Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Thursday 12 October 2023

प्रवासाचा प्रवास...

प्रवास...


जन्माला यायच्या आधीपासून सुरु असतो तो अनेक फेऱ्यांचा प्रवास..

आईच्या पोटात आल्यापासून सुरू होतो तो जीवनाचा प्रवास...

आणि जन्म झाल्यावर सुरु होतो तो प्रवासाचा प्रवास!

माझा प्रवास सुरु झाला तो बहुतेक कोकणापासून..लहानपणी  कोकणात जाणं म्हणजे एक पर्वणीच असायची!

तेव्हा किती सहज उपलब्ध होतं सगळं...

नजर जाईल तिथवरची हिरवळ...त्यातल्याही विविध छटा..

शुद्ध हवा..लाल माती...कोसळणारा पाऊस.. तो मातीचा गंध..

आहा!

तेव्हा हे सगळं लक्षात यायचं वय नव्हतं..आता मात्र त्याचं महत्व चांगलं कळतं, पण द्यायला तेवढा वेळ कुठून आणता..?!

मुंबईसारख्या शहरात रहाणाऱ्या माणसासाठी कुठलाही निसर्गाजवळ जाणारा प्रवास म्हणजे अप्रुपच!

यातही जे "भटके" म्हणून जन्माला येतात, त्यांना लागलेलं व्यसन म्हणजे प्रवास!

मी अनेक प्रांतात थोडे थोडे दिवस जाऊन आले आहे.. सुरवात झाली ती उत्तराखंड पासून!

हरिद्वार, हृषीकेश, बद्री-केदार... आणि तिथला सगळा परिसर म्हणजे स्वर्गच जणू! त्या प्रवासाने मला जागं केलं.. 

आपल्या देशाची नवी ओळख करुन दिली.. तिथल्या निसर्गाने मोहिनी घातली.. आणि या भारत भूमीच्या सौंदर्याचं गारुड दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेलं!

मग काही भ्रमंती थांबली नाही.. 

गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी (पॉंडीचेरी), केरळ, ओरिसा अशी सर्वत्र भ्रमंतीला सुरवात झाली..

आणि आपला महाराष्ट्र तर आहेच! तो अजून पालथा घालायचाच आहे..

यातल्या काही राज्यात एका पेक्षा जास्ती वेळा जाणं झालं.. नंतर काही वेळा कामा निमित्त जाणं झालं..पण कधीच कंटाळा आला नाही... उलट जितके वेळा जाऊ, तेवढं काहीतरी नवीन गवसत जातं!

यावेळी मात्र मीच खूप प्रश्न विचारले स्वतःला..

या प्रवासाचा काय प्रवास आहे?

आपण का करतो प्रवास?

काय मिळतं त्यातून?

आनंद? सुख? समाधान? आणखी काही?

आणि तेही कुठल्या प्रकारचं?

उत्तर मिळालं खरं...

आनंद, समाधान याहीपेक्षा मिळतं ते सुख..

पण ते ना फक्त शारीरिक, ना फक्त मानसिक..

ते असतं शारीरिक-मानसिक सुखाच्या पलीकडे जाऊन आत्म्याला हात घालणारं आत्मिक सुख!

नुसतं बाहेर पडलं तरी मन आपोआप शांत होऊ लागतं..

शहरात आपण ज्या वेगाने धावतो, त्याच्या कैकपटीने आपलं मन धावत असतं!

प्रवासात जितकं रिकामं रहाता येईल तितकं रहावं..

त्या धावणाऱ्या मनाला शांत होऊ द्यावं...

फक्त श्वास घेत रहाणं एवढंच काय ते करावं!

बदलणारी हवा कानावरून गेली की डोक्यातून वाहते ती मनात साचलेल्या विचारांची दुथडी भरलेली नदी! 

वाहू द्यावं तिला..अवखळ...निरभ्र होईपर्यंत..

येतात मग वाहत अनेक प्रश्न..

अनेक आठवणी..

