Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Saturday 6 January 2018

कोकण कन्या!


कोकण कन्या! शिर्षकावरून साधारण लक्षात येऊ शकतं की अशा नावाची एक रेल्वे म्हणजेच ट्रेन आहे..आणि माझ्यामते त्या ट्रेनचं नामकरण करणारा माणूस थोर आहे!!
कोकणची कन्या म्हणवून घ्यायला त्या निर्जीव ट्रेनला सुद्धा अभिमान वाटतो..तर आम्हाला किती वाटत असेल ह्याचा अंदाजच करावा!
आमचो कोकण म्हणताना जे मूठभर मास चढतं त्याने मी सुद्धा थोडी जाड दिसत असेन!
तर आज पुन्हा एकदा, बरेच वर्षांनी कोकण कन्येने प्रवास करायची संधी मिळाली…थोडं दुःख इतकंच की या वेळी कोकणात न जाता ती कन्या ह्या कन्येला गोव्यात सोडणार होती, सुखरूप! हो..कारण प्रवास एकटीने करायचा आहे!
मला नेहेमीच एकटीने प्रवास करायला आवडतं..त्यात तो कोकणातला आणि ट्रेनने म्हणजे तर चार चांद! त्यामुळे reservation करताना ACचे पर्याय आणि घरातल्यांच्या सूचना सपशेल धुडकावून माझ्या लाडक्या साईड लोवर सीटचं स्लीपर कोचचं reservation केलं! कोकणात जाताना कसं खिडकी उघडीच पाहिजे..आमच्या कोकणातली हवा अशी अंगावर घेताना काय सुख मिळतं म्हणून सांगू..आणि इतकी स्वच्छ की तो जळ्ळा AC पण गुदमरत असेल तिकडे बंद डब्यात!
आणि एवढं निसर्ग सौंदर्य दिसतं ते काय काचेआडनं बघायचं…? छे…अशक्य!
तर काल रात्री कन्या नेहेमीप्रमाणे उशिरा आली..एव्हाना सगळ्यांना हे माहीत आहे की ती उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध आहे..पण आल्यावर जे काही समाधान देऊन जाते म्हणून सांगू…
म्हणजे एखादा गायक मैफिलीसाठी उशिरा यावा..मग तंबोरे लावत बसावा..इतका वेळ रसिक वर्ग ताटकळत असावा…पण पहिला सा लावल्यावर जे सुख मिळतं ना! तेच ही कन्या आल्या आल्या मिळतं..
एरवी कुठे एकटं जाताना तुम्ही कितीही धीट असलात तरी मनाच्या कुठल्यातरी बारीकशा कोपऱ्यात एखादी शंका असतेच! पण कोकणात जाताना..? कधीच नाही..एकतर प्लॅटफॉर्म वर अर्धा एक तास वाट बघताना कानावर जी आपली भाषा पडते, त्यानेच सगळी चिंता पळून जाते..मराठीच ती, पण कोकणातली ओ…काय समजलात..? त्याची गोडी जेका कळली तो खरा कोकणचा!
अशा सगळ्या आपल्या माणसांमध्ये एकटेपणा कधी वाटतंच नाही..कारण खरंच म्हंटलंय कोकणची माणसं साधी भोळी! त्यांच्यापासून आपल्याला काही धोका आहे असं वाटणारच नाही! उलट घरची मंडळी आहेत असंच वाटतं…
तर प्रवास पाऊण तास उशिरा सुरू झाला..गर्दी खूप होती, पण सकाळी जाग आली तेव्हा बरीच गर्दी ओसरलेली आणि मुंबईची हवा मागे टाकून कोणातल्या हवेने माझ्या प्रवेश केलेला...स्वच्छ हवा..आणि त्यात ओलावा आपुलकीचा, प्रेमाचा…!
सकाळी उठल्या उठल्या लाल मातीचं दर्शन होणं ह्या इतकी रम्य सकाळ माझ्यासाठी तरी दुसरी नाही!
असंख्य आठवणी या लाल मातीशी जोडलेल्या आहेत…आणि त्याला जोडून लांबच्या लांब पसरलेले मोकळे मळे..माडांची रांग….चिऱ्यांची कौलारू घरं…घरापुढे सारवलेलं अंगण..गवताच्या पेंढी…शेजारी केळ…चरणारी गुरं…असं सगळं चालत्या गाडीतून बघण्याचा आनंद काही औरच…
आणि इकडली स्टेशनं सुद्धा मला प्रचंड आवडतात..का काय माहीत…खरंतर लांबच्या लांब पसरलेला प्लॅटफॉर्म आपण अगदी ओसाड…पण लहानपणापासूनच मला तो खूप आवडत आला…कदाचित लोकांना मुंबईचे तुडुंब भरलेले प्लॅटफॉर्म बघण्यात जे अप्रूप असतं, तेच मला हे रिकामे..शांत, स्थीर प्लॅटफॉर्म बघण्यात मिळतं…इथे आलं की माणूस सुद्धा असाच शांत होत असतो..सगळी टेन्शन बाजूला ठेऊन निवांत चार दिवस घालवून जातो!
पण या वेळी जरा दुःख होत होतं कारण मला हे सगळं मागे टाकून पुढे गोव्यात जायचं होतं..गोव्याला  सुद्धा जायची इच्छा होऊ नये आणि कोकणातच उतरावं वाटतं तेव्हा खरी मी कोकणची कन्या!
आमचं कोकण आहेच तसं…तुम्ही अनुभवलंय की नाही…? नसेल तर नक्कीच अनुभव घ्या..कारण आम्ही येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत हसतमुखानेच करत असतो..तर…येवा..कोकण आपलाच असा!!
©कांचन लेले

