Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Sunday 22 May 2022

चंद्रमुखी - Film Review!


चंद्रमुखी!


नावच इतकं सौंदर्यपूर्ण आहे तर चित्रपट त्या नावाला जागेल असा करणं हे खूप मोठं आवाहन असलं पाहिजे!
प्रसाद ओक हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल हिरा आहे हे त्याने सिद्ध केलं आहे! एक सर्वांगसुंदर चित्रपट असं चंद्रमुखीला म्हंटलं तरी ते कमीच पडेल.

सुरवातीलाच सांगते की नैतिकतेचे निकष घेऊन सिनेमागृहात जाऊ नका. विषयाला कुठल्याही पूर्वग्रहातून बघू नका. तरच ती कलाकृती म्हणून आपल्याला भिडेल.
खरंतर नैतिकतेच्या सर्व मर्यादा झुगारुन केलेल्या प्रेमाची ही कथा. 
पण ते झुगारणं असं आहे की त्यात आधीच्या प्रेमाचा अपमान नाही, उलट एक अपराधी भावना आहे, द्विधा मनस्थिती आहे, या आधी हे आयुष्यात का नाही झालं याची सल आहे, यापुढे हे थांबवलं पाहिजे असं म्हणणारी बुद्धी आणि त्या बुद्धिपलीकडे जाऊन प्रामाणिक भावनेला दिलेली साद आहे..समज गैरसमजातून सुरू झालेल्या नात्याचा समजुतीपर्यंतचा प्रवास आहे. निरपेक्षता नाही, पण अपेक्षा ठेऊनही अपेक्षाभंगला स्वीकारण्याची प्रेमाची ताकद आहे!
आणखी काय आणि किती वर्णावं!

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित हा चित्रपट. सगळ्यात आधी कौतुक या गोष्टीचं की प्रोमोशन करण्यात कुठेही कसूर सोडलेली नाही. जे लोक मराठी सिनेमापासून कोसो दूर आहेत त्यांना सुद्धा एकदा का होईना पोस्टर, गाणं, जाहिरात कुठे ना कुठे दिसलीच असेल. अक्षय बरदापुरकर व त्यांच्या सह निर्मात्यांचं विशेष कौतुक. अनेक मराठी सिनेमे उत्कृष्ट असूनही ते पोहोचत नाहीत, किंबहुना पोहोचवले जात नाहीत याचं एक महत्त्वाचं कारण बजेट असू शकतं त्यामुळे निर्माता चांगला असणं ही खूप मोठी गरज आहे.

चित्रपटाकडे येताना, पहिल्याच सिन मधले मृण्मयी देशपांडेंच्या चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थ करुन जातात. आणि तिथून जागृत होते ती रसिकांची उत्सुकता की हे का? कशामुळे?. जरी विषय बऱ्यापैकी माहीत असला, तरीही आपल्या लोकांची खोलात शिरण्याची सवय अगदी अचूक हेरली आहे ती पटकथेत.

संजय मेमाणे यांची अप्रतिम सिनेमॅटोग्राफी अक्षरशः डोळे दिपवून टाकते. इतका ताकदीचा सिनेमॅटोग्राफर आपल्या इंडस्ट्रीला लाभला हे भाग्यच म्हणायचं. प्रत्येक फ्रेम, त्यातला appealing लाईट, चंद्रमुखीच्या रंगमंदिरातील सीन्स मध्ये काळोख आणि दिव्यांचं साधलेलं अप्रतिम समीकरण..काय आणि किती वर्णावं?
प्रत्येक सिन घेऊन त्यावर एक एक परिच्छेद लिहिता येईल!
त्याचबरोबर एडिटरचं सुद्धा कौतुक, काही काही transitions इतक्या सुंदर अलगद येऊन जातात की दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे या दोघांचं कास्टिंग तसं बघायला गेलं तर रिस्की होतं. पण म्हणतात ना, गुरुला शिष्य बरोब्बर हेरता येतो, तसंच दिग्दर्शकाच्या नजरेतही ती जादू असावी!
इतका सहज सुंदर काळजाला भिडणारा अभिनय असणारा चित्रपट अनेक दिवसांनी पाहिला. खरंतर मला उलट नमूद करावंसं वाटतं की फक्त काही मोजक्या ठिकाणी अभिनय केल्याचं जाणवतं, बाकी ९०% चित्रपट बघताना अभिनेते फक्त वावरले आहेत, म्हणजेच भूमिका जगले आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरु नये. 
मुख्यतः डोळ्यातून व्यक्त झालेली प्रत्येक भावना, "बाई गं" गाण्यात आणि आणखी एक दोन सीन्स मध्ये बरोब्बर एका विशिष्ट क्षणी डोळ्यात येणारं पाणी! आणि नीट बघितलं तर ते हळू हळू वाढत जाताना सहज दिसतं..त्यातून उमटणारे उत्कट भाव, आणि क्षणात शब्द बदलल्यावर पूर्ववत होऊन गाणं पुढे नेणारी अमृता मनात घर करते.
एका सिन मध्ये रस्त्यात एका टर्निंगला चंद्रमुखी कडे जावं की परत घरी जावं असा प्रश्न पडला असतानाचा आदिनाथ कोठारे आणि समीर चौघुले यांचा गाडीतील सिन आहे, त्यात आदिनाथ विचार करायला गाडी थांबवतो, आणि पुढच्या क्षणी गाडी स्टार्ट करतो तेव्हा सरळ कळतं की याने घरी परत जायचा निश्चय करुन गाडी सुरू केली आहे,  पण गाडी स्टार्ट केल्यावर गाणं लागून त्या स्वरांनी चंद्रमुखीची आठवण होऊन चेहऱ्यावरचे बदललेले भाव क्षणात सांगतात की त्याचा विचार बदलला आहे आणि तो गाडी सुरू करुन तिच्याकडे जातो...अक्षरशः ४-५ सेकंदांचा सिन आहे, पण तो इतका सुंदर अभिनित केला आहे की कायम लक्षात राहील!
मृण्मयी देशपांडे बद्दल काय लिहावं? व्याकुळता आणि प्रेम याच्या मध्यावर उभं असलेलं पात्र "डॉली" यावर तिने छाप उमटवली आहे.

