Happy 60th Birthday Wonder Woman!

आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिली wonder woman येते ती म्हणजे आपली आई!
आणि आज माझ्या wonder womanचा ६०वा वाढदिवस!

खरं सांगू तर असं वाटतंच नाहीये..कारण आजही तिचा कामाचा उत्साह, चेहऱ्यावरचा टवटवितपणा आणि आम्हाला लाजवेल अशी जिद्द हे सगळं अवाक करणारं आहे!

बेताच्या परिस्थितीत बर्व्यांच्या घरात झालेला जन्म..नंतर नारायणगावात ती वाढली जिथे आजोबा शेती सांभाळायचे. मूळ गावापासून लांब त्यामुळे सकाळी येणाऱ्या दुधाच्या गाडीबरोबर शाळेत जायचं..ती चुकली तर एवढ्या लांब चालत जायचं असा खडतर प्रवास!

खरंतर व्हायचं होतं डॉक्टर, पण योग्य मार्गदर्शन नाही व त्यामुळे लागतील इतके मार्क मिळाले नाहीत आणि त्यातही ओपन कॅटेगरी आणि मध्यमवर्ग म्हणजे तर जवळजवळ अशक्यच..

पण म्हणून जिद्द न हरता तिने नर्सिंग हा विषय घेऊन पुण्यात शिक्षण घेतलं..पुढे नर्स म्हणून अतिशय तन्मयतेने, सेवाभावी वृत्तीने अनेक वर्षे तिने काम केलं..पुण्यातून मुंबईत आली, नातेवाईकांकडे राहून काम केलं..
दरम्यान लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा स्वतःच्या पायावर उभी असून, शासकीय नोकरी असूनही केवळ शिफ्ट ड्युटी असते आणि नर्स आहे म्हणून अनेकांनी नाकारलं सुद्धा..आणि अखेरीस बाबांशी लग्न झालं!
पुढे शिफ्ट ड्युटी सांभाळूनच आम्हा दोघींना वाढवलं.. संस्कार म्हणजे दुसरं काहीही नसून केवळ अनुकरण असतं असं माझं ठाम मत आमच्या आईला बघूनच झालं आहे..

आम्ही पोटात असताना दोघींच्याही वेळी पूर्ण ९ महिने आईने काम केलं..तेही या मुंबईत, ट्रेन ने जा ये करुन! म्हणूनच कदाचित सतत काम करत राहण्याचं आणि स्वस्थ न बसण्याचं बाळकडू आम्हाला तिथूनच मिळालं आहे! अगदी तान्ह्या असल्यापासून आमच्या कानावर पडलेली अनेक स्तोत्र आम्हाला नीट बोलता येत नव्हतं तेव्हापासून मुखोदगत आहेत.. सकाळी लागणाऱ्या रेडिओने जे उत्तम संगीत ऐकायचा कान तयार केला त्याचा फायदा आज कळतो.. आईचा आवाज फार गोड, त्या रेडिओ बरोबरच ती सुद्धा स्वयंपाक करता करता गात असायची.. आणि हे सगळं झोपेत असताना आमच्या कानावर पडत असायचं!
आमची आजी फार छान गाते, तिचा आवाज आमच्या आईकडे आलेला, पण परिस्थीतीमुळे त्याचं शिक्षण काही घेता आलं नाही...

पहाटे उठायचं, स्वयंपाक करायचा, आपला व्यायाम/प्राणायाम करायचा..आम्हाला तयार करायचं आणि कामावर जायचं अशी सगळी तारेवरची कसरत तिने आजवर हसत हसत केली.. तिला कामं चटचट पटपट केलेली आवडतात..आम्ही रेंगाळलो की फार वैतागते!

