
'काय…? तू अजून इथली पावभाजी नाही खाल्लीस…?' त्याला मधेच तोडत नीरजाने प्रश्न केला!
'हो ना गं..म्हणूनच…खाऊया..?'
'चल..मला फारशी भूक नाही पण वन बाय टू सांगू..चालेल..?'
'धावेल..!'
बटर पावभाजीची खास ऑर्डर दिली गेली..ती येईपर्यंत गप्पा रंगल्या..विहान किस्से-विनोद सांगत होता…नीरजा खळखळून हसत होती…विहान तिच्या हसण्याला डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत होता..
पावभाजी आली…त्यावरचा बटरचा थर विरघळू लागला..अगदी विहानचं मन विरघळलं...
तस्साच…

क्रमशः

-कांचन लेले

Comments

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!

Happy 60th Birthday Wonder Woman!