याचबरोबर मोहन आगाशे, समीर चौघुले, प्राजक्ता माळी, राजेंद्र शिरसाटकर, वंदना वाकनिस प्रत्येकाने तितक्याच तोडीचा अभिनय केलेला आहे.

वेशभूषा आणि रंगभूषा यांचा सुद्धा ही पात्र वठण्यात महत्वाचा वाटा आहे.

कथा व पटकथा याकडे येताना, चिन्मय मांडलेकर यांचं सर्वोत्कृष्ट लिखाण असलेला सिनेमा असं नक्कीच म्हणता येईल.
प्रत्येक डायलॉग टपोऱ्या थेंबांसारखा धरणीवर पडून चित्रपट
सुगंधित करुन गेलेला आहे. सुरुवातीला मी एक दोन डायलॉग लक्षात ठेवले कारण ते इतके अप्रतिम होते, म्हंटलं review मधे लिहिता येतील. पण काहिच मिनिटांनी मला लक्षात आलं तसं करायचं असेल तर जवळपास अख्खं स्क्रिप्टच द्यावं लागेल!
वैशिष्ट्य असं की उगाच भावना व्यक्त करायच्या म्हणून लांब लचक वाक्य दिलेली नाहीत. अगदी कमी संवाद, त्याला कायिक अभिनयाची साथ आणि त्यातुन उभ्या रहाणाऱ्या संवेदना! निव्वळ अप्रतिम!
चिन्मय मांडलेकर यांना त्रिवार वंदन!

मंगेश धाकडे यांनी केलेलं सुंदर पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाची शोभा वाढवतं. आणि अर्थात, केंद्रबिंदू असणारं संगीत, व ते करणारे संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरू ठाकूर यांना सलाम!
गुरू ठाकूर यांच्या शब्दांमध्ये विलक्षण ताकद आहे! आणि अजय अतुल तर या बाजाचे राजेच आहेत. गाण्याची चाल, व त्याबरोबरच केलेली सुंदर arrangement! तबल्यातील बोलांचा, तबल्याचा आणि अनेक गोष्टींचा arrangement मध्ये केलेला वापर लक्ष वेधून जातो. सर्व गायकांनीही या सांगितलं न्याय दिलेला आहे. विशेषतः श्रेया घोषाल आणि आर्या आंबेकर!

दीपाली विचारे, आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तम पेलली आहे!

आता या सगळ्यात दिग्दर्शक कुठे आहे? हा प्रश्नच पडतो आणि मग लक्षात येतं की या सगळ्यात नाही, तर हे सगळं म्हणजे दिग्दर्शक आहे! 

किती सीन्स असे सांगू की जे मनात घर करुन राहिलेत! पण सांगितले तर चित्रपटाची मजा घालवण्यासारखं आहे ते.. त्यातल्या त्यात मृण्मयी देशपांडेचा एक फिशटॅन्कचा सिन! तिथे ती एका सेकंदासाठीच येते, पण असं वाटून जातं पाण्यात राहून मासा तहानलेला आहे तशी तिची झालेली अवस्था तो सिन दाखवतो आणि "घे तुझ्याच सावलीत कान्हा" या ओळीला अमृता खानविलकर वर कृष्णाच्या मूर्तीची सावली पडणारा सिन इतका भिडतो मनाला! पणत्यांची पार्श्वभूमी चित्रपट बघूनच कळेल, त्याची अधिक माहिती इथे दिली तर मजा जाईल!

एकुणात एक अतिशय balanced आणि सर्व गुणांनी बहरलेली कलाकृती. काही ठिकाणी कथा खूपच प्रेडिक्टेबल वळणं घेते आणि काही ठिकाणी अभिनय करुन त्या सीन्सची मजा थोडी कमी झाल्यासारखे वाटते. चंद्रा हे गाणं व त्याची ट्रीटमेंट वेगळी झाली असती तर आवडलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या काळात हा चित्रपट बेतलेला आहे त्याला शोभणारं गाणं चंद्रा नक्कीच नाही असं वाटून जातं. 

विश्वास पाटलांची एक अतिशय ताकदीची कादंबरी आणि त्याचं  तितक्याच ताकदीने केलेलं रुपांतर म्हणजे चंद्रमुखी आहे!

~ ©राधा उवाचं ~

- कांचन लेले

Saturday 30 April 2022

शेर शिवराज..स्वारी अफझलखान!

शेर शिवराज...स्वारी अफझलखान!

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज (स्वारी अफजलखान)!
श्री शिवराज अष्टकातील चौथा मणी!

"अहोरात्र लाथा बुक्क्यांचा अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. कालपुरुषाचाही कानठळ्या बसल्या आssणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करित करित प्रगटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते, शिवराय!!"

चित्रपटाची सुरवात मला थेट इथे घेऊन गेली. शिवकल्याण राजा या अल्बम मध्ये शिवशाहीर बाबासाहेबांनी केलेल्या निवेदनाचा हा भाग. 
लेखकाला जर ही सुरवात इथून सुचली असेल तर त्याचं कौतुक आहे, कारण शिवशाहीरांइतकं महाराजांना कुणी वाहून घेतलेलं नाही. आणि नवीन पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं तर ते कौतुकास्पदच आहे. यातून लेखकाचा अभ्यास, निरीक्षण व समयसुचकता दिसून येते. 
पण जर ही सुरवात तिथून आली नसेल तर मात्र लेखकाच्या प्रतिभेचं विशेष कौतुक करावं, कारण ती थेट बाबासाहेबांच्या प्रतिभेच्या जवळ गेलेली आहे!

आता ही सुरवात सुरवात म्हणजे काय असा प्रश्न चित्रपट न बघितलेल्या लोकांना पडेल, पण त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा! आणि अगदी सहकुटुंब जाऊन बघा, कारण शिवरायांचे संस्कार पुढच्या पिढीवर होणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्यालासुद्धा त्या चरित्रातले अनेक बारकावे कळणं गरजेचं आहे.

गेल्या बुधवारी चित्रपट पहायचा योग आला. मधला वार आणि अगदी संध्याकाळच्या सुरवातीला शो असल्याने थेटर बऱ्यापैकी रिकामं होतं. प्राईम टाइम शो या चित्रपटाला दिलेले नाहीत याचं प्रचंड दुःख वाटतं.