Thursday 4 January 2018

Happy 1st Birthday!


वाढ दिवस म्हणजे जन्म दिवस…मोठं होण्याचं पाहिलं पाऊल…जाणतं होण्याकडची वाटचाल..
प्रत्येक वर्षी अनेक विविध पैलूंनी समृद्ध होणं..
तसंच प्रत्येक वर्षात काही चूका करणं..आणि मग आश्वासन घेऊन येतं पुढचं वर्ष…आश्वासन त्या चुका सुधारायच्या उमेदीचं..आश्वासन नाविन्याचं…आश्वासन टिकून रहायचं!
तसा प्रत्येक दिवस सुर्योदयानेच सुरू होतो, आणि सूर्यास्तानेच मावळतो…पण तरी प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी वेगळा असतो…असाच एक दिवस आपलं आयुष्य बदलून टाकणारा येतो, किंवा आपलं आयुष्य घडवणारा येतो! तोच जन्म दिवस…अर्थात मराठीत Birthday!
तिथून सुरवात होते एका नवीन प्रवासाची..अनेक नवीन गोष्टींची!
तर एवढं सगळं रामायण, कारण आज आहे पहिला वाढदिवस, माझ्या ब्लॉगचा..खरंतर गेल्यावर्षी अजिबात असं वाटलं नव्हतं की मी लिहू शकेन, कारण मुळात मी लेखिका नाही..आणि माझं लिखाण पावसापेक्षा बेभरोशी आहे असं म्हणायला हरकत नाही..कारण तो किमान चार महिन्यांचं आश्वासन देऊन दोन महिने तरी येतो...माझं लिखाण म्हणजे दुष्काळ पडला तर कदाचित पुढच्या पावसाळ्यापर्यंत काही सुचणार नाही इतकं बेभरवशी!
तर ही छोटीशी कहाणी आहे 'राधा उवाचं'च्या जन्माची..
मी असंच काहीबाही लिहीत असे..ते फेसबुकच्या ग्रुपवर आणि काही जवळच्या लोकांना whatsapp वर पाठवत असे..मग एक दोनदा असं झालं की कोणीतरी विचारलं 'तुझा तो लेख पाठव ना..' किंवा 'ह्या कथेचा चौथा भाग पाठव ना'..मग मला नाईलाजाने सांगायला लागायचं की शोधून पाठवते..तेव्हा काही मित्रमंडळींनी बौद्धिक घेतलं आपापल्या परीने..आणि त्याची वेळ मात्र एकच होती! म्हणून विचार केला..काय हरकत आहे एक ब्लॉग सुरू करायला…? किमान जे काही थोडं लिहिलं आहे ते एक जागी नीट राहील.. पण मग वाटलं आपल्यात आणि उठसूट लेखक होणाऱ्यांत काय फरक..?! पण परत काही छान प्रतिसाद आठवले..
जे अशा लोकांकडून आले होते की ते अगदी स्वतःच्या सख्ख्या लोकांसाठी सुद्धा खोटी स्तुती करत नाहीत..
मग बरंच हो-नाही हो-नाही करता करता ब्लॉग सुरू करायचा असं ठरवलंच!
साधारण ऑक्टोबर-नोव्हेंम्बर दरम्यान..पण थोडा अवधी घेऊन, आणखी थोडं लिखाण करून मग ह्यात उतरायचं असं ठरवलं होतं..डिसेंबर मध्ये परीक्षा होत्या, त्यामुळे त्या नंतर काय ते बघू म्हणून तात्पुरता विषय बंद केला..आणि परीक्षा संपल्यानंतर एक दिवस सहज लिहिता लिहिता प्रस्तावनेचा लेखच लिहून काढला…राधा उवाचं हेच नाव असणार हे खूप आधीच ठरलं होतं माझं..मग तो लेख एक दोन जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवला..आणि हिरवा सिग्नल मिळताच १ जानेवारीला ब्लॉग सुरू करायचा असं ठरवलं..पण परत आपण उगच शायनिंग मारतोय असं वाटून तो बेत मी रद्द केला..पुन्हा हो-नाही करत ३ तारखेला रात्री करूच या, काय व्हायचं ते होउदे असं ठरवलं!