माझी मोठी बहीण पहिल्यापासूनच दिसायला गोल गोबरी काश्मीरची कळी, स्वभावाने एकदम शूर आणि पराक्रमी.. त्या अगदी उलट मी सावळी-किरकोळ अंगकाठी, एकदम तल्लख बुद्धीची पण अतिशय भित्री..
मी खूप लहान होते..प्ले ग्रुपमधे असेन. आणि आधी सांगितल्याप्रमाणे अनेक स्तोत्र/गोष्टी मुखोदगत होत्या आणि घरात छान म्हणायचो सुद्धा.. म्हणून आईने वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या तिथे नाव दिलं आणि घेऊन गेली मला. (माझी बहिण अशा स्पर्धांना जाऊन अनेक बक्षिसं घेऊन यायची हे वेगळं सांगायला नकोच!) 
माझा नंबर येईपर्यंत मी मस्त मजेत होते..स्टेजवर गेल्यावर मात्र भोकाड पसरलं..आणि असं एकदा नाही तर अनेकदा झालं. प्रत्येकवेळी फक्त ती राजगिऱ्याची चिक्की किंवा वेफर्स घेऊन परत यायचे. तरी आई आमची फार जिद्दी, कधी मला एखाद्या गोष्टीचा आमिष दाखवून तर कधी ताईला समोर बसवून अशा काय काय क्लुप्त्या करायचा प्रयत्न करायची जेणेकरुन माझी भीड चेपेल आणि शेवटी अनेक वेळा असं झाल्यावर माझी भीड चेपली आणि मी जी सुटले ती आज भारतभर एकटी सुद्धा फिरायला मागे पुढे बघत नाही! जर तेव्हा मी एकदा रडल्यावर आईने मला घरात बसवलं असतं तर ....?! विचारच भीतीदायक आहे!

त्यानंतर सिनियर kg मधे असताना मला एका वेळी ५ गोल्ड मेडल मिळाली होती! आणि त्या बक्षीस समारंभाला आई समोर बसली होती आणि आनंदाने आणि थोडं रडून असा तिचा चेहरा लाल झालेला..मला अजूनही आठवतंय तेव्हा त्या चीफ गेस्टने मला विचरलेलं why is your mother going all red? आणि स्वतःच हसल्या होत्या! तेव्हा आईचा फोटो कुणी काढला असता तर तो माझा सगळ्यात फेवरेट असता!
आमची शाळा दादरला आणि रहायला आम्ही कुर्ल्याला! अगदी लहान असताना काही पालक आलटून पालटून आणायचे-सोडायचे. उरलेला वेळ आम्हाला आमच्या आत्या सांभाळायची!
एकदा मी तिसरीत असताना शाळेच्या पहिल्या दिवशी स्कुल बस आलीच नाही..सगळी पळापळ, मग आम्ही BEST बसने गेलो..आणि नंतर त्या बस मालकाशी झालं भांडण. मग बऱ्याच पालकांनी मिळून ठरवलं की मुलं बेस्ट बस ने जातील.. ताई सातवीत, मी तिसरीत. आम्ही कुर्ला ते दादर बेस्ट बसने मजा करत जायचो! अगदी मोठे हायवे क्रॉस करणं, बस स्टॉप ते शाळा चालत जाणं असं अगदीच रुटीन झालं. आणि दुसरीकडे आमच्या वर्गातील मुलांचे पालक, किंवा त्यांना सांभाळणारे ताई-दादा असं कोण कोण त्यांची दप्तरं उचलून उंची गाड्यांतून शाळेत यायचे.
मला तर त्यानंतर कधी आई बाबा शाळेत सोडायला आल्याचं आठवतच नाही आणि जेव्हा आले असतील तेव्हा कधीच आमचं दप्तर उचलेलंही आठवत नाही. वर्षातून दोनदा पालक सभा, एकदा ओपन हाऊस आणि gathering किंवा स्पर्धेला नेण्यासाठी आले तरच!
इथे त्यांनी अमच्यावर टाकलेला विश्वास आज आयुष्यात खूप उपयोगाला येतो.. आज आमचे निर्णय आम्ही घेतो आणि ते कसेही असले, किंवा अगदी चुकले तरी आई बाबा पाठीशी ठाम उभे असतात!
ताईचा ओढा स्पोर्ट्स कडे जास्ती..माझा भराभर चिंध्या..थोडा कलेकडे आणि बरोबर स्पोर्ट्स..आमच्या दोघींच्याही आवडी जपत लागेल तिथे बरोबर येत, केव्हातरी एकट्याला सोडून पाणावलेल्या डोळ्यांनी कामाला जात हा प्रवास आईने केला.. ताई अगदी ३ वर्षांची असताना आमच्या आत्याबरोबर कोकणात आमच्या गावी महिनाभर रहायला गेली! ती तिकडे मजेत आणि आई मात्र इकडे रोज रडत! त्यानंतर मी सुद्धा थोडी मोठी झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत जाऊ लागले. कुठल्याच वर्षी सुट्यांमध्ये आम्ही कुठली इंटरनॅशनल टूर केली नाही.. पण त्या सुट्यांमध्ये आम्हाला जे आजोळ लाभलं, तेही कोकणातलं..त्याने, तिथल्या माणसांनी, त्या मातीने काय दिलं हे आज फक्त आम्हालाच कळू शकतं! 