पावनखिंड बघितल्यावर प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. आणि अगदी लगेचच शेर शिवराज आल्याने दुधात साखर असा योग आला! काही लोकांनी असाही सूर छेडला आहे की लागोपाठ एकाच विषयावरचे किंवा एका सिरीजचे दोन चित्रपट आल्याने इंटरेस्ट वाटत नाही किंवा तोचतोचपणा येतो. पण प्रेक्षकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पावनखिंड हा कोविड मुळे उशिरा release झाला. व त्यामुळे तो रिलीज होईपर्यंत पुढचा पिक्चर शूट करुन तयार होता म्हणून ते लागोपाठ आले. असो, तर आता चित्रपटाकडे येताना..

सुरवातीचा गोंधळ (गाणं) अगदीच मनात रुंजी घालेल असा झालेला आहे. नंतर बराच काळ ते मनात आणि डोक्यात फिरत रहातं!
 तिथून चित्रपट उत्तम गती घेतो. चिन्मय मांडलेकरांनी घेतलेलं महाराजांचं बेअरिंग प्रत्येक चित्रपटागणिक सहजसुंदर आणि परिणामकारक होताना दिसून येतं. त्याचप्रमाणे या चित्रपटात त्यांची शरीरयष्टी (एक सीन वगळता) विशेष डौलदार दिसून येते!
बहिरजींच्या भूमिकेत यावेळी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर झळकत आहेत. त्यांचा अभिनय अगदी सहज आहे, पण विषेश लक्ष वेधून घेते ती त्यांच्या गालावरची खळी! हरीश दुधाडेंनी आजवर बहिर्जी या पात्राला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, की त्यांचं कास्टिंग बदलणं हे एक धाडसच म्हणावं लागेल. पण जर तुलना नाही केली, तर पात्राला न्याय दिला आहे असं म्हणता येईल.

मृणाल कुलकर्णी नेहेमीप्रमाणेच अतिशय लक्षवेधी ठरतात! पण सईबाई आणि सोयराबाई यांच्याबरोबरच्या सीन्समध्ये त्या फारच तरुण दिसतात अशी गोड तक्रार करावी लागेल!

मुकेश ऋषी यांनी साकारलेला अफझलखान आपलं रक्त उसळायला भाग पाडतो. या व्यतिरिक्त त्यांच्या अभिनयाबद्दल आणखी काहीच बोलायची गरज नाही!

वर्षा उसगावकर यांचं कास्टिंग एकदम चपखल झालेलं दिसून येतं. सईबाई राणीसाहेबांचं पात्र साकारलेल्या ईशा केसकर यांनी संपूर्णतः डोळ्यातून व्यक्त केलेला अभिनय मनात घर करुन रहातो, त्याच बरोबर माधवी निमकरांनी साकारलेल्या सोयराबाई त्याला उत्तम साथ देतात.

दीप्ती केतकरांनी दीपाईआऊ बांदल हे पात्र उत्तम साकारलं आहे. अगदी लढाईचे सीन सुद्धा सफाईदारपणे केलेले जाणवतात.

अजय पुरकर यांनी साकारलेले तान्हाजी मनात घर करुन रहातात. व सगळ्यात सुखद धक्का येतो तो म्हणजे समीर धर्माधिकारी यांनी साकारलेले कान्होजी जेधे. विशेषतः त्यांच्या costumes मध्ये  वापरलेला "इकत" कपडा अतिशय डौलदार दिसतो. आता त्या काळी इकत होतं का अशा भंपक चर्चा न केलेल्या बऱ्या. पण ते अतिशय सुंदर शोभलं आहे हे मात्र निश्चित. हेच दुसऱ्या कुठल्याही किरदाराला दिलं असतं तर ते अजिबात शोभलं नसतं हेही निश्चित!
बाकी एकूणच महाराजांचे कपडे सुद्धा अतिशय रुबाबदार आणि तरीही भपकेदार वाटत नाहीत. सर्व costumes अप्रतिम झालेले आहेत व त्याने screen presence नक्कीच अधिक सुखावह झालेला आहे यात वादच नाही.

आयुर्वेदाचार्य आणि शस्त्रकार यांची पात्र विशेष सहजसुंदर निरागस अभिनयाने नटलेली आहेत! त्या दोन्ही अभिनेत्यांचं विशेष कौतुक.

आस्ताद काळे, निखिल लांजेकर, सुश्रुत मंकणी, रोहन मंकणी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, संग्राम साळवी, विक्रम गायकवाड, अलका कुबल, बिपीन सुर्वे आणि बऱ्याच नवीन कलाकारांनीही आपली पात्र उत्तम वठवली आहेत.
अनेक अभिनेत्यांची नावं माहीत नसल्याने उल्लेख करता येत नाही त्याबद्दल माफी!
तरीही अंकित मोहन या तशा बाहेरच्या असलेल्या पण या सिरीजचा अविभाज्य भाग झालेल्या कलाकाराची कमी, तसेच हरीश दुधाडेंची कमी नक्कीच भासते!

वैभव मांगलेंनी साकारलेले गोपीनाथपंत बोकील त्यांच्या नेहेमीच्याच शैलीतील अभिनयाने व्यापले आहेत. रंजकता आणायच्या दृष्टीने मिश्किल पात्र असणं गरजेचं असलं तरीही महाराजांचे वकील असे बाष्कळ वागत असतील हे मनाला पटत नाही. मांगलेंचा अभिनय उत्तम असला तरी दिग्दर्शकाने या गोष्टीचा विचार जरुर करावा.
कृष्णाजी भास्कर व सय्यद बंडा ही पात्र सुद्धा अभिनेत्यांनी चांगली साकारली आहेत.

रवींद्र मंकणी शहाजी राजे म्हणून उत्तम शोभतात. एके काळी स्वामी मध्ये मृणाल कुलकर्णी आणि त्यांची जोडी हिट झालेली आपल्याला माहीतच आहे. पण आता परिस्थिती व वय यात फार फरक आहे. पण त्या दोघांचे यात एकत्र सीन्स नसल्याने हे कास्टिंग अगदीच उत्तम चालून गेलेलं आहे.