अनेक मनसुबे..

अनेक स्वप्न..

अनेक हिशोब..

अनेक विचार..

वाहू द्यावं त्यांना...

मधेच घ्यावे ओंजळभर विचार हातात आणि उतरवावे असे कागदावर!

पूर्वी झपाटल्यासारखी फिरायचे मी...जितके दिवस असतील तेवढ्यात पालथं घालता येईल तेवढं सगळं बघायचे..सकाळीच लवकर बाहेर पडायचं ते अगदी पाय बोलायला लागले की मगच परत यायचं!

आता मात्र त्या प्रवासाला एक ठेहराव आला आहे असं शांतपणे विचार केल्यावर जाणवतं! आता घाई नसते सगळं पालथं घालायची..

उलट वाटतं बाकी शून्य करु नये.. थोडा बॅलन्स ठेवावा, परत येण्यासाठी!

हा फरक जाणवायला लागला तो मात्र कोविड नंतर..

नोव्हेंबर २० ला ऐन कोविड मध्ये हृषीकेशला गंगेकिनारी बसताना मनात काय काय येऊन गेलं!

ती हिरवट निळी, फेसळणारी पवित्र गंगा मैय्या मनात किती साठवावी..? 

त्यावेळी घरातून निघतानाच ठरवलेलं..ही ट्रिप unplanned करायची.. अगदी सकाळ संध्याकाळ फक्त घाटावर जाऊन बसायचं.. 

आणि तसंच झालं! 

दिनक्रमच असा झाला की सकाळी उठायचं, घाटावर जायचं..

मग चालत जेवढं पालथं घालता येईल तेवढं घालायचं, पण ते नदिभोवतीच!

राम झुला ते लक्ष्मण झुला.. असा वर्तुळाचा प्रवास..

गंगेची प्रदक्षिणा!

तिथे गंगेकिनारी बसून हे उमगलं की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडलं की ते सगळे कप्पे बंद करायचे..

मागे काय सोडून आलो आहोत, किती काम पेंडिंग आहे, घरचे काय करतायत, सोशल मीडियावर काय चाललंय, हे सगळं सगळं पुसट करायचं...

आणि करायचा फक्त प्रवास...


एकाग्र करणारा.. 

उघडे ठेवायचे कान, त्या शहराचा आवाज साठवायला!

उघडे ठेवायचे डोळे त्या शहराची प्रत्येक चौकट साठवायला!

उघडं ठेवायचं नाक त्या शहराचा गंध साठवायला!

आणि उघडं ठेवायचं मन, त्या शहराला साठवायला!

अशा प्रवासाला निघाल्यावर त्या त्या प्रांतातल्या भूमीवर पाऊल ठेवल्यापासून त्या शहराची स्वभाव वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी मन आतुर असतं!

या भूमीवर शेकडो-हजारो वर्षांपूर्वी कोण महात्मे येऊन गेले असतील..? काय कार्य करुन गेले असतील..? कधी साक्षात परमेश्वरही!

त्यांच्या पाऊलखुणा असतील का या धरततीत? त्यांचे उश्वास असतील का याच हवेत..? त्यांचे विचार असतील का आजही आचरणात..?

प्रत्येक प्रांताची एक लय असते.. 

प्रत्येक शहराचा एक गंध असतो..

आणि प्रत्येक प्रांतातील लोकांची एक ठेवण असते!

मुंबईसारख्या माणसांची भेळ असलेल्या ठिकाणी फिरताना माणसं ओळखायला हा प्रवास फार फार मदत करतो!

आणि प्रवासादरम्यान भेटलेली माणसं मात्र कायम लक्षात राहतात!

प्रत्येक शहराचे दोन भाग असतात..

एक अतिशय उच्चभ्रु..आणि एक अतिशय सामान्य..

गेल्यावर दोन्ही भागात मात्र जरुर फिरावं!