मला आजही आठवतं, खेळायला गेलो असताना कधी लागलं म्हणून रडत घरी आलो तर आई सुरवातीला ऐकून घ्यायची, नंतर मात्र ठणकावून सांगायची..खेळ म्हंटला की लागणारच. असं रडत बसायचं असेल तर खेळायला जायचं नाही! मग काय बोलता?
अनेक वेळा ढोपरं-कोपरं फोडून घेतली आणि आज खमक्या झालो!

खेळाच्या बाबतीत असं, तर अभ्यासाच्या बाबतीत मात्र आई अतिशय किचकट! गणिताच्या पेपर मधे २० पैकी साडे एकोणीस मिळाले तर ती सगळ्यात जास्ती ओरडायची!! का? तर साध्या चुकीमुळे अर्धा मार्क गेला. एकवेळ दोन मार्क कमी पडले असते तर चाललं असतं, पण साध्या चुकीत अर्धा मार्क गेला की आईपुढे जाताना ब्रह्मांड आठवायचं!

आम्हाला कधीही ट्युशन हा प्रकार करावाच लागला नाही कारण आईच इतका सुंदर अभ्यास घ्यायची..आणि परत बाकी सगळ्या activity सांभाळून त्या ट्युशनला वेळच उरायचा नाही!

आम्ही लहान असताना प्रवासात किंवा घरात सतत विविध विषयांवर आमच्याशी गप्पा मारत असायची.. वेगवेगळे खेळ शोधून काढून आमच्याशी खेळायची..ट्रेन / st मधे असलो की त्याच्या लयीवर गाणी म्हणायला लावायची..चांगले लेख वाचून दाखवायची..पौष्टिक पण अतिशय चविष्ट असे विविध पदार्थ करुन आम्हाला खाऊ घालायची... 
अशा विविध पैलुनी आम्हाला ती अलगद घडवत गेली आणि त्याबरोबरच स्वतःही घडत गेली.. मी नववीत असताना तिने MSc केलं आणि त्याही वयात चिकाटीने अभ्यास करुन, घर-आम्हाला सांभाळून अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण सुद्धा झाली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर नंतर २०१९ साली तिने PHd पूर्ण केली आणि आज ती डॉक्टर पल्लवी लेले झाली आहे! 
माझ्या बहिणीने जेव्हा graduation नंतर Sports and Exercise या post graduate diploma साठी New Zealand ला जायचं ठरवलं तेव्हा अख्या दुनियेने वेड्यात काढलं होतं. असं कुठे फिल्ड असतं का? भारतात कुठे स्कोप आहे का? एकदा बाहेरच्या देशात गेली की परत येणारच नाही. एवढा पैसा तिथे कशाला घालायचा. इत्यादी इत्यादी. बँकेने एज्युकेशन लोन नाकारलं कारण तारण ठेवायला काही नव्हतं...पण आई बाबा खूप खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले आणि तिनेही त्यांचा विश्वास सार्थकी लावला..तिथे शिकली, नोकरी करुन लोन फेडलं आणि परत आली..नुसतं आली नाही तर आज ती भारतातली सगळ्यात उच्चशिक्षित महिला strength and conditioning कोच आहे !