सुरवातीपासून आजूबाजूला कुठेही न जाता चित्रपट थेट मुद्द्यावरच येतो. गती उत्तम आहे, रटाळपणा नाही. अनेक पात्र ज्यांचा महाराजांच्या कारकिर्दीत वाटा आहे त्यांचा उल्लेख आवर्जून दिग्दर्शक करतो हे विशेष कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर एका बलाढ्य शत्रूला शक्तीने नाही तर युक्तीच्या बळावर शक्तीने मारलं हेच आजवर आपल्याला माहीत होतं. पण त्या युक्तीचं व्यापक रूप या चित्रपटात पहायला मिळतं. त्याचे अनेक बारकावे उत्तम रीतीने दाखवलेले आहेत. ते इथे फोडून मी spoiler देणार नाही, पण आवर्जून बघावं अशी ही विचारमांडणी आहे. 
पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी, संगीत, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा इत्यादी सगळं उत्तम प्रतीचं झालेल दिसून येतं. व cinematic quality च्या बाबतीत मराठी सिनेमा करत असलेल्या प्रगतीबद्दल विशेष अभिमान वाटतो.

चित्रपटात काही प्रमाणात VFX चा वापर केलेला दिसून येतो. काही ठिकाणी तो उत्तम साधला आहे, तर काही ठिकाणी अनावश्यक वाटतो. मधे बहिरजींच्या तोंडी असलेलं गाणं चित्रपटाची लय खेचतंय असं वाटून गेलं, थोडं अनावश्यक वाटलं पण रंजकतेच्या गणितानुसर ते ठेवलं असल्याची शक्यता आहे. सईबाई राणीसाहेब गेल्याची बातमी काळतानाचा सीन थोडा कमी परिणामकारक झाल्यासारखं वाटतं. काही पुस्तकांमध्ये त्याचं नुसतं वर्णन इतकं अंगावर येणारं केलेलं आहे की प्रत्यक्ष अभिनयात तो दिसत असेल तर साहजिकपणे अपेक्षा खूप उंचावल्या जातात. महाराज तलवारबाजी करतानाचा एक bare body सीन आहे त्यात शरीर पिळदार नसलेलं दिसल्याने परिणाम किंचित कमी झालेला वाटतो. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णींच्या सीन ने शेवट झाला असता तर तो आणखी उंचीवर गेला असता असंही जाणवलं. 
या काही गोष्टी वगळता चित्रपट सर्वांगसुंदर जाहला आहे हे माझं वैयक्तिक मत आहे!

त्याचबरोबर शेवटी नवीन चित्रपटाची घोषणा करणं हा प्रकार मस्त आहे! आग्रा स्वारीची आम्ही आतुरतेने वाट बघू!

या सिरीजचा प्रत्येक चित्रपट आपण सर्वांनी पाहणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन पिढीला चौथी आणि सातवीच्या इतिहासातील पुस्तकांपलिकडे महाराज कळले पाहिजेत. आणि चित्रपटासारख्या मनोरंजनाच्या माध्यमातून जर ते कळत असतील तर मुलं सुद्धा आवडीने त्याकडे वळल्याशिवाय रहाणार नाहीत. तूर्तास इतकेच!

जय शिवराय!

- राधा
©कांचन लेले

Sunday 13 March 2022

पावनखिंड - एक अनुभव!

थिएटर पुन्हा सुरु झाल्यापासून दर्जेदार सिनेमांची खैरात प्रेक्षकांपुढे मांडली जात आहे याचा प्रचंड आनंद आहे. पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स, हे दोन्ही सिनेमे दर्जेदार असूनही कितपत बघवतील ही भीती मनात होती.
माझ्या सुदैवाने लहानपणापासून चांगलं साहित्य आई वडिलांनी हातात दिल्याने शिवचरित्र अनेक वेळा डोळ्याखालून गेलेलं होतं.
अनेक रात्री जागवल्या होत्या.
अनेक वेळा उशी भिजली होती.
आता हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघायचं म्हणजे काय होईल?
हा विचार करुन एवढे दिवस गेले नव्हते.
पण मग वाटलं आपण जर आज गेलो नाही, तर उद्या आपण एक रसिक प्रेक्षक म्हणून व्यर्थ ठरु.
आपले काही शिवभक्त कलाकार आपला वेळ-पैसा आणि घाम गाळून महाराजांची व त्यांच्या अनेक शूर साथीदारांची कीर्ती जगासमोर मांडतायत आणि आपण घरात बसून रहाणं हे चूक नाही, 

हा गुन्हा आहे.

म्हणून फोन उघडून तिकीट काढावं म्हंटलं, तर एक शो होता ज्याची वेळ जमण्यासारखी होती आणि अजून house full नव्हता. बाकी बरेच शो house full होते याचा मनोमन आनंदच वाटला. मग त्या शो चं तिकीट काढावं म्हणून booking process केलं तर पहिल्या रांगेतली पहिली एकच सीट बाकी होती.

काही वेळेला इतके अचाट अनुभव येतात ना, तरीही माझी ट्यूब पेटली नाही. मी मागे जाऊन दुसरे शो बघितले...पण मग लक्षात आलं, ती एक सीट माझ्या नावाची आहे. आणि एवढा विलंब झाल्याने पहिल्या रांगेतली आहे.
माझ्यासाठी रिकामी राहिली आहे. 
आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की एक मराठी सिनेमा चौथ्या आठवड्यात असूनही पहिल्या रांगेतल्या पहिल्या सीटवर बसून बघावा लागतोय.
मी लगेच ती सीट बुक करुन थेटर कडे कूच केली!

कुठलाही स्पोइलर देण्यात मला काडीचा रस नाही, किंवा हे पिक्चरचं परीक्षण नाही. हा फक्त माझा अनुभव आहे.


चित्रपट सुरु झाल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक माणूस, त्याने वठवलेलं प्रत्येक पात्र, संगीत, संवाद, चित्रीकरण, वेशभूषा, रंगभूषा, अभिनय, नृत्य, दिग्दर्शन हे काम म्हणून केलेलं नाही तर निव्वळ जीव ओतून केलेलं आहे याची प्रचिती येते.