४ जानेवारी उजाडला..मी सकाळीच लॅपटॉप घरुन बसले, blogger च्या website वर फॉर्मलिटी पूर्ण केल्या आणि domain name 'radhauvacha' असं टाकलं…ते accept झाल्यावर कोण आनंद झाला होता…मग सहज वर बघितलं तर बहिणीचं gmail account signed in होतं…कपाळावर हात मारायची वेळ आली..म्हणजे हा ब्लॉग तिच्या account वरून सुरू होत होता…प्रचंड चिडचिड झाली! मग कसलाही विचार न करता मी ते सगळं delete केलं..log out केलं…माझ्या account वरून signin केलं..आणि पुन्हा blogger वर domain name तेच टाकताच 'not available' असं आलं…झालं..संपलं सगळं..
गूगल बाबाची मदत घेतली तर त्यावर असं कळलं की एकदा domain name वापरलं आणि delete केलं की ते पुन्हा त्या माणसाला सुद्धा वापरता येत नाही…सगळी उरली सुरली आशा संपली होती…मी पणावल्या डोळ्यांनी लॅपटॉप बंद केला…कारण नाव तेच हवं हे माझं ठरलेलं होतं. आणि ते नाव नाही तर ब्लॉग सुद्धा नाही असं ठरवून मी दैनंदिन कामांना लागले…
डोक्यात विचार मात्र तेच होते…एकदा वाटून गेलं की कदाचित मी ब्लॉग सुरू करणं वेडेपणा ठरला असता म्हणून असं झालं असेल (जे होतं ते चांगल्यासाठीच अशी एक theory आहे आपल्याकडे..त्यावरून स्वतःला छाsssन दिलासा देता येतो)…
पण रात्री झोपताना उशीवर डोकं टेकलं आणि मात्र राहवलं नाही मला…असं एक फटक्यात मागे हटणं बरोबर नाही…मग माझंच मन मला उलट सांगू लागलं की कशावरून ही परीक्षा नसेल माझ्या patienceची….?  सगळं सरळ सरळ तर आपल्याला आयुष्यात कधी मिळालं नाही..मग आत्ताच ते एका फटक्यात मिळावं अशी अपेक्षा कशी करायची…? नाही…पुन्हा प्रयत्न करायचे असं ठरवून झोपले…
खरंतर आपलं मन आपल्या हातात असतं..मन हे हळवं आणि मेंदू हा वैचारिक अशी सांगड असते..चांगल्या विचारांना मनाचं पाठबळ मिळालं तर उंच भरारी घेता येते…कारण त्यासाठी लागणारा निर्धार, हेच हळवं मन करत असतं, कणखर होऊन!
पण डोक्यात येणाऱ्या वाट्टेल त्या विचारांना ह्याच मनाने हिरवा सिग्नल दिला तर सगळं आयुष्य उध्वस्त करायची ताकद सुद्धा ह्याच मनात असते बरं! तर..पुन्हा विषयाकडे येताना..
दुसऱ्या दिवशी पुन्हा लॅपटॉप उघडला, माझं account उघडलं…आणि डोमेन नेम टाकताना 'radhauvacha' टाकून बघितलं…नाही मान्य झालं..मग थोडं डोकं लावलं आणि 'radhauvaacha' असं नाव न बदलता त्यात एक 'a' वाढवून लिहिलं…आणि ते accept झालं!
काय आनंद झाला…पण हा आंनद ते accept झाल्याचा कमी, आणि मी हार न मानता माझ्याच अटींवर ते पूर्ण केलं ह्याचा जास्ती होता! वास्तविक अगदी लहान प्रश्न होता..पण क्षुल्लक कारणावरून, हलगर्जीपणामुळे तो झाला नाही म्हणून चिडचिड होऊन तो वाढला! त्यामुळे राग कमी करणे आणि संयम वाढवणे हे ब्लॉगबरोबर सुरू करायचं असं तेव्हाच ठरवलं…
वर्षभर बऱ्यापैकी लेखन झालं ह्याचा आंनद आहे..आता ते पुढे होत राहील असं म्हणायला हरकत नाही..तुम्हा सर्वांनी भरभरून प्रेम-आशीर्वाद दिल्यामुळे आजचा हा वाढदिवस छान झाला आहे..किंवा मुळातच होतो आहे हेच खरं! नाहीतर माझा टिकाव कितपत लागेल ह्याबद्दल साशंकता होतीच..असंच प्रेम-आशीर्वाद कायम राहूदे..!