आमच्या आईचा दुसरा पार्ट टाईम जॉब म्हणजे तिचं counselling सेंटर जे बारा महिने चोवीस तास खुलं असतं! आणि इथे कुठलीही वयाची, ओळखीची, हुद्याची अट नाही! नातेवाईकांपासून, क्लीग्स, विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये भेटलेले पेशन्ट, शेजार पाजारचे असं कुणीही तिला कुठल्याही वेळेला फोन करतं आणि ती अर्ध्या झोपेतून उठून सुद्धा त्यांचं ऐकून घेऊन त्यांचं समाधान करते.

मला सगळ्यात जास्ती कौतुक हे तिच्या diagnosisचं वाटतं. काय होतंय हे तिला नुसतं फोनवर जरी सांगितलं तरी एखाद्या डॉक्टरला लाजवेल असं परफेक्ट diagnosis ती करते आणि त्याचं solution सुद्धा सांगते. माझा जगातील कुठल्याही डॉक्टरपेक्षा तिच्यावर कायमच विश्वास जास्ती राहील!

नर्स म्हणून अनेक वर्षे काम केल्यावर तिचं प्रोमोशन लेक्चरर म्हणून झालं आणि ती जे जे हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेज मध्ये शिकवू लागली. असंख्य विद्यार्थी घडवले जे आजही तिच्या संपर्कात आहेत..कुणाचं काय चाललंय, काय अडचण आहे यावर तिचं बारीक लक्ष असतं. तिची शिकवण्याची तळमळ आणि पद्धत अतिशय वाखाणण्याजोगी आहे. माझी आई म्हणून नाही, पण तिला भेटलेली प्रत्येक व्यक्ती या गोष्टीशी सहमत असेल. ती सेवानिवृत्त झाली तेव्हा तिच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून लोणावळ्याला जाऊन एक सहल वजा कार्यक्रम केला..विशेष म्हणजे त्या एका दिवसासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून तिचे सगळे विद्यार्थी आले होते!

२०१३ साली आम्ही पहिली गाडी घेतली..ती सुद्धा बाबांनी आईला ऑफिसला गाडीने सोडायचं म्हणून त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशातून घेतलेली...आमची alto 800!
पहिल्या दिवशी जेव्हा मी तिला सायन स्टेशनला सोडायला गेले तेव्हा थोडीशी घाबरुन अवघडून शेजारी बसलेली आई मला आजही आठवते. आपण कधी स्वतःची गाडी घेऊन, त्यात बसून ऑफिसला जाऊ हेच तिच्यासाठी मोठं अप्रूप होतं!
 पण तो एकच दिवस, त्यानंतर ती अतिशय आनंदाने माझ्या/ताईच्या/बाबांच्या शेजारी बसायची! आम्ही दोघी फास्ट चालवायला लागलो की बाबा जरा सावध करायचे पण आई मात्र अतिशय आनंदाने ते सगळं एन्जॉय करत असायची, आजही करते!
आम्ही दोघी कमवायला लागलो तेव्हा आमच्या डोक्यावर बसून ८०% पगार हा इन्व्हेस्ट करायला लावला तो आईने! ती कायम म्हणते मी वयाच्या २३व्या वर्षीपासून कमवायला लागले, पण कधी कुणी हे शिकवलं नाही की पैसे नुसते सेव्हिंग मधे ठेवायचे नाही तर invest करून वाढवायचे असतात! त्याचबरोबर आम्हाला कळायला लागल्यापासून एक एक महिना आमच्याकडे घरखर्चाचे पैसे देऊन तो सगळा खर्च सांभाळायला लावायची..व्यवस्थित लिहून काढायला लावायची..अगदी स्वतःला लागले तरी पैसे आमच्याकडून मागून घ्यायची. मी शाळेत असताना आईचं डेबिट कार्ड घेऊन जायचे आणि काही हजार रुपये withdraw करुन आणायचे..कुणी बरोबर नसायचं पण कधी तिने अविश्वास दाखवला नाही किंवा कुणी पाठलाग करेल, मजह्याकडून पैसे गहाळ होतील म्हणून घाबरली नाही! आम्ही दोघी शाळेत असल्यापासून फि भरणे, बँकेतले चेक लिहिणे, बिल भरणे असं सगळं करायचो..त्याचबरोबर बाजारातुन भाजी-किराणा सामान आणणे हे सुद्धा आमच्याकडे असायचं! त्यामुळे आज स्वयंपाक करण्यापासून अगदी घर/गाडी घेण्यापर्यंत कुठल्याही प्रोसेस साठी आम्ही कुणावरही अवलंबून नाही.
आम्ही दोघींनीही जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यात मोलाचा सल्ला आईबाबांनी दिला तो म्हणजे माणसं चांगली बघा. पैसा-अडका-घर या सगळ्या गोष्टी नंतर कमावता येतात, मुळात माणूस चांगला पाहिजे! आणि यावर आईची मुख्य अट अशी होती की गप्पा मारणारे जावई पाहिजेत! ती देवाने दोन्ही वेळी पूर्ण केली!
या सगळ्या यशात कधी हवेत न जाणं, प्रामाणिकपणे सातत्याने व जिद्दीने कष्ट करत रहाणं, कायम आपल्याला जे आणि जेवढं मिळालं आहे त्याची कदर करणं, त्यात समाधानी आणि आनंदी रहाणं, माणसांना धरुन ठेवणं, कधी कुणाला लागेल असं न बोलणं, चांगलं काम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणं, जमेल तिथे आणि जमेल तेवढा दानधर्म करत रहाणं..हे सगळं आम्ही तिच्या आचरणातून शिकत आलो..