विशेष कौतुक करावंसं वाटतं ते समीर धर्माधिकारी आणि आस्ताद काळे यांनी वठवलेल्या सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद या पात्रांचं.
समीर धर्माधिकारीने इतकं अप्रतिम बेअरिंग घेतलं की एंट्रीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवलं. जोडीला आस्ताद काळे! खरं सांगते, चित्रपट संपल्यावर गूगल करुन बघितलं तेव्हा कळलं की सिद्दी मसूद हे पात्र आस्ताद काळेने साकारलं आहे..अतिशय सुंदर अभिनय!

चिन्मय मांडलेकर हा कायमच माझा अतिशय प्रिय अभिनेता, लेखक राहिला आहे. खरंतर दिगपाल लांजेकर आणि या त्यांच्या समस्त शिवभक कलाकार टोळीने सुरवात केली तेव्हापासून सुरवातीला थोडी शंका होती की चिन्मय मांडलेकर महाराजांच्या भूमिकेत कितपत शोभेल. पण आज डोळे मिटले आणि विचार केला तर त्यानेच दिसावं हे त्याच्या अभिनयाचं यश आहे. खरंतर अमोल कोल्हेनी एक काळ असा गाजवला की गडागडांवर महाराजांची म्हणून लॉकेट, प्रतिमा, पोस्टर विकली जात होती ती म्हणजे अमोल कोल्हेची. अशावेळी हे धाडसी काम करणं फारच अवघड आणि जबाबदारीचं, पण ती जबाबदारी पूर्ण पार पाडली आहे. विशेषतः एका दृश्यात सिद्दीच्या वेढ्याची गडावरुन पहाणी करुन महाराज वळतात आणि पाठमोरे होऊन चालत जातात, ते अदृश्य होईपर्यंत शॉट घेतला आहे. ती त्यांची चाल मनात भरते!

विशाळगडाकडे निघण्यासाठी मावळ्यांना संदेश देत असतानाच्या दृश्यात मशालीचं प्रतिबिंब बुबुळात पडलं आहे, आणि त्या क्षणी डोळ्यातले भाव, ते संवाद आणि त्या मशालीच्या प्रतिबिंबाने लावलेले चार चांद ही दिग्दर्शकाची कमाल व्हिजन दिसून येते!

मृणाल कुलकर्णीशिवाय दुसऱ्या कुणाला आऊसाहेबांच्या भूमिकेत बघणं, अजूनही मनाला पटत नाही, पटणार नाही!
काय ते तेज!

बाजी(अजय पुरकर), फुलाजी (सुनील जाधव), रायाजी(अंकित मोहन), कोयाजी (अक्षय वाघमारे) हे  चार अभिनेते या चित्रपटाचे खांब होऊन पायरीपासूम कळसापर्यंत जाईस्तोवर प्रेक्षकांना खुर्चीत रुतवून ठेवतात!
याचबरोबर मातोश्री बयोबाई, दिपाईआऊ बांदल, भवानीबाई, गौतमबाई ही यांच्या मातोश्री व धर्मपत्नींची पात्र तितक्याच तोडीने साकारली आहेत.

हरीश दुधाडेने साकारलेला बहिर्जी नाईक मनात घर करुन जातो!
बहिर्जी हे महाजांचे अतिशय हुशार हेर होते. ती हुशारी डोळ्यात आणणं हे कसबीचं काम हरीश दुधाडेनी अप्रतिम केलं आहे!

त्याच बरोबर फाजलखान, रुस्तमेजमा, अगिन्या, हरप्या, शिवा काशीद, नेताजी, गंगाधरपंत, बडी बेगम, सोयराबाई राणीसाहेब अशी सर्वच पात्र सर्व अभिनेत्यांकडून उत्तम वठली आहेत.

शेवटच्या दृश्यात दिसलेले राजन भिसेंसारखे कसदार नट, फक्त एका संवादात का होईना, अतिशय सुखावून जातात!

चित्रपट संपल्यावर प्रेक्षागृहात जय भवानी, जय शिवाजी..हरहर महादेव अशा झालेल्या गर्जना पुन्हा एकदा रोमांचित करुन जातात.

हा चित्रपट फक्त दृष्यस्वरूपातच नाही, तर अंतरंगात साठवून ठेवण्यासारखा आहे. चिंतन केलं असता काही गोष्टी जाणवतात त्या म्हणजे..
पूर्ण एकाग्र होऊन जर शिवचरित्र अनुभवलं तर एकप्रकारचं तेज अंगात असल्याची जाणीव होते. चित्रपट संपल्यापासून घरी येईपर्यंत माझ्या नजरेत आग आणि चालीत त्याचा प्रभाव आल्याची जाणीव होत होती. त्यातच बाहेर पडल्यापासून मी कानात राजा शिवछत्रपती या सिरीयलसाठी अजय-अतुलने केलेलं शिर्षकगीत इंद्रजिमी जम्बपर रिपीट वर ऐकत होते.
डोक्यात दुसरे कुठले विचार येणं शक्यच नव्हतं. वाट चालत जाताना महाराजांनी आणि मराठ्यांनी तुडवलेली दऱ्या खोऱ्यातली, राना वनातली पाऊस पाण्यातली वाट आठवत होती. त्यांनी तेही केलं स्वराज्यासाठी. आपण सरळ रस्त्यावर असूनही काय करतो?

इतकं काहीतरी संचारल्यासारखं वाटत होतं पण त्या तेजाला वाट कुठं द्यावी हे मात्र कळत नव्हतं. घरी येऊन शांत झाल्यावर अनेक विचार येऊन गेले.

मावळ्यांची स्वामीनिष्ठा, स्वराज्याच्या स्वप्नाकडे जीवाचा विचार न करता घेतलेली धाव सुन्न करुन जाते.

बाजी-फुलाजी कामी आले हे सांगायला महाराज बयोबाई मतोश्रींकडे येतात तेव्हा त्यांना ओवाळून त्या म्हणतात, "माझं नशीबच खोटं, आणखी दोन पोरं असती तर ती सुद्धा स्वराज्याच्या कामी आली असती."
काय लोकं असतील ही? कुठल्या मातीची बनलेली असतील? काय खात असतील? काय संस्कार झाले असतील त्यांच्यावर?

या लोकांनी महाराजांना साथ देऊन स्वराज्य स्थापन केलं. 
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पुन्हा एकदा सुराज्याची स्वप्न बघून या मायभूमीला परकीय पारतंत्र्यातून स्वतंत्र केलं.