गेल्या नवीन वर्षात केलेला हा संकल्प आज पूर्ण होतो आहे ह्याचा सगळ्यात जास्ती आनंद आहे..नाहीतर संकल्प न करणे हाच खरा संकल्प…पण ह्यावर्षी ब्लॉग संकल्प पूर्ण झाल्याने नवीन संकल्प करायला उत्साह निर्माण झाला आहे..आणि राग कमी आणि संयम वाढवण्याचा संकल्प जsssरा अपुरा राहिला असल्याने तोही येत्या वर्षात पूर्ण करायचा आहे!
अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे..पण म्हणतात ना 'Well begun is half done!'
म्हणून हे लिहिण्याचा घाट घातला!

शेवटी  पुन्हा नवीन वर्ष, पुन्हा नवीन सुरवात..
खरंतर पुन्हा तेच वर्ष, पुन्हा तीच सुरवात..
पण तरीही प्रत्येक वर्षी तीच ओढ नाविन्याची..
पुन्हा नवीन संकल्प करण्याचा उत्साह, आणि आता  मात्र पुढच्यावर्षी संकल्पपूर्ती होण्याची ओढ…!

माझं नवीन वर्ष सकारात्मकतेने सुरू झालं! तुमचं झालं का…? नसेल तर ते सकारात्मक करून घ्या…कारण ते तुमच्याच हातात असतं! :)
- एका वर्षाची राधा.....!
©कांचन लेले