तिला काय आवडतं? पैसा-प्रॉपर्टी-सोनं.. असलं काहीहीही नाही! 
तिला आवडतो एक साधा मोगऱ्याचा गजरा..झाडावरून पाडलेल्या चिंचा-कैऱ्या-आवळे-करवंद...आणि चहा-फरसाण आणि मिरच्या आणि माणिजचा इडली वडा आsssणि आंबे! इतकं साधं सोपं आहे सगळं!
दोन वर्षांपूर्वी ती निवृत्त झाली..आणि त्यानंतर स्वस्थ कुठे बसवंतय? 
खरतर निवृत्त व्हायच्या आधी आणि आत्तासुद्धा अनेक लोक विविध प्रकारच्या नोकऱ्या घेऊन तिच्याकडे सतत येत असतात आणि आम्हाला मात्र त्याची धास्ती वाटते! सध्या ती नर्सिंग बोर्डात काम करते..भ्रष्टाचाराविरुद्ध अतिशय स्वच्छ आचरणाने काही प्रमाणात का होईना पण तिथेही शिस्त लावायचा तिचा प्रयत्न सुरु आहे! आणि या व्यतिरिक्त आपल्या काही विद्यार्थ्यांना आणि काही मैत्रिणींना घेऊन एक सोसायटी स्थापन केली आहे जे सगळे मिळून मेडिकल सर्जिकल नर्सिंग या विषयावर काम करतात.
 मेडिकल कॅम्प घेतात, वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासाठी काम करतात! आणि एक गोड तक्रार अशी की आई हल्ली आम्हा दोघींपेक्षा दोन्ही जावयांचे आणि आमच्या मनीचे लाड जास्ती करते!
येणाऱ्या आयुष्यात मात्र तिने तिला मनापासून आवडेल तेच काम तिने करावं..थोडं बाहेर पडावं, देशभर फिरावं असा माझा प्रेमळ आग्रह तिला कायमच असतो! पण आजही कुणाला मदत केल्यावर तिच्या चेहऱ्यावर असणारं समाधान आम्हाला तिला काम करु द्यायला भाग पाडतं! 
लिहिण्यासारखं इतकं आहे की जागा आणि वेळ पुरणारच नाही! म्हणून आता थांबते..
 देव तिला उत्तम आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो..तिचा उत्साही आणि आनंदी चेहरा आम्हाला ऊर्जा देत राहो आणि पुढील प्रत्येक जन्मी आम्हाला हीच आई लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना! 