पण आज ते राखलं जातंय का?

आजही सीमेवर असंख्य जवान आपल्या रक्षणाखातर बर्फात गाडून घेऊन, समुद्रात वाहून घेऊन किंवा रणरणत्या उन्हात उभं राहून आपली निष्ठा सिद्ध करतायत. 
देशाच्या प्रत्येक नागरिकाला याची जाणीव जन्माला आल्यापासून आपण का नाही देऊ शकत?

आपण अनेकदा ऐकतो की पाकिस्तानात कोवळ्या मुलांना कशाप्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, निर्दयी केलं जातं वगैरे वगैरे. त्याचा उल्लेखही नकोय खरंतर आत्ता, पण ते किती परिणामकारक असेल याचा अनुभव मी या काही काळात घेतला. 
असं ट्रेनिंग महाराजांचा इतिहास दाखवून आपण आपल्या पुढच्या पिढीला का देत नाही? का शाळा शाळांमधून महाराजांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा इतिहास जास्तीत जास्त प्रमाणात पाठ्यपुस्तकात येत? 
आणि जर पाठ्यपुस्तकात येत नसेल, तर आपण आपल्या मुलांच्या हाती तो देणं हे आपलं कर्तव्य आहे. हा विषय खूप मोठा व गंभीर आहे, पण अशा कलाकृती समोर आल्या की विचार करायला भाग पाडतात! असो!
आज मात्र थिएटर मध्ये 20% लहान मुलं होती. आणि ते बघून खरंच खूप बरं वाटलं! 

हा सिनेमा मी पुन्हा एकदा बघणार आहे, आणि त्यातले मोजके पण अतिशय मोलाचे संवाद टिपून त्यावर एक लेख लिहिणार आहे.
नीट ऐकलं तर चित्रपट बघितलेल्या प्रत्येकाच्या ते लक्षात येईल की अनेक ठिकाणी असे संवाद आहेत जे डोळ्यात अंजन घालतात, जे आजच्या काळातही लागू होतील.
ही ताकद आहे शब्दांची. आणि अनेक असे प्रसंग आहेत ज्यात एकही संवाद नसताना ते अंगावर काटा उभा करतात. ही ताकद आहे अभिनयाची.

दिगपाल लांजेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष विशेष कौतुक आणि प्रचंssड आभार की ही पर्वणी ते आम्हा मराठी माणसांसाठी आणत आहेत. 

त्यांच्या येणाऱ्या "शेर शिवराय" या कलाकृतीला अनेक शुभेच्छा.
याच बरोबर विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स पुढच्या आठवड्यात नक्की बघण्याचा निश्चय केला आहे. 
कारण चांगल्या कलाकृती ह्या थिएटर मध्ये जाऊनच बघितल्या पाहिजेत. त्यामागे अपार अपार मेहनत गेलेली असते.

हा लेख जर संपूर्ण वाचला असेल, तर एक कळकळीची विनंती. लवकरात लवकर जाऊन पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स जरुर बघा.

जय भवानी, जय शिवाजी!

- कांचन लेले

Sunday 6 February 2022

लता..


लता दीदी गेल्या..
आज एका विलक्षण सांगीतिक युगाचा अंत झाला..
असं कितीही वाटलं की आता ९२ वर्षं म्हणजे काही कमी नाही, खूप उत्तम जगल्या वगैरे वगैरे तरी ती एक पोकळी जाणवतेच, ती कधीच भरुन निघणार नाही.

आयुष्यात एकदा त्यांना भेटायचा योग आला, तो सुद्धा इतका विलक्षण!
शिवसेनेने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात दीदी गाणार आणि त्यांच्या बरोबर महानगर पालिकेच्या शाळांतिल मुलं गाणार असा कार्यक्रम होता..वर्ष असावं २०१०..
तेव्हा आमचे सर महानगरपालिकेतील शाळेत संगीत शिक्षक असल्याने आम्ही तो चान्स सोडण्याचा प्रश्नच नव्हता..
कार्यक्रमाच्या दिवशी कडक बंदोबस्तात कसे बसे आत गेलो..
स्टेजवर मांदियाळीच होती..साक्षात वंदनीय बाळासाहेब ठाकरे उभे होते! त्याबरोबर अनेक ज्येष्ठ नेते, कलाकार..
आणि मग स्टेजच्या एका बाजूला लिफ्ट सारखि काहीतरी योजना केलेली होती त्यातुन दिदींची एन्ट्री झाली!
सगळं वातावरणच भारावून टाकणारं होतं.
खुल्या आसमंतात त्यांचा घुमणारा स्वर त्या बालवयात सुद्धा अंगावर रोमांच उभे करुन गेला..पण तेव्हा हे का झालं ते कळलंही नसावं!

कार्यक्रम झाला तसे सगळे स्टेजच्या मागे काही टेम्पररी रुम बांधलेल्या तिकडे धावले.. म्हणजे तिथे दीदी आहेत हे कळलं!
त्या प्रचंड गर्दीत सगळ्यांची चुकामुक झालेली. पण सगळे तिथेच भेटतील हे मात्र माहीत होतं! सर मुलांची व्यवस्था करायला गेले, त्यांच्या दोन्ही मुली त्या रुम कडे जाताना मला दिसल्या, तशी मी सुद्धा गेले..पण मला जरा वाट काढत जायला वेळ लागला, माझ्या समोर त्या आत जाताना गेल्या..मी जायला आणि त्या गार्ड ने दरवाजा लावून घेतला! कारण एकाएकी खूपच झुंबड उडाली..मी त्या गार्ड शेजारीच उभी होते. मुळातच स्वतःच्या तोंडाने असं मागून काही घेण्याची सवय नसल्याने मी काही त्याला "मला आत सोडा" असं म्हंटलं नाही, पण तिथून हटले सुद्धा नाही..पण बाकी लोक अगदी हमरी तुमरी वर येऊन त्याच्याशी भांडत होते..
मला मनातल्या मनात मात्र एकाच वेळी आपली वेळ किती चांगली आणि किती वाईट असं वाटत होतं. आत्तापर्यंत जे अनुभवलं ते अविस्मरणीय होतं म्हणून चांगली आणि काही क्षणांच्या फरकाने आपण बाहेर राहिलो म्हणून वाईट..
मग सर आले, त्यांना मी दिसले तशी ते मागून त्या गार्डच्या तिथे आले..माझ्याकडून बाकी सगळे आत गेले आणि मी एकटीच बाहेर राहिले कळल्यावर माझ्यापेक्षा त्यांनाच वाईट वाटलं आणि मग ते गार्डला हिला एकटीला तरी सोडा आत, लहान आहे वगैरे सांगून बघत होते. पण काही उपयोग झाला नाही. नंतर काही जवानांनी येऊन सगळी गर्दी मागे करायला सुरुवात केली, तसं त्या गार्डला काय वाटलं देव जाणे, त्याने आम्हाला दोघांनाही खुणेने आत जायला सांगितलं..