उच्चभ्रू भागात गेल्यावर दिपतात डोळे, दिसतं ते त्या शहराचं वैभव आणि सामान्य भागात गेल्यावर दीपतं ते मन.. साध्या खेडूत माणसांच्या मायेने..तिथे दिसते ती त्या शहराची संस्कृती!

एखादी अगदी साधी दिसणारी आजी जेव्हा पटकन बोटं मोडून "नजर ना लगे" म्हणते तेव्हा कोण धन्य वाटून जातं!

कोण ही बाई? तिचा माझा संबंध काय? का वाटावी तिला ही माया?

वाटणारच म्हणा, कारण माझ्या मातीतच आहे की ती! अपरंपार माया..!

प्रवासात सोबतही फार महत्वाची...ती पूरक असेल तर आनंद द्विगुणित होतो, आणि नसेल तर मात्र सगळा विचका व्हायला वेळ लागत नाही! माझ्या सुदैवाने मला कायम चांगलीच सोबत मिळाली..त्यामुळे कधी एकटं फिरण्याचा योग आला नाही. पण एकदा तरी सोलो ट्रिप करायचीच होती! ती संधी या यावर्षी आली! जाताना थोडी धाकधूक वाटत होती की करमेल का आपल्याला? काय करु आपण एकटे? पण तरी निग्रहाने गेले!

आणि गेल्यावर मात्र सगळे प्रश्न निकालात निघाले.. 

कारण सोबतीचा आनंद हा स्वतःबरोबरही मिळू शकतो..फक्त स्वतः आपलं सोबती होता आलं पाहिजे!

त्यातही एक वेगळाच आनंद असतो..

सात दिवस मी हॉस्टेल मधे राहिले..एक scooty रेंट केली आणि तेव्हाच पहिली सोलो राईड सुद्धा केली..त्याबद्दल सविस्तर पुढच्या ब्लॉग मधे लिहायचा प्रयत्न करेन!

पण एकूणच काय, निसर्गाच्या सानिध्यात असताना कुणाच्याही सोबतीची गरज पडत नाही एवढं निश्चित!

उलट आपण आणखी ओपन होत जातो.. आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करु लागतो..अगदीच कुणी क्लिक झालं की त्या अनोळखी माणसांशी सुद्धा मस्त गप्पा होतात!  त्यांचे अनुभव कळतात... आणि हॉस्टेल मधे रहाताना तर अनेक प्रांतातून अनेक प्रवास करुन आलेली लोकं भेटतात! प्रत्येकाची एक गोष्ट असतेच की.. आणि अशा माणसांच्या गोष्टींनी भरलेला प्रवास अधिक बहारदार होतो!

असेच २-४-६-७ दिवस या सगळ्याss मायेच्या पगड्याखाली जातात..

आठव्या दिवशी मात्र ओढ लागते ती घरट्याची..

तिथली माया कोण वर्णावी..? आपली माणसं ती आपलीच.. 

आणि निघायच्या दिवशी मनात सुरू होतात पुढच्या कामांचे विचार कारण एव्हाना बॅटरी फुल्ल चार्ज झालेली असते!

परतीचा प्रवास मात्र कायमच कंटाळवाणा असतो..

प्रवासाने मन भरलेलं असतं, आणि पुढचं क्षितिज खुणावत असतं...

मग कधी एकदा घर दिसतंय असं होतं..

पण थोडाफार प्रवास केल्यावरही एक मात्र खरं,

मनुष्य जन्म मिळणं भाग्याचं..

त्यात तो माझ्या भारतभूमीत मिळणं अहो भाग्याचं...

आणि त्यातही तो माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत मिळणं परम भाग्याचं!!

दिल्लीहून वाराणसीला जातानाच्या प्रवासात सुरु केलेलं लिखाण,

वाराणसीच्या गंगेत बुडालेल्या विचारांची कास धरुन 

मुंबईच्या फ्लाईट मध्ये परतीच्या प्रवासात सुफळ संपूर्ण!

~ राधा ~

०९-१०-२०२३

©कांचन लेले