तिला वस्तूंचं फार अप्रूप नाही म्हणून आजच्या वाढदिवसासाठी हा लेख हीच तिला भेट! :) 
 
- कांचन

Comments

  1. तुझी थोडीफार माहिती असलेली आणि जास्तीत जास्त गुलदस्त्यात असलेली तुझी आई आज तू लेखनातून खूप छान उभी केलीस.. आई अशीच असावी.. वाढदिवसानिमित्त तुझ्या आईला अनेकानेक उत्तमोत्तम शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  2. वाढदिवसाच्या दिवशी या व्यतिरिक्त जगातील कोणतीही गोष्ट या मनोगतापुढे फिके आहे.....आईला खूप खूप अभिष्टचिंतन.....आई पण म्हणेल अशाच मुली जन्मोजन्मी मिळतो.......

    ReplyDelete
  3. अप्रतिम लिखाण. मामीचे अनेक पैलू आम्हालाही माहिती नव्हते ते तुझ्या लेखात उलगडून दाखवलेस. हीच तिला ६०व्या वाढदिवसाची सुंदर भेट

    ReplyDelete
  4. तुझ्या आईचं अतिशय चपखल वर्णन या लेखात तू केलं आहेस. त्या माझ्यासाठीही कायम एक प्रेरणास्थान राहिल्या आहेत.

    ReplyDelete


  5. Aai che karave tevdhe varnan ani kautuk kamich ahe. Mi anubhavlelya madam agdi ashach ahet. Khup sundar lihila ahe blog.

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिल आहेस

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर लिखाण, म्हणजेच आईचे विविध पैलू पण उलगडलेस कांचन, खरंच ग्रेट मामी व तुम्ही साऱ्याजणी,! एव्हढं सर्व करुन मामी हसत खेळत असते त्याला ही सलाम,! तिला शतायुषी शुभेच्छा,!

    ReplyDelete
  8. एका मुलीने आईबद्दल व्यक्त केलेल्या भावना ऐकून खूपच भारी वाटलं आणि जे लिहिलं आहे त्यातलं बरंच लेले मॅडम सोबत काम करतांना मी अनुभवलं सुद्दा आहे. त्यामुळे आपण एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहात हे निश्चितच आहे. मॅडम आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख !!!

    ReplyDelete
  10. As you said madam is same like. Madam tumhi always keep energetic, God give u lots of love and good health. Happy birthday Dear madam.

    ReplyDelete
  11. Khup Sundar amchya Pallavi mam,, agdi uttam vyaktimatv aslelya

    ReplyDelete
  12. Eka mulikadun tichya aaila hya pekhya sundar gift asuch shakat nahi... Khup Uttam ritya shabdhchi gumfan Keli aahe Kanchan tai tumhi... Kharach mam ashyach aahet mi pan anubhaval aahe... Tya simply great aahet... Aani hyasagalyacha tyana bilkul garv nahi... Ekdam down to earth aahet... Mi swatala khup nashibwan samajate ki Dr.Pallavi Lele mam chi mi student aahe... Thank you mam... & Ofcourse Wish you a very happy birthday my favourite mam...

    ReplyDelete
  13. Being a student of your Mom, We always feels proud. She is our favourite teacher. Without her life would have no class because she taught us in very enthusiastic, realistic way and easily understandable manner. You mentioned her characteristics in as it is... We always feels proud to tell others that she is our teacher. Madam.....Cheers to another trip around the Sun. I wish you a very happy birthday and healthy wealthy life ahead!

    ReplyDelete
  14. Working with Madam is a brief yet unforgettable experience. Her humble attitude, strong work ethic, and exceptional problem-solving skills make a lasting impression on me. She never fails to find solutions to even the most complex problems, and her expertise and willingness to share her knowledge are invaluable.

    ReplyDelete
  15. Ho Kharach amachya madam khup sunder Ani energetic ahet Ani tyancha welewar help karanyacha swabhaw amhi anubhawala ahe, pudhil education madhe yach madam bhetawyat hich prarthana Ani madam na pranam

    ReplyDelete
  16. Adeline Noronha13 April 2023 at 09:32

    I thank God each time for having blessed us with a true teacher like you. You are a true inspiration to all of us.