काय वाटलं त्या क्षणी हे १० मिनिटं शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करतीये, पण ते अशक्य आहे. 

आत गेलो तर कोचावर दीदी बसलेल्या. अक्षरशः हात पाय कापायला लागले होते. मी कशी बशी वही आणि पेन त्यांच्यापासून थोडं लांब धरलं, तसं त्यांनी माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केलं व वही घेतली..ती घेताना त्यांच्या मऊसूत हाताचा स्पर्श आजही जाणवतो..त्यांनी धरलेलं पेन मी कित्येक दिवस तसंच ठेऊन दिलेलं..आजही जुन्या सामानात ते नक्कि असेल..
त्यांनी वही घेतली आणि मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं!
सही करुन होईपर्यंत काही मी डोकं काढलं नाही, आणि नंतर काढायला गेल्यावर त्यांचा हातच डोक्यावर असलेला जाणवला!
किती भाग्यवान समजावं स्वतःला..
काहीही बोलायची हिंमतच नाही झाली..मग बाकीचे लोक आले, मी जरा बाजूला होऊन बघत होते..तेव्हा मुद्दाम बहिणीचा Nokia 3110 घेऊन गेले होते त्याची आठवण झाली..आणि हळूच त्यांचं लक्ष नसताना हा काढलेला फोटो! तोही काढताना माझे हात थरथरत होते!

आज शिवाजी पार्कात लांबून सुद्धा लोकं "सेल्फी" घेताना बघुन कीव करावीशी वाटली..

तो दिवस आणि आजचा दिवस..

गेले काही दिवस सतत विविध बातम्यांनी उद्रेक केलेलाच..शेवटी आज तो दिवस आलाच..काल वसंत पंचमीला सरस्वती आली, आणि आमच्या भूतलावरच्या या सरस्वतीला घेऊन गेली..

दुःख होतच होतं, पण संध्याकाळी जशी अंत्ययात्रा निघाली, ती बघितल्यावर काय आतमध्ये झालं आणि आपण अंत्यदर्शनासाठी गेले पाहिजे असं तीव्रपणे वाटलं. दर्शन मिळणार नव्हतंच, मिळालं तरी दीदी दिसतील असंही नव्हतं..त्यापेक्षा दिवसभरासारखं tv समोर बसलेलं बरं.. 
पण असं वाटलं ही बाई, जिने इतकं समर्पित आणि पवित्र जीवन व्यतीत केलं..
आज पवित्र अग्नित तिचं मिलन होणार..
ज्या अग्नीला हिंदु धर्मात सर्वोच स्थान आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे त्या अग्नित आज आमची पवित्र देवी समर्पित होणार!
अस वाटलं,
त्या अग्निचं दर्शन घेतलंच पाहिजे..
त्या क्षणी त्या पवित्र ज्वाला वाऱ्याबरोबर अंगावरुन गेल्या पाहिजेत..
त्या क्षणी तिथे अंगावरुन जाणारा प्रत्येक धूलिकण आपल्यात रुजला पाहिजे..
म्हणून गेले..

दीदींचं आयुष्य बघितलं तर त्यात संपूर्ण समर्पण भरलेलं आहे..
त्यासाठी त्यांनी स्वतःला घातलेल्या नियमांचा अभ्यासच केला पाहीजे!
कपड्यापासून संसारापर्यंतचे असंख्य मोह त्यांच्यासमोर आले नसतील..? 
आपल्याला साधी पाणीपुरीची गाडी दिसली तरी मोह आवरत नाही!
पण काय निर्धार असेल..? काय श्रद्धा असेल..? काय समर्पण असेल स्वरांसाठी..!

आमच्या सुदैवाने लहानपणीपासूनच आमच्या आईवडिलांनी चांगल्या गाण्याचे, चांगल्या साहित्याचे संस्कार केले..
सकाळ व्हायची तीच मुळी रेडिओने! त्यामुळे नकळत्या वयातच काही आवाजांनी मनावर गारुड घातलेलं..चांगलं संगीत म्हणजे उत्तम शब्द, उत्तम संगीत आणि उत्तम स्वरसाज यांचं मिलन असतं हे नकळतपणे मनावर बिंबवलं गेलेलं. 
त्यामुळे हल्लीची ८०% गाणी ही खरंच संगीत प्रकारात मोडण्याइतकी तरी बरी आहेत का? हा प्रश्नच पडतो आणि आजही असंख्य भारतीय जुनं सिनेसंगीत ऐकणं पसंत करतात..

दीदी नाही, गानसरस्वती नाही, गानकोकिळा नाही तर तमाम भारतीयांच्या मनामनात रुजलेली, अंकुरलेली ती लताच!

आमच्या पिढीने मागच्या पिढीकडुन ऐकलेले उद्गार हे असेच आहेत..ऐकलं की खरंच असं वाटेल की ही लता म्हणजे रोज चहाला येणाऱ्या कुणी ओळखीच्या बाईच आहेत!
पण त्यांच्यासाठी लता म्हणजे तितकीच जवळची आहे!

"काय साला आवाज आहे लताचा!" असं मी कित्येकदा ज्येष्ठ मंडळींच्या तोंडून ऐकलं आहे!

विद्यार्थी म्हणून विचार करायला गेलं तर, एकेका गाण्याचा अभ्यास केला तर किती बारीक बारीक जागा, त्यातलं एक्सप्रेशन, कुठे श्वास घेतला असेल हा विचार करुनच अचंबित व्हायला होतं!

पू लं म्हणतात तसं लता ही एकमेव गायिका आहे जिचा आवाज प्रत्येक सेकंदाला जगात कुणी ना कुणी ऐकत असेल!

विचार करा, काय भव्यता आहे!
पण आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की नुसता आवाज नाही, तर चांगलं संगीत त्यांनी पोहोचवलंय..
त्यांनी काहीही गायलं असतं तरी ते चांगलंच झालं असतं.. पण त्यांनी काहीही गायलं नाही !

आज जर आपल्याला त्यांना श्रद्धांजली द्यायची झाली, तर आपलं हे कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला चांगल्या संगीताची ओळख करुन दिली पाहिजे. 
त्यांच्या कानावर चांगलं संगीत पडलं पाहीजे..
पुढील अनेक पिढ्यानी या गानसारस्वतीची पूजा केली पाहिजे!
पुढच्या अनेक पिढ्यात जन्माला येणारी मुलं त्यांच्या अंगाईने झोपली पाहीजेत..
प्रत्येक प्रेमिकेने मेरा साया साथ होगा म्हंटलं पाहिजे..
देशाच्या प्रत्येक जवानाची किंमत ए मेरे वतन के लोगो ऐकून कळली पाहिजे..
पुढील अनेक पिढ्या काय, या जगाच्या अंतापर्यंत हे सगळं करण्याची ताकद त्या आवाजात आहे..
आणि म्हणून लता खऱ्या अर्थाने अजरामर आहे!
कारण..

उसकी आवाजही पेहचान है..

©राधा_उवाचं..

- कांचन लेले

Monday 31 January 2022

असं कधी होतं का तुमचं..?!


असं कधी होतं का तुमचं…?


आनंदाचं उधाण येतं! चेहऱ्यावर सतत स्मित विलसतं…येणाऱ्या जाणाऱ्याला प्रसन्न करतं..कोणी अगदी धक्का दिला तरी मन म्हणतं "छोड दिया आज! तू भी क्या याद रखेगा..?"…
सरळ वाटेने न जाता वाकडी वाट करुन काहीतरी आवडीचं करतं..उगाचच एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन करतं…
मधेच स्वतःसाठी एखादं चाफ्याचं फुल घेतं..बसने न जाता सरळ रिक्षात बसुन मोकळं होतं..उगाच स्वतःचेच लाड करतं!

.

.

असं होतं का कधी तुमचं..?

.

.

स्वच्छ आभाळात क्षणात मळभ दाटतं..ऐन थंडीत पावसाची सर झेलतं..
नेहेमीच्या वेगात काम करत असताना एखादी कटू आठवण मनाची तार अशी छेडून जाते, की ती तुटून डोळ्यात
टचकन पाणीच येतं ..
मग क्षणात आपण कुठे आहोत हे लक्षात येतं..
काहीतरी करुन मग मन डोळ्यातलं पाणी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतं..
हळूच कुणी बघितलं नसेल ना म्हणून आजूबाजूला डोकावून बघतं…आणि पुन्हा कामात व्यस्त होतं, पण ते लपवलेले अश्रू उशीवर डोकं टेकताच रिते करतं...

.

.

असं होतं का कधी तुमचं..?

.

.

प्रचंड आनंदी वातावरणात सगळीकडे उत्साह असताना, एखादं मंगलकार्य असताना, आपलं आनंदी मन उगाचच एका शंकेच्या पालीने चुकचुकतं..
मग उगाच कुणाची दृष्टच लागेल का सगळ्याला..?
सगळं अगदी सरळ कसं पार पडलं..?
मग आता काही विघ्न येईल का..?
असे एक ना अनेक विचार करत त्या क्षणाच्या आनंदाला थोडं का होईना, पण मुकतं..

.

.

असं होतं का कधी तुमचं..?

.

.

आपलं मन, आयुष्यातले मोठा निर्णय घेताना स्वतःपेक्षा बाकीच्यांचाच विचार करतं..
"आपलं सुख-दुःख" या पलीकडे जाऊन आपल्या निर्णयाने बाकी सगळे खुश होतील ना..? मग ठीक! असा विचार करतं..
पण मग काही दिवसांनी मात्र मागे वळून बघताना आपण चुकलो की काय असं वाटून हळहळतं..पण तेव्हा..? तेव्हा हातात काहीच राहिलं नसतं…

.

.

असं होतं का कधी तुमचं…?

.

.

आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वपूर्ण आनंदाची घटना घडते! ती जिवश्च कंठश्च मित्राला सांगायला मन धावतं..
पण मग त्याच्याकडून, त्याच्या आयुष्यात आलेला कटू प्रसंग कळून क्षणात स्वतःच्याच आनंदावर विर्जण पडतं..
स्वतःसाठी आनंदी व्हावं..? की त्याच्यासाठी दुःखी..?

अशा कात्रीत मन सापडतं..आणि मग उगाचच देवाला या परिस्थितीचा जाब विचारतं..

.

.

असं कधी होतं का तुमचं..?

.

.

अशा आनंद-दुःखाच्या किनाऱ्यावर असताना, असं काहीतरी लिखाण हातून होतं..

मग हे आत्ताच कुठे टाकलं तर त्या मित्राला आपली अवस्था कळेल, म्हणून लिहिलेलं सगळं ड्राफ्ट म्हणून मोबाईल मध्ये पडुन रहातं..

आणि मग अनेक अनेक दिवसांनी फोनची स्वछता करताना वरची जळमटं दूर केली, की खाली खजिन्यासारखं सापडतं!

दुसऱ्याचं मन जपण्यासाठी स्वतःचं मन मारुन त्या वेळेला घेतलेला जड निर्णय कधीतरी अचानक समोर येऊन मन सुखावतं!

.

म्हणून, असं कधी होत असेल तुमचं, तरी ते चांगलंच असतं बरं..

कारण जे चांगल्या मनाने केलं जातं त्याचे चांगले परिणाम उशिराने का होईना, पण उपभोगायला मिळतातच !

.

१३-१२-२०१९ ला लिहिलेलं,

आज गवसलेलं, 

शेवटच्या ओळी लिहून तुमच्यासाठी सादर..

©राधा_उवाचं..

Picture Credits - ©Swapnil Bhade