    ReplyDelete
  17. Kharach khupch chhan aahet aamchya Lele madam😊❤️

    ReplyDelete
  18. Wish you very happy birthday dear madam. Living legend. Luv u madam. Be as you are always.

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम लेख कांचन. १८ वर्ष मी एकमेकांसोबत काढली. तू वर्णन केलेस ते सगळे आम्ही अनुभवले. खरंच मी भाग्यवान
      समजते स्वात:ला की अशी जिवाभावाची मैत्रीण आम्हाला लाभली आणि तुम्हीही नशीबवान आहात की अशा आईच्या
      लेकी आहात. पुनश्च शतायुषी शुभेच्छा तिला 💕💖🎊💐




      Delete
  19. अप्रतिम लेख.. आईसाठी सर्व काही..वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा.🌹🙏

    ReplyDelete
  20. तुम्ही तुमच्या आईच वर्णन खरंच अगदी नेटक्या शब्दात आणि खरं केलय मी त्यांचा Student आहे 2 वर्ष त्यांच्या बरोबर राहता अल आणि त्यात खूप काही शिकता आलं ह्याचा मला खूप आनंद आणि माझं भाग्य समजतो त्यांची सगळ्यात चांगली गोष्ट सांगायची तर मी एक average student होतो बहुदा बरेच शिक्षक मला नावाने ओळखत नसत पण मॅडम मला नेहमी नावाने हाक मारत सांगायचं येवढाच शेवटचे मुले देखील त्या तेवढेच लक्षात ठेवत

    ReplyDelete
  21. Tumchi Aai ani amchi shaletil maitrin.
    Atishay fresh persanility.
    Sunder description. June devas athavle. Amhi saglech sathiche zalo ahot.
    Plan asa ahe ki amha sarvachi 61 barobar sajri karaychi ahe. Baghu jamtay ka. All the best MEDHA

    ReplyDelete
  22. Khup chan warnan kharokharach wonder women. Belated Happy Birthday!!

    ReplyDelete
  23. Kanchan खूप छान लिहिले आहेस. कौतुक वाटल. आईला खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  24. फारच सुंदर आहे लिहिले आई बद्दल ती आमची मैत्रीण आहे पण तीचे सगळे पैलु तु उलगडले त्यामुळे सगळ्यांना कळाले आनंद झाला

    ReplyDelete
  25. Very good write up ✍️. Actually Medha आमची ससून रुग्णालयातील batch mate. ती अतिशय hard working, studious, soft spoken होती. We all batch mates are proud of her because she is the one who did PHD,and became Dr. Medha wish you happy 60th birthday, May God bless you abundantly physically, mentally and spiritually 💖 ❤️ 🤗🤗

    ReplyDelete
  26. 'माझी आई ' या विषयावर निबंध स्पर्धा असती तर या तुझ्या निबंधाला नक्कीच प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं असतं. कांचन, खरंच अप्रतिम लिखाण. तुझ्या आईला ६० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  27. खरंच खूपच सुंदर लेख आणि मॅडम चे अप्रतिम वर्णन.

    ReplyDelete
  28. Khupch chhan ... vachtana fakt madam ch samor disat hotya...

    ReplyDelete
  29. अप्रतिम लेखन केले केले आहे खरे चित्र डोळ्यासमोर उभे राहते...बाबांबद्दल काहीच नाही जास्ती लिहले..👍

    ReplyDelete
  30. Superb.keep it up. Proud of you

    ReplyDelete
  31. किती सुंदर लिहिले आहेस कांचन. तुझ्या आईचा कित्येक वर्षांचा प्रवास ओळखीचा झाला आमच्याही.😍

    ReplyDelete
  32. कांचन ,आईविषयी लिहलेला सुंदर लेख आज वाचला .मला तुझा खुपच अभिमान वाटतो. वाढदिवसाचं छान गिफ्ट यापेक्षा दुसरं असुच शकत नाही..गुणाची लेक.

    ReplyDelete
  33. Pravin Ghaisas.-- खूपच छान लिहिलयस. मातृ देवो भव:॥

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

29 on 29th with a twist..!

शंभर नंबरी सोनं कांचन!